आधी ज्यात सुधारणा करायची आहे त्या परिस्तितीतील परस्पर व अपरस्परसंबंध तपासावे लागतात. जसे, जगामध्ये कोट्यवधी माणसं व घटक आहेत आणि ह्यामुळे ह्या दोघांतील परस्पर संबंधसुद्धा अनंत असतील. ढोबळतेने ह्या संबंधांचे दोन विभाग करता येतील- परस्परसंबंधीत व असंबंधीत.
परस्परसंबंधीत घट्कांमध्ये एखादा उद्देश असु शकतो व त्याचा तर्क लावता येऊ शकतो- उदा-
१. कारण आणि परिणाम: आगीचे कारण सिगारेटचे थोटूक होते
२. विरोध: आग आणि पाणी
३. साधर्म्य: लाकडी आणि लोखंडी फडताळ
४. घनिष्टता: टेबल आणि खूर्ची
चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे)
१. भावंडं
२. पति आणि पत्नी
३. मित्र
४. पालक आणि मुलं
हे परस्परसंबंध लक्षात ठेवले तर ज्याची मिमांसा करायची आहे अशा घटकांची चिकित्सा करता येते. काही प्रश्न स्वतःला विचारता येतात:
१. ह्या घटकांवर काय परिणाम करत आहे?
२. विरोधी बाबी/मुद्दे काय आहेत?
३. कशात साधर्म्य दिसत आहे?
४. काही गोष्टी नेहमीच एकदम प्रकट होत आहेत का?
अशा प्रकारचे विचारचक्र आपल्याला मदत करु शकते.
ज्यात बदल करायचे आहेत ती आपल्याला दिसणारी वस्तुस्थिती ही एकतर ठळकपणे जाणवते अथवा खूप वरवरची/कल्पित दिसत असते.
ठळकपणे जाणवणारी घटना आपल्याला आपल्या चेतनांद्रीयांनी अनुभवता येते- वास, चव, ऐकणे, स्पर्श आणि पाहून. कल्पित किंवा (असेही म्हणता येईल- मनोमन पाहीलेल्या) घटना आणि ठळकपणे जाणवणाऱ्या घटना ह्यात काय परस्परसंबंध लावता येतील हे समजणे पुढची पायरी असते. अर्थातच ह्या कल्पित असणाऱ्या घटकांचा ठळक दिसणार्या घटकांशी संबंध लावणे फार अवघड असते.
परिणामत: जेव्हा आपल्याला सुधारणा करायची असते तेव्हा नुसत्या ठळकपणे जाणवणाऱ्या घटकांच्याही पुढे गेल्याशिवाय ती साधता येत नाही- ती सुधारणा वरवरची होऊ शकते. त्यासाठी त्या न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या कल्पित अशा घटकांचा सतत पाठपुरावा करणे आवश्यक असते. बघा प्रयत्न करुन! (परवा मी लिहिलेल्या "चहा व वाफप्रक्रीया" ह्यातील त्या डोकेबाज माणसाने सुधारणा घडवण्यासाठी अशाच मार्गाचा वापर केला.)
[आधारीत]
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 12:36 am | धनंजय
रोजव्यवहारातले उदाहरण घेतो - ही मीमांसा ठीक आहे का :
सुधारणा करायची परिस्थिती - मला आता फार उकडत आहे.
यातले घटक काय - (१) मी, (२) खोलीतली बंदिस्त हवा, (३) पंखा, (४) वातानुकूलन यंत्र, (५) माझे बजेट, (६) जगाचे पर्यावरण
(यांच्यामधील परस्परसंबंध १५ आहेत! त्या सर्वांविषयी चर्चा करणार नाही.)
१. कारण आणि परिणाम: (यात मला प्राथमिक वाटणारे घटक): (अ) खोलीतल्या बंदिस्त हवेचे तापमान वाढले आहे, आणि दमटपणा खूप आहे, या कारणाचा परिणाम म्हणून मला उकडत आहे. (आ) खोलीत पंखा चालू नसल्यामुळे मला उकडत आहे. (इ) खोलीत वाताकूलन बंद पडले आहे म्हणून तापमान आणि दमटपणा वाढला आहे. (ई) मला आर्थिक नियोजनासाठी पैसे वाचवायचे आहे म्हणून वातानुकूलन बंद ठेवले आहे, परिणामस्वरूप तापमान-> उकाडा... (उ, ऊ, ए, ऐ... वगैरे)
२. विरोधी बाबी/मुद्दे काय आहेत? ??? कोणास ठाऊक. (अ) कदाचित आताच कढत चहा प्याल्यामुळे मला उकडत असल्याचा भास होतो आहे? (आ) खोली खरे तर बंदिस्त नाही, दोन खिडक्या उघडून वार्याचा झोत निर्माण होऊ शकतो? ???
३. कशात साधर्म्य दिसत आहे? घटकांमध्ये तर कुथलेच साधर्म्य दिसत नाही :-( घटक नसलेल्या गोष्टींशी साधर्म्य दिसते आहे. (अ) मागे मला खोलीत हीटर चालू नव्हता तेव्हा कडाक्याची थंडी वाजत होती ते "यंत्र बंद असण्या"चे साधर्म्य आहे. ???
४. काही गोष्टी नेहमीच एकदम प्रकट होत आहेत का? माहीत नाही. हळूहळू उकडू लागले. सकाळी उकडत नव्हते. हं दुपार आणि उकाडा एकदम प्रकट झाले असे म्हणता येईल.
- - -
मला वाटते मुद्दा १ वरून मी पर्याप्त पैसे असल्यास, आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दल काळजी कमी करू शकल्यास वाताकूलन यंत्र सुरू करावे. नाहीतर पंखा लावावा. मुद्दा २ वरून नुसतीच वाट बघावी, उकाडा वाटायची भावना निघून जाईल, किंवा खिडक्या उघडून बघाव्यात. मुद्दा ३ आणि ४ यांची उपयुक्तता या बाबतीत फारशी जाणवली नाही.
- - -
समस्या सोडवण्यासाठी (सुधारणा करण्यासाठी) एक कृतिक्रम (अॅल्गोरिदम) देण्याची कल्पना स्तुत्य आहे.
पण मला तंतोतंत पटलेली नाही. इतकेच काय हे चाचणीचे उदाहरणही मुळीच समजलेले नाही.
चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे)
१. भावंडं - साधर्म्य (एकमेकांत तेच मातापिता असल्याचा संबंध)
२. पति आणि पत्नी - साधर्म्य (एकमेकांत तेच विवाहबंधन असल्याचा संबंध)
३. मित्र - साधर्म्य (एकमेकांत तेच सौहार्द्य असल्याचा संबंध)
४. पालक आणि मुलं - साधर्म्य (एकमेकांत तेच कुटुंबत्व असल्याचा संबंध)
(पण फक्त क्रम बदलला आहे, म्हणजे एकच साधर्म्य हवे... बाकी विरोध, घनिष्ठता आणि कार्यकारणभाव हवा.)
असे म्हणावे की माता-पिता यांना कारण आणि पुत्र-पुत्री यांना परिणाम म्हणावे? की "तुझ्यामुळे मी झाले आई" म्हणणारी माता परिणाम, आणि तिला माता बनवणारे बाळ कारण?
भावंडे त्याच वस्तूसाठी भांडत असतील (मी आणि माझा भाऊ "चांदोबा"साठी भांडत असू तसे) तर विरोधी म्हणायचे? मग पालक-पाल्य यांच्यामधील भांडणांना विरोध म्हआयला काय हरकत आहे?
मित्र-मित्र घनिष्ट म्हणावेत का?
चाचणीने तर माझी विकेटच उडवली आहे!
- - -
चहासाठी थंड तुषारांचे धुके वापरण्याची कल्पना खरेच अशा अॅल्गोरिदममधून आली होती का? (की त्या चतुर स्फूर्तीला अॅल्गोरिदममध्ये बळेच बसवले आहे?) नसल्यास विचार करायच्या नैसर्गिक पद्धतींना वाव देणारा अॅल्गोरिदम तयार करावा असे मला वाटते.
पण कदाचित वरील कृतिक्रमातून ही कल्पना जन्माला आली असू शकेल. हेसुद्धा पटते. वरील कृतिक्रम औद्योगिक अभियांत्रिकी (इंडस्ट्रियल इंजिनियरिंग)मध्ये अधिक उपयोगी पडेल असे मला वाटते - कारण अपेक्षित उत्पादन, कृतीचा हेतू, फायदा-तोटा-खर्च या गोष्टी हिशोबात घेता तरी येतात.
- - -
मानव्य समस्यांच्या बाबतीत मात्र पुष्कळदा अशी उकल जमणे कठिण असते. सध्या संयुक्त राष्ट्रे (अमेरिका) येथे आरोग्यसेवेतील सुधारणा मोठी चर्चेत आहे. खर्च कमी हवा, सेवेत मर्यादा नको, सर्वांना सेवा मिळायला हवी, पण कोणावर विमा घेण्याची सक्ती नको... कितीतरी परस्पर-प्रतिषेधक मुद्दे बोलले जात आहेत. होईल तर समस्येचे समाधान होणार नाही, तर त्यातल्या-त्यात चालेल असा तह होईल, तडजोड होईल. अशा प्रकारच्या सुधारणांसाठी खूपच वेगळा कृतिक्रम लागेल, असे मला वाटते.
5 Aug 2009 - 1:17 am | लिखाळ
आपल्या दोघांचा विद्वत्ताप्रचूर संवाद वाचून माझी विकेट उडाली आहे :) (ह घ्या)
सहमत आहे.
थोडे वेगळे - समस्येचे निवारण का करायचे त्याची भूमिका स्पष्ट असणे आणि ती जास्तीतजास्त व्यापक कल्याणाची असणे जरूर आहे. ती भूमिका कशी बनावी या बद्दलचे शिक्षण लोकशिक्षण देणार्यांनी करायला हवे. (तसे ते करतही असतात). अजय भागवतांच्या या आधीच्या धाग्यांत सुद्धा मी या ना तर्हेने हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला आहे.
विचार कसा करायचा या बद्दल, तर्काबद्दल अजयरावांनी या पूर्वी लिहिले आहे. या मागे माणसाची भूमिका काय असावी या बद्दल जाणून घ्यायची मला नेहमी उत्सुकता असते.
-- लिखाळ.