तिने केली एक कविता

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
1 Aug 2009 - 4:52 pm

तिने एक कविता केली
अन् विचारले "कशी वाटली"?
मी म्हणालो
"नदी, झरे, चांदण्यांची
पान भरुन दाटी झाली"

कविता कशी हवी
वास्तवदर्शी अन् आरस्पानी
काळजाला भिडणारी
मनाला जरा पिडणारी
विचार करायला लावणारी
अन् काळाबरोबर धावणारी
(म्हणजे नको नॉस्टेलजिक )

ती म्हणाली " अरे ,आपण
वास्तवतर जगतोच आहोत
मग कविता हवी कशाला
तू वास्तवाच्या ऐदीसाठी
स्वप्ने घेतोसच कि उश्याला.

कवितासुध्दा एक स्वप्न -
मुक्त विचारांना पडलेलं
त्यामध्ये मग काहिही येईल
पानं, फुलं, टोपड, झबलं

कवितेतलं वास्तव म्हणजे
नक्की रे असतं काय ?
-वास्तवतेच्या भावनांना
कल्पनेचेच ना असतात पाय ?

नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?

कविता

प्रतिक्रिया

पोलिसकाका_जयहिन्द's picture

1 Aug 2009 - 5:03 pm | पोलिसकाका_जयहिन्द

नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?

मनाला भावली कविता... मस्तच....

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

मनीषा's picture

1 Aug 2009 - 5:40 pm | मनीषा

प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?
-----अगदी खरं
कविता आवडली ..

क्रान्ति's picture

1 Aug 2009 - 7:59 pm | क्रान्ति

कवितासुध्दा एक स्वप्न -
मुक्त विचारांना पडलेलं
त्यामध्ये मग काहिही येईल
पानं, फुलं, टोपड, झबलं
अगदी खरंय!
पिंपळपान तर सुरेखच!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

राघव's picture

1 Aug 2009 - 8:51 pm | राघव

छान लिहिलेत.
भावना नेमक्या पोचल्यात. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

संदीप चित्रे's picture

1 Aug 2009 - 9:43 pm | संदीप चित्रे

केलेला कवितेचा शेवट खूप आवडला :)

शशिधर केळकर's picture

1 Aug 2009 - 10:16 pm | शशिधर केळकर

छान आहे कविता - सरळ सोपी, विचार थेट पोचवणारी.
मजा आली. अजूनही येऊद्या!

अनिरुध्द's picture

2 Aug 2009 - 2:09 am | अनिरुध्द

लै भारी कविता. आवडली.
नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?
हे तर खुपच छान आहे.

विसोबा खेचर's picture

2 Aug 2009 - 8:50 am | विसोबा खेचर

कवितासुध्दा एक स्वप्न -
मुक्त विचारांना पडलेलं
त्यामध्ये मग काहिही येईल
पानं, फुलं, टोपड, झबलं

क्या बात है..!

तात्या.

अश्विनीका's picture

2 Aug 2009 - 1:00 pm | अश्विनीका

सुंदर कविता.

नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?

हे कडवं तर खूपच आवडलं.

- अश्विनी

दत्ता काळे's picture

3 Aug 2009 - 11:21 am | दत्ता काळे

पोलीसकाका, मनीषा, क्रांती, राघव , संदीप चित्रे, शशिधर केळकर, अनिरुध्द, विसोबा खेचर आणि अश्विनीका - प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद.

यशोधरा's picture

3 Aug 2009 - 12:11 pm | यशोधरा

शेवटचं कडवं अतिशय आवडलं.

धनंजय's picture

3 Aug 2009 - 7:24 pm | धनंजय

तिने "नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली" म्हणजे भारंभार पिंपळपानेच शिवलेले पुस्तक दिले होते? की पुस्तकात एखादेच पिंपळपान असलेली कविता दिली होती (आणि अतिगद्य अशा "त्या"ला ती उगाच भरगच्च वाटली होती)? कारण तिची कविता खरीच खचाखच भरलेली असेल, तर "एखादे पिंपळपान" हे तिचे समर्थन अप्रस्तुत आहे.

आणि हृदयाला भिडणारी विचार करायला लावणारी कविता मात्र नॉस्टॅल्जिक नकोच हे त्याचे म्हणणे काहीच्या काहीच वाटले.

"तो" हे एक चालते-बोलते विचार-करते पात्र, खरीखुरी व्यक्ती आहे हे पटले नाही. कोणालातरी भलताच गद्य म्हणून मग स्वतःच्या भावुकतेला छान-छान म्हणण्यासाठी बनवलेले बुजगावणे = "तो", असे वाटते.

समर्थ भावुकता दाखवण्यासाठी या कवितेला खूप गर्भित शक्यता आहे, ती थोड्याच पुनर्विचाराने मूर्तिमंत होऊ शकेल.

तिने "नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली" म्हणजे भारंभार पिंपळपानेच शिवलेले पुस्तक दिले होते? . .की पुस्तकात एखादेच पिंपळपान असलेली कविता दिली होती (आणि अतिगद्य अशा "त्या"ला ती उगाच भरगच्च वाटली होती)? कारण तिची कविता खरीच खचाखच भरलेली असेल, तर "एखादे पिंपळपान" हे तिचे समर्थन अप्रस्तुत आहे.

- मला वाटते, त्याचे म्हणणे असे होते कि, हि नेहमीचेच पारंपारीक धाटणी असलेले हे निसर्गकाव्य वाटते. त्यासाठीच त्याने 'नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली' असे उपरोधाने शब्द वापरले आहेत. आणि कवितेमधले पिंपळपान हे खरेखुरे नसून मनात असणार्‍या जुन्या आठवणींचे द्योतक आहे. कविता वाचताना कागदाची पानेच्या पाने भरून पिंपळपाने जोडली आहे असे भासंत असेल, तर मग कविता निश्चितच आशयाचा लय बिघडवणारी होईल, पण कविता परत परत वाचताना मला असे जाणवले नाही.

हृदयाला भिडणारी विचार करायला लावणारी कविता मात्र नॉस्टॅल्जिक नकोच हे त्याचे म्हणणे काहीच्या काहीच वाटले.
- पण असा विचार त्याचे तथाकथीत श्रेष्ठत्व दाखवण्याकरता केला असेल.

"तो" हे एक चालते-बोलते विचार-करते पात्र, खरीखुरी व्यक्ती आहे हे पटले नाही. कोणालातरी भलताच गद्य म्हणून मग स्वतःच्या भावुकतेला छान-छान म्हणण्यासाठी बनवलेले बुजगावणे = "तो", असे वाटते.
- हे तुमचे म्हणणे पटले नाही, कारण शेवटची चार कडवी - ह्यातला संवाद, गद्य स्वरूपात जर, विचारात आणला तर कदाचित असं जाणवेल, कि सत्यातसुध्दा 'ती'ने केलेल्या कवितेची 'त्या'ने अश्या प्रकारची हेटाळणी केल्यावर, तिला वाईट वाटून, नंतर आलेल्या रागापोटी ती हे नक्कीच म्हणेल. मग ह्यात भावुकतेला छान-छान म्हणण्यासाठी निर्माण केलेला 'तो' बुजगावणे आहे असं कसं म्हणता येईल ? सत्यात अशी बुजगावणी नसू शकतात ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिच्या कवितेच्या ( पर्यायाने तिच्या विचारांच्या) तात्कालिक अवमानाची गडदता अश्याप्रकारे अधोरेखीत केली असेल तर त्यात काय चुकलं. तुमच्याच एका कवितेला दिलेल्या प्रतिक्रियेत असा अर्थ होता कि, कविता शब्दांच्या कल्पक रचनेने नटलेली असते. मग हि थोडीफार तरी कल्पक रचना वाटंत नाही कां?

सत्यात अशी बुजगावणी नसू शकतात ? - ह्याचा अर्थ बायकोचे चिडणे बघून समजुतीने शांतपणे राहणारे नवरे नसू शकतात कां ? मग कवितेमध्ये निर्माण केलेला 'तो' कसा बेगडी वाटू शकतो ?

धनंजय's picture

3 Aug 2009 - 9:30 pm | धनंजय

उपमा या द्योतक असतात (पिंपळपाने खरीखरची नाहीत), असे जाणूनच वरील सुचवणी केली आहे. :-) माझ्या प्रतिसादातही ती द्योतकच आहेत.

जर "पारंपरिक धाटणीच्या कवितेत नॉस्टॅल्जिक प्रतिमांचा अतिरेक झाला" असे त्याचे म्हणणे यथार्थ असेल, तर "पुस्तकात एकच पिंपळपान आहे = कवितेत एखादीच उत्तम जुनी आठवण आहे" असे तिचे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. जर एखादीच सुयोग्य जुनी आठवण असेल, तर त्याला भासणारा पारंपरिक आठवणींचा अतिरेक म्हणजे काय? तर केवळ त्याला कविता नीट वाचता न येणे...

तुम्ही म्हणता :
> त्याचे तथाकथीत श्रेष्ठत्व
यातही तेच आले. "तथाकथित" म्हणजे "तसे म्हटले गेले तरी खरे नसलेले"...
हे "तो" पात्र बरेच मूर्ख आहे. कवितेत एक आठवण आहे, की गच्च पारंपरिक चित्रे आहेत, हे त्याला कळत नाही. त्याला स्वतःबद्दल खरे नसलेले श्रेष्ठत्व वाटते. म्हणून हे "तो" पात्र झोडपण्यासाठी बनवलेले बुजगावणे आहे, असे मला वाटते. तिने त्याचे बुजगावणे बनवलेले नाही. मला वाटले की कवीला काही सांगायचे आहे, आणि ती-तो यांच्या संवादाचे निमित्त करून कवी ते सांगत आहे. कवीने "कसले हे अरसिक लोक असतात" असे म्हणण्यासाठी "तो" नामक एक अरसिक बुजगावणे बनवले आहे, आणि मग "ती" पात्राने "त्या"ला झोडपले आहे. एकदा असला अरसिक मनुष्य कवीने उत्पन्न केला, मग ती त्याला रागाने असे काही म्हणू शकेल हे ठीकच आहे. मान्य.

ज्याला सौंदर्यदृष्टीच नाही अशी व्यक्ती जगात खरोखर सापडेल का? असतील म्हणा मेंदूचा रोग झालेली अशी काही पंगू मुले. पण रोजव्यवहारात प्रत्येकाला कशाततरी सौंदर्य, भावुकता जाणवतेच. ("माझ्या कविता कोणाला समजत नाहीत, लोक कसे अरसिक आहेत," असे कित्येक कवींना वाटते. पण ही त्यांची स्वतःला चुचकारणारी कपोलकल्पना होय.) पण हे सौंदर्यदृष्टीहीन "तो" पात्र या कवितेत निर्माण केले आहे. जे पात्र आधीच लंगडे आहे, त्याला फोल म्हणून सिद्ध करण्यात काय वैशिष्ट्य?

आता कवीच्या मनात "बायकोचे चिडणे बघून समजुतीने शांतपणे राहणारा नवरा" असे उदात्त पात्र असेल. जर "शांत-उदात्त पण अरसिक" असे बहुपदरी - बुजगावणे नसलेले - पात्र कवीला निर्माण करायचे असले, तर उत्तम. पण कवितेच्या शेवटी "पिंपळपानासारखी आठवणही न समजणारा" असेच "तो" पात्र वाचकासाठी शिल्लक राहाते. वरील प्रतिक्रियांवरून असे दिसते, की अनेकांना "ती"चे शेवटचे म्हणणे निर्णायक म्हणून पटते आहे.

जर "तो" कुठला ग्राह्य मुद्दा सांगता, आणि "ती"सुद्धा कुठला ग्राह्य मुद्दा सांगती, तर आस्वादाच्या, स्मरणरंजनाच्या वेगळ्या पैलूंबद्दल तुमचा बहुपदरी स्पर्श जाणवला असता. आता केवळ "किती अरसिक आहे तो - पुस्तकातले (द्योतक) पिंपळपानही न कळणारा" इतपतच भावना पोचते आहे. (प्रतिसादकांपैकी कित्येकांनी शेवटच्या चार ओळींना विशेष दाद दिली आहे.) ठीक आहे. पण "काही लोक किती अरसिक असतात" या जुन्या कवि-विलापापेक्षा अधिक खोल असण्याची शक्यता या कवितेत होती, आहे, अशी माझी सुचवणी आहे.

तुमच्याच एका कवितेला दिलेल्या प्रतिक्रियेत असा अर्थ होता कि, कविता शब्दांच्या कल्पक रचनेने नटलेली असते. मग हि थोडीफार तरी कल्पक रचना वाटंत नाही कां?

:-) संबंध कळला नाही. मला वाटले आस्वादाबद्दल आणि स्मरणरंजनाबद्दल विलक्षण नवा विचार करावा असा कवीचा मानस होता. (नव्हता का?) तो साधताना रचना कल्पक असावी, समृद्ध असावी, हे तर आहेच. कल्पकतेविषयी कुठलीच तक्रार नाही.

कविता चांगली आहे, पण त्याहून अधिक शक्यता तीत आहेत, असे मला म्हणायचे होते. "बुजगावणे" शब्द फार तीक्ष्ण वाटत असल्यास दिलगीर आहे. (पण जर कवितेत खूप शक्यता जाणवली नसती, तर गुळमुळीत बोथट प्रतिसाद लिहिला असता!)

बेसनलाडू's picture

4 Aug 2009 - 12:03 am | बेसनलाडू

धनंजय नि दत्ता काळे यांच्यातील चर्चा मनोरंजक आहे. वेळेअभावी इच्छा असूनही पुरेसे मतप्रदर्शन करता येत नाही, याचे वाईट वाटते आहे.
(चर्चेकरी)बेसनलाडू
कविता, त्यातील संवाद आवडला. शेवटच्या चार ओळी खास वाटल्या. चालू झालेली चर्चा कवितेतील विषयाला अनुसरूनच झाली आहे, हेही पटले.
(निरीक्षक)बेसनलाडू

अनिल हटेला's picture

4 Aug 2009 - 12:41 am | अनिल हटेला

नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये
असतेच ना एखादे पिंपळपान ?

सुरेखच......:-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

मी समजून घेण्यास कमी पडलो, कारण तुमच्या पहिल्या प्रतिसादावर लगेचच मी माझे विचार लिहिल्यानंतर, नंतर माझ्या लक्षात आले, कि तुम्हाला काय म्हणायचे आहे.

"बुजगावणे" शब्द फार तीक्ष्ण वाटत असल्यास दिलगीर आहे.

- तुम्ही दिलगीरी अजिबात व्यक्त करू नका, माझी तेवढी लायकीसुध्दा नाही. मुळात मला"बुजगावणे" हा शब्द तीक्ष्ण वाटलाच नाही. उलट Jigs of goads असेल तरच माझ्या कवितेची चाल योग्य राहील.

जसे वाटले तेच प्रतिसाद देत चला. त्याबरोबर तुम्ही सुरवातीला लिहिल्याप्रमाणे "समर्थ भावुकता दाखवण्यासाठी या कवितेला खूप गर्भित शक्यता आहे, ती थोड्याच पुनर्विचाराने मूर्तिमंत होऊ शकेल." - मी पुनर्विचार खरोखर करु लागलो आहे. आणि तसे मी तुम्हाला खरडवहीतून लिहिनच.

लिहिताना जर काही चुकून वेडे वाकडे शब्द गेले असेल तर क्षमस्व.

राघव's picture

4 Aug 2009 - 5:40 pm | राघव

दत्ताजी,
कविता कशी असावी किंवा कशी नसावी यावर जास्त भाष्य न करता, रोखठोक अन कठीण वाटणार्‍या माणसाच्या मनाच्या कोपर्‍यात सुद्धा एखादी भावुक आठवण असतेच ना.. असे सहज विचारून जाणारी ही रचना आहे. त्याचे उत्तर ज्याने त्याने स्वतःचे स्वतः शोधावे. याच दृष्टीकोनातून मी या कवितेकडे बघीतले. तेवढे पुरेसे आहे असे वाटले.
शिवाय रचनेतली सहजता अतिशय भावते. तेही बलस्थान आहेच.
वर प्रतिसाद लिहितांना जास्त लिहिले नव्हते. नंतर तुमची चर्चा वाचून मला काही वेगळे वाटते का याचा विचार केला. त्याअनुषंगाने थोडा वेगळा विचार होऊ शकतो असे दिसले, पण मला वर नमूद केलेला अर्थच जास्त भावला! :)
साध्या-सोप्या रचनेसाठी पुन्हा अभिनंदन!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )