उद्दंड जाहल्या लाटा
तांडव करीती वारे
स्तब्ध चंद्रमा नभात
हरवुन गेले तारे...
बेभान जाहली गाज
सागरा जावु कसा रे
सारे किनारे संपले
कसा आवरु पिसारे...
मिठीत घेण्या धरणी
करशी किती पसारे
डोळ्यात दाटले पाणी
सांगु वेदना कशा रे
पांघरशी स्वप्न निळे
स्वप्नांचे धुंद मनोरे
स्नेह तुझा ओसरला
रे बघ खुंटले फुलोरे
विशाल
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 1:36 pm | सागर
विशाल,
मस्त कल्पना आहे कवितेची...
एका वेगळ्याच धुंद वातावरणात घेऊन जाते.
मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याबद्दल थोडे सांगावेसे वाटले म्हणून सांगत आहे.
पहिल्या २ कडव्यांची पकड शेवटच्या २ कडव्यांत थोडीशी सुटते असे वाटते. थोडे शब्दांच्या वापराकडे लक्ष दिले की अजून सुंदर होईन.
पहिल्या २ कडव्यांत जे "जाहल्या " "जाहली" हे दोन शब्द वापरले आहेत, ते काव्यरसाच्या दृष्टीने छानच आहेत यात वाद नाही. पण आजच्या काळातला वाचकवर्ग तितका डोक्यावर ताण देत नाही,
त्यामुळे थेट "झाला"..."झाली" हे शब्दप्रयोग तुमच्या काव्याच्या रसाची गोडी अजून वाढवतील असे वाटते... आणि कवितेच्या शीर्षकाला न्याय देणारे अजून एक कडवे वाढवता येईन असेही वाटते..
एकूणच कवितेची मूळ कल्पना, भाव व ढाचा चांगला आहे. त्यामुळे छान जमली आहे असे आवर्जून म्हणेन... :)
(थोडाफार कवी ) सागर
29 Jul 2009 - 9:39 am | विसोबा खेचर
जबरा कविता...!