राजे साहेबांच्या आपण देशासाठी काय करतो या संदर्भातील चर्चा वाचताना, एक बर्यापैकी समान धागाअसा आहे की आपण कर भरत असलो, आपले काम नीट करत असलो वगैरे, तर नागरीक म्हणून आपण आपले काम करतच असतो. हा १००% पटणाराच मुद्दा आहे.
आता भारताची सद्यस्थिती पहाता कोणीही मान्य करेल की त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे. आर्यचाणक्याच्या नितीत म्हणल्याप्रमाणे, पाण्यात रहाणारा मासा पाणी कधी पितो ते कळत नाही, जिभेच्या अग्रावर जर विष असले तर त्याची चव घेण्याचा मोह पण टाळता येणार नाही (आता ही उपमा आहे, त्यावर चर्चा नको!) तसेच राजाचा अधिकारी, कोषागार पैसे कधी खातो ते कळणार नाही.
थोडक्यात भ्रष्टाचार हा पुरातन कालापासून आहे. तो जसा भारतात आहे तसाच अगदी अमेरिकेतही आहे. तरी त्यातील फरक काय आहे? भ्रष्टाचाराची लागण ही येथे (अमेरिकेत) संपुर्ण राष्ट्राला अंतर्बाह्य झालेली नाही... सामान्य माणसाला पासपोर्ट पोस्टात अर्ज केल्यावर ठरलेल्या वेळेत मिळतो इथपासून ते कुठलीही परमिटे वगैरे मिळवणे हे कुणालाही सहजसाध्य काम आहे. त्यात मेजावरती/मेजाखाली पैसे द्यावे लागत नाहीत...
आता बहुतांशी मी ऐकलेली तक्रार आणि कदाचीत तुम्हीपण ऐकलेली/अनुभवलेली असेलः कुठेही लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. तर या चर्चेचा विषय असा आहे की: स्वतःला जागृक नागरीक म्हणत असताना तुम्ही लाच देणे अथवा घेणे यात प्रत्यक्ष सहभाग करता का? आशा आहे घेत नसाल, तेंव्हा तो मुद्दा सोडूनः लाच देण्यासंबंधी तुम्ही कधी कुठले महत्वाचे काम लाच न देता केले आहे का? घरे घेताना तुम्ही कधी सगळे पैसे हे चेकने अर्थात काळे पैसे न देण्याचा किमान विचार केला आहे का?
कदाचीत प्रत्येक गोष्ट आत्ताच्या घडीला जमत नसली तरी कधीतरी सरकारी, नीमसरकारी अधिकार्यांशी/कर्मचार्यांशी कामानिमित्त संबंध आले असताना, लाचे शिवाय काम झाले आहे, अडवणूक झाली नाही असे झाले आहे का? तसे अनुभव येथे अवश्य लिहा. खात्री आहे सगळेच काही वाईट नसते. (उ.दा.: मला मुंबई कस्टम्समधे कायम चांगला अनुभव आला आहे. विस्तार हवा असल्यास नंतर प्रतिसादात)
थोडक्यात जो पर्यंत आपण "सिस्टीमचा" भाग म्हणत भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खतपाणी घालतो, "चलता है" असे म्हणतो, तेंव्हा बाकी नागरीक म्हणून कितीही चांगले वागत असलो तरी त्याचा फायदा होण्याची शक्यता नाही असे वाटते. तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
20 Jul 2009 - 5:42 pm | नाना बेरके
माझ्या क्लायंटचे नुकसान होते आणि पर्यायाने माझेही. कारण क्लायंट टिकला तरच माझा व्यवसाय टिकेल. मला सरकारी ऑफिसमध्ये माझ्या व्यवसायाच्या कामासाठी वारंवार जावे लागते, तिथे बर्याच वेळा पैसे द्यावे लागतात.
तरीसुध्दा पैसे देण्याचे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी करतो. अर्थात, त्यात यश फार कमी वेळा मिळते.
तेंव्हा बाकी नागरीक म्हणून कितीही चांगले वागत असलो तरी त्याचा फायदा होण्याची शक्यता नाही असे वाटते. - हे खरेच आहे.
सिस्टिम बदलण्याकरता जे शक्य असते, तेसुध्दा प्रामाणिकपणे करू शकत नाही त्याची खंत वाटत राहते.
20 Jul 2009 - 5:46 pm | लिखाळ
काही कामे विनाकटकट होतात. अश्या कामांना आपणच उगीच एजंटांकडून अथवा चिरीमिरी देऊन करुन घ्यायचा प्रयत्न करतो. (उदा. वाहनपरवाना. स्वानुभव. )
तसेच गाडीची आवश्यक कागदपत्रे जवळ न बाळगता गाडी चालवणे आणि पोलिसाने पकडल्यास चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करणे. हा प्रकार मी इतरांच्या बाबतीत पाहिला आहे.
काही कामे मात्र सरकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत आणि पैश्याची मागणी मोकळेपणी करतात :)
आपल्याला काम करुन हावे असेल आणि आपल्या 'वरती' ओळखी नसतील तर पैसे द्यावे लागतात. अनेकदा थोड्या 'वरच्या' ओळखीतले लोक आपले काम होते आहे ना इतकेच पाहण्याचे सहकार्य करताना दिसतात. देण्याघेण्याच्या व्यवहारात ते ढवळाढवळ करत नाहीत. तो 'व्यवहाराचा' भाग असतो :)
आपल्याकडे ओळख किंवा/आणि पैसे देण्याची तयारी असल्यशिवाय अनेक कामे होत नाहीत हा अत्यंत त्रासदायक प्रकार आहे. कोणतेही सरकारी काम करायला जाताना ते होईलच याची मनात खात्री नसते याचे फार वाईट वाटते.
-- लिखाळ.
20 Jul 2009 - 6:08 pm | ढ
चिरीमिरी, चहापाणी, बक्षीसी, काहीही नाव द्या पण हे केल्याशिवाय आपलं काम कधीच होत नाही. साहेब बाहेर गेले आहेत, सही करायची राहिली आहे, पुढल्या आठवड्यात या असली उत्तरं ऐकायची नसतील तर लाच द्यावीच लागते.
लाच देणे आणि घेणे हे दोन्ही गुन्हेच आहेत. पण..
"श्री अमुक अमुक यांना लाच देताना सापळा लावून अटक" असं कधी ऐकलं नाहीये मी तरी. एकाही सरकारी कर्मचार्याने 'मला लाच देण्याचा प्रयत्न केला' अशी पोलिस तक्रार केल्याचं माझ्या तरी पहाण्यात नाही.
एव्हढंच काय माझ्याकडून शववाहिकेच्या कर्मचार्यांनी सुद्धा बक्षिसी(?) घेतली आहे!!!
त्यामुळे लाचखोरी भारतातून कधीही नष्ट होणार नाही हेच सत्य.
20 Jul 2009 - 9:30 pm | केळ्या
एव्हढंच काय माझ्याकडून शववाहिकेच्या कर्मचार्यांनी सुद्धा बक्षिसी(?) घेतली आहे!!!
काय करणार बिचारे;माणूस गेला तरी केल्या कामाची बक्षिसी घेतल्याशिवाय रहवतच नाही त्यांना.
20 Jul 2009 - 6:23 pm | दशानन
लाच खाणे व देणे हे कायदाने बंधनकारक आहे की काय असा अनुभव तुम्हाला दिल्ली मध्ये कधी ही या नक्की भेटेल ;)
पोलिसापासून.. चपराश्यापर्यंत.. मास्तर पासून नेत्या पर्यंत सगळे लाच घेतात .. हा आजपर्यंतचा अनुभव.
लाच ह्या विषयी काही न बोललेलेच बरे ;)
20 Jul 2009 - 6:31 pm | नितिन थत्ते
*आमच्या देशाची संस्कृतीच भ्रष्टाचाराचे दैवीकरण करणारी आहे. आमची संस्कृती आम्ही आमच्या देवावरही लादतो. त्यामुळे आमची कामे देव चिरीमिरी घेऊन करून देईल असे आम्ही मानतो. आणि त्यानुसार देवाला काम करून दिल्यास काहीतरी करण्याचे/ देण्याचे कबूल करतो.*
आज खातंय मार
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
20 Jul 2009 - 6:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो निथ-ख, अथर्वशीर्ष काय श्रीसूक्त काय शेवटी फलश्रुती येतेच! ;-)
आत्तापर्यंत कधी लाच द्यायला लागली नाही आहे, अगदी डेथ सर्टीफिकेट्स, लिगल हेअर सर्टीफीकेट्सपासून, पासपोर्ट, लायसन्स इत्यादींमधे.
एकदा चुकून 'नो एंट्री'मधे घुसलो होतो. "पावती फाडा" असं सांगितल्यावर वाट पाहून हवालदाराने फक्त तंबी देऊन सोडून दिलं.
पण तरीही आयुष्यभर क्लीन रेकॉर्ड ठेवता येईल याची खात्री वाटत नाही.
(सध्या सरकारी हापिसातली) अदिती
20 Jul 2009 - 6:52 pm | विकास
चर्चेचे कारण फक्त "तुम्ही" लाच देता का इतकेच नाही आहे. मला कल्पना आहे की कुठल्याच गोष्टी एकारात्रीत बदलता येत नाहीत. तुम्ही "रजबी"गिरी करता का असे विचारण्याचा पण यात उद्देश नाही अथवा तसे करणे चांगले, कायम शक्य असते असे म्हणणे देखील नाही...
मात्र लिखाळांनी म्हणल्याप्रमाणे जेथे शक्य आहे तेथे - हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे बर्याचदा चांगले अनुभव येत असतात जेथे अडवणूक न होता पण कामे होतात. असे अनुभव पण येउंद्यात.
मुळ चर्चा चालू करताना म्हणल्याप्रमाणे, मला मुंबई कस्टम्स मधे कायम चांगला अनुभव आला आहे. कधीपण अडवणूक वगैरे झालेली नाही. तसेच इतरत्रही (खर्या) "सिस्टीम" मधून पाठवून कामे झालेली अनुभवली आहेत. त्याच बरोबर एका सरकारी कचेरीत "वन विंडो सिस्टीम" म्हणत फक्त एकच खिडकी ठेवून अप्रत्यक्ष अडवणूक करताना अनुभवली आहे.
20 Jul 2009 - 7:19 pm | चतुरंग
पोलीस घरी आला होता. चौकशी करुन गेला. त्याची काही अपेक्षा नसावी. पासपोर्टचा अर्ज मुंबईत जाऊन भरुन आलो होतो तिथपासून बरोब्बर ४५ व्या दिवशी पासपोर्ट रजिस्टर्ड पोस्टाने घरपोच आले!
वाहन परवान्यासाठी सुद्धा मी एकदाही लाच दिलेली नाही. अहमदनगर, पुणे इथे दुचाकी आणी हैद्राबादला चारचाकी परवाने मिळाले. दोनेक हेलपाटे घालावे लागले असतीलही पण पैसे मात्र दिले नाहीत.
घराचे रजिस्ट्रेशन करताना सुद्धा मामलेदार कचेरीत बरेच हेलपाटे घातले होते पण पैसे दिले नाहीत.
चतुरंग
21 Jul 2009 - 4:52 am | विकास
आमच्या रस्त्यावरील एका (त्याच रस्त्यावरील म्हणून) ओळखिच्या ट्रॅव्हल एजंटने पासपोर्ट काढून देतो म्हणून सांगितले. म्हणजे फॉर्म्स त्या कचेरीत देणे (त्या काळी ते ऑफिस फक्त वरळीलाच होते आणि मोठीच्या मोठी लाईन असायची) तसेच तेथून पोलीसांकडे कधी जात आहे वगैरे सांगणे आणि शेवटी घरपोच पासपोर्ट आणून देणे असे ते काम होते. त्याने पैसे काही विशेष घेतल्याचे आठवत नाहीत (मला वाटते १०० रुपयाच्या आतच!) मात्र पोलीसासाठी म्हणून २५ रुपये वेगळे घेतले. त्यांना दिले का ते माहीत नाही..
गंमत पुढे झाली: पोलीस घरी आला आणि पुढच्या एकदोन दिवसात पोलीस कचेरीत येऊन नुसते तोंड दाखवून जा म्हणून सांगितले. कधीपण आलात तरी चालेल असे सांगितले. एका संध्याकाळी गेलो. तर माझ्या वयाच्या मागे-पुढे असलेली काही मुले रांगेत उभी होती. थोडीफार गप्पा मारत होती. मला वाटले वा, का लाईन आहे पासपोर्टसाठी म्हणून उभा राहीलो... नशिबाने एका पोलीसाच्या लक्षात आले. त्याने विचारले मी का उभा आहे ते. सांगितल्यावर, तो म्हणाला ही त्याची रांग नाही उद्या वगैरे या आता गडबड आहे. तर झाले असे होते की तेंव्हा तलावपाळीवर मुलींवर काँमेंट्स करणारे आणि एकंदरीत जरा जास्तच टाईमपास करणारे वाढले होते. त्यांना जरब बसावी म्हणून सगळ्यांना पकडून आणले होते आणि रांगेत उभे राहून जबानी घेणे आणि नोंदणी करणे चालले होते!
थोडक्यात पोलीसांकडून त्रास काहीच झाला नाही. झाली असेल तर मदतच झाली...
21 Jul 2009 - 6:17 am | llपुण्याचे पेशवेll
माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी पासपोर्ट माझा मीच काढला. एजंट वगैरे काही नाही. लागतच नाही एजंट. पासपोर्ट ऑफीस बाहेर एक फॉर्म भरून देणारे काका होते. मी फॉर्म भरला होता पण म्हणले चला चेक करून घेऊ. म्हणून त्या काकाना दिला त्यानी सांगितले फॉर्म भरला नाही तरी चेक करायचेही ३० रु. होतील (फॉर्म भरून द्यायचे ३० रु होते. आणि अनेक सुशिक्षीत लोक उगाच रीस्क नको म्हणून तिथून फॉर्म भरून घेत होते.) त्या काकानी फॉर्म चेक करून म्हटले 'तू फॉर्म बरोबर भरला आहेस. काहीच चूक नाहीये. बरेच लोक काही चूका करतात त्या मी दुरूस्त करतो आणि पैसे घेतो पण तुझे पैसे नको'. झाले. फॉर्म सबमीट केला. बाहेर आलो हे काका म्हटले आता १५-२० दिवसानी पोलिस तपासणी साठी चौकीत जावे लागेल. ही घटना होऊन २ महीने झाले तरी पोलिसांचा फोन नाही. म्हणून मी आणि आई (माझ्याबरोबर तिचाही पासपोर्ट करायचा होता) म्हणून आम्हीच पोलिसचौकीत गेलो पौड फाट्याच्या. तिथल्या पोलिसाने उर्मटपणे उत्तर दिले की "रोज हजारो फॉर्म येतात, आम्ही काय प्रत्येकाला फोन करायचा का?" मग त्याने फोनचे बिल, इलेक्ट्रीक बिल नेलेले असतानाही परत रेशनकार्ड आणा असे म्हणून आम्हाला परत पिटाळले व तो हवालदार आईला म्हणाला "काकू तुम्ही परत नाही आलात तरी चालेल तुमच्या फॉर्म वर सही केली आहे, रेशनकार्ड पाहीले की त्यांच्या कार्ड वर पण सही करेन." मग मी रेशनकार्ड घेऊन परत आल्यावर म्हटला की तुमचे आणि आईंचे २ फॉर्मचे ४०० रु लागतील. निरूपाय होऊन द्यायला लागले. त्याच वेळेला माझा एक मित्र जो 'IMA, डेहराडून' येथे लष्करी प्रशिक्षणासाठी निवडला गेला होता तो देखील पोलिस व्हेरीफिकेशन साठी तेथे आला होता. त्याच्याकडून देखील या पोलिसाने ४०० रु उकळले. का तर म्हणे मिलीट्रीसाठी रेकॉर्ड क्लीअर केले पाहीजे ना. या हवालदाराचा असा राग आला होता. पण आहे हे असे आहे असे म्हणून सोडून दिले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Jul 2009 - 6:55 am | रेवती
पेशवेसाहेब,
या हवालदाराचा असा राग आला होता. पण आहे हे असे आहे असे म्हणून सोडून दिले.
आत्ता कसं बोललात! अहो अशीच आपल्यासारखी समजुतदार माणसं हवीत देशाच्या प्रगतीसाठी! तुम्हाला नाही पटलं ना वागणं, म्हणूनच शूज घालून तुम्ही चालू लागलात ना! ;)
हे बघा आहे हे असं आहे.;) (हलकेच घ्या.)
आपल्या देशावर व (लाचखोर) देशबांधवांवर प्रेम करणारी , इथली आणि फक्त इथलीच, कधीकधी गोंडेदार, जरीचे नक्षीकाम असलेल्या कोल्हापूरी लेडीज चपला वापरणारी,
रेवती
21 Jul 2009 - 7:26 am | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे.. चायला मी एकटा किती काय काय बदलणार. तेव्हा पासून चपला घालूनच उभा आहे.
(स्केचरधारी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
20 Jul 2009 - 7:49 pm | रेवती
पुण्याच्या घराचे रजिस्ट्रेशन झाल्यावरही टॅक्सच्या पावत्या जुन्या घरमालकांच्या नावाने येत असत. रीतसर अर्ज देउनही नाव बदलले गेले नाही. तीन वर्षे पावत्या तश्याच येत असत व आम्ही पुन्हा प्रयत्न करत असू. दरम्यानच्या काळात हैद्राबादला नोकरीनिमित्त जाणे झाले व हे काम मागे पडले. एकदा मात्र काम करूनच जायचे असे ठरवून पुण्यात आले तर म. न. पा. मधील संबंधीत व्यक्तीला आपण आता यांना किती त्रास देउ शकतो याचा अंदाज आला. "आज नाही , उद्या या" असे करत करत तो मनुष्य माझ्या परत हैद्राबादला जाण्याच्या रिझर्वेशनच्या तारखेपर्यंत टाळाटाळ करत असे. (माझी जाण्याची तारीख नक्की माहित नसे त्याला.......त्याचा अंदाज मात्र बरोबर असायचा). तोपर्यंत माझे तीन प्रवास, हैद्राबाद ते पुणे फक्त याच कामासाठी झाले होते. चौथ्या वेळेस मात्र त्याला सांगितले की आता हे काम पूर्ण झाल्याशिवाय येथून जाणार नाही, कितीही दिवस लागू देत. दोनेक दिवस त्याने पाहिले की मी खरच तिथे जावून बसून राहते. नंतर मात्र त्याने नाव बदलून दिले. त्यासाठी त्याला लागलेला वेळ पाच मिनिटे व नियमानुसार असलेली २५ किंवा ५० रू (नक्की आठवत नाही) फी घेतली.
दुसरा अनुभव हैद्राबादच्या टेलीकॉम डिपार्टमेंटचा. दुरध्वनी क्र. साठी अर्ज केल्यावर," येण्याआधी कधी येऊ हे कळवणारे पत्र येइल" असे सांगितले. आम्हाला पत्र आलेच नाही व कामानिनित्त चेन्नैला आम्ही निघालो. दरवाजाला कुलुप लावले तर ही मंडळी हजर! झक्काझक्की झाली. "आता आम्ही परत येणार नाही, तुम्हीच पाठपुरावा करा. लवकर काही फोन मिळणार नाही." अशी भिती दाखवली. नंतर पैसे हवे असल्याबद्दल काही बोलणी झाली. आम्ही देत नाही हे पाहून त्यांच्या भाषेत तावातावाने बोलत निघून गेले. सुमारे सात महिन्यांनी आपणहून येउन एक पैसाही न घेता (पण पत्र पाठवले नाहीच) काम करून गेले.
रेवती
20 Jul 2009 - 11:30 pm | ऋषिकेश
घरातील तिघांचेही पासपोर्ट लाच न देता / एजंट न ठेवता एका फटक्यात झाले. पोलिस स्टेशनवरही कोणीही लाच मागितली नाहि. (पोलिस मंडळींत चक्क विनोद चालले होते. आपण बरे आपले काम बरे या नीतीने काम चालु होते ते पाहून भरून आले :) ) बरोबर २१व्या दिवशी पासपोर्ट घरात हजर होता
चारचाकी लायसन्स (अप्रत्यक्ष लाच: ड्रायविंग एजंटने दिलेली) व घराची मुद्रांक-नोंदणी(प्रत्यक्ष लाच) मात्र लाच दिल्याशिवायक करता आली नाहि.
बँकांतील कामे, पोस्टातील कामे, कोर्टातील कामे मात्र विनालाच झाली आहेत.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
21 Jul 2009 - 2:25 am | मृदुला
आत्तापर्यंत दोनदा लाच दिली आहे. एकदा इंग्लंडहून बंगलोरला सामान पाठवले होते ते सोडवून घेताना, त्यात काही करपात्र नसूनही ५० रू लाच द्यावी लागली.
नंतर घराची नोंदणी करताना काही हजार रू लाच द्यावी लागली. आमच्या बांधकामवाल्यांनी इतके पैसे रोख लाच म्हणून आणा असे इमेल पाठवले होते! बाकी घर खरेदी करताना सारी रक्कम जालावरून भरली. सगळ्या रकमेच्या पावत्या मिळाल्या.
बाकी पारपत्रे, वाहन चालवण्याचे परवाने, लग्नाची नोंदणी इ कोणत्याही गोष्टीत पैसे द्यावे लागले नाहीत.
21 Jul 2009 - 3:17 am | धनंजय
लाच देऊन काम करण्याचा प्रसंग कुठल्या मोठ्या कामात आला नाही. म्हणजे पारपत्र मिळवणे, लोकमित्र प्रतिष्ठान रजिस्टर करणे, इत्यादी.
एकदा कॉलेजात असताना वाहातुक पोलिसाला लाच दिली. (तेव्हा माझ्या मते वाहन चालवण्यात माझी चूक नव्हतीच. पण घाईमुळे सोडवणूक करून घ्यायला लाच वापरली, हे चूकच केले.)
सरकारी नोकरीमध्ये होतो तेव्हा लाच घेतली नाही. (त्यामुळे हा एक दूधखुळा तरुण आहे, असे माझ्या सहकार्यांचे आणि हाताखालच्या लोकांचे मत होते.)
सरकारी नोकरी सोडताना एका कारकुनाने लाच मागितली, त्याच्या मठ्ठपणाने अवाक झालो. मी गाव-देश सोडून चाललो होतो. नोकरी सोडल्याचा कुठलाही दस्तऐवज मला आवश्यक नव्हता. ती नोंद महाराष्ट्र सरकारला आवश्यक होती, नाहीतर माझ्या बँकेत दरमहा सरकारी पगार जमा होत राहिला असता... नोकरी सुरू करायला लाच मागितली असती तर समजलो असतो, पण नोकरी सोडायला लाच मगणारा कारकून म्हणजे बुद्धिभ्रंशाचा अतिरेकी नमुना! (लाच दिली नाही, पण या कारकुनाने मला हेलपाटे घालायला लावले.)
21 Jul 2009 - 5:33 am | पाषाणभेद
आमच्या बिहारातल्या ऑफीसात आम्ही सगळे लोक लाच घेतल्याशिवाय काम करतच नाही. नाही म्हणायला एक मराठी माणूस आला आहे एक तो फार तत्ववेत्ता समजतो. तो लाच घेत नाही. मी तर एक खेडेगावातून येणार्या लोकांकडूण डाळ, गूळ, लाकूडफाटा, ओरीजनल भांग, दुध इ. वस्तू हक्काने मागुन घेत असे. आता सगळ्यांना हे माहीत झाले असल्याने मला मागावे लागत नाही. ते लोक सवयीने आणून देतात.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
21 Jul 2009 - 7:24 am | छोटा डॉन
तसा सरकारी कार्यलायाशी जास्त संबंध आला नाही पण काही कागदपत्रांची पुर्तता करताना मात्र जावेच लागते ..
१. लहानपणी डोमेसाईल सर्टिफिकेट काढताना तो अधिकारी २० रुपये घेतो असे ऐकले होते व ते घेऊन गेलो होतो. मात्र त्याने काहीही पैसे न घेता काम करुन दिले व ते ही लगेच. कदाचित आमच्या गल्लीतच राहणारे एक काका त्याच कार्यालयात असल्याने झाले असेल.
२. पासपोर्ट काढताना "एजंट" हा मार्ग सोईस्कर वाटला, त्रास काहीच झाला नाही. घराकडची चौकशी अगदी पटकन झाली, इकडच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनवर बोलवायला एक कॉन्टेबल आला होता वर्दीसह ....
दुसर्या दिवशी ५०० रुपये कॅश, १-२ फोन नंबर्स आणि बराच ताठपणा आणि जमल्यास अपशब्द ऐकुन घेण्याची तयारी ठेऊन पोलीस स्टेशनात गेलो. पण घडले उलटेच, तिथे जे इन्स्पेक्टर होते ते फारच चांगले निघाले, ३० मिनीटे वाट पहायला लावली पण पैसे वगैरे घेतले नाहीत अजिबात व अनावश्यक त्रासही दिला नाही.
आश्चर्य म्हणजे मी गेलो तेव्हा त्यांची कॉफीपानाची वगैरे वेळ असावी त्यामुळे मलासुद्धा त्यांनी "फुकटात" कॉफी पाजली व सर्व प्रक्रिया आरामात पुर्ण करुन दिली ...
हा अनुभव चांगलाच होता.
३. परदेशातुन येताना कस्टम क्लियरिंगला पण काहीच त्रास झाला नाही. अनेकांच्या सल्ल्यानुसार सुट्ट्या चिल्लरमध्ये २५-३० युरो वर जवळ बाळगले होते.
बाहेर आल्यावर कस्टमचे काउंटर लक्षात न आल्याने तसाच बेधडक पुढे निघुन गेलो, मागुन एक माणुस पळत आला व म्हणाला "फक्त १ फॉर्म भरुन द्या व मग जावा" , अक्षरश: १० मिनीटात खरोखर फक्त फॉर्म भरुनच त्याने मला सोडले.
कदाचित त्याची काही अपेक्षा नसावी.
मात्र कधी कधी भ्रष्टाचारात सामील होतो ...
रात्री अपरात्री गाड्यांवरुन हिंडताना पोलीसांना वगैरे अडवले तर अगोदर सुमडीत मिटवालचे बघतो, नंतर पैशाचे मार्ग वापरतो व ते ही नाही जमले तर "इन्फ्ल्युएंस" वापरतो, मला त्यात व्यक्तीशः चुक वाटत नाही.
सिग्नलला वगैरे शक्यतो कायद्याच्या विरुद्ध जात नाही त्यामुळे अडवायचा प्रश्नच नाही. मात्र तरीही आडवल्यास आणि मला भरपुर वेळ असल्यास वाद घालत टीपी करतो अन्यथा गडबड असल्यास चिरीमिरी टेकवुन पळतो.
प्रायॉरिटी इंडेक्स महत्वाचा नाही का ?
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
21 Jul 2009 - 7:29 am | विकास
...मात्र त्याने काहीही पैसे न घेता काम करुन दिले व ते ही लगेच. ..
...तिथे जे इन्स्पेक्टर होते ते फारच चांगले निघाले, ...त्यामुळे मलासुद्धा त्यांनी "फुकटात" कॉफी पाजली ...
...परदेशातुन येताना कस्टम क्लियरिंगला पण काहीच त्रास झाला नाही. ..
अहो छोटा असेल पण तरी "डॉन"शी पंगा कोण घेणार? ;)
21 Jul 2009 - 8:03 am | छोटा डॉन
>>अहो छोटा असेल पण तरी "डॉन"शी पंगा कोण घेणार?
=))
अहो हेच ते, हेच ते "इन्फ्ल्युएंस" का काय ते ...
हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का ? फक्त थोड्या कमी लेव्हलचा ;)
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
21 Jul 2009 - 8:40 am | हर्षद आनंदी
मित्रहो,
इथे भ्रष्टाचार हा फक्त सरकारी हापिसातच चालतो, असे वाटुन चर्चा चालु आहे असे वाटते.
अहो, बार, चित्रपटगृहात, नाट्यगॄहात मध्ये १० रु चे शीतपेय १५ / २० रु ला इकणे, शितपेय थंड करण्याचे २ रु जास्त घेणे, वाहकाने सुटे पैसे परत न देणे, अमृतपेय (चहावाला) पारले-जी चा ४ चा पुडा ५ ला विकतो. पुजारी दक्षिणा देणार्याला प्रथम दर्शन घेऊन देतो.
हे असे आणि अनेक प्रकारे भ्रष्टाचार बोकाळला आहे.
शब्द फोड करायची झाली तर भ्रष्ट + आचार = भ्रष्टाचार !!
'भ्रष्ट' हा शब्द अनेक ठिकाणी अनेक पध्दतीने वापरला जातो. आजचा माणुस नितीमत्ता फाट्यावर मारुनच अनेक ठिकाणी वावरत असतो, एखादी गोष्ट नजरेसमोर चुकीची घडत असताना, समोरच्याला चुकीची जाणीव करुन दिली जात नाही व एक प्रकारे त्याला समर्थन मिळते हा सुध्दा भ्रष्टाचार नाही का? (मला काय त्याचे? ही भुमिका) का आपणही कधी काळी हेच केले होते, ह्याची बोच मनात असते आणि पुढे होण्याचा धीर होत नाही ? (सदसदविवेक?)
बागेत, नदीकाठी, बाईकवर, कोपर्यात जागा मिळेल तिथे प्रणयाराधन करणे कुठल्या आचारात बसते? बाईकवर पोरगी बसली की अनावश्याक वेग आणि करकचुन ब्रेक मारायची ईच्छा, हे भ्रष्ट नितीमत्तेचे प्रतिक नाही का? आज काल जरा चांगली दिसणारी मुलगी, बाई, काकु कोणही दिसले की "तो"विचार करणारी मंडळीच भेटतात, कोण हा मानसीक भ्रष्टाचार!!
अश्या अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारात हा देशच नाही तर मानवी जगत वाहुन चालले आहे, ह्यातले कोण कोण किती किती सावरणार?
सकाळी प्रवचन देणारा, संध्याकाळी डान्सबार मधे भक्तीवर पैसे ऊधळतो तेव्हा कलियुग आले म्हणायचे....
भ्रष्टानंदी टाळी लागलेला .. हर्षद ..
21 Jul 2009 - 10:16 am | नितिन थत्ते
हे बाकी खरेच.
आपल्या १३-१४ वर्षांच्या मुलाला/मुलीला स्कूटर वगैरे वापरायला देणारे सायंकाळी 'बसून' गप्पा झोडताना देशात कायद्याचे राज्य राहिले नाही म्हणून गळा काढतात.
आमच्या कंपनीला एकदा काही अॅप्रूवल घ्यायची होती. ती देणारे अधिकारी आमच्या कंपनीत विझिटला आले होते. त्यांनी आमच्या लोकांना 'स्टॅण्डर्ड रेट' वगैरे सांगितले. आणि नंतर जेवायला बसल्यावर तेच लोक भ्रष्टाचार किती वाढलाय म्हणून दु:ख करीत होते.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
21 Jul 2009 - 3:50 pm | सहज
नशीबाने कुठे ना कुठे कोणाचीतरी (सर्वच सरकारी खात्यात) ओळख असल्याने सरकारी कामात शक्यतो लाच द्यावी लागली नाही. पारपत्र काढताना पोलीसाने पोलीस मुख्यालयात हॅ हॅ हॅ बक्षीशी, आपले स्वखुशीने हॅ हॅ हॅ मागीतले होते. मी हो जवळच बँकेतुन पैसे काढतो आणी येतोच म्हणून पोबारा केला. धाकधुक होती पण ४५ दिवसात पारपत्र आले.
वाहनपरवाना काढायला गेलो असता एका मित्राचे वडीलच त्या खात्यात असल्याने सरळ त्यांच्या टेबलवर गेलो व त्यांनी स्व:ता जाउन आम्हा मित्रांना परवाने अगदी हातात, संबधीत खात्यातुन आणुन दिले. रेशनखात्यात देखील कोणतरी ओळखीचे होतेच त्यामुळे कधीच पत्ताबदल , नावबदल इ इ साठी लाच द्यायचा प्रसंग आला नाही. कधी वाहतूक नियम तोडला नाही म्हणून पोलीसाला मामा मामा करत पटवायची वेळ आली नाही.
लेटेस्ट गोष्ट फ्लॅट खरेदी सर्व रक्कम चेकने दिली कारण मी तो फ्लॅट एका माणसाकडून खरेदी केला ( त्याच्या होमलोनवाल्या बँकेच्या नावाने एक चेक व उर्वरीत रक्कम त्या माणसाला चेकने) बिल्डरकडून नाही. परंतु नोंदणी करायला मुद्रांकशुल्क खात्यात गेलो असता, बिल्डरचा माणुस जो सगळे व्यवहार बघत होता, तो म्हणाला तुम्ही एकदा सही/फोटो झाला की जा बाकीचे मी बघतो. त्याने ११०० रु. सांगीतले. मी म्हणालो मला पावती दे, तो हो म्हणाल्यावर मी तिथुन गेलो. दुसर्या दिवशी पावती दिली होती ४०० रु. ची तर कळले की लाच + वकिलाची फी असे बाकीचे ७०० रु. होते. काय बोलणार. :-( नंतर ओळखीच्या व्यक्तीला बोलून दाखवल्यावर म्हणाला सगळ्यांचे असेच असते ओळखीचे म्हणून ११००नाहीतर ३०००, ५००० रु पुढे घेतात. कोणाला काही माहीती नसते.
विमानतळावर कस्टम मधे मी नेहमीच बिन्धास्त ग्रीन चॅनेल मधुन जातो एक दोन वेळा अडवले मी म्हणालो सामान चेक करा, जे काही आहे त्याच्या पावत्या बरोबर आहेत. लाच खाणेबल असे काही सामान देखील कधी नेले नाही व एक माणाशी बहुतेक २५,००० रु ची सुट असल्याने कधी काही प्रश्न आला नाही. माझे काही मित्र अक्षरशः लग्नाला रुखवत "डिजीटल सेक्शन" होईल इतके सामान एका वेळी नेतात व दोन हजार रुपयात सुटले म्हणतात. भारतात हे सगळे सामान घ्यायचे म्हणले तर [परदेशातील खरेदी + २००० रु यापेक्षा ] महागच पडेल म्हणून जो झाला तो फायदेका सौदा म्हणुन खुश असतात.
माझ्या नात्यातले एकजण बरीच वर्षे परदेशात काढल्यावर आता पुण्यात स्थाईक आहेत व त्यांचा स्वताचा एक्पोर्टचा धंदा आहे. त्यांचा कस्टम, सरकारी कार्यालये इ नियमीत संबध येतो. अनेक चकरा मारतात पण लाच देत नाहीत. मला सांगत होते की सुरवातीला त्रास झाला व होणार माहीती होते पण एकदा का हा माणुस लाच देत नाही कळले (३ वर्षे ) मग आता तिथले लोक त्यांना ओळखतात(मानतात). त्यांचे काम पटकन करतात कारण हा माणुस लाच देत नाही व परत या म्हणले तरी कितीही वेळा यायला काचकूच करत नाही. मुख्य म्हणजे धंदे का टाइम व इतर लोक पाकिटे घेउन इतकी तयार लाईन मधे उभी असताना, ह्या माणसावर वेळ कशाला घालवायचा.
माझे काही नातेवाईक कमालीचे इंटेलिजंट इन्व्हेस्टर आहेत किंवा काहीतरी गडबड नक्की आहे की त्यांच्या सरकारी नोकरीत त्यांना इतके सर्व कसे काय उभे करता आले याबाबत माझा अजुन निर्णय झाला नाही आहे. ;-) ;-)
माझ्या भारतातल्या एका नोकरीत, निकृष्ठ दर्जाचा एका सप्लायरचा माल मी रिजेक्ट केला होता. ट्रान्सपोर्टवाल्याचा ट्रक एक दोन दिवस उभाच. पहील्या दिवशी स्टोअरचा माणूस येउन जाउ दे पास कर म्हणून रदबदली करुन गेला. बोलता-बोलता माझ्या कानावर एक दोघांचे बोलणे पडावे अशी व्यवस्था केली गेली होती की काही लोकांना मोटरसायकल एका ट्रान्सपोर्टवाल्याने घेउन दिली. स्टोअरच्या काही लोकांनी नुकतीच स्वताची घरे बांधली आहेत इ इ. एक, दोन ट्रक ड्रायव्हर माझ्या सहीसाठी आले तेव्हा एक पाकीट ठेवले होते, मी अतिशय संतापलो होतो, तमाशा केला होता. तडक बॉसकडे जाउन सर्व केस सांगीतली होती, स्टोअरच्या बॉस कडे जाउन बोलून आलो. मला त्यावेळी सर्व शिकलेले / बॉस लोक चांगलेच असतील व माझे ऐकतील अशी खात्रीच होती. दोन दिवस काही ट्रक तसेच उभे केले गेले. मग माझे एक वरिष्ठ माझ्याकडे आले व मला म्हणाले मी आता तुला सांगतो ते माझ्यात व तुझ्यात ठेव व तु हे आदर्श विचार/व्यवहार गुंडाळ. शेवटी तुला तेच करावे लागेल जे तुला वरिष्ठ करायला सांगतील, फारतर तुझ्या कामाचे स्वरुप बदलेल. तुला वेगळे काम/ डेस्क जॉब करायला लागेल. मग त्याने स्टोअरचा बॉस, आपला बॉस दोस्त / भागीदार आहेत व घडल्याप्रकाराचा फायदा करुन दोघे आता सप्लायर व ट्रान्सपोर्टर करुन वाढीव दराने हप्ता घेतील, आज तुला बॉस येउन सांगेल की सप्लायरकडून दर कमी करुन घेतलाय, तंबी दिली आहे व हे ट्रक आता उतरवुन घ्यायचे. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की ती नोकरी मी लवकर सोडून दिली व जवळजवळ ७ वर्षानंतर त्या बॉसला अफरातफर केली म्हणून कंपनीने पोलीसांच्या ताब्यात दिले. अर्थात पैसे होतेच त्याच्याकडे न्यायसंस्थेकडून नंतर सुटला म्हणे. असो.बॉस असला तरी मी त्याच्याकडे डोळे वटारुन बघु शकत होतो इतकेच माझे सुख :P
परदेशात लाच द्यायचा प्रसंग कधी आला नाही व येउ नये ही मनोमन इच्छा! (ओळखी करुन ठेवल्या आहेत ;-) )
लास्ट बट नॉट लिस्ट वर उल्लेख केलेले माझे नातेवाईक/ मित्र यांच्याकडे मी जातो, पाहूणचार झोडपतो या नात्याने मी अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेच की नाही? उद्या वेळप्रसंग आला तर त्यांना शिक्षा होउन नये म्हणुन प्रार्थना तर करीनच की जरी प्रत्यक्ष काही मदत केली नाही तरी.अगदी पैसे दिले घेतले पाहीजे असेच काही नाही, हो कीनई? माझा एक मित्र प्रायव्हेट कॉलेज मधुन डॉक्टर झाला तर आमच्या ग्रुप मधील एक हुशार मुलगी सरकारी कॉलेज मधुन मेरीट मधे येउन. आम्ही मित्र तो शिकताना चिडवायचो की लेका तु आम्हाला मारणार आम्ही तुझ्याकडे नाही येणार, तिच्याकडे जाणार. तु तुझ्या दुकानात एक पाटी टाक मी खाजगी कॉलेज मधे डोनेशन देउन पास झालो, आता आपल्या जबाबदारीवर ठरवा माझ्याकडून उपचार करुन घेणार की नाही. आज माझ्या मित्राचे ३ मजली इस्पीतळ आहे. मधे त्याला भेटुन हॅ हॅ हॅ करुन आलो.
प्रत्येकाच्या निर्णयाबरोबरच ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग आहे भ्रष्टाचारात भाग घ्यावा लागतो की नाही. आता आपण शिकलो सवरलो आहोत, न्याय, अधिकार, हक्क, कर्तव्य इ इ जाणीव आहे, समजा एखाद्या खेड्यातल्या माणसाला भ्रष्टाचार हाच शिष्टाचार इतकीच माहीती असेल तर तो त्याच्या मते जे योग्य आहेत तेच करत आहे ना. असो त्याला न्याय, अधिकार, हक्क, कर्तव्य इ इ योग्य, अयोग्य काय याची जाणीव आपण करुन द्यायची मग पुढचे पापपुण्य त्यांच्या बोकांडी. आपल्याला जे उपलब्ध मार्ग आहेत त्यातुन शासन यंत्रणा भ्रष्टाचार विरहीत कशी होऊ शकेल हे बघायचे, किमान चर्चा करायची ;-), आपल्या हातुन कोणाचे काम होत असेल लाच न देता तर जरुर करायचे.
ही भ्रष्टाचार करणारी काही लोक ज्यांच्याशी मी बोललो आहे त्यांच्या तोंडून असेच ऐकायला येते की मी कितीतरी जणांचे काम पैसे न घेता करतो, (म्हणजे कोण गरजु व कोण की ज्यांच्याकडून लाच घेतलीच पाहीजे हे मी ठरवतो) बाकी ज्यांच्याकडून घेतो ते सगळे चोरच असतात. व हे अगदीच असत्य नाही.
21 Jul 2009 - 9:49 am | मराठी_माणूस
तो जसा भारतात आहे तसाच अगदी अमेरिकेतही आहे.....
हे अगदि "भोग देवानाही चुकले नाहीत" असे म्हटल्या सारखे वाटते.
21 Jul 2009 - 11:34 am | तिमा
माझी पहिली स्कूटर लँबरेटा होती. ती पुण्याला घेऊन नंतर मुंबईला ट्रान्सफर केली होती. पहिली २-३ वर्षे त्याला व्हील टॅक्स् असतो हे मला माहितच नव्हते. नंतर कळल्यावर जवळच्या महानगरपालिकेच्या खिडकीवर गेलो. टॅक्स् भरायचा आहे असे सांगितले. पण तो नोटिसशिवाय टॅक्स् घेईना. शेवटी प्रयत्न सोडून दिला. १२ वर्षांनंतर स्कूटर विकायची होती पुण्याच्या गिर्हाईकाला , म्हणून आरटीओत गेलो एनओसी आणायला. तिथे व्हील टॅक्स् भरल्याच्या पावत्या मागितल्या. त्या नव्हत्याच. मग एजंटला गाठले. ३०० रु. त काम झाले.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
21 Jul 2009 - 12:02 pm | शाहरुख
एक अनुभव..
दुचाकी वाहन परवाना काढतानाचा-
मी स्वतः अर्ज भरून रांगेत उभा होतो..रांग बरीच लांब असल्याने साहजिकच पुढच्या-मागच्याशी गप्पा झाल्या.त्यांनी मध्यस्थाकडून अर्ज भरून घेतला होता..मी त्यांना विचारले की साहेबांना कसे कळणार की तुम्ही मध्यस्थामार्फत आला आहात, तर म्हणाला की साहेबांना अक्षर माहिती आहे.माझा अर्ज बघताच साहेबांच्या लक्षात आले असावे..आत गेल्यावर साहेबांनी आधी जवळपास सगळी चिन्हे विचारली..ती मला आली.मग एक-एक वाहतूकीची कलमे विचारली..मला त्यातली १-२ आली नाहीत (मी तेवढा हुषार नाही ;-))..त्यानंतर,
साहेब - कलमं येत नाहीत तुला.
मी - वाचली होती सगळी, पण विसरलो थोडी.
साहेब -मग ??
मी - मी वाचून येईन परत.
साहेब - नक्की ?
मी - हो.
मग साहेबांनी अर्जावर "कलमे येत नाहीत..नापास" असे मोठ्या अक्षरात लिहून बहुतेक अर्ज स्वतःकडे ठेऊन घेतला.
मग मी कलमं पुन्हा पाठ करून दुसर्या दिवशी पुन्हा गेलो.बर्याच वेळाने नंबर आल्यावर आत गेलो तर तेच साहेब होते.
साहेब - काल आला होतास ना ?
मी - होय.
साहेब - मग काल का नाही झाले काम ?
मी - काल विचारलेली सगळी कलमं नाही आली.
साहेब -आज येतील का ?
मी - हो, आज नीट पाठ करून आलो आहे.
साहेब - तू पाठ केली आहेस बरोबर आहे पण मार्चला नापास झाल्यावर लगेच एप्रिलमधे नाही देता येत परीक्षा..अभ्यास झाला असला तरी ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागते.काय करतोस ?
मी - मग कधी येऊ परत ?
साहेब - ये चार दिवसानी..
मी चार दिवसानी परत गेलो..तेंव्हा मात्र २-४ कलमं विचारून मला पास केले :-)
जेंव्हा मी ही घटना आठवतो तेंव्हा मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो :-)
21 Jul 2009 - 12:06 pm | विकि
मि नाही होत भ्रष्टाचारात सहभागी पण डोळ्यांदेखत होत असलेला भ्रष्टाचार थांबवूही शकत नाही.
21 Jul 2009 - 12:18 pm | Nile
विकासरावांचा नक्की उद्देश लक्षात आला नाही.(विरंगुळा सदर राहीलं काय?) ;) नुसतं वाटुन काय उपयोग हो! या चर्चेतुन एक-सहस्त्रांश भ्रष्टाचार जरी कमी झाला तरी खुप झालं.म्हणुनंच चार ओळी खरडतो.
भ्रष्टाचारला 'चलता है' म्हणण्यानेच त्याचा भस्मासुर झालेला आहे असे वाटत असल्याने कुठेही त्याला खतं पाणी न घालण्याकडे कटाक्षाने लक्ष देतो. (खरं तर उगीच सांगत बसत नाही कसे ते पण वर म्हणल्याप्रमाणे कुणाला प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल या आशेने)
१. मी स्वतः १ पै ही(डोनेशन इ.) न देता, १२ वी, व इंजिनरींग केलं. बंधुराजांच्या प्रवेशावेळी पैसे भरावेच लागतील अशी वेळ आलेली असतानाही आग्रहाने एकही पै भरु दिली नाही. त्याला हव्या त्या महाविद्यालयात शेवटच्या यादित प्रवेश मिळाला!
२. सिग्नल वगैरे जाणुन बुजुन मोडत नाही, जर मोडला तर पावती सह पुर्ण दंड भरतो. एकदा पुण्यात (कर्वे रोड) वर 'नो यु टर्न' ठीकाणी यु टर्न घेतला म्हणुन पोलिसाने पकडले पण तिथे 'नो यु टर्न' अशी पाटी नव्हती. पोलिसाला म्हणलं पाटी दाखवं दंड भरतो. पोलिसाने पाटी शोधण्याचा प्रयत्न केला पण नव्हतीच तर कसली सापडतीये? मग तो म्हणु लागला तुम्ही सिग्नल पण तोडलात! " पैसे देत नाही, कायदेशीर कारवाईला तयार आहोत" असे म्हणाल्यावर त्याने आम्हाला सोडुन दिले.
३. मद्रासला प्रथमच गेल्यावर सामानाचं वजन जास्त होतं म्हणुन ४५० रु दंड होइल (तिकिट २५० होतं मला वाटतंय!) असं टीसी म्हणाला. २०० रु द्या काम होईल असं म्हणत असताना पुर्ण ४५० रु दंड (पावती सह) दिला. :)
४. रेनीगुंटा रेल्वे स्थानकावर. ३.५० रु चा चहा (भारतीय रेल्वे महामंडळाने ठरवलेली किंमत) ५ रु ला विकत असलेल्या कर्मचार्याबरोबर अर्धा तास भांडुन ३.५० रुपयानांच घेतला. :)
५. पुण्यातल्या रिक्षावाल्यांबरोबर (जास्ती पैसे मागितल्या बद्दल) तर हमखास भांडतो. :)
बरीचशी कामं ओळखीमुळे विनासायास पार पडत असल्याने लाच देण्याची कधी गरज पडल्याचं कधी आठवत नाही.
थोडक्यात, रोजच्या आयुष्यात 'चलता है' वगैरे म्हणुन मी तरी लाच देत नाही. :)
21 Jul 2009 - 12:18 pm | नितिन थत्ते
>>रेनीगुंटा रेल्वे स्थानकावर. ३.५० रु चा चहा (भारतीय रेल्वे महामंडळाने ठरवलेली किंमत) ५ रु ला विकत असलेल्या कर्मचार्याबरोबर अर्धा तास भांडुन ३.५० रु लाच घेतला.
अरे वा. तुम्हाला तामीळमध्ये भांडता येतं तर...
=))
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
21 Jul 2009 - 12:56 pm | Nile
तमिळ तेरीयादं!
-नियम सच्चे
(पुर्वीचा मर्हाठा)
21 Jul 2009 - 2:07 pm | चिरोटा
मला अजुनपर्यंत एकदाच लाच द्यायची वेळ आली. मुंबई कस्टमला -लॅपटॉप सोडवण्यासाठी .त्यावेळी (२००१ साली)लॅपटॉप होता-१६००$चा.
कस्टम अधिकारी(हे मराठीच होते) : $६०० ड्युटी आताच्या आता भरावी लागेल नाहीतर लॅपटॉप जप्त करावा लागेल.
मी: साहेब , माझ्या खिशात फक्त १००$ आहेत.(१००$ च होते).-(१)
साहेब- $१०० ने काम नाही होणार. लॅपटॉप जप्त करावा लागेल.-(२)
बराच वेळ (१) आणि (२) सारखे बोलण्यात गेला. शेवटी-
साहेब- हरकत नाही. बॅगेत काय काय आहे?
मी- उघडुन दाखवतो.
साहेब- इकडे नाही.(साहेबानी एका सिंग नामक कस्टम अधिकार्याला बोलावले आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजले)त्यांच्याबरोबर जा.
मी- ठीक आहे.
हे सिंग मला मागच्या बाजुला घेवुन गेले.
सिंग- वो बॅग खोलो.
बॅग उघडली.
सिंग- वो २ perfumes ka bottles/2 shaving creams/chocolates निकालो.
हा माल दिल्यावर सिंग खूष दिसले.इतक्यात मराठी साहेब आले. "हे आम्हाला नकोय्.आम्हाला "वर" द्यावे लागते" असेही (लाजत)म्हणाले.थोडे पन्नास डॉलर द्या. मी $१०० ची नोट दिली.त्यानी $५० परत केले!. मी $६०० भरल्याची एक रेसीट त्यानी मला दिली.
शेवटी एकदाचा एयर पोर्टच्या बाहेर आलो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
21 Jul 2009 - 3:26 pm | मैत्र
अनुभव वाचून वाटलं बरेचसे सारखेच आहेत ... आपल्यासारखे आडमुठे लोक आहेत हे पाहून आनंद झाला...
दुचाकी चालवण्याचा परवाना ३० रु. एवढ्या सरकारी पावतीच्या रकमेवर झाला. व्यवस्थित चालवून दाखवली, उत्तरे दिली त्या मनुष्याने पास केले. चारचाकी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलो आणि त्यांच्या बरोबर टेस्ट ला गेलो. तिथे या स्कूलच्या लोकांचा दबदबा आणि ज्या पद्धतीने आमच्या सर्वांच्या टेस्ट घेतल्या त्यावरून आपल्या फी च्या कॉस्टिंग मध्ये इथे देण्याचे पैसे पण आहेत हे लक्षात आलं... ( ते पूर्ण गोल पण मारु देत नव्हते. सेकंड गिअर टाकून अर्ध मैदान झालं की बदला ड्रायव्हर).
पारपत्र कार्यालयात मात्र अडवलं. तेव्हा सिंहगड रोडला पोलिस चौकीच नव्हती ! एक छोटी चौकी अभिरुची मध्ये होती. त्यामुळे व्हेरिफिकेशन साठी खडकमाळ - स्वारगेट ला हवेली तालुका पोलिस ठाण्यात गेलो होतो. अगदीच लहान दिसत असल्याने (तेव्हा :) )
पोलिस फार प्रेमाने वागले. पण त्यांनी आम्हाला तिथे येता येणार नाही सरपंच किंवा कोणी बड्या व्यक्तीचे पत्र आणा असं सांगितलं. अखेर काहीतरी ओळखी काढून पत्र घेऊन गेलो. ते पाहून जो चेहरा त्या पोलिसाने केला त्यावरुन आपलं काम झालं हे समजलं.
पण सगळं काम झाल्यावर 'प्रोसेसिंग फी' असते म्हणून १०० का २०० रुपये घेतले. हे इतकं रीतसर होतं की मला तेव्हा खरं वाटलं होतं :(
कुठले नियम मोडत नाही त्यामुळे ट्रॅफिक पोलिसाला काही देण्याचा प्रश्न येत नाही. एक दोनदा उगाच पकडल्यावर अर्धा तास थांबून वाद घालत राहिलो तेव्हा सोडून दिलं होतं.
फ्लॅट खरेदीत अप्रत्यक्ष पणे दिले असतील पैसे कारण दुय्यम निबंधक अधिकारी त्याशिवाय सहीच करत नाही असं नंतर कळलं !! पण स्वत:चा जुना फ्लॅट विकताना सिंहगड रोडच्या कार्यालयात अतिशय चांगला अनुभव आला. वकीलाची नाममात्र फी वगळता वर काही घेतले नाहीत. कार्यालय नवीन आणि नीट होतं. नुकतंच या प्रोसेसचं संगणकीकरण झालं होतं.
हैदराबादला आर टी ओ ऑफिसरने खूप त्रास दिला. सगळी कागदपत्रे असून व एन ओ सी असून गाडीवर रिपोर्ट लिहिला. विनाकारण कुकटपल्ली ते खैरताबाद तीन चार चकरा मारायला लावल्या. पण रिपोर्टचा फाईन वगळता एक पैसाही दिला नाही. तिथे सिस्टीम चांगली आहे. खायला संधी कमी आहे. पण तक्रार घ्यायला कोणी नव्हतं. पी आर ओ आठ दिवस भेटला नाही !
दुसर्या आर टी ओ मध्ये काम करणार्या लोकांना टॅक्स किती आणि कसा घ्यायचा हेही माहीत नव्हतं. तिथे काही सरकारी पगारावर नसलेली तरुण मुलं सगळी कामं करत होती. पूर्ण कागदोपत्रीसह आणि तिथल्या बाई फक्त आरडाओरड करत होत्या सगळा वेळ आणि त्याने सांगितल्यावर सांगेल तिथे सही. त्यांना काहीही कामाची माहिती नव्हती. राजेंद्र नगर रस्त्याला रंगारेड्डी जिल्ह्यासाठीचं ते आर टी ओ होतं.
बर्याच जणांना विवाह निबंधक कार्यालयात लाच द्यावी लागली आहे. हैद्राबादचा अनुभव सुखद होता. तिथे नीट माहिती लिहिली होती. लोक चांगले होते. फक्त तेलुगू पद्धतीचे लग्नाचे फोटो नाहीत म्हणून गोंधळले होते बराच वेळ :) सगळं काम झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट हातात दिल्यावर तिथल्या एका अगदी गरीब आणि अपंग कारकूनाच्या चेहर्यावर खूप आशेचे भाव दिसले त्यामुळे त्याला काही पैसे दिले.
एम एस ई बी मध्येही खूप वर्षे रेंगाळलेली कामं एक पैसा न देता हेलपाटे मारून करुन घेतली.
संभाजी पार्क, कोथरूड, अरण्येश्वर इथे सॉफ्ट ड्रिंक जास्त भावाने विकणार्यांशी खूप भांडलो. एक दोघांनी 'मला आता तुम्हाला विकायचंच नाही. संपलं आहे, गार नाही' अशी वाटेल ती उत्तरं दिली.
एक मनुष्य उलट भांडला आणि कुठे तक्रार करायची ती करा असा आरडाओरडा केला. तेव्हा पेप्सीचे रिजनल सेल्स मॅनेजर ओळखीचे होते. त्यांना फोन लावतो अशी धमकी दिल्यावर दिवे गेले आहेत गार नाही सांगितलं. पण नंतर काही दिवस बरोबर किंमतिला विकले. पुन्हा येरे माझ्या मागल्या.
पुणे महानगरपालिका हा भयाण प्रकार आहे. तिथे एक काम अत्यंत प्रयत्नाने आणि अनेक चकरा मारुन पैसे न देता करुन घेतले. त्यावरुन जर कोणाचं काही काम अडलं तर हे लोक किती त्रास देतील याचा अंदाज आला.
कळकटलेल्या जुनाट खोल्या. हजारो .. हो खरोखर हजारो फायली. एका वेळी त्या माणसाची खुर्ची सोडुन खोलीत सर्वत्र फायली होत्या.
जुनाट टेबलं आणि जुन्या पद्धतीच्या हाताच्या लाकडी खुर्च्या. किमान चाळिस वर्ष जुने उषा किंवा जी ई सी चे करकरणारे पंखे आणि किरकोळ पगार. आणि अत्यंत गोंधळाचं, स्पष्ट सुचना नसलेलं काम. असंख्य लोक... परत कधीही मनपाचे ते अंधारे कॉरिडॉर्स पाहण्याची इच्छा नाही.
सर्वात वाईट अनुभव. नात्यातील एका तरूणाचे मुंबईत हार्ट अटॅकने अचानक निधन झाले. तो एल अँड टी मध्ये होता. तिथेच गेल्याने पोस्ट मॉर्टेम झाले. घाटकोपरला राजावाडीच्या सरकारी शवविच्छेदन केंद्रात त्या लोकांनी चेहरा नीट ठेवण्यासाठी एल अँड टी च्या अतिशय वरिष्ठ लोकांकडून बरेच (बहुधा पाच हजार) रुपये घेतले. आई वडील दूर गावी होते तिथे त्यांना त्याला शेवटचं नीट बघता यावं यासाठी ते दिले. त्यानंतर काम करुन लवकर सोडावं यासाठी काही हजार घेतले. तरी सकाळी नऊला आलेली बॉडी संध्याकाळी चार ला दिली जेव्हा एल अँड टी चे जी एम पर्यंत लोक येऊन गेले. कंपनीच्या डॉक्टरच्या सर्टीफिकेट नंतर आणि दवाखान्यात ज्याचा मृत्यू झाला अशा केसला इतका त्रास दिला. तिथे त्याची तरुण वयाची बायको सोडुन कोणी नव्हतं. कंपनीच्या लोकांनी अतोनात मदत केली. स्वतःच्या खिशातून सुद्धा हजारोंनी खर्च केला. आणि गेलेल्या माणसावर या सरकारी लोकांनी प्रचंड पैसा खाल्ला. मन विषण्ण झालं....
22 Jul 2009 - 10:20 am | चिरोटा
लातुर भुकंपाच्यावेळीही असे अनुभव लोकाना आले होते.ह्यात भारतिय सैन्याचे जवानही सामिल होते.एकाने सांगितलेला अनुभव- एक स्त्री मोठ्या ढिगार्यात अडकली होती.एका जवानाने ते पाहिले. तिच्या कानातले/हातातले दागिने काढुन तिला पुन्हा ढिगार्यात लोटले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
22 Jul 2009 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे
माझी बायको पुण्यात हाच व्यवसाय करते. रिअल इस्टेट कन्सल्टंट. अगोदर ती दुय्यम निबंधक कार्यालयात नोकरीला होती. तेथे लाच हा प्रकार यंत्रणेचाच अविभाज्य भाग होता. मग नोकरी सोडली.
आता तोच 'लाच' हा भाग तिच्या 'सर्विस चार्ज' मधे मोडतो. अनिवासी भारतीय, मुंबईवाले कष्टमर यांना वेळ व त्यातील ज्ञान नसते. तेच तिचे भांडवल. त्या सर्व लोकांना ती पुर्वनियोजित १५ मिनिटात मोकळे करते. लोक तिच्या विश्वासावर 'फुल्या' केलेल्या जागी सह्या करतात.यासाठी तिला आतुन 'म्यानेजमेंट' करावी लागते. दुय्यम निबंधकाने जर काटेकोर पणे नियम लावायचे ठरवले तर बहुसंख्य व्यवहार होणारच नाहीत. मग कितीही चक्करा मारा. या सर्वांची कल्पना ती कष्टमरला देते. कष्टमर म्हणतो म्हणुन तर आम्ही तुमच्याकडे येतो. अनेक व्यवहारात तिने जवळच्या कष्टमरला प्लॉट/फ्लॅट घेण्यापासुन परावृत्त केले आहे. त्यातील धोके समजावुन सांगुन योग्य वेळी योग्य फ्लॅट घेण्याला मदत केलेली आहे. जुनेकागद पत्र मिळणे हे तर महादिव्य. लोक आयत्यावेळी जागे होतात. मग कितीही पैसे घ्या पण जुनी कागद पत्रे मिळवुन द्या असे म्हणतात. पण या गोष्टी ती मिळण्याच्या 'लक' वर असतात. पराधीन गोष्टीची हमी ती देत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Jul 2009 - 6:38 pm | सूहास (not verified)
:W
सविस्तर प्रतिसाद राखुन ठेवत आहे..
लोकप्रभात हा लेख सापडला..
http://www.loksatta.com/lokprabha/20090724/bhavtal.htm
सुहास
22 Jul 2009 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे
लाच हा भ्रष्टाचाराचा अनेक पैलुंपैकी एक भाग आहे. सुहास यांनी दिलेला लोकप्रभेचा दुवा उत्तम ( असाच ज्योतिषावरील एक लोकप्रभेचा दुवा अनपेक्षित पणे मिळाला होता असो) भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट+आचार. असा निकष लावला तर आपण सर्वच भ्रष्टाचारी होतो. कमी भ्रष्ट म्हणजे स्वच्छ असा निकष लावुनच आपली सुटका आहे. स्वतःच्याच मनाची समजुत घालताना एका मनाने दुस-या मनाला (सोयीसाठी वापरलेले शब्द) दिलेली काही वैचारिक, काही भावनिक चिरिमिरि देउन ही कुत्तरओढ आपण थांबवायचा प्रयत्न करतो. अकार्यक्षमता, डोळेझाक करणे, असंवेदनशीलता,अधिकाराचा दुरुपयोग हे देखील भ्रष्टाचारच आहेत. निव्वळ स्वार्थासाठी केलेला भ्रष्टाचार व असहायतेपोटी स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी केलेला भ्रष्टाचार हे तत्वतः भ्रष्टाचार असले तरी त्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषणमुल्य वेगवेगळे आहे.
लाच ही समांतर अर्थव्यवस्था आहे. हपापाचा माल गपापा असे दुष्टचक्र इथे अनेकदा दिसुन येते.(अपवाद असतील ) नवस ही देवाला दिलेली लाचच असते. तु माझे हे काम कर मी तुला अमुक अमुक देईन. यामुळे अनेक देवस्थाने नवसाला पावु लागली व श्रीमंत झाली. शॉर्टकट शोधणे हे माणसाला सोयीचे जाते. लाच ही देणारा व घेणारा याच्या परस्पर सोयीतुन निर्माण झाली.
सरकारी खात्यात अनेक वरिष्ठ सम्पूर्ण शासकीय यंत्रणा स्वत:च्या दिमतीसाठी बिनदिक्कतपणे वापरतात. तसा वापर करण्यास प्रतिबंध करणाऱ्याला टार्गेट करुन नोकरी करणे मुष्किल करुन टाकतात. त्या मानसिक तणावातून चुका झाल्या की त्याचे कागदावर भांडवल करुन रीतसर शासकीय नियमांचाच वापर करुन काटा काढतात. मग इतर लोकही ताटाखालचे मांजर बनून राहणे पसंत करतात. सदासर्वदा कायदेशीर नियमानुसार राहणे कुणालाही शक्य नसते. बरं हे नियम व्यवहार्य असतीलच असेही नाही.नियमांच्या कचाटयात न सापडता जगणे हे तारेवरच्या कसरतीपेक्षाही अवघड आहे. सर्वच सरकारी खात्यात लायकी नसलेले अधिकारी अनेक असतात. केवळ पदासाठी आवश्यक असलेल्या काही विशिष्ट खातेनिहाय तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने ते अधिकारी झालेले असतात. पण ही लायकी ठरविण्याचे अधिकार कोणाचे? हा प्रश्न उपस्थित होतो. असो
(आम्ही या घुसमटीतुन मार्ग काढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली पण तो मार्ग नाही पळपुटे पणा आहे हेही आम्हीच जाणतो.)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Jul 2009 - 11:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
घाटपांडे काकांचा प्रतिसाद मनापासून आवडला आणि पटला.
(सरकारी ऑफिसात मिपा-मिपा खेळणारी) अदिती
22 Jul 2009 - 12:09 pm | प्रकाश घाटपांडे
स्वानुभवाचे बोल आहेत. तरी देखील चौकटीत राहुन काही गोष्टी करता येतात यावर नोकरशाईचे रंग हे ज्ञानेश्वर मुळे यांचे एक पुस्तक आवडले. सध्या ते माले येथील राजदुत आहेत. साधना प्रकाशन चे हे पुस्तक आहे. कोल्हापुर भागातुन ग्रामीण भागातुन आलेला हा माणुस आहे. संवेदनशील प्रशासकीय अधिकारी . उत्तम सुसंवादक. साधानात ही लेखमाला होती. घुसमटीतुन देखील कुढत न बसता मार्ग काढणारा हा लेखक ऐकताना देखील आपल्यातला वाटतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Jul 2009 - 12:35 pm | पाषाणभेद
काका तरीही , तुम्ही तुमचे संवेदनशील मन जपले यातच सर्व काही आले.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 10:52 am | मराठी_माणूस
पैसा आणि प्रतिष्ठा हे समिकरण मोडले पाहिजे तरच भ्रष्टाचार कमी होउ शकेल.