म्हमद्या !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Jul 2009 - 10:13 am

सकाळी नेहेमीच्या लोकलने सायनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताना नेहेमीप्रमाणे आपसुकच मागच्या खिशावर हात गेला. खिश्यातलं पाकीट जागच्या जागी असल्याची खात्री झाली आणि एक निश्वास सोडला. हुश्श .... चला आता संध्याकाळपर्यंत तरी काळजी नाही.... अगदी नेहेमीप्रमाणेच. नकळत एक सुस्काराही सोडला गेला....

अहं, म्हमद्या आता कधीच दिसणार नव्हता.

मी काही कुणी सराईत लेखकू नाही, त्यामुळे जे सांगायचय ते सरसकट सांगणार आहे. सांभाळुन घ्या. मी अंबरनाथला राहातो. रोज सकाळी सात वाजता घरातुन बाहेर पडायचे, लोकल पकडुन सायन गाठायचे. आधी बीकेसीला होतं ऑफीस, तेव्हा कुर्ल्याला उतरायचो आणि मग शेअर रिक्षा किंवा बस जसे मिळेल तसे वाहन पकडून ऑफीसला पळायचो आता एक स्टेशन पुढे. ऑफीस आता धारावी साईडला शिफ्ट झालेय ना. अं... हो, ते राहीलंच, केमिकल प्रॊडक्ट्स बनवते कंपनी आमची. मी तिथे डिस्पॅचला आहे. म्हणजे सांगायला डिस्पॅच क्लार्क पण कामे सगळीच करावी लागतात ! आता सायनला उतरलो कि सरळ चालतच निघतो. दहा मिनीटात ऒफीस. मग दिवसभर तोच तोच राम रगाडा.

आमचा तात्या पण असा आहे ना! तात्या .... ? गोंधळात पडलात ना? आम्ही आमच्या बॉसला तात्या म्हणतो. का ? तर त्याचे वरचे दात तात्या विंचुसारखे आहेत म्हणुन..... आणि डोक्याचा विमानतळ झालाय, बंद पडलेल्या रनवेसारखा. मध्ये मध्ये छोटी छोटी खुरटी झुडपे उगवली आहेत म्हणा! तर आमच्या तात्याच्या सुपीक (?) डोक्यातुन आम्हाला (त्यात मीही आलोच की! ) छळण्याच्या अफलातुन कल्पना येत असतात आणि मग आम्ही नाचत राहतो त्याच्या हुकूमावर. असो, थोडं भरकटायला झालं. तर आमचा तात्या सकाळी मस्टर घेवूनच बसलेला असतो. दररोज सकाळी आलो की मला पहीला संशय येतो तो म्हणजे या माणसाने घड्याळ पाच मिनीटे पुढे तर करून ठेवलेले नाही ना? नाहीतर घरुन नेहेमी वेळेवर निघुन सुद्धा मला नेहेमीच लेट मार्क का मिळतो? मी ऑफीसमध्ये शिरलो की ऒफीसचा स्टाफ एकमेकाला खाणाखुणा करायला लागतो. तो चंद्रकांत.... आम्ही त्याला समर्थाघरचे श्वान म्हणतो. (तसा तो इथे प्युन आहे, पण रुबाब एम.डी.चा) मला बघितलं की साला कुजकटासारखा हसतो आणि सांगतो.... सायबांनी बोलावलय तुम्हाला! हरामखोर साला.

अरे..., मी तुम्हाला माझी ओळख तर करुन दिलीच नाही ना. मी ....... जावुद्या हो, काय ठेवलय नावात? तो कोण शेक्सपिअर म्हणुन गेलाय ना.

शेक्सपिअर...! हं....त्याचं काय जातंय म्हणा? तो साला भारतात जन्माला यायला पाहीजे होता. मग त्याचं झालं असतं डेअरिंग "नावात काय आहे म्हणायचं?"

आणि नावात जर काही नसतं तर माझी आणि म्हमद्याची भेट कशी झाली असती? म्हमद्या पाकेटमार कशाला झाला असता? म्हमद्याला कशाला जीव गमवावा लागला असता? नावात जर काही नसते तर तात्याचं दुसरं रूप कळलं असतं का मला? जावु दे , सांगुनच टाकतो. माझं नाव सराफ.. अशोक सराफ! चमकलात ना नाव ऐकुन. नाही हो, फक्त नावच काय ते सारखं आहे आमचं. बाकी आमच्यात काहीच साम्य नाही. तो खुप गुणी आणि मुरब्बी नट आहे हो. मला आमच्या तात्यासमोर उभा राहील्यावर उशीर का झाला याचं एक कारण आठवत नाही साधं. मी कसला बोडक्याचा अभिनय करतो. पण या नावामुळेच माझी आणि म्हमद्याची ओळख झाली होती. त्यादिवशी असाच कुर्ल्याला उतरलो. तेव्हा ऑफीस अजुन बीकेसीतच होतं. स्टेशनवर उतरल्यावर नेहेमीच्या सवयीने हात मागच्या खिश्यावर गेला आणि चमकलोच. पाकीट जागेवर नव्हतं. मी मटकन खालीच बसलो ... प्लॅटफॉर्मवर. कालच पगार झालेला, सकाळी गडबडीत निघताना पैसे घरी काढुन ठेवायचे विसरलो. ते तसेच पाकीटात राहीले आणि आता कुणीतरी पाकीटच मारलेलं. पुर्ण महिन्याचा पगार होता हो. ५६६७ रुपये आणि ८० पैसे. बरोबर लोकलचा पास आणि स्वामींचा फोटो पण. एका क्षणात सगळं स्टेशन माझ्या डोळ्यासमोरुन गरागरा फिरलं. बरोबर जगताप होता. त्याने हाताला धरुन उठवलं तिथल्याच एका बेंचवर बसवलं.

"काय झालं रे सराफ?"

"जगताप, अरे पाकीट मारलं रे कुणीतरी! महिन्याचा पुर्ण पगार होता बघ त्यात! " मी अक्षरश: रडकुंडीला आलो होतो. आज जेमतेम आठ तारीख, पुढचा सगळा महिना आ वासुन उभा होता डोळ्यासमोर. घरभाडं, लाईट बील, किराणा, मुलाची शाळेची फी, आईची औषधे! शालिनीच्या रोजच्या वापरातल्या साड्या खुपच विरविरीत झालीय, रंगही उडालाय तिचा. तिच्यासाठी एक साधं का होइना पातळ घ्यायचं होतं? लोकलचा पास रिन्यु करायचा होता. जमलंच तर वसंतरावांची नवीन आलेली कॅसेट घ्यायची होती. ब्रम्हांड आठवलं हो मला. त्या उद्वेगातच बोलुन गेलो.

"आडनाव सराफ म्हणुन मोठ्या हौसेने आई-वडीलांनी अशोक नाव ठेवलय बघ.... श्रीयुत अशोक सराफ, पण साला त्या अशोक सराफाचं नशीब कुठून आणु?" माझे डोळे भरुन आले होते. जगतापला पुढे जायला सांगितलं ऑफीसात.

"जगताप, तु हो पुढं, साहेबांना कल्पना दे. मला उशीर होइल म्हणावे. मी पोलीसात तक्रार नोंदवुन येतो. तु जा पुढे, नाहीतर माझ्याबरोबर तुला पण लेटमार्क पडायचा."

जगताप गेला आणि मी पोलीस चौकीकडे निघालो. मनात एकच विचार होता, आता कुणापुढे हात पसरायचा? सगळ्या नातेवाईकांकडे उधार मागुन संपले होते. आणि त्यांच्याकडे उधार मागायचे म्हणजे भीक नको पण ....... असली गत. काय करू ... कुठे जावू? हा महिना कसा घालवायचा? वेड लागायची वेळ आली होती. तेवढ्यात कुठूनतरी एक चौदा - पंधरा वर्षाचा पोरगा पुढ्यात येवून उभा राहीला.

अंगात एक जुनाट, मळलेला पण रंगीबेरंगी, फॆन्सी टी-शर्ट, त्याखाली तसलीच गुडघ्यावर रफ़ु केलेली विरविरीत जीन्स. चेहेर्‍यावर मळाची पुटे साठलेली. अस्ताव्यस्त वाढलेले केस. तोंडात बहुतेक मावा भरलेला असावा. तो अचानक समोर येवून उभा राहीला आणि मी दचकलोच. त्याने हात पुढे केला....

"साब, तुमेरा पाकीट ! "

मी पाकीटावर झडपच घातली आधी आतला मुद्देमाल चेक केला, सगळं जसं च्या तसं होतं, जागच्या जागी.

"अरे ये पाकीट तुम्हारेजवळ कैसा आया?"

वर तोंड करुन त्याला विचारेपर्यंत पोरगा गायब झालेला.

मी चमकलोच, च्यायला हा कुठे गायब झाला? आभार मानायचीही संधी दिली नव्हती त्याने मला. मी मनोमन त्याचे आणि परमेश्वराचे आभार मानले आणि ऑफीसकडे निघालो. श्री स्वामी समर्थ, माऊली तुमचं लक्ष आहे हो लेकराकडे. साहजिकच ऑफीसला पोहोचायला थोडा उशीरच झाला.

ऑफीसमध्ये पोचलो की लगेच सगळ्यांनी घेरलं.

काय झालं सराफ? नोंदवली का पोलीसात तक्रार? काय म्हणाले पोलीस? पाकीट मिळालं का? ........

एक ना दोन नाना प्रश्न ! आणि त्यानंतर सुरू झाले सल्ले...

"सराफ, तुम्ही पाकीट कुठल्या खिशात ठेवलं होतं?" इति सौ. गोरडेबाई.

"पँटच्या मागच्या खिशात?" .... मी

"तरीच, पाकीट कधीही पुढच्या खिशात ठेवावे, मागे मारले जाण्याची शक्यता जास्त असते." इति सौ. गोरडेबाई.

"सराफ, अहो सगळे पैसे एका जागी ठेवलेतच कशाला? वेगवेगळ्या खिश्यात डिस्ट्रिब्युट करुन ठेवायचे ना! " ज्यु. अकाउंटंट देशमाने.

"सराफ. साला तु पन ने, एकदम घोचुच असते बग, साला तुला पाकीट बॅगेत ठेवायला काय झाले?" म्हातारे रुस्तम अंकल.

मी गपचुप ऐकत होतो. माझं पाकीट परत मिळालंय हे कुणाला सांगितलंच नाही. म्हणलं बघू एवढे जण इतके सल्ले देताहेत तसाच मदतीचा हात कुणी पुढे करतय का? पण कुणाच्याही मनात बहुदा तशी इच्छा झाली नाही.

मी खुर्चीवर टेकतो न टेकतो तोच चंद्रकांत समोर येवून उभा राहीला. तो काही बोलायच्या आतच मी उठलो...

"जातो बाबा ! तात्याने बोलावले असेल ना ! " तसा तो पुन्हा कुजकटासारखा हसला.

मी केबीनच्या दारावर नॉक केले आणि दरवाजा ढकलुन आत शिरलो.

"सर, आय एम सॉरी.. पण आज ........

पण तात्याने माझं बोलणं मध्येच थांबवलं. स्वत:च्या मागच्या खिश्यात हात घालून पाकीट काढलं. त्यातुन काही पैसे काढले, माझ्या हातावर ठेवले....

"हे बघा सराफ, पाच हजार आहेत हे. दर महिन्याला १०००.०० या हिशोबाने कापुन घेणार आहे मी. आय कॅन अंडरस्टॆंड युअर कंडिशन. पण आजचा लेटमार्क मात्र कापला जाईलच. त्यात सुट नाही.. समजले? निघा आता..कामाला लागा?"

तात्या त्याच्या नेहेमीच्याच स्टाईलमध्ये वसकले आणि पुन्हा खाली मान घालुन कामालाही लागले. मी त्यांच्याकडे बघतच राहीलो. या माणसाचे हे ही एक रुप आहे तर. रोज माझ्यावर खेकसणारा, एखाद्या कट्टर वैर्‍यासारखा राग राग करणारा तात्या खरा की हे तात्या खरे! मला काहीच समजेना. माझे डोळे भरून आले पुन्हा.

"सर.....!"

"काय आहे? हे काय तुम्ही गेला नाहीत अजुन? चला कामाला लागा. लेटमार्क पडणारच. उगीच गयावया करण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचा आणि माझाही ! इट्स ऑफ नो युज ! "

"नाही सर ...... ! मी त्यांना सगळे काही सांगितले, पाकीट परत मिळाल्याचेही सांगितले. त्यांनी दिलेले ५०००.०० रुपये त्यांना परत केले आणि म्हणालो.

"धन्यवाद सर, आज पहिल्यांदा कळलं , दिसतं तसं नसतं म्हणुन जग फसतं."

त्यांनी एकदा माझ्याकडे पाहीलं... "ओक्के! चला कामाला लागा!" आणि पुन्हा फायलीत डोकं खुपसलं.

मी कामाला लागलो. काही दिवसात ती घटना आणि तो मुलगा दोन्हीही विसरून गेलो. पण ते संबंध इतक्यात संपायचे नव्हते. त्या घटनेनंतर साधारण दहा बारा दिवसांनी तो मुलगा परत दिसला. कल्याणला ४ नंबर प्लॅटफॉर्मवर जिन्याच्या खाली बिडी ओढत उभा होता. मी पुढे गेलो, त्यानेही ओळखले असावे. मला पाहताच त्याने पळायचा प्रयत्न केला पण मी पुढे होवून त्याचा हातच धरला तसे नाईलाजाने त्याला थांबावे लागले.

"सलाम अशोक सराफ साब !" त्याने उजव्या हातातली बिडी डाव्या हातात घेतली आणि उजवा हात डोक्यापाशी नेवुन मला नमस्कार केला.

मी चाट पडलो! "तुला माझं नाव माहीत आहे?"

"अरे साब, तुम्हेरा नाम मालुम पडा, इसि वास्तेच तो तुम्हेरा पाकीट लौटाया ना!" तो खालमानेने म्हणाला.

"मेरेको कुछ कळ्या नही? नामका क्या वास्ता? और तुमको मेरा नाम कैसा पता चल्या?"

"अरे साब, वो दिन जब तुम प्लॅटफोरमपे परेशान बैठा था, तब तुमनेइच तो बोला था ना, अशोक सराफ करके. वो अपुनने सुना करके तुमेरा पाकीट लौटा दिया! वो क्या है ना साब, अपुन भोत बडा फॅन है अशोक सराफ साबका. वो तुमेरी मराठी फिलममे काम करताय ना, वोइच! क्या काम करताय बाप, बोलेतो मराठी फिलम का गब्बरच हे तो उनो !"

"अरे बाबा, म्हणायचच असेल तर बच्चन म्हन, संजीवकुमार म्हण... एकदम गब्बर काय? अशोक सराफांनी बहुतेक हिरोचीच कामे केली आहेत. तुला थेट विलेनच का आठवला बाबा? आणि माझं पाकीट तुला कुठे मिळालं ते सांगितलंच नाहीस!

"अरे साब, अपनी अब तक की जिंदगीमें सिरफ विलेन लोगोसेइच वास्ता पडेला है! अपने को पैले वोइच याद आयेगा, वो छोडो. रही बात तुमेरे पाकीट का पुछो तो वो अपननेच उडाया था ! लेकीन जब अपनेको पता चला की तुमेरा नाम अशोक सराफ है तो अपनेको भोत बुरा लगा! बोले तो.... अपन खुदसे बोला, म्हमद्या साले... कुछ तो शरम कर. अपनके लाडले एक्टरके नाम वाले आदमी का पाकीट मारता है, किस्मतमें कभी अशोकसाबसे मिलना नसीब हुवा तो क्या मु दिखायेगा? डुब मर साले चुल्लु भर पानीमें! करके अपनने तुमेरा पाकीट लौटा दिया! अब जाने भी दो ना साब, देखो हवालदार इधरीच आ रेला है! खाली फोकटमें हंगामा करेगा!"

मी त्याला सोडला तसा सराईतासारखा तो स्टेशनवरच्या गर्दीत मिसळून गेला आणि मीही. च्यायला त्या हवालदाराच्या प्रश्नांना कोण उत्तरे देत बसणार? अशोक सराफ नाव असल्याचा असा फायदा होइल याचा मात्र मी कधी विचारही केला नव्हता. कोण रे तो "नावात काय आहे म्हणणारा?"

त्यानंतर मात्र म्हमद्या नेहेमीच दिसायला लागला. कधी कुर्ला, कधी सायन तर कधी कल्याण स्टेशनवर. आज माझं मलाच आश्चर्य वाटतं मी कसा काय त्याच्याशी अटॅच झालो असेन? बोलुन चालुन म्हमद्या एक पाकीटमारच होता. समाजकंटकच म्हणावे लागेल त्याला!

समाजकंटक? नाही... म्हमद्या खुप काही होता. जसा जसा त्याला भेटायला लागलो, तसतसा म्हमद्या मला कळत गेला. खरेतर त्या दिवसानंतर माझे डोळे आपोआप म्हमद्याला शोधायला लागले. मी कोणी समाजसेवक किंवा सुधारक नाही. माझ्या घरच्या समस्या सोडवतानाच नाकी नऊ येतात माझ्या. पण म्हमद्याबद्दल का कोण जाणे, एक आपलेपणा वाटायला लागला होता. एका भेटीत मी त्याला सहज सांगुन टाकलं की ज्या भुमिकेमुळे त्याच्या आवडत्या अशोक सराफची कारकिर्द बहरास आली त्या पात्राचे नाव देखील "म्हमद्या" होते... "म्हमद्या खाटिक"! हे ऐकल्यावर तर पठ्ठ्या एवढा खुश झाला की तिथेच त्याने "इस जुम्मेको मलंगबाबा को चद्दर चढानेका!" असं ठरवुन टाकलं. त्याचं हे अशोक सराफचं वेडच मला त्याच्याबद्दल विचार करायला भाग पाडत होतं. त्याच्यात कुठेतरी एक लहान मुल शिल्लक आहे याची जाणीव करुन देत होतं. नाहीतर कुठे गर्दीतुन लिलया पाकीटं मारुन पसार होणारा म्हमद्या आणि कुठे हा म्हमद्या? सगळच और होतं. पण त्यामुळेच मला म्हमद्याचं जास्त आकर्षण वाटायला लागलं. कुठुन आला असेल? कुठे राहात असेल? कोण कोण असेल त्याच्या घरी? चांगलं शिकायचं सोडुन एवढ्या लहान वयात पाकेटमारीकडे का वळला असेल? एक ना दोन हजार प्रश्न मनात उभे राहायल लागले.

हळु हळु बोलता बोलता म्हमद्याकडुन त्याची कहाणी कळायला लागली. गडचिरोलीजवळच्या एका छोट्याशा खेड्यातुन तो सात वर्षाचा असतानाच पळुन आला होता. तेव्हापासुन लोकल ट्रेन हेच आई - बाप असणारा "मोहंमद शरीफ गयासुद्दीन काझी" उल्हासनगरच्या एका झोपडपट्टीत राहात होता.

"साब, बच्चा था सात सालका ! पढाईमें अपनेको बिलकूल इंट्रेस नै , दिनभर साला इधर उधर मटरगश्ती करता रहता था! इस्कुलके नामपें थेटरमें जाके बैठता था, एक दिन बापने पकडा थेटरमेच! जो मारा सालेने, दो दिन खटिया पें पडा रहा!"

"ए म्हमद्या, पिताजी को गाली नही देनेका रे, अच्छी बात नै होता!" अस्मादिक.

"पुरा किस्सा तो सुनो साब, बाप ने इसलिये नै मारा की मैं इस्कुल छोडकू पिच्चर देख रैला था ! वो तो ऐसा हुवा की उनो भी आया था फिलम देखनेको! साला अम्मी को घरपें छोडकें किसी और को साथ ले आया था! अपुनने मौकेका फायदा ऊठानेका कोशिष किया! उसको बोला, देख, अम्मीको नै बोलने का हय, तो अपुनको हररोज पाच रुपया मंगता पिच्चर के लिये! देगा क्या? साला पैसा तो दुर, इतना मारा मेरेको की पुछो मत ! अम्मी को बोला तो उनो बी मेरेपेच गुस्सा हुई! तेरेको क्या करना है बोली! मेरेको बोली....

"अरे माटीमिले, पैला बेटा करके तेरा नाम मोहंम्मद रखा, बोलेतो अल्ला का नाम और तु जब देखो शैतान की माफीक हरकते करताय!"

"अब तुमीच बोलो साब, अपनेको अल्लाने ऐसाइच बनाया, तो अपन क्या करता? नाम मोहंम्मद रखनेसे कोई अल्ला बन सकता है क्या? तुमेरा नाम भी अशोक सराफ है, पन तुमे अ‍ॅक्टिंग करनेको सकता क्या? नै ना? फीsssर .........

वोईच दिन घर छोडके भागा. सिधा बंबई आके पोचा. तीन दिन ऐसेइच फुटपाथपें सोया ! तीन दिनमें सिरिफ एक बार वडापाव खाया था साब! काम ढुंढनेका भोत कोशीश किया! हाटेलमें काम भी किया! लेकीन सेठ साला हरामी था! काम भोत करवाता था! बदलेमें क्या देता तो सुबह १० बजे दाल चावल , उसके बाद डायरेक रात को ११.३० बजे हाटेल बंद होने के बाद फिर वोइच सडा हुवा बासी दाल चावल! पैसा तो देताइच नै था! अपनका दिमाग सटक गया, करके एक दिन रात को उसका गल्ला तोडके भाग गया!" म्हमद्या सांगत होता आणि मी सर्द होवून ऐकत होतो. त्याच्या बोलण्यातल्या बेफिकीरीसोबत असणारा प्रामाणिकपणाही कुठेतरी स्पर्श करुन जात होता.

किती वेगळं असु शकतं ना आयुष्य? मला माझं लहानपण आठवलं. आमची पण परिस्थिती गरीबीचीच होती. वडील गिरणीकामगार. आम्ही तीन भावंडं, दोन मोठ्या बहिणी आणि मी धाकटा. पण सुदैवाने माझे वडील म्हमद्याच्या बापासारखे अजिबात नव्हते. माळ घातलेला साधा सरळ वारकरी होता हो तो. पण त्यामुळे गरीबी असली तरी योग्य त्या वयात योग्य ते संस्कार झाले होतेच आम्हा भावंडावर. चांगले, सुसंस्कृत आई - वडील लाभणं ही देखील नशीबाचीच गोष्ट आहे हो!

त्या पार्श्वभूमीवर मी जेव्हा म्हमद्याचे आयुष्य तोलायचो, तेव्हा मला तो जास्तच केविलवाणा वाटायचा. त्याला जर चांगले वडील लाभले असते, त्याचवेळी त्यांनी जर त्याला योग्य पद्धतीने समजावले असते तर कदाचित आज मोहंम्मद काझी कुठेतरी साधी का होइना पण नोकरी करत साधे सरळ जीवन जगला असता. पण .......?

हा पण, खुप वाईट असतो. आपण सगळेच नेहेमी हे असलं जर - तर चं जगणं का जगतो? सामान्य माणसाला त्याच्या स्वत:च्या अटीवर जगता येवुच नये का? नाही, याला ही अपवाद असतीलच हो. पण ते फार कमी असतात, म्हणुन तर त्याला अपवाद म्हणतात ना! म्हमद्यासारखे रस्ता चुकलेलेच जास्त. देव, देव म्हणतात त्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका यायला लागते असे काही बघितले की!

"ओ साब, किदरकु खो गया! साला अपनका इष्टोरी सुनके निंद तो नै आ रेलाय ना? तो वो रोज जो चोरी करके भागा, उसी शाम को पुलीस ने पकडा, भोत मारा, भोत मारा ! पुलीसवाला बी वोइच बोला... साले नाम मोहंम्मद होर काम शैतानके ! साला वो सेठ, मार मार के काम करवाता था, पगार नै देता था, उसको कुछ नै बोला, पर मेरेको जानवर के माफीक रगडा सालेने! अपनने वोइच दिन तै किया साब...ये दुनीया अच्छाईकी नै, इदर जैसे को तैसाच होना पडता! मांगके नै मिलता ना तो छिनके लेनेका ! दुसरे दिनसे सिद्धे लोकलमें, भीडमें पाकीटामारी चालु किया! वो वखत अपन मेन लाईन पें धंदा करता था! ये बंबईका पब्लिकभी ना बकरोके झुंडके माफीक होता है! साला किसकोबी छेडो चुपचाप खडा तमाशा देखेगा, जब तक अपनेपे बिजली नै गिरती तब तक दुसरे की बदहाली का मजा लेगा! मेरे जैसे कत्ते लोगा इस वास्तेच तो सेटल हो जाते ना साब!

एकबार सावत्यादादाके एरियेमें पाकीट मारा, तो उसके लौंडोने पकड लिया! पैले तो भोत मारा उनो बी, पर जब अपुनका हुनर समझ गया तो उसका गॆंगमें भरती कर लिया! तबसे ये साला हवालदार भी पंगा नै लेता हए अपनेसे! क्या? " बोलता बोलता त्याने शर्टाच्या मळकट खिश्यातुन एक बीडी बाहेर काढली आणि शिलगावली.

"बिडी पिताय क्या साब?

"नाही रे बाबा, मला नाही ती सवय! "

"साला तुम्हारा बाप शरिफ आदमी रहा होअयेंगा! तुम खुद भी तो एकदम जंटलमेन लगता हैम अपनकी तरह हरामी नै है ! तुम पैला आदमी हे, जिसको ये सारा कहानी बताया! नै तो किसकोइच मालुम नै! अब तो अपन मा-बाप का थोबडा भी भुल गयेला है! बस अब अपन होर अपनका दोस्तलोग, येइच अपनी जिंदगी है!"

"तुझ्या दोस्तांना कधी बगितलं नाही रे तुझ्याबरोबर! ते सेंट्रल लाईनला नसतात का?" मी आणखी थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

"अरे नै साब, वो लोग ये धंदेमे नै हे! वो लक्ष्मीकांतको तो अपनने एक ठेला लेके दियेला है..वो उदर कल्याण इस्टेशन के बाहर सब्जी बेचता है! राघू इधर लोकलमेंच कुछ ना कुछ बेचता रैता है! होर भी बंदे है, मेहनत करते है, मेहनत की कमाई खाते है अपनके दोस्ता!

"अरे राजा, मग तुच का अजुन ही पाकेटमारीची कामे करतोस? तुला नाही का वाटत आपण ही त्यांच्यासारखं शांत सरळ आयुष्य जगावं म्हणुन? त्यांच्यासारखं मेहेनत की कमाई करावी ऐसा नै लगता क्या तेरेको?" मी अगदी कळवळुन विचारलं.

तसा तो माझ्याकडे बघुन असं काही हसला की माझ्या डोळ्यात पाणी आलं........

"साब अपन ये धंदा करता है, अपनका सावत्याभाईके साथ चलता है, इसलिये वो लोगा कुछ मेहनत कर पाते है! नै तो ये गॆंगवाले तो गॆंगवाले , साले हरामी पुलीसवाले भी कब का उनको भी म्हमद्या बना चुके हुते! जाना देव साब, तुम शरीफ आदमी है, फेमिलीवाला है ! ये साला इष्टोरी तुमेरे समझमें नै आयेगा! ये बंबई की पब्लिक बडी हरामी है साब! प्यार से बात करो समझती नही है! आप काम मांगने जावो....तो धक्के मारके निकाल देंगे! साले कुत्तेपें हजारो रुपये खर्च करेंगे, पर गरीब आदमी को एक रोटी देने को तैय्यार नही होते! इदर सिग्नलपें बच्चे गाडी साफ करते है, ये हरामी गाडी साफ होने तक कुछ नही कहेंगे... उसके बाद जब रुपीया-दो रुपीया देनेका वक्त आता है..तो इनकी फटती है! एक एक पैसे के लिये खिचखिच करते है, गाल्या देने लगते है! गरीब सिर्फ गरिब होता है साब, उसका कोइ नै होता, होर कोइ उसका हो सकता है तो वो है पैसा, जो उसके पास कभी होता नही! मेरेको पता है साब, मै एकदम सही नै बोलताय, गलत काम करताय, पन क्या करे साली जिंदगीने येइच तो सिखाया है, जब मांगकर ना मिले तो छिन लो!"

"मग तु राहतोस कुठे?"

"उल्हासनगर झोपडपट्टीमे दो खोली है ना साब अपना, अस्सी हज्जार रोकडा देके लियेला है!"

मी त्याच्याकडे पाहातच राहीलो. ३८ वर्षे वय झालं तरी मी अजुन भाड्याच्या खोलीत राहतो आणि हा चौदा - पंधरा वर्षाचा पोरगा दोन खोल्याचा मालक होता. मग भले त्या कुठल्या का मार्गाने मिळवलेल्या असेनात?

"अच्छा, म्हणजे तु उल्हासनगरला राहतोस तर?" मी विचारले.

"किदर साब! अपन एक तो सावत्याभाईके अड्डेपे पडेला रैता है...नै तो लोकलमें! होर इदर किदर बी नै मिला तो समझने का की ससुराल गयेला है! खोलीपें तो बच्चे लोगा रैते है!"

"ससुराल? "बच्चे...? मी थोडा संभ्रमात पडलो!"

तसा म्हमद्या खदखदुन हासला .......

"वो क्या बोलते है आप लोग! रिमांड होम! दो बार तो उदरसे भाग चुका हूं अबतक! अब साले पुलीसवाले बी पैचानने लगे है! एक दो रात अंदर रखते है फिर छोड देते है! वो भी कितना दिन किसीको फोकटमे खाना खिलायेंगे साब! खोली पे तो बच्चे लोगा रैते है अपने. वो क्या है साब, किदर किदर से आते है छोकरे बंबई पेट पालने के लिये. हर कोइ म्हमद्या नै होता ! किसीको छोटे भाई-बहनकी पढाइ के वास्त पैसा कमाने का होता है, किसीकी मा बिमार होती है, कोइ किस्मत आजमाने को आता है! वक्त पें सर टिकाने की जगा ना मिले तो साला वो भी म्हमद्या बन जाता है! होर अपनेको ये बात पसंद नै....कि कोइ होर भी पेट के लिये म्हमद्या बने, होर सबसे बडा पिराब्लेम बोले तो अपनका कोंपिटेशन बढ जायेगा ना बाप! " म्हमद्या आपले पिवळे झालेले दात दाखवत डोळे मिचकावत कसनुसं हसला आणि उठला......

"चलता है साब, धंदेका टाईम हो गया!" म्हमद्या तसाच लोकलच्या पाठी धावला, लोकलने तोवर वेग पकडला होता. पण याने कसरती करत लोकल पकडलीच.

त्यानंतर एक दिवस म्हमद्याने त्याच्या दोस्ताची पण ओळख करुन दिली. त्यानंतर मग मी रोजची भाजी त्याच्याकडुनच घ्यायला लगलो. (विकत.. पैसे देवून!)

मध्ये असेच काही दिवस गेले आणि तो लोकलमधल्या स्फोटांचा भयानक प्रकार घडला. त्यानंतर मी आपोआपच म्हमद्याबरोबरचे संबंध जरा कमीच केले. पोलीसांचा काय भरोसा द्या हो. कशातुनही काहीही अर्थ काढतील. पण डोळे मात्र म्हमद्याला शोधत असायचे. पण त्यानंतर म्हमद्या कधीच दिसला नाही. त्याचा तो भाजीवाला मित्र लक्ष्मीकांत तो पण अलिकडे स्टेशनवर दिसत नव्हता. त्याच्या गाडीवर दुसराच कोणीतरी पोरगा होता. मी एकदा त्याला विचारलं लक्ष्मीकांतबद्दल तर म्हणाला गावी गेलाय.

जवळजवळ महिन्याने लक्ष्मीकांत भेटला. दादरच्या पुलावर भाजीची टोपली घेवून बसला होता. मी त्याला बघितले की पुढे गेलो. तसा तो ही उठुन पुढे आला.

"म्हमद्या गेला सायेब! चालत्या लोकलखाली आला ना !" लक्ष्मीकांत जोरजोरात रडायलाच लागला.

मला शोकच बसला. गेली सात - आठ वर्षे लोकलच्याच अंगाखांद्यावर खेळलेल्या म्हमद्याचा शेवटी लोकलनेच बळी घेतला होता.

"अरे पण नक्की झालं काय ते तरी सांगशील?" मी लक्ष्मीकांतचं सांत्वन करायचा प्रयत्न केला, खरेतर त्याची गरज मलाच होती.

"साहेब, म्हमद्या नेहेमी म्हणायचा, साला ये मेरा नाम, बचपनसे इससे भागता फिर रहा हू, एक दिन येइच मुझको डुबायेगा!" आणि तसंच झालं साहेब. त्याचं नावच त्याच्या मृत्युला कारण झालं !

"तु ..., तु जरा उलगडुन सांगशील का?" माझ्या आवाजातली थरथर मलाच स्पष्टपणे जाणवत होती.

"साहेब, ते परवाचे बॊंबस्फोट झाले ना लोकलमध्ये. त्यांच्या पैकी एकजण आमच्या झोपडपट्टीत लपला होता महिनाभर. कसा कोण जाणे पण म्हमद्याला त्याचा पत्ता लागला. ह्या येड्याने डायरेक्ट फोन करुन पोलीसांना खबर दिली. पण कशी कोण जाणे ही बातमीही फुटली आणि तो अतिरेकी पळाला. आणि पोलीस ती बातमी देणायाला शोधायला लागले. नेमकं ज्या बुथवरुन म्हमद्याने फोन केला होता त्या कुरेशीने म्हमद्याला पोलीसांना खबर देताना ऐकले होते, त्याने पोलीसांना म्हमद्याचे नाव सांगितले. पोलीसवाले मग म्हमद्याच्या मागे लागले. म्हमद्या लै दिवस घाबरुन दडुन बसला होता. एका दिवशी कुर्ला स्टेशनला दोन पोलीसांनी त्याला बरोबर पकडला. त्यापैकी एका पोलीसाने त्याला विचारलं नाव काय तुझं म्हणुन?

याने सांगितलं म्हमद्या! त्यावर तो पोलीसवाला दुसयाला म्हणाला,

" तो अतिरेकी पण मुसलमानच होता आणि हा पण म्हमद्या, म्हणजे मुसलमानच. मग हा त्या अतिरेक्यांचा सहकारी नसेल कशावरुन? घ्या याला पण आत? टायरमध्ये घातला की ओकेल सगळं आपोआप!"

तेवढं ऐकलं आणि म्हमद्या पार घाबरला असावा. जेल त्याला नवीन नव्हती साहेब, पण हा गुन्हा लै मोठा होता. भले त्याने तो केला नव्हता. उलट त्याने तर तो उघडकीला आणायला मदत करण्याचाच प्रयत्न केला होता. पण हे पोलीस साले, त्यालाच अडकवायला निघाले होते.साहेब मुसलमान असणं हा गुन्हा आहे का हो? मुसलमान असलेल्या म्हमद्याच्या जिवावर तर आम्ही सगळे सुखाने राहत होतो इथं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पण कितीतरी मुसलमानांनी बलिदान केलंच ना? शिवाजी महाराजांच्या दरबारात पण कितीतरी इमानी मुसलमान सरदार होतेच ना? पण म्हमद्याचं मुसलमान असणंच त्याच्या मरणाला कारण झालं बघा !

तेवढं ऐकलं आणि म्हमद्या घाबरुन तसाच पळत सुटला, पोलीसांना चुकवायचं म्हणुन नेहेमीच्या सवयीने ट्रॆकवर उडी मारुन ओलांडायला गेला, नेमकी उलट्या बाजुने कर्जत डाउन येत होती, घाबरलेल्या अवस्थेत याला दिसलीच नाही आणि.............

अक्षरश: दोन तुकडे झाले साहेब.

बारा पोरं राहात होतो आम्ही त्याच्या खोलीतुन. पण पोलीसांच्या भीतीने आमची हिंमत नाही झाली पुढे जावुन प्रेत ताब्यात घ्यायची. त्याच्या सावत्याभाईनेपण वार्‍यावर सोडला त्याला. बारा जणांचा आश्रयदाता स्वत: मात्र बेवारश्यासारखा मेला साहेब."

लक्ष्मीकांतच्या डोळ्यातुन घळा घळा पाणी वाहत होते. मलाही माझ्या गालावर ओल जाणवली.

"अरे पण मग तु तुझी कल्याणची भाजीची गाडी सोडुन इकडे कुठे आलास? परवा तुझ्या गाडीवर दुसराच कोणीतरी पोरगा बघितला मी!"

"साहेब, खोली , गाडी म्हमद्याच्या नावावर होती. म्हमद्या गेला की सावत्याभाईने दोन्हीवर कबजा केला. सगळी पोरं बाहेर काढली. माझी गाडी त्याच्याच एका पंटरच्या नातेवाईकाला चालवायला दिली. मी बसतो आता इथं पाटी घेवुन. गंमत बघा माझं पण नाव लक्ष्मीकांत, पण एक वेळाच्या जेवणाला महाग! नावात काय आहे म्हणा?"

लक्ष्मीकांत खिन्नपणे हसला आणि गिहाईकाकडे वळला.

मी त्याच्या खांद्यावर हलतेच थाप मारली आणि खांदे पाडुन स्टेशनकडे चालायला लागलो. मध्येच काहीतरी आठवण आली आणि मागे वळलो...

"लक्ष्मीकांत......" मी त्याला हाक मारली.

त्याने गिराईकाशी बोलता बोलता माझ्याकडे पाहीलं आणि जणु काही माझ्या मनातलं ऒळखल्याप्रमाणे म्हणाला...

" काळजी करु नका साहेब, काहीही झालं तरी माझा म्हमद्या होणार नाही याची काळजी घेइन मी. आई बापांनी लक्ष्मीकांत नाव ठेवलय, नशीब साथ नसलं म्हणुन काय झालं? मी मेहनतीच्या जोरावर त्याला माझ्या सोबत यायला भाग पाडेन. आई वडीलांच्या इच्छेप्रमाणे लक्ष्मीकांत होवून दाखवेन."

मी तृप्त मनाने, अगदी समाधानाने हसलो.

"साला कोण म्हणतो, नावात काही नाही म्हणून?"

समाप्त.

विशाल कुलकर्णी

कथा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2009 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हमद्या, मस्त रेखाटला. आणि म्हमद्या, असा नको होता मरायला. मुस्लीम थोर असतात ...आणि तेच त्याच्या मरणाचं कारण..वगैरे कथेत उगाच लेखकाने घातले असे वाटले, असे असले तरी...कथा खूप्पच आवडली.

अजून येऊ दे.

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

6 Jul 2009 - 11:46 am | विशाल कुलकर्णी

मुस्लीम थोर असतात असे म्हणण्यापेक्षा इथे कुणीच पुर्णपणे वाईट किंवा चांगला नसतो हे सांगण्याचा इथे हेतु आहे. केवळ एखाद्याच्या धर्मावरुन त्याच्याबद्दल कुठलेही मत कायम केले जावु नये हीच इच्छा आहे, विनंती आहे. धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अरुण मनोहर's picture

6 Jul 2009 - 11:59 am | अरुण मनोहर

विशाल, तुमची लेखनकला आवडली.
>>>ये बंबई की पब्लिक बडी हरामी है साब! प्यार से बात करो समझती नही है! आप काम मांगने जावो....तो धक्के मारके निकाल देंगे! साले कुत्तेपें हजारो रुपये खर्च करेंगे, पर गरीब आदमी को एक रोटी देने को तैय्यार नही होते! इदर सिग्नलपें बच्चे गाडी साफ करते है, ये हरामी गाडी साफ होने तक कुछ नही कहेंगे... उसके बाद जब रुपीया-दो रुपीया देनेका वक्त आता है..तो इनकी फटती है! एक एक पैसे के लिये खिचखिच करते है, गाल्या देने लगते है! गरीब सिर्फ गरिब होता है साब, उसका कोइ नै होता, होर कोइ उसका हो सकता है तो वो है पैसा, जो उसके पास कभी होता नही! मेरेको पता है साब, मै एकदम सही नै बोलताय, गलत काम करताय, पन क्या करे साली जिंदगीने येइच तो सिखाया है, जब मांगकर ना मिले तो छिन लो!">>>

जीवनाचे दान योग्य न पडलेल्या माणसाला असे वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात म्हणून ही विचारसरणी बरोबर आहे असे नव्हे. परंतू तो मुद्दा नाहीच. जीवनाचे भेदक दर्शन दुसर्‍या बाजूने दाखवण्याची लेखकाची शैली परिणामकारक आहे.

>>>मुस्लीम थोर असतात ...आणि तेच त्याच्या मरणाचं कारण..वगैरे कथेत उगाच लेखकाने घातले>> असे वाटले नाही. ओघाओघात एका पात्राच्या तोंडी काही संवाद आले आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

6 Jul 2009 - 12:38 pm | विशाल कुलकर्णी

धन्स अनंतजी, ही विचारसरणी योग्य नव्हेच, नव्हे ते म्हमद्यालाही मान्य आहे. आपण चुकतोय हेही तो कबुल करतोय. पण त्याच्यापुढे दुसरा पर्यायच राहीलेला नाहीये. सभ्यपणे जगण्याचे सगळे नियम पाळुनही अपयश मिळाल्यानंतर पदरी पडलेल्या निराशेमुळे एका पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाने अगतिकतेने स्विकारलेली ती जिवनशैली आहे. आपण कितीही नितीमत्तेच्या आणि आदर्शाच्या गोष्टी केल्या तरी हेच कटु सत्य आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

बेचवसुमार's picture

6 Jul 2009 - 12:40 pm | बेचवसुमार

म्हमद्या मनाला भिडला.
पण लक्ष्मीकांतच्या तोंडातले संवाद फार पुस्तकी वाटतायेत.

सनविवि's picture

6 Jul 2009 - 9:11 pm | सनविवि

मस्त जमलाय लेख.

पिवळा डांबिस's picture

6 Jul 2009 - 10:45 pm | पिवळा डांबिस

मस्त! विशालराव, मस्त लिहिलंय!!
खूप आवडलं!!!
जियो!!

अंतु बर्वा's picture

6 Jul 2009 - 11:42 pm | अंतु बर्वा

म्हम्द्या छान रेखाटला आहे...

श्रीयुत संतोष जोशी's picture

7 Jul 2009 - 12:24 pm | श्रीयुत संतोष जोशी

म्हमद्या च्या तोंडची बंबईया भाषा छानच जमली आहे.
आणि कथा तर मस्तच.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.