आकाशी जलद जलद नाचू लागले
आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले!
दरवळ तो मातीचा मनास मोहवी
वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले!
मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्याचे
मनात आगळे, अलगुज छेडू लागले!
संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे
आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले!
रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा
नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले!
विशाल
प्रतिक्रिया
29 Jun 2009 - 7:45 pm | पाषाणभेद
मस्त . छान आहे कविता. आवडली.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
29 Jun 2009 - 10:25 pm | लिखाळ
वा ! छान मातीचा सुवास घेऊन आलेली कविता आहे.
एकदम पाऊस सुरु झाल्याचे समजते आहे :)
काही शंका :
आकाशी जलद जलद नाचू लागले
यामध्ये दुसरा जलद हा शब्द वेगवान या अर्थी आहे का?
वर्षेचे कंजन
कंजन शब्द छान आहे. पण मी प्रथमच ऐकला. त्याचा अर्थ काय?
संपले बघ वाट पाहणे ते चकोराचे
चकोराचा आणि चातकाचा काव्यातील संकेत नक्की काय आहे अशी एक शंका आली. 'कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर' या मध्ये चकोराला चांदण्याची भूक आहे. तर आजवर मी 'चातकासारखी वाट पाहणे' असा वाक् प्रयोग ऐकत आलो आहे. चातक फक्त पावसाचेच पाणी पितो असा एक कवीसमज आहे.
कैवल्याच्या चांदण्याचा वर्षाव झाल्यावर त्या धारा प्राशन करण्यासाठी चकोर उत्सुक आहे असा अर्थ केला तर चकोर आणि चातक हे समान संकेत आहेत असे ठरेल. हिंदीमध्ये चकोर आणि मराठीमध्ये चातक असे वेगळे शब्द आहेत का? नक्की काय? कुणी सांगीतले तर बरे होईल.
नग्ननिखळ
नगनेनिखळ धरेला म्हटले आहे की हास्याला? पावसाने धरेवर हिरवा शालू चढतो. म्हणून विचारले.
वरील शंका या छिद्रान्वेश नाही. प्रामाणिक आहेत.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
30 Jun 2009 - 9:39 am | विशाल कुलकर्णी
पाषाणभेद, लिखाळराव, धन्यवाद....
लिखाळराव... पहिल्या शंकेचे उत्तर तुम्हीच दिलेले आहे.
दुसरी शंका... कंजन हा शब्द कुजन या अर्थी वापरला आहे.
चकोर आणि चातकाच्या बाबतीत घाईघाईत माझाच थोडा गोंधळ झाला होता, अपेक्षित बदल केला आहे.
नग्ननिखळ हे हास्याचे विशेषण आहे. विकाररहित या अर्थाने !
पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...