स्वप्नातील पदर धुक्याचा (१)

मनमीत's picture
मनमीत in जनातलं, मनातलं
15 Feb 2008 - 8:54 am

शेवटच्या वर्षाची परिक्षा संपली. रुद्रला हलकं हलकं वाटू लागल. महत्वाकांक्षी तो कधीच नव्हता, त्यात त्याला शिक्षण सुरू असतांच शेवटच्या वर्षी नोकरी मिळालेली. वडीलांचा व्यवसाय साधारणच व शेतीवर आधारीत असल्याने खात्रीशीर उत्पन्नाचा नव्हता, त्यामु़ळे पुढे काय ह्याचा फारसा प्रश्न त्याच्यापुढे किंवा त्याच्या मात्यापित्यांपुढे नव्हता. परिक्षेचा शेवटचा दिवस आणि नोकरीचा पहिला दिवस ह्यात साधारण ८ दिवसांचा अंतराळ होता. नोकरीच शहर पुण्यापासून बरच दूर होतं, येऊन-जाऊन ३६ तास लागत. लहान भावाच शिक्षण सुरू होत, त्यामुळे, सगळ कुटुंब पुण्यातून नोकरीच्या शहरी जाऊन राहील हे शक्य नव्हत.
काहीतरी भव्यदिव्य करावं असं रुद्राला कधी वाटलं नाही. जी. आर. ई. त्याला कधी द्यावी वाटली नाही, एम. एस. किंवा एम. बी. ए. च्या त्यानं कधी विचार केला नाही. ८ दिवसात इंग्लीश स्पिकींग किंवा व्यक्तीमत्व विकासाचा कोर्स करावा किंवा पुण्यातच दुसरी नोकरी शोधावी की नाही? ह्यापेक्षा त्याचा ओढा, ह्या ८ दिवसांत कुलदेवतेच्या गावी आणि आपल्या मूळ गावी जावे, जुन्या गावच्या घरच्या झार्‍याच्या गच्चीवर संध्याकाळी खिचडी, पापड हाणावी आणि चांदणे न्हाहाळत झोपावे, नदीकाठी एक फेरी मारावी, मळ्यात जाऊन चपला न घालता मऊ ढेगळातून चालावं, ह्याकडे होता. बालपणीचे दिवस, गाव, प्रार्थमीक शाळा जणू त्याला म्हणत होत्या की एकदा शेवटचा भेटून जा. आम्हीच घडवलेला पिंड आम्हास एकदा डोळे भरून पाहू देत. नोकरीच्या निमित्तानी आता कुठे कुठे फिरशील आणि परत कधी येशील. गाव सोडून रुद्र, विष्णू आणि त्यांच्या आईला ६ वर्ष झाले होते, सुट्यांमधे कधी आजोळ, कधी पुढच्या सेमीस्टरच्या अवघड विषयांचे क्रॅश कोर्सेस ह्या कारणांमूळे गावी जाणे झाले नव्हते. नाही म्हणायला बाबा अधून मधून जाऊन येऊन होते.

रुद्र, विष्णू आणि आई बाबांनी देवीला जायची तयारी केली. शुक्रवारी सकाळी सगळे, कुलदेवतेच्या गावी पोचले. अभिषेक, पूचाअर्चा करण्यात २ वाजून गेले. परतीची गाडी संध्याकाळी ६ ची होती. चौकोनी कुटुंब देवीच्या देवळा जवळील पांथस्तांकरिता बांधलेल्या पडवीत गप्पा मारीत बसले. आईबाबांचा उर एकीकडे भरून येत होता की एका मुलाच शिक्षण संपल, नोकरी लागली कमावता झाला, दुसरी कडे हेही ध्यानी होतं की आता हा आपल्यापासून दूर जाणार, कोण लोक भेटतील, काम झेपेल की नाही, काही वेड्या वाकड्या सवयी तर लागणार नाहीत ना. आईच्या तोंडातून मधूनच एखादं अभिमानाचं, एखादं काळजीच वाक्य बाहेर पडत होतं. वडील जमाखर्चाची वही लिहिण्याचे फायदे तोटे काय ते सांगण्यात गुंतले होते. विष्णूला दादाच्या नोकरीचं विशेष वाटत नव्हतं, दादा महत्वाकांक्षी नसला तरी, योग्यतेचा आहे हे त्यास पक्क माहिती होतं. रुद्रास स्वत:च्या गुणांबदल जेवढी खात्री नव्हती तेवढी विष्णूस त्याच्या दादा बद्दल होती. पण आता घरी, तू जाड्या, तू रड्या, जास्ती खीर असलेली वाटी माझी, असली भांडाणे करायला कोणी नाही, कोशंबीर तू संपव, भाजी मी संपवतो म्हणणारा कोणी नाही. लहानपणी त्याच्यावर आलेला राज्य घेणारा, तोंडातून शिवी बाहेर पडल्यावर रागवणारा त्याचा दादा त्याच्यापासून दूर चालला होता. विष्णू कावराबावरा झाला. रुद्र घरापासून दूर जाणार हा एकच विषय, चार मनात वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचे काहूर घेऊन ती चार शरीरे कुलदेवतेच्या दारी बसली होती.

प्रसादाची ताटे घेऊन नुन्या भटजींच्या घरची मंडळी आली, गावाकडच्या चार गप्पा झाल्या, काही ओळखीपाळखी निघाल्या. रुद्राचं शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्याच कळताच, भटजींनी ओळखीच एखाद दुसरं स्थळ सुचवलं. चेक कॅश होतो आहे अस लक्षात येऊन आई-बाबा आतून सुखावले पण अजून २१ वर्षाचाच आहे वैगेरे बोलून विषय टा़ळला. अभिषेक, देणगीचे पैसे वैगेरे आधीच देऊन झाले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास कुलदेवता व पुजारी मंडळींचा आशिर्वाद घेऊन मंडळी मूळ्गावा कडे निघाली.

मंडळी रात्री उशीरा गावी पोचली, बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती, कोपर्‍यावरील उसाच्या गुर्‍हाळाची छुमछुम थांबलेली होती. चहाची आणि पानाची टपरी अर्धवट उघडी होती. पलीकडच्या देशीदारूच्या गुत्त्यावरचा मुबलक कलकलाट होता, त्यासमोर अंड्याच्या गाडीवर ज्यांना थोडी शुद्ध उरली होती ते आम्लेट पाव, भुर्जी पाव चापत होते. त्या पलीकडच्या विश्वात पोचलेल्यांनी डुकरांच्या घरादारांवर अतिक्रमण केले होते. कानी पडणार्‍या शिव्या, अपशब्द, भांडणे न एकल्या सारखे करून सगळे घराच्या दिशेने चालू लागले. गावात नेहेमी प्रमाणे विजेचा तुटवडा होता, मधेच कुठे एखादा मिणमिणता दिवा दिसत होता. त्या काळोखातही रुद्राला आपलं गाव लखलख दिसत होतं. रुद्राचे पाय आपल्या ओळखीचे खाचखळागे चुकवत एका अनाहूत ओढीने त्याला घराकडे नेत होते.

क्रमशः

समाज

प्रतिक्रिया

प्राजु's picture

15 Feb 2008 - 9:19 am | प्राजु

भाग थोडे मोठे लिहिलेत तर आणखी मजा येईल वाचायला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 10:07 pm | सुधीर कांदळकर

त्रोटक झाला पहिला भाग. कथानकाला पकद घ्यायला उसंत मिळाली नाही.

विसोबा खेचर's picture

16 Feb 2008 - 9:11 am | विसोबा खेचर

मनमीतराव,

छान वाटते आहे कथा. भाषाही अगदी छान साधी सोपी आहे. सुरवात उत्तम!

पुढील भागांची उत्सुकता आहे...

तात्या.

सहज's picture

16 Feb 2008 - 12:09 pm | सहज

>छान वाटते आहे कथा. भाषाही अगदी छान साधी सोपी आहे. सुरवात उत्तम!

>पुढील भागांची उत्सुकता आहे...

हेच म्हणतो. लवकर येउ द्या.