(गजल?)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
13 Feb 2008 - 7:09 am

माणुस १ यांच्या 'गजल' या गजलेच्या विडंबनाचा हा अजून एक प्रयत्न. केशवसुमारांचे (गजल) हे विडंबन वाचून मलाहि त्या सुंदर गजलेचा विडंबन पाडण्याचा मोह झाला. चुका पदरात घेणे:)
--------
हाकले मग भैय्यांना हा रा़ज होता
मुंबईत फक्त त्याचा आवाज होता.

आझमीही शब्दांची मग डागे गोळी
दोघांमधील संवाद खटकेबाज होता

वाहत्या गंगेत धुवुया हात थोडे
आपमतलबी समाजवादी बाज़ होता

आग शब्दांतील होती कापरासम
कृतीशुन्यतेचा हा महायाज होता

मतांसाठीचि पोळी भाजून झाली
कार्यकर्ता आतुनी नाराज होता

मराठी वाचेल का या भाषणांनी ?
नैतिकतेचा हा चढवला साज होता

मराठी गड्यास रोज का होतोय घाटा ?
खूर्चीवरी बसलेला सट्टेबाज होता!

-ऋषिकेश
(याज = यज्ञ)

विडंबन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Feb 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

वा ऋषिकेशा,

अतिशय दर्जेदार लिहिलं आहेस. माझ्या मते महाराष्ट्रातील सर्व प्रमूख वर्तमानपत्रांतून ही गझल छापून यायला हवी. सद्यस्थितीचं अतिशय बोलकं आणि करेक्ट विवेचन आहे हे!

वाहत्या गंगेत धुवुया हात थोडे
आपमतलबी समाजवादी बाज़ होता

मतांसाठीचि पोळी भाजून झाली
कार्यकर्ता आतुनी नाराज होता

क्या बात है...!

तात्या.

प्रमोद देव's picture

13 Feb 2008 - 8:31 am | प्रमोद देव

ऋषिकेश! अतिशय उच्च कोटीतील गजल.

मराठी गड्यास रोज का होतोय घाटा ?
खूर्चीवरी बसलेला सट्टेबाज होता!

हा शेर म्हणजे 'हासिले गजल' शेर आहे.

प्राजु's picture

13 Feb 2008 - 8:54 am | प्राजु

मतांसाठीचि पोळी भाजून झाली
कार्यकर्ता आतुनी नाराज होता

मराठी वाचेल का या भाषणांनी ?
नैतिकतेचा हा चढवला साज होता

ऋषिकेश, मस्तच.. "राज"कारणावररही सुंदर गझल होऊ शकते??? मानलं तुला!

- प्राजु

सर्किट's picture

13 Feb 2008 - 8:59 am | सर्किट (not verified)

ऋषिकेषा,

अरे भावना उतम आहेत रे, पण वृताचा राडा होतोय...

पहिल्याच शेराला खटकले..

हाकले मग भैय्यांना हा रा़ज होता
मुंबईत फक्त त्याचा आवाज होता.

सर्व गजल आणि विडंबनकारांनी रोज धा-धिन-धिना-ततक-धिन-धिना असे रोज अर्धातासतरी टेबलवर बडवावे. लय ही अत्यंत महत्वाची असते, मूळ गझलेत आणि विडंबनत देखील.

ह्याच ओळी लयीत बसवायच्या असल्यास..

राज भैय्यांचा (आ) कर्दनकाळ होता
मुंबईला फक्त त्याचा माज होता

उद्धवाने रिपीटले त्याचेच मुद्दे
दशरथाला जाळण्या ज्रि तोच होता..

बेश्ट लक फॉर फ्युचर..

- सर्किट

चतुरंग's picture

13 Feb 2008 - 10:04 am | चतुरंग

अर्थ छानच आहे पण वृत्तात हुकलेली आहे.
मी केलेला एक प्रयत्न खाली दिलेला आहे, पहा कसा काय वाटतोय...
-------------------------------------------------------

हाकले भैय्येच तो हा रा़ज होता
मुंबईला अन तयाचा माज होता

थुंकता तो अबू शिवराळ भाषा
अन तयाचा 'ठाकरी' तो बाज होता

वाहत्या गंगेत धुवुया हात थोडे
मतलबी हा त्या 'सपा'चा डाव होता

आग शब्दांतील होती वांझ तीही
षंढ त्या सार्‍या कृतींचा याज होता

त्या मतांचा मांडला बाजार ऐसा
कार्यकर्ता तो तरी नाराज होता

काय वाचे ती मराठी भाषणांनी?
चढविला हा साज त्यांचा दंभ होता

का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
सत्तेवरी तो बैसलेला नाग होता!

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

13 Feb 2008 - 10:33 am | मुक्तसुनीत

चतुरंग साहेब ,
उत्तम सुधारित आवृत्ती ! पण इतके केले आहे तर थोडे "फाईन ट्युनिंग" स्वीकारा :-)

>>थुंकता तो अबू शिवराळ भाषा
>>अन तयाचा 'ठाकरी' तो बाज होता

पहिल्या ओळीत काही "औंस्" कमी पडले :-)

थुंकता तो आझमी शिवराळ भाषा
अन तयाचा 'ठाकरी' तो बाज होता

>>का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
>>सत्तेवरी तो बैसलेला नाग होता!

आणि इथे सुद्धा थोडी फिरवाफिरव जरूरी :

का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
बैसला सत्तेवरी तो नाग होता!

चतुरंग's picture

13 Feb 2008 - 10:35 am | चतुरंग

आता ही इमारत नेटकी वाटायला लागली.
धन्यवाद मुक्तसुनीत!

चतुरंग

धनंजय's picture

13 Feb 2008 - 10:37 am | धनंजय

आता एकदम चुस्त.

सर्किट's picture

13 Feb 2008 - 11:15 am | सर्किट (not verified)

अब ये इमारत बहुत तंदुरुस्त लग रही है !

- सर्किट लुधियानवी

ऋषिकेश's picture

13 Feb 2008 - 7:56 pm | ऋषिकेश

चतुरंग आणि मुक्तसुनित..डागडुजीसाठी आभार.

आता ही इमारत नेटकी वाटायला लागली

+१

फक्त पुढील शेरांना ऑब्जेक्शन आहे :)

काय वाचे ती मराठी भाषणांनी?
चढविला हा साज त्यांचा दंभ होता

का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
सत्तेवरी तो बैसलेला नाग होता!

माझ्या मते इथे '--ज' 'होता' हा काफिया आणि रदिफ आहेत. या गझलेतील शेरांना इथे "आ" ही अलामत देखील आहे त्यामुळे डागडुजी झालेल्या पहिल्या शेरात अलामत आणि काफिया दोन्ही मिस होतेय तर दुसर्‍या मधे 'काफिया' जमला नाहि आहे.

बाकी वृत्तात बसवणे मला कठीणच जाते ते केल्याबद्दल पुन्हा आभार :)

-ऋषिकेश

चतुरंग's picture

13 Feb 2008 - 9:29 pm | चतुरंग

गजल लिखाणाच्या बाबतीत मी अजून 'बिगरीत' आहे त्यामुळे मला 'काफिया' आणि 'रदिफ' म्हणजे काय हे जरा विस्तारपूर्वक कोणी सांगितले तर मला नक्की समजेल की नेमक्या त्रुटी कोठे आहेत.
मग मी त्यावर जरा काम करु शकेन.

इथे असलेल्या गजल तज्ञांनी जरा लक्ष द्यावे अशी विनंती.

चतुरंग

ऋषिकेश's picture

13 Feb 2008 - 9:36 pm | ऋषिकेश

मी ही अजून बिगरीतच आहे. खरंतर तेहि नाहि. नुसतेच नियम माहित आहेत. शुद्ध गजल लिहिता येत नाहि :)
पण जालावर तुम्हाला हवी ती माहिती येथे मिळेल
शुभेच्छा!
-ऋषिकेश

आज रात्रीच जाईन आणि गजलेचे गमभन गिरवायला लागेन!

चतुरंग

हुकलेले दोन शेर -
--------------------------------
काय वाचे ती मराठी भाषणांनी?
चढविला हा साज त्यांचा दंभ होता

का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
सत्तेवरी तो बैसलेला नाग होता!
---------------------------------
सुधारित आवृत्ती -

काय वाचे ती मराठी भाषणांनी?
दंभ त्यांचा, चढविलेला साज होता

अलामत आणि काफिया सांभाळले.

का मराठी त्या गड्याला रोज घाटा?
बैसला सत्तेवरी सट्टेबाज होता

काफिया परत आलाय

चतुरंग

धनंजय's picture

14 Feb 2008 - 4:45 am | धनंजय

बैसला खुर्चीत सट्टेबाज होता
(ही सत्तेची खुर्ची, पण सहज कळणार नाही.)

हाय! सत्तारूढ सट्टेबाज होता
("हाय!" च्या ठिकाणी "होय", आणखी एक शक्यता.)

चतुरंग's picture

14 Feb 2008 - 4:56 am | चतुरंग

आणि मी 'सत्ता' - 'सट्टा' असा श्लेषानुप्रास (असा सट्टा!;) खेळायचा प्रयत्न केला.

हाय! सत्तारूढ सट्टेबाज होता
ही सुधारणाही भावते. 'हाय!' मुळे दगाबाजीचा फील चांगला ठसतो.

झकास सुधारणा! धन्यवाद.

चतुरंग

ऋषिकेश's picture

14 Feb 2008 - 8:50 am | ऋषिकेश

हाय! सत्तारूढ सट्टेबाज होता
हाए हाए! शब्दांना काय जबरदस्त वजन घातलयंत राव.. आपण खल्लास!! :)

-ऋषिकेश

बेसनलाडू's picture

13 Feb 2008 - 11:58 am | बेसनलाडू

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू

स्वाती राजेश's picture

13 Feb 2008 - 7:33 pm | स्वाती राजेश

गझल (विडंबन)छान जमली आहे.

त्यावर फेरफार केलेले आहेत ते सुद्धा मस्त आहेत.
मुक्त सुनित, चतुरंग आणि सर्किट यांनी छान रंग भरले आहेत.

नंदन's picture

14 Feb 2008 - 12:58 pm | नंदन

म्हणतो. छान झालंय विडंबन.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Feb 2008 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश,
विडंबन मस्त जमलंय !!!!

( आणि त्या वृत्ता-ब्रित्ताचं लै मनावर घेऊ नको.........मुळ आत्मा हरवतो त्या भानगडीत.... आस्सं माझं ये-या गबाळ्याचं मत हाये )

मुक्तसुनीत's picture

13 Feb 2008 - 8:43 pm | मुक्तसुनीत

... आणि त्या वृत्ता-ब्रित्ताचं लै मनावर घेऊ नको.........मुळ आत्मा हरवतो त्या भानगडीत....

विनम्र असहमती. :-) अहो मुक्तछंदात लिहायचे तरी त्याला स्वतःची एक लय असते !

चतुरंग's picture

13 Feb 2008 - 10:21 pm | चतुरंग

मूळ कृती सुंदर आहेच.
आपला प्रयत्न रचनेचे बारकावे आत्मसात करुन ती अधिक सुंदर करता येईल का असा आहे, अर्थात आशयाला धका न लागता.

हे माझे मत. बाकी ज्याची त्याची आवड आहेच. कोणताच आग्रह नाही.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Feb 2008 - 9:01 pm | llपुण्याचे पेशवेll

हे ऋषिकेशा ...
लई भारी गज़ल जमली रे...
वृत्त बित्त आत्ता पुरते सोडूनच दे. लई भारी वाटली..गज़लीशी सहमत...
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

13 Feb 2008 - 9:26 pm | प्राजु

ऋषिकेश, चतुरंग आणि मुक्तसुनित..
आपणा तिघांचे करावे तितके कौतुक थोडे आहे. एकदम छान गझलेचा जन्म झालाय..
जरा त्या गझलेची बाराखडी मलाही शिकवा..

- प्राजु

सर्वसाक्षी's picture

13 Feb 2008 - 9:41 pm | सर्वसाक्षी

विषयावरील गजल आवडली.

साक्षी

भडकमकर मास्तर's picture

14 Feb 2008 - 7:22 am | भडकमकर मास्तर

अहाहा...
गजल छान जमली आहे .... सुरुवातीला नीट म्हणता येइना... मग कळले की ते काय व्रुत्ताचा प्रोब्लेम होता... मला इथे डागडुजी करणार्यांचेसुद्धा अभिनंदन करावेसे वाटते...
दुव्याबद्दल धन्यवाद....मी सुद्धा ग म भ न गिरवणार... ( चांगला रसिक होण्यासाठी तरी निदान , गजल येइल की नाही माहित नाही)
...मला हाय! सत्तारूढ सट्टेबाज होता
फार म्हणजे फार आवडले... उत्तम भाव आला आणि वजनही संतुलित झाले...
....
स. भडकमकर