"कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?"
"नाही हो घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला जवळजवळ दत्तकच मागून घेतलं बाबांच्याकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही."
घरी आलेल्या मुलाखतकाराला वैदेही म्हणजे सुप्रसिद्ध गायिका वैदेही सरनाईक उत्तरं देत होती. मधूनच फोन घेत होती. अभिनंदनासाठी येणार्यांचं चहापाणी बघितलं जातंय ना यावरही देखरेख करत होती. पुरस्कार, अभिनंदनाचा वर्षाव, लोकांचं प्रेम या सगळ्यांनी भारावली होती वैदेही. एकुणात आज उत्सवाचा दिवस होता. गर्दी कमी झाली तशी दमून वैदेही डोळे मिटून बसली होती. आणि तिला पूर्वीचं सगळं आठवायला लागलं. लहानपणचं ते चाळीतलं घर, पाठोपाठच्या चार बहिणी, चौथीच्या वेळेला आईचा झालेला मृत्यू, गाण्याच्या बाईंशी जुळलेले सूर. सगळं सगळं परत आठवताना वैदेहीला फार छान वाटत होतं. कठीण परिस्थितीमधून येऊन वैदेहीनी गाण्यामधे नाव काढलं होतं. धाकट्या तिघींचे संसार मार्गी लावले होते. बाबांचं आजारपणही काढलं होतं. बाबांना जाउनही आता ४-५ वर्षं होऊन गेली होती. वयाच्या चाळीशीला मात्र तिला आता कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती.
का कुणास ठाऊक पण कालच्या बक्षिसाच्या सोहळ्यामधे तिच्याबरोबर मंचावर बसलेल्या त्या एका तरूण उद्योगपतीकडे सारखं तिचं लक्ष जात होतं. सोहळ्यानंतर झालेल्या जेवणाच्या कार्यक्रमात या तरूणाने संपूर्ण वेळ तिच्याशी बोलण्यात घालवला होता. संग्राम बडोदेकर असं भारदस्त नाव असलेला हा पस्तिशीचा तरूण उद्योगपती बोलायला अगदी छान होता. वैदेहीच्या गायकीवर प्रेम करत होता. दोन दिवसांनी त्याच्या घरी काही ठराविक निमंत्रितांसमोर छोटेखानी मैफल करायचं वैदेहीनी मान्य केलं होतं.
वैदेही ठरल्या वेळी पोचली. संग्रामचे तीन चार मित्र, मैत्रिणी आले होते. संग्रामच्या घरात नोकरचाकर बरेच दिसत होते पण घरातली माणसं नव्हती. संग्रामची पहिली बायको लग्नानंतर वर्षभराच्या आतच अपघातात गेली तेव्हापासून संग्राम एकटाच आहे हे कळल्यावर वैदेहीला वाईट वाटलं आणि बरंही. वैदेहीचं गाणं आज नेहमीपेक्षा जास्त रंगलं. इतरांपेक्षा वैदेहीच आज स्वतःचं गाणं अनुभवत होती. मधेच डोळे उघडले तर नजरेसमोर तल्लीन झालेला संग्राम दिसत होता आणि मग ती अजूनच आर्त होऊन जात होती.
वैदेहीला घरी यायला पहाट झाली. रात्रभर गाण्याचा किंचितही थकवा तिला जाणवत नव्हता. तिला घरी सोडताना संग्रामने किंचित ओल्या डोळ्यांनी तिला हसून निरोप दिला होता. त्याच धुंदीत वैदेही दिवसभर होती.
-------------------
संध्याकाळचे सात वाजले. लॅच उघडल्याचा आवाज आला. श्री मनोज पाटील घरी आले होते. सौ वसुधा पाटील भानावर आल्या. वैदेहीला पटकन गुंडाळून आतल्या कप्प्यात टाकून देत त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. सगळंच इतकं अंगवळणी पडलं होतं की डोकं इकडे तिकडे भरकटलं तरी हात आपलं काम बरोबर जिथलं तिथे करत होते. वीस वर्षांची सवय होती त्यांना हे सगळं करायची. कधीच कुठल्याच कारणाने हे वेळापत्रक बदललं नव्हतं. अपवाद फक्त दोन चार वर्षांनी उगवणार्या भारतभेटीचा.
वीस वर्षांपूर्वी आपलं गाव, घर, माणसं आणि स्वतःलाही सोडून देऊन त्या सौ वसुधा पाटील बनून अमेरीकेत आल्या होत्या. "अमेरीकेत नोकरी करतात जावईबापू! वैदूनी नशीब काढलं." दोघांच्या वयातल्या फरकाकडे काणाडोळा करत मावशी म्हणाली होती. लग्नानंतर कायमचं अमेरीकेतच रहायचं, दरवर्षी भारतात यायचं नाही, अमेरीकेत रहात असलो तरी तिने घराबाहेर पडायचं नाही, शिक्षण, नोकरी कशाचीही अपेक्षा करायची नाही, आदर्श भारतीय स्त्री प्रमाणे पतिच्या अर्ध्या वचनात रहायचं अश्या सगळ्या अटी वैदूच्या बाबांनी एका क्षणात मान्य केल्या होत्या. वैदूच्या नंतर तीन मुली होत्या आणि वैदू बिनाहुंड्याची खपत होती तिही अमेरीकेत म्हणजे पुढच्या मुलींच्या लग्नांसाठी वैदू मदतही करू शकेल असा साधा सरळ विचार वैदूच्या बाबांनी केला.
१० दिवसांच्या आत वैदेही शिंदेचे सौ वसुधा पाटलांच्यात रूपांतर झाले. वैदूने खूप शिक्षण, करीअर अशी स्वप्ने बघितलीच नव्हती. आता कधीही आपलं लग्न होईल आणि आपण सासरी जाऊ याची तिला कल्पना होतीच. नवर्याबद्दल फार अपेक्षा ठेवण्याची आपली ऐपत नाही हेही तिने मनाशी मान्य केले होते. पण मनोज पाटलांना बघून तिचा जीवच धसकला. हार घालतानाच त्यांच्या डोळ्यातली जरब आणि कडवटपणा तिच्या अंगभर पसरत गेला. विष पसरावं तसा. वैदू भारतातच राह्यली. तिला भूतकाळात गाडून सौ वसुधा पाटील परदेशात आल्या.
मनोज पाटलांना ऑफिसमधले सहकारी सोडले तर मित्र नव्हते. मनोज पाटील सहकार्यांच्यामधेही फारसे मिसळत नसत. क्वचित कधी ऑफिस पार्टीला जावे लागलेच तर एकटेच जात. दर शनिवारी ते ग्रोसरी आणि इतर खरेदीसाठी जात. दर रविवारी एक सिनेमा बघायला जात. या दोन ठीकाणी मात्र ते सौ वसुधा पाटलांनाही घेऊन जात. सिनेमा बघून आल्यावर न चुकता आपला नवरा असल्याचं आद्य कर्तव्यही निभावत.
मनोज पाटील निर्व्यसनी होते. ते कुठल्याही इतर बायाबापड्यांच्यात गुंतलेले नव्हते. मनोज पाटील आपल्या काकांना दरमहा पैसे पाठवत असत. मनोज पाटलांनी वयाच्या पस्तिशीला विशीतल्या वैदूशी लग्न केले होते.
एकदा रविवारच्या कार्यक्रमानंतर मनोज पाटलांनी सौ पाटलांना आपल्या आईवडीलांचा मृत्यू, काकाने वाढवणं पण त्यात प्रेम नसणं, काकाच्या उपकाराची परतफेड म्हणून पैसे पाठवणं असं काय काय सांगितलं होतं. सौ पाटलांनी वैदेही होऊन ऐकलं होतं. हार घालतानाचं धसकणं विसरून या माणसावर प्रेम करायचं असं वैदेहीनी ठरवलं होतं. सौ पाटलांना पर्याय नव्हताच.
असं आयुष्य सरळ रेषेसारखं चाललं होतं. सगळ्या रेषा, चौकटी विस्कटून टाकेल आणि घरात गोंधळ माजवेल अशी चिमुरडी पावलं त्यांच्या आयुष्यात आलीच नाहीत. मनोज पाटील चिडले, अस्वस्थ झाले आणि मग गप्प बसले. सौ वसुधा पाटील घाबरल्या, रडल्या आणि मग सगळं गिळून गप्प झाल्या.
हे सगळं सगळं रोज रोज त्यांना आठवे. सगळी कामं आटोपल्यावर त्या सोफ्यावर बसत तेव्हा हा सगळा चित्रपट पुन्हा पुन्हा बघत. इतके वेळा बघून बघून ते आपलंच आयुष्य आहे ही त्यांची जाणीव नष्ट झाली होती. सौ वसुधा पाटील रिमोट हातात घेऊन टीव्ही पुढे बसत. सतत टीव्ही चे चॅनेल्स मागे पुढे करून झाल्यावर एका ठिकाणी थांबत. तिथे काय चालू होतं ह्याच्याशी त्यांचं घेणदेणं उरलं नव्हतं. करण्यासारखं काही नव्हतं म्हणून त्या टिव्ही लावून बसत. थोड्या वेळाने ठरलेल्या वेळेला दुपारची झोप घ्यायला त्या बेडवर पडत. ठरल्या वेळेला उठणे. चहा करणे. भरपूर वेळ लावून तो पिणे. संध्याकाळचा स्वैपाकही उरकणे. इतकं करूनही नेहमी फक्त पाचच वाजत. वेळ सरता सरत नसे आणि कंटाळा सगळा आसमंत व्यापत असे. याची त्यांना सवय झाली होती.
मनोज पाटलांच्या एका सहकार्याच्या बायकोने पूर्वी एकदा गाडी शिकण्याचा सल्ला दिला होता. वसुधा पाटील गाडी शिकून केवळ लायब्ररीत जायचं म्हणत होत्या. पण मनोज पाटलांचा 'आमच्या घरातल्या बायका बाहेर पडत नाहीत.' असा अभिमान उफाळून आला होता. वर 'वाचन चांगलं नाहीच बायकांना. लायब्ररीच्या नावखाली परक्या देशात इतर धंदे नकोत सुरू व्हायला.' अशी फोडणीही घातली होती. वसुधा पाटील गाडी न शिकताच गप्प बसल्या.
जगात इंटरनेट रूळून कैक वर्ष झाली होती आणि हल्लीच आपल्या भारतातल्या भाच्याशी फोनवर बोलताना वसुधा पाटलांनी त्याचं कौतुक ऐकलं होतं. हळूच मनोज पाटलांना त्याबद्दल विचारलं होतं. मनोज पाटलांचं मत इंटरनेटबद्दल भलं नव्हतंच. कामापलिकडे इंटरनेट वापरणारे लोक त्यांना पसंत नव्हते. कामापलिकडे इंटरनेट वापरणारे सगळे जण चुकीच्या आणि घाणेरड्या गोष्टींसाठी वापरतात असं त्यांना वाटे. त्यात चाळीशी पूर्ण झालेल्या बायकोने इंटरनेटची मागणी केली तेव्हा त्यांना वसुधा पाटलांची शरम वाटली होती. ताडकन चोख उत्तर त्यांनी वसुधा पाटलांना दिले होते. वसुधा पाटील परत गप्प बसल्या होत्या. अन्न, वस्त्र, निवारा यापलिकडे वसुधा पाटलांच्या कुठल्याही गरजा असणे त्यांना मान्य नव्हते. उलट दर रविवारचा कार्यक्रम हा ते देत असलेला बोनस होता.
घरामधे खायला उठणारा वेळ, कंटाळा, कोणाशी न बोलणं अश्या सगळ्या गोष्टी वसुधा पाटील रोजच्या रोज झेलत होत्या. पेलत नसलं तरी निभावत होत्या. अश्यातच एक दिवस दुपारी वसुधा पाटलांचं भारतातून पार्सल आलं. माहेरच्या पत्त्यावरून बहिणीने पाठवलेलं पार्सल. "आपली चाळीतली जागा शेवटी रिकामी करून द्यावी लागली. तुझ्या काही बारीकसारीक वस्तू सापडल्या. त्या आणि काही फोटो पाठवतेय." अशी बोटभर चिठ्ठी वरती आणि आत एक वही, गाण्याच्या स्पर्धेत चौथीत मिळालेलं उत्तेजनार्थ बक्षिसाचं सर्टिफिकेट, आईवडीलांचा एक, चाळीचा एक आणि बहिणींचा आपापल्या कुटुंबासकट एकेक असे फोटो असा सगळा सटरफटर कारभार होता.
फोटो बघून झाले आणि सर्टिफिकेट बघताना सौ वसुधा पाटलांना आठवलं आपल्याला शाळेतल्या सरनाईक बाईंनी बरं गातेस असं सांगितलं होतं. त्यांनीच शाळेतून स्पर्धेला पाठवलं होतं. पण स्पर्धेत गाउन आल्यावर घरी बाबांनी मारलं होतं. "दोन वेळच्या अन्नाची कमतरता पडण्याइतकी परिस्थिती नाहीये की मुलीला गाण बजावणं करायच्या धंद्याला लावेन." असं बरंच काय काय तेव्हा न कळणारं बाबा बोलले होते. नंतर त्या घराने वैदूचं गुणगुणणं सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. हे सर्टिफिकेट सुद्धा कित्येक दिवस बाईंच्याकडेच पडलं होतं. शाळा संपताना मात्र बाईंनी एवढे वर्षं जपून ठेवलेलं सर्टिफिकेट तिच्या हातात ठेवलं होतं.
सर्टिफिकेट बाजूला ठेवून मग सौ वसुधा पाटलांनी वही उघडली. सरनाईक बाईंनी भेट दिलेली वही. अभ्यासाची नसलेली, काहीही लिहायची मुभा असलेली अशी नवलाईची पहिली वही. पहिल्या पानावर प्रिय वैदेहीस सप्रेम भेट असं बाईंच्या अक्षरात लिहिलेलं होतं. आणि पुढच्याच पानावर सरनाईक बाई, त्यांचं गाणं आणि बाबांना असलेला गाण्याचा तिरस्कार, त्यावरून वैदूनी खाल्लेला मार असं सगळं होतं.
'नाहीतरी मी नकोच झालीये बाबांना, मग सरनाईक बाई मला दत्तकच का घेत नाहीत?' १५-१६ वर्षाच्या वैदूनी स्वप्न पाह्यलं होतं.
वहीच्या पानापानांच्यात वैदूची पुरी न झालेली कैक स्वप्नं, कैक इच्छा होत्या. बहीणी मैत्रिणी कुणालाच सांगता येण्यासारखं नसलेलं बरंचसं आतलं काय काय त्या पानांवर सांडलेलं होतं.
'चाळीतल्या मदाने काकू डेंजर आहेत. इतकं मारलं बिचार्या वंदनाला. कॉलेज बंद केलं तिचं'
'पण आता तर वंदना पळून गेली. लग्न केलं. आता पाया पडायला आलेत. तिच्या नवर्याला मोठ्ठं टक्कल आहे. वंदना सुंदर आहे. हा असा कसा? तर यावर निलू म्हणते स्मार्ट आहे की.'
'हे असले उद्योग केले की लवकर लग्न करावं लागतं असं नाहीतर तसं. नकोच ते.'
'अर्चनाच्या घरी गेले होते पहिल्यांदा. केवढं मोठ्ठं घर आहे. तिला वेगळी खोली सुद्धा आहे. तिथे तिच्याशिवाय कोणी जात नाही. तिच्या वस्तूंना घरातले कोणीही हात लावत नाहीत. तिची आई फार छान आहे अगदी माझ्या आईसारखी. फक्त तिची आई आहे आणि माझी आता नाही. तिचे बाबा पण छान आहेत. एकदम मस्त दिसतात. ते घरी आले की गप्प बसावं नाही लागत. उलट ते आल्यावर अज्जून मज्जा असते अर्चनाच्याकडे. ते अर्चनाला खूप शिकवणारेत. आपल्या पायावर उभं करणारेत आणि मग अर्चना म्हणेल त्याच्याशी तिचं लग्न करून देणारेत. माझे बाबा का असे नाहीत? ते आमच्याशी नीट बोलत सुद्धा नाहीत. माझी बाबा असे असते तर कींवा मी अर्चनाची जुळी बहीण असते तर...'
'टाकीवरच्या ग्रुपमधल्या त्या चेक्स शर्टवाल्याने मी निळा रंग घातल्यावर दोनदा वळून बघितलं.
माझंही लक्ष गेलं कळताच नजर चुकवली. मला निळा रंग आवडतो. माझ्याकडे निळ्या रंगाचे २ च कपडे आहेत.
त्याचं नाव काही माहीत नाही. त्याचं नाक मात्र गमतीशीर आहे. आधी घसरगुंडीसारखं ढॉइंग आणि मग अचानक वरती वळून तुटक्या स्वल्पविरामासारखं तुटलेलं टुक्. अगदी ढॉइंग टुक् म्हणता येईल असं.'
'तुझा ढॉइंग टुक अर्चनाच्या मागे आहे. संगीता सांगत होती. पण तो मुळात माझा कधी झाला? मला त्याच्या नाकाची मजा वाटते एवढंच.'
'अर्चनाचं जमलंय म्हणे. त्या ढॉइंग टुकशी नव्हे. कायनेटीकवाल्याशी.'
'अर्चना सांगत होती जरा बरी रहा म्हणून. कसं जमणार? कॉलेजमधे यायला मिळतंय हेच खूप आहे.'
'आज ढॉइंगने अर्चनाला माझ्याबद्दल विचारलं असं संगीता सांगत होती. अर्चनानी विषयच काढला नाही.'
सौ वसुधा पाटलांना ढॉइंग टुक आठवला. काय बरं विचारलं होतं ढॉइंगने? लांब केसवाल्या सावळ्या मुलीचं नाव काय असं विचारलं असेल? अर्चनाने कधीच कसं नाही सांगितलं? कधीच भेटलो नाही आपण ढॉइंगला.
......................
कोण ती सुंदर लांब केसांची सावळी राजकन्या? नाव काय तिचं? ढॉइंगने अर्चनाला विचारलं होतं. अर्चनाने वैदूला सांगितलं होतं. वैदू कल्पनेनीच लाजली होती. वैदूनी किती आढेवेढे घेतले पण अर्चना तिला टाकीशी घेऊन गेलीच होती. प्रत्यक्ष समोर ढॉइंगला बघून वैदू बावरलीच. त्याच्याशी बोलताना त्याच्याकडे सोडून सगळीकडे बघत होती वैदू.
वैदू आणि ढॉइंग केवळ दोन तीनदाच भेटले होते. "तो वेडा झालाय तुझ्यापायी! काय केलंस कोण जाणे!" अर्चना वैदूला चिडवत म्हणाली होती. अजूनतरी तो वैदूचा छान मित्रच होता. छान मित्र पण खूप आवडता. इतकं लक्ष वैदूकडे आजवर कुणी दिलं नव्हतं. वैदूचं गुणगुणणं त्याला खूप आवडायचं.
"वैदेही!" त्याच्या तोंडून आपलं नाव पहिल्यांदा ऐकताना आपलं नाव इतकं सुंदर आहे याचा साक्षात्कार झाला होता वैदूला. वैदेही आणि ढॉइंग कॉलेजमधे टाकीशी भेटायचे आणि मग त्याच्या बाईकवरून कुठेतरी लांब जायचे. तो तिच्यासाठी कविता लिहायचा आणि तिला वाचून दाखवायचा. असंच शहरापासून दूर एका ठिकाणी ते बसलेले असताना ढॉइंगनी हळूच हाक मारली होती. वैदेहीचा हात हातात घेतला होता. वैदेही शहारली होती. त्याच्या डोळ्यात बघता बघता त्याच्या मिठीत शिरली होती. आणि थोडी घाबरली पण होती. तिला मिठीत घेताना हळूच तिच्या डोक्यावर थोपटून त्याने विश्वास दिला होता तिला 'घाई करणार नाही!' हा. तिच्या डोळ्यातून खळ्ळकन एक थेंब पडला होता.
इतकं प्रेम तिच्यावर कुणी केलं नव्हतं आजवर. वैदू गुणगुणायला लागली की तो म्हणायचा "तुला तुझ्या वडलांच्यापासून पळवून नेतो मग बघू कोण तुझं गाणं थांबवतो. तू घरात केवळ गात रहा. आपलं घर नुसतं सुरांनी भरलेलं असू देत.."
वैदूची टी वायची परीक्षा नुकतीच संपली होती. त्याचं शिक्षण गेल्या वर्षीच पुरं झालं होतं आणि आता तो त्याच्या वडलांना धंद्यात मदत करत होता. तेव्हाच कोणीतरी हा प्रकार वैदूच्या बाबांच्या कानावर घातला. मुलीने दिवे लावले म्हणून, स्वत:चा निर्णय घेतला म्हणून, न विचारता निर्णय घेतला म्हणून, जातीबाहेरचा मुलगा निवडला म्हणून, मुलगी ऐकत नाही म्हणून.. अश्या असंख्य म्हणूनांना घेऊन वैदूचे बाबा चीड चीड चिडले. वैदूला कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे असे सगळे प्रकार करू झाले. शेवटी वैदूला मारायला धावले आणि तेवढ्यात धाकट्या बहिणीने बोलावल्यामुळे ढॉइंग तिथे हजर झाला. वैदूनी जवळजवळ नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं.
ढॉइंगच्या घरात वैदेहीचं स्वागतच झालं. वाजतगाजत लग्न झालं. वैदेही शिंदे आता सौ वैदेही टुक झाली. सगळं टुक घराणं आनंदानी भरून गेलं. वैदू गाणं शिकायला लागली आणि घरभर सुरांच्या महिरपी सजायला लागल्या. वर्षभरातले सगळे सणवार दणक्यात पार पडतायत न पडतायत तोच वैदेहीला 'हवंनको' झालं. परत एकदा टुक बंगल्यात आनंदाला उधाण आलं.
एक मुलगा नी एक मुलगी. जुळ्यांचा जन्म झाला. मुलगी ढॉइंगसारखी तर मुलगा वैदूसारखा. वैदूला दिवसाचे २४ तास कमी पडायला लागले. ढॉइंग, त्याचे आईबाबा, धाकटा भाऊ सगळे वैदेहीवर खुश होते. जुळे दोघं तर सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होते.
मुलं मोठी होत होती. अभ्यासात चमकत होती. वैदूच्या अंगावरही सुखवस्तू तजेला चढला होता. ढॉइंगचा बिझनेस उत्तम चालला होता.
बाबा सोडून वैदूच्या माहेरचे सगळे तिला भेटून गेले होते. बहिणींच्या लग्नांच्या वेळी आपलं कर्तव्य म्हणून वैदूनी घसघशीत मदत केली होती. बाबांच्या मनातली अढी काही जात नव्हती. कधी कधी तो विचार करून वैदू कष्टी व्हायची. मग ढॉइंग तिची समजूत घालायचा.
बाबा अत्यवस्थ आहेत कळल्यावर सगळा कडवटपणा गिळून वैदेही धावली होती. शेवटी तरी बाबांनी तिला माफ करायला हवं होतं. पण ते घडलं नाही. बाबा तसेच गेले तिच्याकडे पाठ फिरवून. वैदेही खूप रडली पण नवरा आणि मुलांच्यामुळे सावरली.
मुलं दहावीला बोर्डात आली. टुक बंगला परत एकदा सजला. वैदेही आणि ढॉइंग सुखाच्या शिखरावर होते.
............
फोन वाजला आणि सौ वसुधा पाटलांची तंद्री भंगली. त्या नॉर्थ कॅरोलिनाच्या त्यांच्या घरात परत आल्या वैदेहीला ढॉइंगबरोबर सोडून. त्यांनी घड्याळ पाह्यलं. सात वाजले होते. आजचा पहिलाच दिवस होता जो कधी सरला ते कळलंच नव्हतं. एक विचित्र हुरहुर घेऊन त्या आपल्या कामाला लागल्या. किंचित गुणगुणत.
आणि मग त्यांचा कंटाळा पार पळाला.
श्री मनोज पाटील घरी आले. जेवले. झोपले. सकाळी उठले. नाश्ता केला आणि परत ऑफिसला निघून गेले. त्यांना वसुधा पाटलांमधला बदल जाणवला सुद्धा नाही. वसुधा पाटलांनी सगळ्या क्रमातला त्यांचा त्यांचा भाग पूर्ण केला.
वही उघडली आणि नवीन आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाल्या.
---------------------------------------समाप्त---------------------------------
प्रतिक्रिया
15 May 2009 - 4:41 pm | सहज
थेरपी? vicarious life? का इडियट बॉक्स ची कमाल?
कथा हटके / वेगळीच आहे. :-)
15 May 2009 - 4:49 pm | चतुरंग
अतिशय सुंदर कथा! अभिनंदन नीधप!!
रोज एक नवा दिवस, रोज एक नवी फँटसी!!
(का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!)
चतुरंग
17 May 2009 - 5:59 pm | नीधप
(का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!)<<
असेलही कुणासाठीतरी हे खरं. यातले सगळे संदर्भ वास्तवात कुठेतरी अस्तित्वात असू शकतील असेच आहेत. तेव्हा असेलही.
आणि स्वप्नरंजन आपण सगळेच रोजचे रोज करतो. आयुष्यात वेळोवेळी निवडलेले/ समोर आलेले पर्याय तसे नसते तर तिथून आयुष्य कुठे गेलं असतं याबद्दल प्रत्येक जण विचार करतोच ना.
कदाचित माझ्यासारखीला वाटेल की बरं झालं अमुक एक पर्याय निवडला नाही ते नाहीतर काय झालं असतं माझं.. एखाद्याला उलटं वाटेल.
पण असं जरतर करून बघणं प्रत्येकजणच करत नाही का?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 May 2009 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कळायला वेळच लागला. पण आवडली कथा! यापुढे काही लिहावं एवढी माझी समज नाही.
15 May 2009 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
ज ब र द स्त !
एकदम वेगळ्याच वाटेवरचे लेखन :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
15 May 2009 - 5:58 pm | अवलिया
सुरेख वेगळ्या पद्धतीची कथा आवडली.
अवांतर - कलादालनात टाकण्याचे प्रयोजन समजले नाही.
शीर्षकात कथा असे लिहिले नसते तर कदाचित वाचायची राहिली असती.
--अवलिया
15 May 2009 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कथा !
15 May 2009 - 6:12 pm | मि माझी
मस्त.. आपण सगळे पण क्रमातला आपला धागा पुर्ण करून पुढे जात असतो..
15 May 2009 - 6:16 pm | विनायक प्रभू
खुपच आवडली
15 May 2009 - 6:56 pm | लिखाळ
कथा फार आवडली.. एकदम मस्त !
कल्पनेत रमणे हे एकाकी पणात वरदान ठरते !!
एखाद्या लहानशा चित्र-कथेप्रमाणे (एपिसोड) कथा आहे. डोळ्या;समोर प्रसंग उभे राहिले आणि फोन वाजल्यावर खाडकन भान आले. -- लिखाळ.
15 May 2009 - 7:15 pm | मदनबाण
कथा फार आवडली.
(वाचक)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
15 May 2009 - 7:20 pm | कपिल काळे
छान कथा !!
पहिला भाग मात्र थेट शुभांगी भडभडे, ज्योत्स्ना देवधर वगैरे कौटुंबिक कादंबरीतील भास होतो. पण पुढे मात्र कल्पनाविलासात रमून वेळ घालवणारी आणी त्यातून प्रेरणा मिळवणे ही कल्पना सुंदर.
व्याकरणावर इथे बोलू नये पण राहवत नाही म्हणून....
तृतीया विभक्तीचा ने हा प्रत्यय आहे.
प्रस्तुत कथेत नी हा प्रत्यय बरेच ठिकाणी आहे , वाचताना तो जाणवतो..
उदा. वैदूनी,वैदेहीनी,अर्चनानी,आनंदानी
निळा शर्टवाल्याने, बहिणीने इथे हा ने प्रत्यय योग्यरितीने वापरला आहे.
नी बोली भाषेतील प्रत्यय आहे, पण तो सर्रास वापरला जातो लेखनात. चूक की बरोबर असे मला म्हणायचे नाहे, पण मला तरी तो खटकतो.किंबहुना चांगल्या लिखाणात नी प्रत्यय असेल तर तो टोचतोच. त्यामुळे लिहिले.
अवांतरः नावातच नी असल्यामुळे नी प्रत्यय वापरलाय की काय? ह. घ्या.
15 May 2009 - 10:16 pm | नीधप
वसुधाच्या फँटसीची झेपही तेवढीच असणार ना? त्यामुळे ते मुद्दामूनच तसे आहे.
नावाशी साधर्म्याचा संबंध नाही पण मला कथा बोलीभाषेत बरी वाटते. ने प्रत्ययाने ते अधिक पुस्तकी होतं. असं माझं मत आणि लिहिणार्याचे स्वातंत्र्य.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 May 2009 - 9:00 pm | अभिरत भिरभि-या
कथा आवडली. कालचक्रात उलटी जात राहिली.
शेवटी समाप्त आल्यावर चुकून क्रमश: वाचल्यासारखे वाटले. कारण वर्तुळ पूर्ण होऊन ते संग्राम पाशी जाऊन थांबेल अशी माझी कल्पना होती.
कालाच्या अक्षावर असे उलटे जाणे कथेला सुंदर आयाम देते.
17 May 2009 - 6:08 pm | नीधप
संग्राम शी परत जाणं तर शक्य नाही. संग्राम, ढॉइंग सगळंच कल्पनेतलं. वहीचं नवं पान, नवं आयुष्य.. त्या त्या दिवशी जगायचं आणि ते तिथेच सोडून द्यायचं.
वास्तव श्री मनोज पाटील एवढंच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 May 2009 - 9:27 pm | मस्त कलंदर
जरा वेगळ्या अंगाने जातेय.., आवडली मात्र!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर म्हणजे घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
15 May 2009 - 10:42 pm | प्राजु
कथा लिहिण्याची पद्धत वेगळी आहे.
खूप आवडली.
कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 May 2009 - 11:59 pm | पिवळा डांबिस
सुंदर कथा!
खूप आवडली!!!
16 May 2009 - 1:17 am | स्वप्निल..
एकदम मस्त! बरेच दिवसांनंतर काहितरी चांगले वाचायला मिळाले!
स्वप्निल
16 May 2009 - 1:29 am | नंदन
थोड्या वेगळ्या धाटणीची ही कथा अतिशय आवडली. कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 May 2009 - 2:20 am | Nile
हेच म्हणतो! कथा आवडली! :)
17 May 2009 - 6:15 pm | नीधप
कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.)<<
हा संदर्भ मी खरंच विचारात घेतला नव्हता. योगायोगाने जुळलेलं आहे. कथाबीज डोक्यात आलं तेव्हा जिवंत 'ती' वैदेही या नावानेच समोर आली. पण खरंच आभार या वेगळ्या संदर्भासाठी.
आपणच लिहितो आणि आपल्यालाच लक्षात येत नाही काय काय दडलंय त्यात ते...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
16 May 2009 - 11:19 am | काजुकतली
कथा म्हणुन आवडली, पण खुप वाईट वाटले वाचुन.. आपल्याला हवे तसे आयुष्य का मिळत नाही, जे मिळते ते असे विचित्र का असते, केवळ स्वप्नामध्येच हवे तसे जगुन घ्यावे असेच का लिहिलेले असते काहींच्या नशिबी??
कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे.
मला भयाण वाटते असे जगणे :(
साधना
16 May 2009 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार
भवतेक सुशींच्या दुनियादारी मध्ये असे काहिसे वाक्य आहे की, "आयुष्यात माणसाला हवे ते सगळे काही मिळते, फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते."
सुशीभक्त
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
16 May 2009 - 2:10 pm | पर्नल नेने मराठे
खरे आहे.
चुचु
16 May 2009 - 12:11 pm | रामदास
कथा आवडली.अजून नियमीत कथा लेखन येऊ द्या.
16 May 2009 - 1:20 pm | भडकमकर मास्तर
(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
17 May 2009 - 7:50 pm | स्वाती दिनेश
(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली...
मास्तरांसारखेच म्हणते,
नंदनने लावलेला वसुधा, वैदेहीचा अर्थही भावला.
स्वाती
18 May 2009 - 12:28 am | बिपिन कार्यकर्ते
अतिशय सुंदर गोष्ट. मांडणी पण छानच, नाविन्यपूर्ण. निवांतपणे वाचायची होती म्हणून इतके दिवस बाजूला ठेवली होती, सार्थक झाले.
बिपिन कार्यकर्ते
19 May 2009 - 2:33 pm | मिसळभोक्ता
९९.९९% अनरियलिस्टिक. भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्या आणि इतरांना ठेवणार्या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन.
टुकार !
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
30 May 2009 - 8:44 pm | नीधप
९९.९९% अनरियलिस्टिक. <<
शक्य आहे तुम्हाला असे वाटणे.
भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्या आणि इतरांना ठेवणार्या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन.<<
माझ्याबद्दलचे दोन्ही अंदाज चूक. अमेरीकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर अत्याचारच होतात इत्यादी भ्रमात मी नाही. आणि असले भ्रम इतरांसाठी तयार करण्यात मला रस नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेटवर लिखाण करून मला पैसे मिळत नाहीत वा लिखाणावर माझे पोट अवलंबून नाही.
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)<< कशाबद्दलची अधिक माहीती? कोण प्रभूमास्तर?
बाकी टुकार तर टुकार..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
19 May 2009 - 4:06 pm | सुमीत
कल्पनाच फार छान वाटली, तसे कल्पनेत सर्व काही शक्य असते अगदी वेगळे आयुष्य सुद्धा
19 May 2009 - 11:52 pm | शक्तिमान
:P एकदम डेंजर कथा आहे...
विचित्र वाटली आधी.. पण हळुहळू उमगली
कथा मांडण्याची शैली अप्रतिम....
20 May 2009 - 12:36 am | चतूराक्ष
नीधप,
कालचक्रातील कथा मांडण्याची शैली अप्रतिमच!
लगे रहो..
चतूराक्ष
नावातच सर्व काहि आहे .....
20 May 2009 - 2:02 am | धनंजय
विमनस्क स्वप्नरंजन वाचताना वाईट वाटले.
लेखन उत्तम झाले आहे.
20 May 2009 - 6:14 am | अगोचर
सुंदर कथा. आवडली.
(थोडीफार रिचर्ड बा़ख यांच्या "वन" ह्या कादंबरीची आठवण झाली)
- आगंतुक
(उद्यापासुन नविन आयुष्य जगायला तयार)
27 Sep 2009 - 11:16 am | नीधप
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार माझ्या या कथेला 'साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत उत्तेजनार्थ (का होईना!) बक्षिस मिळालंय.
या वेळच्या सा. स. मधे रिझल्ट प्रकाशित झालाय. पुढच्या कुठल्यातरी अंकात माझी कथा प्रकाशित होईल.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Sep 2009 - 11:25 am | गणपा
अभिनंदन,
मस्त आहे कथा, नजरेतुन सटकली होती.
27 Sep 2009 - 11:33 am | श्रावण मोडक
अभिनंदन.
27 Sep 2009 - 2:09 pm | बिपिन कार्यकर्ते
मनःपुर्वक अभिनंदन. अशाच अजून उत्तम कथा कविता येऊ दे.
बिपिन कार्यकर्ते
27 Sep 2009 - 11:42 am | राजू
अतिशय सुंदर कथा!
_________________
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
27 Sep 2009 - 11:48 am | JAGOMOHANPYARE
अभिनंदन.....
सा स साठी अभिनंदन....
27 Sep 2009 - 11:48 am | प्रभाकर पेठकर
नीधप,
आधी ही कथा वाचली नव्हती. (म्हणजे 'नेट' वरील कमी वावराने नजरेतून सुटली होती.)
आत्ताच वाचली. कथा आणि शैली दोन्ही उत्तम आहे. अभिनंदन.
तसेच, 'साप्ताहिक सकाळ' मधल्या प्रकाशनाबद्दल आणि मिळालेल्या बक्षिसाबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
27 Sep 2009 - 2:07 pm | नीधप
सगळ्यांचे आभार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
27 Sep 2009 - 2:52 pm | क्रान्ति
हार्दिक अभिनंदन. कथा आवडली. लेखनशैली खासच.:)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
28 Sep 2009 - 2:04 am | मीनल
आधी वाचायची राहून गेली होती. निसटलीच म्हण डोळ्यातून.
कथा आवडली. वेगळ्या प्रकारे लिहिली आहे.
`ढॉइंग टुक ` ची मजा वाटली.
ढॉइंग नाव आणि टुक आडनाव हे नंतर कळल.
ती वसुधा आता गायन सुरू करेल अस वाटतय. तेही मनोज च्या नकळत. स्वतः पुरत.
मीनल.
28 Sep 2009 - 11:40 am | मी_ओंकार
छान. कथा आवडली. बक्षिसाबद्दल अभिनंदन.
- ओंकार
9 Feb 2011 - 8:04 pm | गणेशा
बर्याच दिवसानी आपली कथा वाचायला मिळाली.
खुपच छान लिहिली आहे.
मनातली पाणे आणि आयुष्याचा बाँयडींग केलेला ग्रंथ यातील जमीन अस्मानाचा फरक पाहुन खुप वाईट वाटले.
तुम्ही खुप छान लिहिता.
22 May 2015 - 5:54 am | रुपी
छान कथा! आवडली!