कलाकृतींचा उगम

विकास's picture
विकास in काथ्याकूट
6 May 2009 - 4:29 am
गाभा: 

अनंताने लिहीलेल्या "रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" या धाग्यात या कवितेच्या उगमाबद्दलची रोचक माहीती कळली, जी मला आणि कदाचीत येथील बर्‍याच जणांना आधी माहीत नसावी.

अशाच काही गोष्टी गदीमांच्या कवितेबद्दल ऐकलेल्या आहेत:

  1. मायाबाजार मधे श्रीकृष्णास उठवण्यासाठी म्हणून जे गाणे लिहायचे होते ते सुचलेले नव्हते. रात्रभर मित्रांबरोबर (कदाचीत बाबूजी वगैरे) जागून ते पहाटेच्या प्रहरी पुण्यनगरीत शिवाजीनगरच्या वगैरे भागात फिरायला म्हणून निघाले आणि त्यांनी नगरपालीकेचे रस्त्यावरील दिवे विझताना पाहीले आणि त्यांना एकदम "विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ" हे गाणे सुचले!
  2. बाबुजींनी चाल लावली मात्र गाणे तयारच नव्हते. जे केले होते ते हरवले! आकाशवाणीवर कार्यक्रम तर दुसर्‍या की त्याच दिवशी होता... त्यांनी गदीमांना एका खोलीत बंद करून ठेवले आणि गाणे लिहून होईपर्यंत बाहेर येता येणार नाही म्हणून सांगितले! त्यातून स्वये श्री रामप्रभू ऐकतीचा जन्म झाला...
  3. रामजन्माचे गाणे काही केल्या सुचत नव्हते... येराझरा घालताना पाहून वरून विद्या माडगुळकरांनी मध्यरात्रीच्या सुमारास विचारले. ते म्हणाले अग "रामाचा जन्मावरील गाणे लिहीतोय, अण्णा माडगुळाकरांच्या जन्मावरील नाही!"


दोन जन्मः

  1. बाळंतपणात मृतावस्थेत मूल झाले. सगळ्यांना वाईट वाटले. पण त्या अर्भकाच्या अचेतन देहाला घेऊन जाण्याची तयारी झाली. बाळंतिणीच्या जवळील सुईणीस वाटले नाहीतरी मूल मेलेलेच आहे, काय फरक पडतोय? तीने एक शेकायचा राख तयार झालेला कोळसा त्या अर्भकाचा बेंबीवर ठेवला आणि त्या बाळाने जे काही टँ केले त्यामुळे गीतरामायण काय आणि अनेक उत्कृष्ठ गाणी/कविता तयार करणारे माडगूळकर जगात येऊ शकले!
  2. जन्माच्या वेळेस नाही पण आदलाबदल होऊन तीच अवस्थ होऊन लिटील मास्टर गावस्कर असाच मासे पकडत बसला असता.


आवाजः

लहानपणी घशाचा काहीतरी त्रास असल्याने आवाज एकदम खराब/घोगरा. पण एकदा काहीतरी लागले म्हणून मोठ्या भावाने त्याला वैदूकडे नेले आणि बिब्बा लावता क्षणी हे आक्रस्ताळी पोर इतके गुरासारखे ओरडले की घसा एकदम साफ! विचार करा तसा नसता झाला तर किशोर कुमार आपण ऐकू शकलो असतो का? :-)

अनेकदा अनेक कलाकृती अशा तयार होतात. त्या जशा काव्यात असतात तशाच इतर कुठल्याही क्षेत्रात असू शकतात. या आठवणी कधीतरी वाचलेल्या ऐकलेल्या आहेत त्यातून लिहील्या. काही चुकले असल्यास अवश्य सांगावे आणि आपल्यास माहीत असलेल्या अशाच विविध कलाकृतींच्या उगमाबद्दल येथे सर्वांना माहीती करून द्या ही विनंती!

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

6 May 2009 - 6:01 am | नाटक्या

१. संगीतकार इंदिवर उमेदवारीच्या काळात एका स्टुडिओ मधुन घरी चालले होते. घरी जाण्यासाठी अर्थातच स्वःताची गाडी वगैरे नव्हती. बस मध्ये बसले आणि त्यांना नेमकी अशी जागा मिळाली की जी उलट्या दिशेने (ड्रायव्हरच्या मागे) असते. थोड्या वेळाने समोरच एक अतिशय सुंदर तरुणी येऊन बसली. तिला पहाताक्षणी इंदिवर यांना एक कविता सुचली ज्याचे नंतर गाणे झाले. ते गाणे आहे "पास बैठो तबियत बहल जायेगी, मौत भी ऑ गयी है तो टल जाएगी..". चित्रीत केलं आहे जगदीप आणि अमितावर.
गीतकार :इंदिवर
गायक :मोहम्मद रफी
संगीतकार :सी. अर्जुन
चित्रपट :पुनर्मिलन - १९६४

२. गीतकार शैलेन्द्र बर्‍याचदा गायक हेमंतकुमार यांच्याकडे गप्पा मारायला जात. हेमंतकुमारांना सात मेव्हण्या होत्या आणि त्या हेमंतकुमारांबरोबरच रहात, त्यामुळे त्यांना सगळे 'सालीवाहन' म्हणत. संध्याकाळी हेमंतकुमार पत्नी, मुलं आणि या सात मेव्हण्यांबरोबर बंगल्याच्या गच्चीवर गप्पा मारत बसायचे. एकदा संध्याकाळी हेमंतदा असेच बसले होते आणि शैलेन्द्र तिथे गेलेते. जाताना शैलेन्द्रांनी बरीच ढोसली होती. गाडीतून उतरताना शैलेन्द्रचा तोल गेला आणि हेमंतदांच्या सगळ्या मेव्हण्या हसायला लागल्या. ते बघुन शैलेन्द्रना एक गाणे सुचले. ते त्यांनी तसेच लिहून काढले. ते गाणे होते, "जंगलमे मोर नाचा किसने ना देखा, हम जो थोडीसी पिके जरा झुमे हाय रे सबने देखा.."
गाणं चित्रीत केलं आहे बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांच्यावर, चित्रपट आहे मधुमती (१९५४) आणि गायक आहे मोहम्मद रफी...

३. हसरत जयपुरी, राजकपूर हे लंडनला गेले होते. एका कॅब्रे बार मध्ये बसून मदिराप्राशन करत असताना एक मदनिका अंगावर चांदण्यांसारखा चमचमणारा ड्रेस घालून समोर नाचत आली. राजकपूरने जयपुरींना विचारले, "काय काही काव्य सुचते का हिला बघून?". त्याक्षणी हसरत जयपुरींनी सिगारेटचा कागदी बॉक्स फाडला आणि त्याच्यावर एक कविता लिहीली: "बदन पें सितारे लपेटे हुए, न जाने तमन्ना किधर जा रही हो। जरा पास आओ तो चैन आ जाये".. नंतर हे गाणं प्रिन्स (१९६९) या चित्रपटासाठी मोहम्मद रफींनी गायलं आणि शम्मीकपूरवर चित्रीत करण्यात आलं. संगीतकार होते शंकर-जयकिशन.

असे बरेच किस्से आहेत. नंतर सवड मिळाली की आणखी लिहीन...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

टिउ's picture

6 May 2009 - 6:29 am | टिउ

फक्त एक सुधारणा:
'न जाने तमन्ना किधर जा रही हो' असं नसुन 'ओ जान-ए-तमन्ना किधर जा रही हो' असावं असं वाटतं...चु.भु.दे.घे.

विकासरावांचे किस्से पण सही आहेत.

काळा डॉन's picture

6 May 2009 - 7:15 am | काळा डॉन

वा छान! विकासपेक्षा नाटक्याचे किस्से जास्त आवडले.

विकासचे किस्सेही बरे आहेत पण ते काहीसे घिसेपिटे बर्याचदा ऐकलेले आहेत त्यामानाने नाटक्याचे किस्से एकदम फ्रेश वाटले.

संदीप चित्रे's picture

7 May 2009 - 1:59 am | संदीप चित्रे

माझ्या माहितीप्रमाणे रशिया की पोलंडमधे एक स्टेज प्रोग्राम बघताना घडला होता

सहज's picture

6 May 2009 - 7:28 am | सहज

पूर्वी रसरंग, जी, चंदेरी इ इ सिनेमाविषयक मासीक, नियतकालीके वगैरे मधुन असे किस्से वाचायला मिळायचे.

मुक्तसुनीत's picture

6 May 2009 - 7:28 am | मुक्तसुनीत

किस्से आवडले. घिसेपिटे वगैरे वाटले नाहीत. काहींना जे किस्से फ्रेश वाटतात तेच किस्से बाकीच्याना घिसेपिटे वाटतात. चालायचेच.

प्राजु's picture

6 May 2009 - 8:14 am | प्राजु

सगळेच किस्से मस्त.

मी डोलकर दर्याचा राजा बद्दल ऐकलेला किस्सा. कोणी सांगितला आठ्वत नाही, खरा आहे की खोटा ते ही माहीती नाही. जाणकरांनी प्रकाश टाकावा.
किस्सा असा..
शांताबाई शेळक्यांनी "मी डोलकर दर्याचा राजा " गाणं लिहिलं. पं. हृदयनाथ मंगेशकर त्याला चाल लावत असताना, "मी डोलकर ,डोलकर, डोलकर.. दर्याचा राजा" ही ओळ कोणत्याही चालीत नीट बांधता येईना. त्यांनी शांताबाईंना ही ओळ बदलण्याची विनंती केली. पण शांताबाईंनी "अरे हृदयनाथ, इतका मोठा तू पंडीत्..इतक्या अवघड गाण्यांना चाली लावल्यास आणि डोलकर डोलकर.. या साध्या दोन शब्दांना तुला चाल लावता येत नाही??? ते काही नाही, मी त्या ओळी बदलणार नाही..." अशी कान उघडणीच केली जणू. हृदयनाथांपुढे चाल लावली... आणि डोलकर दर्याचा राजा गाणं अजरामर झालं आणि मराठी माणसाला त्या गाण्यानं वेड लावलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अमोल केळकर's picture

6 May 2009 - 9:32 am | अमोल केळकर

सर्वच माहिती छान
--------------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नितीनमहाजन's picture

6 May 2009 - 9:32 am | नितीनमहाजन

एकदा ग. दि. मा. , पु. भा. भावे व इतर गप्पा मारीत बसले होते. पु. भा. भावे माडगुळकरांना म्हणाले "अण्णा तुमची इतकी गाणी ऐकली, कविता वाचल्या पण त्यात कुठे ळ हे अक्षर मला दिसले नाही". ताबडतोब अण्णांनी कागद मागविला व गाणे तयार झाले: "घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा"; कागद दुसर्‍या अण्णांकडे देऊन म्हणाले "मोजा यात किती आहेत ते."

नितीन

अवांतरः आणखी जन्मकथा ऐकायच्या असतील तर सध्या झी मराठीवरील सा रे ग म प मधील किस्से ऐका.

अनंता's picture

6 May 2009 - 9:42 am | अनंता

माझ्या शुभेच्छा!!
आणखी माहितीपूर्ण चर्चा वाचायला आवडेल. :)

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

परिकथेतील राजकुमार's picture

6 May 2009 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार

वाह ! मस्तच किस्से.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

6 May 2009 - 11:24 am | स्वाती दिनेश

किस्से आवडले.
ते पहाटेच्या प्रहरी पुण्यनगरीत शिवाजीनगरच्या वगैरे भागात फिरायला म्हणून निघाले आणि त्यांनी नगरपालीकेचे रस्त्यावरील दिवे विझताना पाहीले आणि त्यांना एकदम "विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ" हे गाणे सुचले!
पुलं बरोबर पहाटे फिरायला गेले असता असे पुलंच्या गदिमा साइट वर उपलब्ध असलेल्या भाषणातून समजते.
स्वाती

क्रान्ति's picture

6 May 2009 - 11:08 pm | क्रान्ति

आम्रपाली या चित्रपटातील 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' या गाण्याचा मुखडा लतादीदींनी गीतकार शैलेन्द्र यांना सुचवला होता, आणि अंतरे शैलेन्द्र यांनी लिहिले होते, असा किस्सा या गाण्याच्या संदर्भात ऐकला होता. बरेचदा विविधभारतीवर देखिल काही कार्यक्रमांमध्ये असे किस्से ऐकायला मिळतात. अलिकडे 'उजाले उनकी यादों के' हा दर रविवारी लागणारा कार्य्क्रम अशा माहितीचे भांडार आहे.
वरचे सगळेच किस्से मस्त आहेत.

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

श्रावण मोडक's picture

7 May 2009 - 1:06 am | श्रावण मोडक

धागा वर असावा, यासाठी हा प्रतिसाद.

धनंजय's picture

7 May 2009 - 1:47 am | धनंजय

वाचताना मजा वाटत आहे.

पंचमदा चाली बसवत होते 'चुरा लिया हैं तुमने जो दिल को' ह्या गाण्यासाठी काही केल्या समर्पक सुरुवात सुचेना. असेच एकदा जेवायला बसताना ग्लासवर ग्लास आपटून विशिष्ठ किणकिणाट झाला, पंचमदांनी पुन्हा आवाज काढून बघितला आणि एकदम चाल सुचली. गाण्यात सुद्धा सुरुवातीला ग्लासांची किणकिण दाखवली आहे! :)

चतुरंग

उत्खनक's picture

28 Mar 2013 - 12:21 pm | उत्खनक

मस्त लेख. वाचनखूण म्हणून साठवलेला आहेच! :)

सागरसाथी's picture

29 Jul 2023 - 7:18 pm | सागरसाथी

किस्से आवडले, वाचताना शिरिष कणेकरांची आठवण जागी झाली