वेगाने होणारे शहरीकरण , तन्त्रज्ञानातील बेसुमार प्रगती याचा परिणाम ५० वर्षांनी (कदाचित) असा झालेला असेल..
त्यावेळच्या बाप- लेकाचे संवाद या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न....
कुण्या सकाळी बाबा वाचती ,
साईट वरचा पेपर एक .
जूने पुराणे पुस्तक वाची ,
बाजूलाच त्याचा लेक .
"मोर म्हणजे काय हो बाबा "?
पोर विचारी बापाला.
"Don't ask me silly questions "!
बाप खेकसे पोराला..!
"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
मात्र आता बापाच्याही ,
मनावरचा सुटला ताबा.
खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतेय अपुले पोर.
पुस्तकावरी त्या लिहीले होते,
कविता : मंगेश पाडगांवकर .
खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
"नकोरे वाचू ऐसे काही
काय तुझेरे डोके फिरले.."?
"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
राघु -मैना , चिऊ- काऊ ,
ऐसे काही पक्षीचं नसती ! "
"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले कोकीळ कुंजन..?
जुन्या कल्पना, खुळ्या समजुती
हे कवींचे .. केवळ fiction "
"पुर्वीची ती माणसे पोरा
खूप खूप मागास होती
भाजी म्हणुनी खराखुरा
पाला शिजवूनी खात होती "
"भात म्हणुनी तांदूळ अख्खा
शिजवूनी ते होते खात
मुखात त्यांच्या होते म्हणे
शुभ्र-शुभ्र बत्तीस दात "
"आता कशी बघ आपण
जेवण म्हणूनी खातो गोळी
परी जेवित होते पूर्वज अपुले
हातामध्ये घेऊन थाळी "
"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
बाप आपुल्या पोराची ,
समजुत काढी कशी बशी .
"झोप आता पोरा गुपचूप
रात्र खूप बघ आहे झाली . "
असे म्हणूनी त्याने पोरा,
झोपेची ती गोळी दिली .
बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ती ही वदली , " झोप रे सोन्या
नको खाऊ रे त्यांचे डोके . "
असे बोलुनी पोरा तिने,
जरा -जारासे थोपटले .
आठवुनी तिने कसे से ,
अंगाईगीत गाईले .
नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
लिंबोणीचे झाड अन्,
चंद्र तयाला कोठून दाऊ . "
पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
गोळीशिवायच येते डोळा
शांत शांत झोप मजला ."
"खर्च वाचेल गोळ्यांचा अन्
पैसेही साठतील खूप
साठलेल्या पैशातून आणु
हिरवी हिरवी झाडे खूप "
बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
टप टप टप टप गळू लागती ,
मोती भरल्या पाण्याचे .
बघुनी पाणी डोळ्यांमधले
पोर जरासे बावरते
"आई तुझ्या डोळ्या मधुनी
असे कसे गं पाणी गळते..?"
माय म्हणे , "माझ्या पोरा,
हा मायेचा वाही झरा ,
तुझ्या बोलाने रे सोन्या
डोळ्यांनाही फुटला पान्हा...! "
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 5:00 pm | भडकमकर मास्तर
भविष्यातल्या भीषण आणि भयंकर परिस्थितीचे भावोत्कट सादरीकरण...
खूप छान असे तरी कसे म्हणू?
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?
25 Apr 2009 - 5:22 pm | ऋषिकेश
वा! बर्याच दिवसांनी कथावस्तु संदेश वगैरे असं सगळ काहि असणारी दीर्घ कविता वाचली.. आवडली :)
कवितेच्या रचनेपेक्षा तीचा विषय आणि भाव प्रचंड आवडला..
हे तर फारच छान!!!
और भी आने दो! :)
ऋषिकेश
25 Apr 2009 - 5:25 pm | अभिज्ञ
जबरदस्त.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
29 Apr 2009 - 5:46 pm | मैत्र
अप्रतिम कविता ... सुंदर आशय... खूप आवडली!
25 Apr 2009 - 5:28 pm | विसोबा खेचर
अप्रतीम कविता..!
गोखलेसाहेब, ही कविता डायरेक्ट काळजालाच भिडली..!
आपला,
(फ्यॅन) तात्या.
25 Apr 2009 - 7:46 pm | क्रान्ति
खूप खूप जबरदस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
25 Apr 2009 - 8:16 pm | प्राजु
इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल गोखल्यांचे खास अभिनंदन!!
(माझे माहेर गोखलेच ना ;) )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Apr 2009 - 8:36 pm | चन्द्रशेखर गोखले
आपण करत असलेल्या कौतुकामुळेच माझा उत्साह वाढतो. धन्यवाद !
25 Apr 2009 - 8:54 pm | यशोधरा
आवडली कविता.
25 Apr 2009 - 10:24 pm | कपिल काळे
सुंदर...कविता
25 Apr 2009 - 10:53 pm | लवंगी
बरेच दिवसानी मिपावर वेगळ्या विषयावर कविता वाचायला मिळाली. सुंदर..
25 Apr 2009 - 11:54 pm | लिखाळ
वा ! मस्त कविता.. आवडली.
-- लिखाळ.
27 Apr 2009 - 12:39 pm | अश्विनि३३७९
मस्त!! खुप आवड्ली
28 Apr 2009 - 2:40 am | धनंजय
तरी वाईट वाटते.
कल्पना छान शब्दांकित केली आहे.
29 Apr 2009 - 10:49 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
28 Apr 2009 - 7:24 am | शितल
कवितेतील परिस्थिती कधी येऊ नये एवढीच इच्छा !
कविता सुंदर. :)
30 Apr 2009 - 3:43 am | भाग्यश्री
सहमत..आवडली .. मात्र असं होऊ नये.. :(
www.bhagyashree.co.cc
28 Apr 2009 - 8:15 am | प्रमोद देव
कविता आवडली.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
28 Apr 2009 - 9:23 am | वेताळ
तुम्ही खुप छान कविता करता गोखले साहेब....फिक्शन कविता खुपच मन सुंदर आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
28 Apr 2009 - 9:41 am | चन्द्रशेखर गोखले
एवढी भुतावळ माझ्या कविता वाचते..? अदभुत आहे..!!
29 Apr 2009 - 5:24 pm | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान कविता , आवडली
30 Apr 2009 - 4:16 am | पिवळा डांबिस
छान आहे कविता, आवडली!
(अवांतरः कवितेत वर्णन केलेली परिस्थीती! यालाच डार्विनचा उत्क्रांतीवाद म्हणतात का?:))