कोण तूं रे कोण तूं ?

सुभाष's picture
सुभाष in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 11:14 pm

कोण तूं रे कोण तूं

कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ?

जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ?

खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ?

वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ?

भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ?

मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ?

अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ?

कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ?

वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ?

शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ?

की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ?

शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ?

की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ?

कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ?

चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ?

तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ?

मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ?

द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ?

गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं !

संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं !

कोण तूं रे कोण तूं.......कोण तूं रे कोण तूं

'महाराज' या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ग्रंथातून साभार .

कविता

प्रतिक्रिया

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची परवानगी मी घेतली आहे.
सुभाष