माझी मैत्रिण मीनल गद्रे हिने पाठवलेली ही माहीती. आवडली म्हणून इथे देत आहे.
शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त.
प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती.
रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं.
पानं काळवंडलेली उदास.
वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले.
देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. "
प्राजक्ताने ती केली.
दिवस-महिने-वर्ष उलटले.
तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.
आणि एकदिवस पहाटे सुगंधी हिर्या माणकांनी डहाळी न डहाळी ओथंबली.
प्राजक्ताच्या ह्या अवर्णनीय वैभवाकडे सारं वन मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलं.
पण प्राजक्ताला कसली जाणीवच नव्हती.
तपातच दंग शेफ़ालिकेला शेवटी शेजारच्या एका वृक्षाने हलवून जाग आणली.
वैभव? करू काय मी ह्याच?
निरिच्छपणे काया झटकून दिली तिने ती सारी दौलत मातीत उधळून..
धुळीत पडल्यावर लखलखती हिरे माणकं जराशी मंदावली आणि सूर्याच्या पहाटेच्या किरणांत मोती पोवळ्यांच रुप ल्यायली.
शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते.
बंगालमधे प्राजक्त खूप फ़ुलतो.
आणि शगुन म्हणून घरात येणार्या सूनेची ओटी प्राजक्ताच्या फ़ुलांनी भरायची पूर्वीची रीत.
काळाच्या ओघात, वैभव दाखवण्याच्या हौसेपायी त्यांची मोती पोवळी झाली.
--
Meenal Gadre.
Alpharetta,Georgia,
U.S.A.
प्रतिक्रिया
21 Jan 2008 - 11:50 pm | विसोबा खेचर
आम्ही स्वत: मोगर्याचे प्रेमी आहोत, परंतु हे प्राजक्ताबद्दलचे हे लेखनही आवडले!
शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते
वा! वा! अतिशय सुरेख लेखन...!
प्राजू, तुझ्या मैत्रिणीपाशी मिपातर्फे कृतज्ञता व्यक्त कर!
तात्या.
21 Jan 2008 - 11:51 pm | धनंजय
माझ्या मनःचक्षूंसमोर माळलेल्या प्राजक्ताचे चित्र आहे. पण ताज्या फुलांचा, पडलेल्या फुलांचा रंग यांत फरक सुचवायला मिनल गद्रे यांनी वापरलेले रूपक फार आवडले.
21 Jan 2008 - 11:52 pm | संजय अभ्यंकर
फारच सुंदर!
आपली माहिती वाचताना प्राजक्ताचा सडा सभोवतालि पडलेला भासत होता.
संजय अभ्यंकर
22 Jan 2008 - 12:05 am | बिपिन कार्यकर्ते
प्राजक्त म्हटले की मला आठवतात माझ्या लहानपणीचे गणपतिचे दिवस... आम्ही मुले भल्या पहाटे उठायचो आणि फुले वेचायला जायचो. आमच्या जवळपास प्राजक्ताची झाडे भरपूर... सकाळी सकाळी नुसता सडा पडलेला असायचा आणि त्याचा तो विशिष्ट सुगंध सगळिकडे भरून गेलेला असायचा. पु.लं. नी जपान च्या प्रवासवर्णात चेरी ब्लॉसम बद्दल लिहिले आहे... (साकुरा).... पण प्राजक्ताचा सडा पण तसेच वेड लावतो.
माहिती आवडली. तुमच्या मैत्रिणिला 'थँक्स' सांगा.
बिपिन.
22 Jan 2008 - 12:30 am | मुक्तसुनीत
प्राजक्त म्हणजे पारिजातक असे मला अंधुकसे आठवते. हे खरे ना ?
मुक्तकाव्यात्मक चिंतन आवडले. विशेषतः ही ओळ :
"शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. " लेखिकेची काव्यात्म दृष्टी, त्यांचे या झाडावरचे प्रेम आणि कविमनास शोभून दिसेल असा मनस्वीपणा त्यातून मला दिसला.
मीनल गद्रे यानी चेतनागुणोक्ति अलंकाराचा वापर करताना त्यांच्या उपमेयस्वरूपी मैत्रिणीला समोर आणले होते काय ? :-) (हलकेच घ्या !)
22 Jan 2008 - 12:30 am | चतुरंग
माझ्या बहिणीचं नावही प्राजक्ताच आहे त्यामुळे ह्या नावाशी माझं सहाजिकच जिव्हाळ्याचं नातं.
इंजिनियरिंग च्या वेळी मी माझ्या मावशीकडे रहात असताना मी ज्या खोलीत झोपत असे त्याच्या बाहेर प्राजक्ताचं झाड होतं.
हिवाळ्यातल्या पहाटे कितीतरी वेळा थंड वार्याची झुळूक आत येई ती प्राजक्ताचा सुगंध घेऊनच!
मग मी बोचर्या थंडीत अंगणातल्या प्राजक्ताची फुले वेचून घ्यायला जायचा. (आत्ताही माझ्या अंगावर काटा आला!!)
ह्या आठवणी किती खोलवर दडलेल्या असतात ना?
पुन्हा एकदा ती प्राजक्तमय सफर घडवून आणल्याबद्द्ल तुला आणि तुझ्या मैत्रिणीला धन्यवाद!
चतुरंग
22 Jan 2008 - 12:37 am | विसोबा खेचर
प्राजू, तुल एक विनंती!
तुझ्या मैत्रिणीला मोगर्यावरदेखील असंच काहितरी छानसं लिहायला सांग! आपला साला जाम जीव आहे मोगर्यावर!
मोगरा तो मोगरा!
साला काय सुरेख वास असतो! खल्लास...
बघ बुवा तुझ्या मैत्रिणीला एकदा मोगर्यावर लिहिण्याची रिक्वेष्ट करून!
आपला,
(मोगराप्रेमी) तात्या.
22 Jan 2008 - 12:39 am | प्राजु
माहीती असेल तिला तर ती लिहिल ना.. तिला मि मिपाची सदस्य व्हायला सांगते.
ओ.के.?
- प्राजु.
22 Jan 2008 - 12:40 am | विसोबा खेचर
माहीती असेल तिला तर ती लिहिल ना.. तिला मि मिपाची सदस्य व्हायला सांगते.
ओ.के.?
Ok, Done!
आपला,
सरपंच! :)
22 Jan 2008 - 1:08 am | स्वाती राजेश
खूपच मस्त...
ही गोष्ट फारच छान आहे.
गोष्ट वाचता वाचता बालपण च्या आठवणी कधी जाग्या झाल्या कळलच नाही.
ते पारिजाकताचे झाड..
फुले कोमेजु नयेत म्हणून अलगद वेचलेली फुले...
22 Jan 2008 - 1:28 am | मीनल गद्रे.
गैरसमज झाला आहे .ले़खिका मी नाही.
ती माहिती tulipsintwiligh Blog मधे वाचायला मिळाली.
आपली प्रामाणिक
मीनल गद्रे.
22 Jan 2008 - 2:42 pm | ध्रुव
महिती अत्यंत छान आहे, मिनलने तर प्रामाणिकपणे हेदेखील सांगीतले की लेखीका ती नाही. ते काहिही असो, माहिती ही कधीच वाया जात नाही. उलट माहिती असेल तर आपल्यालाच छान वाटते.
आता मलाही कुठेही प्राजक्ताचे झाड दिसले की ही माहिती आठवणार.
बाकी प्राजक्ताच्या झाडाबद्दल कुठल्यातरी कथेत वाचले होते. लेखक म्हणतो, मला मृत्युनंतर अग्नी देऊ नका, मला मातीत जाऊदे, मला जिथे पुराल तिथे प्राजक्ताचे झाड लावा. माझी आठवण कायम त्या फुलांच्या रुपाने कायम होऊदे आणि मला अमर होऊदे. बाकी या गोष्टीबद्दल संदर्भ/लेखक काही आठवत नाही पण ही लेखकाची इच्छा मात्र मनात घर करुन गेली.
--
(प्राजक्ताच्या सुवासात रमणारा)ध्रुव
27 Jan 2008 - 9:38 am | सुधीर कांदळकर
फुले हा वि स खांडेकरांचा लघुनिबंध आम्हाला एस एस सी (पास झालोय बरे का) ला होता. कवि प्रफुल्ल दत्त उर्फ द. वि. तेंडुलकर आम्हाला शिकवीत. हा लघुनिबंध त्यांनी इतका छान शिकविला की आम्ही लघुनिबंध याप्रकाराच्या प्रेमात पडलो आणि बरेच दिवस अभ्यास सोडुन लघुनिबंध वाचायच्या वेडात होतो. अनंत काणेकर, म ना अदवंत, वि स खांडेकर इ. च्या अनेक लघुनिबंधांनी आमचे आयुष्य सोनेरी केले.
माझ्या आजोळी प्राजक्ताचे झाड होते. मी ३ री ४ थीत होतो व सुटीत आजोळी जात असे. फुले वेचून आणणे व हार बनविणे हे आमचे लहान मुलांचे काम असे. मला चांगले हार बनविता येत नसत व ते कामहि आवडत नसे. माझी मामेबहीण माझ्यापेक्षा फक्त ६ महिन्यांनी मोठी असलेली फार सुरेख बनवी. माझ्या वाट्याचेहि तीच बनवी. या मनोरम आठवणी जाग्या झाल्या. हल्ली ती फक्त लग्न इ. समारंभांतच भेटते. मग आम्ही त्या आठवणी पुन्हा जगतो.
धन्यवाद. वरिल सदर हे गद्यकाव्य आहे. अशीच सदरे येऊद्यात. लघुनिबंध आला तरी चालेल.