फाशीची शिक्षा झालेल्या क्रांतिकारकाची फाशीच्या आदल्या रात्री काय मनस्थिती असेल.....त्यातुनही तो अंदमानसारख्या ठिकाणी मातृभुमीपासुन हजारो मैल दुर असेल तर.? मृत्युला निर्भयपणे ललकारणार्या या वीराला भीती असते ती फक्त आपले बलिदान अनाठायी तर ठरणार नाही ना याची !
एकटी ही वाट माझी
आस मनी ती तेजाची
स्मरतो मी तुला दयाळा
मज भीती अंधाराची
सुर्य उद्याचा स्वातंत्र्याचा
पहाट गात्या वार्याची
गाती निर्झरही लाजरे
ही साद येई मातृभुमीची
नाचती सागर लाटा
मुग्ध धुंदी मृगजळाची
झिम्मड वर्षेच्या धारा
उत्कंठा त्या मिलनाची
गात्रींच्या कराल शृंखला
भीती भग्न एकांताची
खुणावती मेघमाला
आस मनी धरतीची
जेव्हा कंठी मृत्यु उरे
तमा नुरे अस्तित्वाची
नसे पाश यमराजाचा
कुस असे ती मातेची
विशाल.