खरतर ही खूप बेसिक रेसिपी आहे. पण प्रत्येक जणाकडे आमटी बनवण्याचे काहीतरी वेरिएशन असतेच..या पाकृ च्या निमित्ताने आमटी चविष्ठ बनवायच्या प्रत्येकाच्या टिप्स, पद्धती वाचायला मिळाल्या तर मजा येइल.
कमी पदार्थ वापरून चवीला मस्त झालेली आमटी तूप भातावर घेउन खाण्यासारखे सुख नाही!
साहित्य:
१/२ कप तूरडाळ
७ ते ८ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे (४ इंचाचे)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
५ ते ६ कढीपत्ता पाने
४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/४ कप खोवलेला नारळ
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ ते दिड टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून गूळ
३ ते ४ आमसुलं
चवीपुरते मिठ
कृती:
१) तूरडाळ प्रेशर-कूकरमध्ये शिजवून घ्यावी. नंतर शेवग्याच्या शेंगा २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्याव्यात. तूरडाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र कूकरमध्ये शिजवू नयेत, नाहीतर शेंगा जास्त शिजतील आणि फुटतील. शेंगा शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) तूरडाळ वरण निट घोटून घ्यावे. पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरची, कढीपत्ता, नारळ घालून फोडणी करावी त्यात कोथिंबीर घालून १५ ते २० सेकंद परतावे. नंतर यात तूरडाळ घालावी गरजेनुसार पाणी घालावे.
३) आमटीला एक उकळी आली कि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. गोडा मसाला, आमसुलं आणि मिठ घालून मध्यम आचेवर आमटी ५ मिनीटे उकळू द्यावी. नंतर गूळ घालावा आणि साधारण २ ते ३ मिनीटे उकळू द्यावी. गॅस बंद करून थोडावेळ पातेल्यावर झाकण ठेवावे.
गरम गरम वाफाळता भातावर साजुक तूप सोडावे. वर आमटी, बरोबर पापड !...
चकली
http://chakali.blogspot.com/2009/02/shevagyachya-shenganchi-amati.html
प्रतिक्रिया
12 Feb 2009 - 9:57 pm | मीनल
शेवग्याच्या शेंगा घालून पिठलं ही छान होतं.
मीनल.
12 Feb 2009 - 10:08 pm | रामची आई
फोडणीत मेथीचे दाणे घालुन अजुन चव वाढवता येईल :)
12 Feb 2009 - 10:51 pm | प्राजु
शेवग्याच्या शेंगाची आमटी, तूप आणि गरम भात... आहाहा!
हे सगळं स्वतः न केलेलं.. म्हणजे आयतं करून वाढावं कुणीतरी. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 10:59 pm | विसोबा खेचर
संपलो, वारलो, खपलो, निवर्तलो!
बाई गं चकले, का असा अत्त्याचार करतेस? :)
असो, पाकृ बाकी भन्नाटच! माझी अत्यंत आवडती! :)
जियो..!
आपला,
(शेवग्याच्या शेंगांचा आशिक!) तात्या.
13 Feb 2009 - 7:50 am | विंजिनेर
ह्यां चित्रांतून वाफाळत्या आंबेमोहोर तांदुळाच्या भाताच सुगंध आणि त्याबरोबर असलेल्या आंबडगोड आमटी चा स्वाद जर "अटॅच करून पाठवला तर किती छान होइल
असल्या साध्याच पण अस्सल म्हराट मोळ्या पा़कृ पानात असल्यावर जगातल्या कुठल्याही पंचतारांकित हॉटेल मधले पदार्थ त्यापुढे झक मारीत जातात.
छायाचित्र ही तोंडाला पाणी सूटवणारे..
13 Feb 2009 - 8:45 am | अंतरंग....
६ ते ७ शिट्ट्या जरा जास्त होतिल असे नहि वाटत चकलीताई....?
मला वाटते ३ शिट्ट्यात डाळ मस्त शिजते....
13 Feb 2009 - 8:05 pm | चकली
अंतरंग..
त्याचं काय आहे, माझ्याकडे जो कूकर आहे त्याच्या शिट्ट्या भराभर होतात, त्यामुळे ३ शिट्ट्यांमध्ये डाळ चांगल्याप्रकारे शिजत नाही, जास्त शिट्ट्या कराव्या लागतात, म्हणून तसे लिहिले होते. त्यामुळे कूकरनुसार शिट्ट्या होवू द्याव्यात आणि डाळ शिजवावी.
चकली
http://chakali.blogspot.com
13 Feb 2009 - 8:49 am | सहज
मस्त. फोटो कातिल आहे.
:-)
13 Feb 2009 - 8:52 am | मदनबाण
सहमत... :)
या शेंगेतल्या बिया खायला पण मजा येते...:)
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
13 Feb 2009 - 3:41 pm | प्रभाकर पेठकर
आमटीत गोडा मसाला तर चांगला लागतोच पण कधी कधी गोड्या मसाल्या ऐवजी फोडणीत ४ कुटाच्या मिरच्या घातल्यास मस्त चव लागते. तसेच नारळ, पुदिना, कोथिंबिर आणि हिरवी मिरची ह्यांची चटणीही आमटीत मिसळल्यास मस्त लागते.
दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
13 Feb 2009 - 3:54 pm | परीसा
रेसिपी खरच खुप छान आहे. पण मला हे सांगा ना गोडा मसाला म्हणजे कांदा खोबरे भाजुन केलेला ना?
परीसा
13 Feb 2009 - 8:10 pm | चकली
धन्यवाद परीसा,
नाही, गोडामसाल्यात कांदा नाही घालत, गोडा मसाल्याच्या कृतीसाठी इथे टिचकी मारा
चकली
http://chakali.blogspot.com
13 Feb 2009 - 4:01 pm | शाल्मली
चकली,
माझी फारच आवडती आमटी.
गरम गरम भात आणि त्यावर पहिल्या उकळीची आमटी आणि तूप.. अहाहा मस्तच!
पाकृबद्दल धन्यवाद :)
मी बरेचदा आमसूलाऐवजी चिंच वापरते.
--शाल्मली.
13 Feb 2009 - 7:25 pm | रेवती
मस्तच गं चकलीताई!
पाकृ मस्त व फोटू झकास!
फार फार आवडीची आमटी.
(आमच्या इथल्या ग्रोसरी दुकानात फारच मरतुकड्या शेंगा मिळतात.
दुकानाच्या मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!)
रेवती