पंढरी (अष्टाक्षरी)

प्रशांत.पोरे's picture
प्रशांत.पोरे in जे न देखे रवी...
18 Jan 2009 - 1:14 pm

पंढरीचा विठूराया,
पंढरीत आहे कुठे?
वाट विठूची पहात,
उभे मंदीर एकटे!

रखुमाईही पुसते,
"कसा दिवस हा आला?
विना सांगता कुणाला,
कुठे नाथ माझा गेला?

नाही कुणी कान्होपात्रा,
आज कुणी जना नाही.
ज्यांच्या मदतीच्या साठी,
देव देवळात नाही."

विठू कधीच नव्हता,
पंढरीच्या मंदिरात,
तोच सांगे "नका पाहू,
मला काळ्या पत्थरात."

देव सांगे आज मला,
"देव तुझ्याच घरात,
घरातल्या विठ्ठलाच्या,
काय जाण अंतरात.

बाप तुझा रे विठोबा,
अन आई रखुमाई,
त्यांच्या पायधुळीचीही,
सर पंढरीस नाही.

माय पित्याहून दुजा,
स्वर्ग नाही हे सांगतो,
तीच तुझी रे पंढरी,
विठू तिथेच नांदतो."

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Jan 2009 - 5:52 am | प्राजु

कविता अतिशय सुरेख जमली आहे.
खास करून शेवट अतिशय सुरेख.

विठू कधीच नव्हता,
पंढरीच्या मंदिरात,
तोच सांगे "नका पाहू,
मला काळ्या पत्थरात."

+१
आणि
बाप तुझा रे विठोबा,
अन आई रखुमाई,
त्यांच्या पायधुळीचीही,
सर पंढरीस नाही.

व्वा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

19 Jan 2009 - 10:04 am | राघव

मी हा धागा नंतर बघीतला.. त्या आधीच हा अभिप्राय देवून झाला.. http://www.misalpav.com/node/4549#comment-83247
असो. खूप सुंदर कविता! येऊ द्यात अजून!
मुमुक्षु :)