जुना ओसाड वाडा

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
3 Jan 2009 - 6:38 pm

जुन्या वाड्याच्या आठवणीची कविता

तुटलेल्या दिंडीमधुनी
अवचित आत मी येते
चाफ्याच्या सोनफुलांचे
आठवून सुगंधी नाते

भिंत जरी खचलेली
ती गवत पांघरुन बोले
लखलखत्या आठवणींचे
अवशेष मोहरून आले

आठवे देवघर इथले
श्रध्देच्या सांज सकाळी
फिरतात आता बेताल
मुंग्यांच्या काळ्या ओळी

अल्लड अंगणामधला
प्राजक्त फुलांचा भार
शिडकाव्यामधुनी ठेवे
अंगणावर अधिकार

आटला अभागी आड
डोळ्यात साचले पाणी
ह्या लगबग काठावरती
मी कितीक गाईली गाणी

परतूनी निघाले जेव्हा
तोडून भरजरी धागे
दिंडीच्या दरवाज्यातून
हे कोण खेचते मागे ?

कविता

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

3 Jan 2009 - 8:33 pm | चतुरंग

लखलखत्या आठवणींना उजाळा देणारी भावस्पर्शी कविता. फारच सुरेख.
(बाळकराम तुमचे कवित्व मिताक्षरी आहे पण अतिशय परिणामकारक. लिहिते रहा.)

चतुरंग

प्राजु's picture

3 Jan 2009 - 8:55 pm | प्राजु

या कवितेबद्दल तुम्हाला एखादे बक्षिस द्यावे असे वाटते आहे.
अप्रतिम कविता. माझ्या वाड्याची आठवण झाली.
प्रत्येक ओळ दाद द्यावी अशी आहे. चाफ्याच्या सोनफुलांचे नाते, श्रद्धेच्या सांज सकाळी, गवत पांघरलेली भिंत, प्राजक्ताचा भार, आटलेला आड.. अत्युच्च!
जियो...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

4 Jan 2009 - 3:15 am | धनंजय

बाळ्कराम!

चित्रदर्शी कविता आहे.

मीनल's picture

4 Jan 2009 - 4:10 am | मीनल

सर्वच ओळी हाय क्लास !
मीनल.

लवंगी's picture

4 Jan 2009 - 4:31 am | लवंगी

गावात एकट्या पडलेल्या वाडयाची आठवण आली.. भूतकाळात घेऊन गेलात आणि मन आता परतायलाच तयार नाही..

घाटावरचे भट's picture

4 Jan 2009 - 7:51 am | घाटावरचे भट

मस्त कविता.....

नंदन's picture

4 Jan 2009 - 9:28 am | नंदन

आणि चित्रदर्शी कविता, अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2009 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली !

मुक्तसुनीत's picture

4 Jan 2009 - 10:55 am | मुक्तसुनीत

कविता आवडली. बालकवींच्या "पारवा" या प्रसिद्ध कवितेतील 'भिंत खचलेल्या आणि खांब कलथून गेलेल्या उध्वस्त धर्मशाळेची' आठवण तुम्ही कवितेतून जागवली आहे. तुमच्या आयडीवरून आणि या कवितेवरून तुम्ही गडकरी नि ठोंबरे या दोघा मराठीतील दिग्गज कवींचे चहाते आहात असे दिसते :-)

दत्ता काळे's picture

4 Jan 2009 - 1:43 pm | दत्ता काळे

चतुरंग, प्राजुताई, धनंजयराव्,मीनल, लवंगी, घाटावरचे भट, नंदन, डॉ. बिरुटे आणि मुक्तसुनीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मुक्तसुनीत,
तुम्ही लिहिल्याप्रमाणे मी खरोखरी गोविंदाग्रज आणि बालकवी ह्यांचा चाहता आहे आणि माझ्या "बाळकराम" ह्या 'आयडी'लासुध्दा शाळेत घडलेल्या एका छोट्याश्या घटनेचा संदर्भ आहे.

मृण्मयी's picture

4 Jan 2009 - 9:57 pm | मृण्मयी

कविता अप्रतीम!!! खूप आवडली.

राघव's picture

5 Jan 2009 - 12:41 pm | राघव

वाहवा! क्या बात है! खूप सुंदर!!
मनापासून आवडली कविता. अगदी चित्रदर्शी!

(बाळकराम तुमचे कवित्व मिताक्षरी आहे पण अतिशय परिणामकारक. लिहिते रहा.)
चतुरंगांशी सहमत.

मुमुक्षु

मृगनयनी's picture

5 Jan 2009 - 12:52 pm | मृगनयनी

परतूनी निघाले जेव्हा
तोडून भरजरी धागे
दिंडीच्या दरवाज्यातून
हे कोण खेचते मागे ?

मस्त!!!!!
पाणी आले डोळ्यांत.....

नकळत "आजोळ"च्या.... चार-मजली वाड्याची आठवण झाली.......

:)

धन्यु....

दिपक's picture

5 Jan 2009 - 12:57 pm | दिपक

यंदाच्या मौज दिवाळी अंकात आलेल्या चपळगावकरांच्या "वाड्या"वरील लेखाची आठवण झाली.
:)

सहज's picture

5 Jan 2009 - 1:10 pm | सहज

बाळकराम तुमची कविता "बालभारती" मधे नक्की शोभुन दिसेल. मस्त आहे.

झेल्या's picture

5 Jan 2009 - 2:59 pm | झेल्या

आटला अभागी आड
डोळ्यात साचले पाणी
ह्या लगबग काठावरती
मी कितीक गाईली गाणी

डोळ्यांचा आणि आडाचा काठ अगदी एकरूप झालाय....!
अतिशय सुरेख कविता..!
-झेल्या

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2009 - 3:18 pm | प्रभाकर पेठकर

परतूनी निघाले जेव्हा
तोडून भरजरी धागे
दिंडीच्या दरवाज्यातून
हे कोण खेचते मागे ?

हृदयस्पर्शी शेवट. मस्त आहे कविता. अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

लिखाळ's picture

5 Jan 2009 - 8:32 pm | लिखाळ

बेताल मुंग्यांच्या काळ्या ओळी , फुलांचा अंगणावर अधिकार, बावेचा लगबग काठ
या कल्पना विशेष आवडल्या. सुंदर कविता.
शेवटचे कडवे तर सर्वांवर कडी !
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:36 am | विसोबा खेचर

अप्रतीम कविता..!

अन्य शब्द नाहीत..!

तात्या.

रामदास's picture

7 Jan 2009 - 9:06 am | रामदास

प्रतिभा बहराला येते आहे. आणखी लिहा.

ह्या लगबग काठावरती
मी कितीक गाईली गाणी या ओळी खूप आवडल्या.

एकलव्य's picture

7 Jan 2009 - 9:20 am | एकलव्य

फिरतात आता बेताल
मुंग्यांच्या काळ्या ओळी

खूपच आवडले... सुंदर कविता!

दत्ता काळे's picture

7 Jan 2009 - 4:02 pm | दत्ता काळे

तात्याराव, रामदासजी, पेठकरकाका, सहजराव, मुमुक्षु, मृण्मयी, मृगनयनी, दिपक, लिखाळ, झेल्या, एकलव्य, आपणा सर्वांचे मी प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.

उत्खनक's picture

28 Mar 2020 - 3:04 pm | उत्खनक

नॉस्टॅल्जिक व्हायला भाग पाडणारी एक खास जुनी आठवण!

अवांतरः कुठे गेलेत हे सगळे लोक्स आता.. कुणी काही लिहित का नाही.. कल्पना नाही.. :-(

जिन्क्स's picture

29 Mar 2020 - 10:53 pm | जिन्क्स

खूप मस्तं!