(वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व)
प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे. असो...
आमचा प्रोजेक्ट सुरु झाला आणि साधारण २-३ महिन्यांनी काही तरी कारणामुळे माझ्याकडून अपेक्षित असलेले काम वेळेवर होऊ शकत नव्हते आणि सर तर शासनाला तारीख कबूल करून बसले होते.
ज्या कारणांमुळे दिरंगाई झाली ती अतिशय योग्य होती आणि माझा काहीच दोष नव्हता. एक दिवस सरांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले,
"राजीव, काम का होत नाहीये?"
"सर, मला कामासाठी कंम्प्युटर मिळत नाहीये"
"पण मला ते काही ऐकायचे नाही"
"सर, पण..."
"नथिंग डूइंग. तुला अपॉईंट्मेट देताना मला काय करावे लागले आहे, ते तुला माहिती आहे ना? डोण्ट लेट मी डाऊन."
मला ती वाक्ये भयानक झोंबली. नंतर दोन-तीन दिवस सतत आपण काहीही काम केलं नाही, हे विचार कोडगेपणा माहित नसल्यामुळे मनाला भयानक खात होते. मग मी एक विचार केला आणि मी त्या महिन्याचा पगार घ्यायला जायचं नाही असं ठरवलं. काम केलेलं नसेल तरी पगार घ्यायचा हे मनाला पटेना...
त्या महिन्याचा पगार न घेतल्यामुळे आमच्या अकाउंट विभागाने सरांच्याकडे मी काम सोडून गेलो आहे का? अशी चवकशी केली. मी पगार न घेतल्यामुळे त्याना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मला बोलावून विचारणा केली.
"राजीव, पगार का नाही घेतला?"
"सर, तुम्ही म्हणालात की मी काम करत नाही. मग मी काम न करता पगार का घेऊ?"
सरांनी कपाळाला हात मारला आणि म्हणाले,
"अरे बाबा, मी कितीही रागवलो तरी पगार घ्यायचा नाही असा वेडेपणा करायचा नाही. गो ॲण्ड कलेक्ट युवर सॅलरी".
मग काही दिवसांनी माझ्या वडिलांचे १लेच वर्षश्राद्ध होते. त्यासाठी मला कामाच्या प्रेशरमुळे रजा मागायची हिंमत झाली नाही. माझी आई त्यामुळे माझ्यावर (एकुलता एक असल्यामुळे) भडकली. त्यामुळे परत कामात लक्ष लागेनासे झाले. सरांच्या ते लक्षात आले, पण यावेळेला त्यांनी सौम्य स्वरात विचारले,
"राजीव, काही प्रॉब्लेम आहे का?"
"सर, मला माझ्या वडिलांच्या १ल्याच श्राद्धाला मी जाऊ शकलो नाही म्हणून आई खूप चिडली आहे".
"ओह माय गॉड, मी आता पुण्याला जाईन तेव्हा तुझ्या आईला भेटून माफी मागेन."
हा निरोप मी आईला कळवला आणि आईचा राग निवळला. सरांना आईची माफी मागायची वेळ अर्थातच आली नाही.
काही लोकांच्या शब्दात ताकद असते. पुढे मी पुण्याला एका "नामवंत" संशोधन मंदिरात रूजू झालो तेव्हा संचालकांनी पाळलेल्या एक व्यक्तीने मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझा अनन्वित छळ केला. मी सरांना त्याबद्दल सांगत असे, तेव्हा ते मला म्हणत -
"राजीव, पी०एच०डी० इज शॉर्टटर्म मॅरेज. तुझ्या सारख्या व्यक्तीने ज्या ठिकाणी आणि ज्याच्या हाताखाली पी०एच०डी० करायची त्यांचा कमीतकमी एकवर्षाचा अनुभव घेतल्याशिवाय रजिस्टर करायचे नाही, आणि लक्षात ठेव, नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग".
"नोवन कॅन सप्रेस यु फॉर टू लॉंग", या आशीर्वादाने मला नंतर अनेक लढायात प्रचंड मानसिक ताकद दिली...
प्रतिक्रिया
17 Jun 2025 - 3:57 pm | रामचंद्र
संगणकाअभावी सदर प्रकल्पाचे काय झाले? कृपया सविस्तर वर्णन येऊ द्यावे ही विनंती.
17 Jun 2025 - 5:11 pm | युयुत्सु
सुरुवातीला रात्री-बेरात्री जागून संगणक मिळेल तेव्हा काम करावे लागले. मग काही महिन्यांनी संगणक विभागातील प्रत्येक प्राध्यापकाला स्वतंत्र पीसी (एक्स्टी ६४केबी रॅम १०/२० एम्बी हार्डडीस्क) मिळाल्यावर काम करणे सुलभ झाले. प्रकल्प अर्थात्च पूर्ण झाला. या घटना १९९० च्या अगोदरच्या आहेत.
17 Jun 2025 - 5:35 pm | विजुभाऊ
आठवणीत मजा येण्यासारखे काय आहे ते समजावून सांगाल का? म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्याला ही मजा घेता येईल
17 Jun 2025 - 5:50 pm | युयुत्सु
तुम्हाला माझ्या अनुभवात मजा वाटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. तुम्हाला कौशिकी चक्रवर्ती आवडू नये असा ही माझा हट्ट नाही. मी फक्त कौशिकी चक्रवर्ती या बाईंच्या सांगीतिक थरथराटाबद्दल माझी मते व्यक्त केली, आणि माझ्या मतांशी अनेकजण सहमत आहेत. सांगीतिक अनुभव म्हणजे वैज्ञानिक सत्य नव्हे, की जे काही जण बेजबाबदारपणे नाकारतात.
17 Jun 2025 - 5:59 pm | चौथा कोनाडा
खरोखरच हृद्य आठवण !
काही व्यक्ति अश्या वंद्य असतात ज्यांचे योग्य मार्गदर्शन लाभते अन आयुष्यभर त्यांचा आदर वाटत राहतो...
17 Jun 2025 - 6:01 pm | चौथा कोनाडा
प्रतिसाद देताना .. बाकी, मथळ्यातील "मजेशीर" या शब्दाकडे दुर्लक्ष करत कात्रज बायपास दाखवला !
17 Jun 2025 - 6:08 pm | युयुत्सु
मनःपूर्वक धन्यवाद! "मजेशीर" अशासाठी की काही प्रसंगांची आता मागे बघताना गंमत वाटते आणि हसू येते.
18 Jun 2025 - 3:15 pm | Bhakti
अनुभव आवडले.
"
मग तुम्ही पीएचडी त्याच गाईडकडे केली की दुसरीकडे.
ला
मला आयुष्यात असे पीएचडीचे भले बुरे अनुभव यावे अशी इच्छा होती ;),पण ती गाडी आता चुकली.असो,पुढे जात रहावे
18 Jun 2025 - 6:28 pm | युयुत्सु
@Bhakti
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नंतर पीएचडी करायला जमले नाही कारण प्राधान्यक्रम आणि जबाबदर्या बदलत गेल्या.
19 Jun 2025 - 7:04 am | नचिकेत जवखेडकर
अवांतर होईल पण एक विचारायचं आहे(माझं अज्ञान समजा) की,
पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात? अशासाठी विचारलं की, माझ्या कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीने पीएचडी केली होती. अत्यंत हुशार माणूस पण त्याच्या टीम मधल्या थोड्या अनुभवी इंजिनिअर आणि याच्या पगारामध्ये फार तफावत नव्हती. म्हणजे जर का एका क्ष जागेसाठी २ उमेदवार असतील आणि एक पीएचडी पण अननुभवी आणि दुसरा पदवीधर पण ५ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला माणूस यांच्यापैकी प्राधान्य खचितच अनुभवी व्यक्तीला दिलं जाईल नाही का? म्हणजे पीएचडी करण्यात इतकी वर्ष घालवणं कितपत फायदेशीर आहे, जर का नंतर एमएनसी मध्ये नोकरी करायची असेल तर?
19 Jun 2025 - 8:25 am | युयुत्सु
श्री० नचिकेत जवखेडकर
<पी एच डी केली की पुढे अर्थार्जनासाठी काय संधी असतात?>
इट डीपेण्डस...
पी०एच्०डी० कशात केली आहे, कुठे केली आहे, कुणाच्या हाताखाली केली आहे यावर सगळे ठरते. माझे माझ्या बरोबर आय्०आय्०टी०त तेव्हाचे दोन सख्खे मित्र जिवाच्या आकांताने अमेरिकेत गेले, पी०एच्०डी० करायला गेले. दोघाना ही त्याच्या पी०एच्०डी० च्या संबंधित नोकरी मिळाली नाही. मग एक जण रस्त्यावर चित्रे काढायला लागला, ऑर्केस्ट्रात गाणी गायला लागला तर दूसर्याने युनिक्स प्रोगामिंग करायला सुरुवात केली. नंतरच्या आयुष्याशी त्यांच्या पी०एच्०डी०चा काहीही संबंध राहीला.
अशी असंख्य उदा० देता येतात...
कोर्टात गेलं की काळे कोट्वाले आपल्यामागे लागतात, तसे पुणे विद्यापीठात काहीजण तेव्हा पी०एच्०डी०साठी हात धूवून मागे लागत असत. अशा लोकांच्या हाताखाली अजिबात करायची नाही.
पुणे विद्यापीठातील पी०एच्०डी० संदर्भातला माझा एक गमतीदार अनुभव स्वतंत्रपणे पोस्ट करीन.
20 Jun 2025 - 5:53 am | नचिकेत जवखेडकर
धन्यवाद. अनुभव वाचायला उत्सुक आहे.बाकी वरती भक्ती ताई म्हणतायत त्याप्रमाणे, आमची पण गाडी चुकली आहे. किंवा घसरली आहे म्हणूयात कारण पदवी पण नाहीये
😅
19 Jun 2025 - 8:34 am | युयुत्सु
१९९० च्या दशकात चाळिस हजारात पी०एच्०डी०चा प्रबंध पुणे विद्यापीठासाठीच्या डॉ०साठी लिहून मिळत असे, अशी माहिती विद्यापीठाशी संबंधीत व्यक्तीनीच दिली होती.