कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला!
काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच.
अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली. २ बॅटरी ऑपरेटेड गाड्या बदलत, कुणाला १० तर कुणाला २० रुपये देत शेवटी मंदिराजवळ पोहोचलो.
आता पुढे मोठं दिव्य होतं. इथपर्यंतचा प्रवास त्रासदायक नव्हता, तेवढं दर्शन महाभयंकर होतं. दुपारी १२ वाजले होते. ऊन कडक होतं. मंदिराकडे मुख्य रस्त्यापासून वळालो. दूरदूरपर्यंत मंदिर किंवा कळस दिसेना. बराच चालून गेल्यावर चप्पल काढायचं लॉकर मिळालं. तिथे चप्पल तर काढली, पण चालायला एक लांबलचक नि रुंद सतरंजी अंथरलेली होती. सतरंजीवर जागा मिळाली तर ठीक, नाहीतर जळणारे पाय घेऊन पळत सुटावं लागलं.
फक्त चप्पल काढण्यासाठीच २००–४०० मीटरचा मोठा U-टर्न ठेवलेला. लोक घामाघूम होऊन चालत होते, पाय जळत होते. पुन्हा बरंच चालल्यावर सिक्युरिटीने सांगितलं – मंदिरात मोबाईल अलाउड नाही (अरे बाबानो, असा बोर्ड आधी लावायचा ना?) मग पुन्हा जिथे चप्पल काढल्या तिकडे लॉकरला मोबाईल ठेवायला यावं लागलं. सिक्युरिटी चेक करून झाल्यावर मंदिराच्या दिशेने निघालो. पुन्हा बरंच चालल्यावर मंदिर एकदाचं आलं.
मला वाटलं होतं – “रामजन्मभूमीचं राममंदिर” किती भव्यदिव्य असेल? पण नाही! जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती, आणि गावातील एखाद्या २ नंबर कमावणाऱ्या माणसाने मंदिर बांधावं इतकंच छोटंसं प्रत्यक्ष राममंदिर होतं. एकतर राममंदिरापर्यंत पोहोचताना अनेक भाविक गळून पडले होते. सुरुवातीला "जय श्रीराम"च्या घोषणा देणारे चडिचूप झाले होते. म्हातारे–कोतारे सावली मिळेल तिथे बसत होते.
तर हो, छोटेखानी मंदिर अजूनही पूर्ण झालेलं नाही. बांधकाम अजूनही सुरूच आहे. मागच्या वर्षी सत्तालालसेपोटी हिंदूंच्या भावनेची कदर न करता उद्घाटन रेटलं गेलं होतं. बरं, एक अक्षरधामसारखं भव्य मंदिर बांधले असते तर ठीक पण नाही छोटं मंदिर बांधलंय, नि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ मंदिरांचं बांधकाम सुरू होतं. माती, धूळ उडत होती.
मंदिरात प्रवेश केला. आता इतक्या दूर भक्तगण थकून आलेत, आपण त्यांचे इतके हाल केलेत – तर दर्शन तरी सुखाने होईल? पण नाही! सरकारने हाल केल्यानंतर दर्शनही सुखाने होऊ नये अशी चोख व्यवस्था केलीय. एकतर मूर्ती अतिशय छोटी – ३ ते ४ फुटांची. त्यात भक्त आणि मूर्तीमध्ये इतकं जास्त अंतर की मूर्ती नीट दिसतही नाही. कसं तरी दर्शन आटोपून लोक बाहेर पडले. पुन्हा तीच छोटी सतरंजी नि जळणारे पाय.
कसंतरी लॉकरपर्यंत पोहोचलो. मोबाईल घेतले. गरम फरशीवरून पळत जाऊन चप्पल मिळवली. रस्त्यात ठिकठिकाणी हाल होऊन म्हातारे लोक सावली पाहून पडले होते. स्त्रिया कुठेही फोटो काढायला जागा नाही म्हणून सिक्युरिटीशी भांडत होत्या. अनेक लोकांना बाहेर जायचा रस्ता सापडत नव्हता म्हणून पुन्हा जिथून आले तिथे परत जात होते आणि सिक्युरिटीशी भांडत होते. सिक्युरिटी त्यांना पीटाळत होती.
मध्ये मध्ये पाणी पिण्याची व्यवस्था होती – तेवढंच काय ते सुख. जाताना प्रसाद दिला. राममंदिरात येऊन गेल्याचा पुरावा म्हणून फोटो घेण्याची एकही जागा नव्हती.
मला वाटतं, एवढे हाल जर मुस्लिमांच्या ताब्यात रामजन्मभूमी जमीन असती तरी त्यांनी देखील हिंदूंचं केलं नसतं, तेवढं योगी सरकारने केलंय. शिर्डीचं मंदिर व्यवस्थेच्या बाबतीत कितीतरी पटीने आदर्श आहे!
तर असे कसेबसे दर्शन आटोपून पुन्हा गोरखपूरकडे वळालो. अयोध्येबद्दलचे सगळे भ्रम तुटले. इतर कुठे फिरायची इच्छा राहिली नाही! उगाच नाही अयोध्यासाठी अनेक शहरांमधून सुरू करण्यात आलेल्या फ्लाईट्स बंद पडल्या. मुळात देवदर्शन करायला म्हातारे लोक जास्त येतात. त्यांचेच कसे हाल होतील नि जिरतील याची उत्तम व्यवस्था रामजन्मभूमी मंदिरावर करण्यात आली आहे. ना कुणी फोटो काढू शकतो, ना नीट दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे अयोध्याधाम जास्त प्रसिद्ध पावलेले नाही. उत्तरोत्तर इथे भाविक कमीच होत जाणार, आणि मोठी पब्लिसिटी होणारच नाही.
ज्याला कुणाला जायचे असेल त्याने सोबत एनर्जी ड्रिंक, ओआरएस, टोप्या, गोळ्या, औषधे असा लवाजमा बरोबर असू द्यावा. आपण मंदिरात नाही तर ट्रेकिंगला जातोय, अशा तयारीने जावे.
गोरखपूरला येऊन गोरक्षनाथ मंदिरात दर्शन घेतले
पुढे गोरखपूरमधले काम आटोपून २०० किमीवरील वाराणसीला जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून रेल्वे नव्हती, म्हणून ४० किमीवरील “देवरिया सदर”ला जाऊन रेल्वे पकडली.
रेल्वे स्टेशनवर वेळ होता म्हणून बाहेर जाऊन कॉफी प्यावी असा विचार केला, पण बाहेर भयंकर प्रमाणात कत्तलखाने होते. तिथला वास नि वातावरण पाहून भयंकर मळमळ झाली. परत आता २ महिने तरी नॉनव्हेज खाल्ले जाणार नाही.
रेल्वेत AC चेअर कार मिळाले होते. बाजूला एक कुठल्यातरी कॉलेजचा गप्पिष्ट प्रोफेसर येऊन बसला. त्याने त्याची विंडो सिट मला दिली नि त्या बदल्यात भयंकर गप्पा मारल्या. कानातला हेडफोन पुन्हा पुन्हा काढून तो काय सांगतोय ते ऐकत बसावे लागायचे. असे ४ तास गेले. मधल्या काळात त्याने थोडाफार वेळ दिला, तोपर्यंत वाराणसीच्या हॉटेल आणि घाटांची माहिती युट्यूबवर घेतली. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून भयंकर उत्सुकता लागली. केव्हा पोहोचेल वाराणसीला, असे झाले.
दशाश्वमेध घाट ते नवा बनलेला नमो घाट पहावाच, असे ठरवून तयारीला लागलो. युट्यूबवर “रांझणा” सिनेमाच्या गाण्यांवर अनेक व्हिडिओ होते, त्यात सुंदर गंगा नि घाट दिसत होते. हा सिनेमा मी कॉलेजमध्ये असताना थिएटरमध्ये पाहिला होता.
रात्री १० वाजता वाराणसी जंक्शनला पोहोचलो. रिक्षावाल्याला १०० टेकवून “तीर्थ गेस्ट हाऊस”ला निघालो. हे गेस्ट हाऊस मी रेल्वेत असतानाच बुक केले होते — ६०० रुपयांत काशी विश्वेश्वर मंदिराला लागूनच रूम मिळाली. गंगेकिनारीही गेस्ट हाऊस आहेत, सकाळी गंगा घाट थेट दिसेल असे. १२ पर्यंत जेवण आटोपून, चेक-इन करून मी गंगेकडे सुटलो.
दशाश्वमेध घाटापासून सुरुवात करून मी एकेक घाट ओलांडत जात होतो. मनकर्णिका घाट अखंड प्रेते जाळत होता.
इतर घाट — पेशवे घाट, गणेश घाट, भोसले घाट, मनकर्णिका घाट ओलांडत मी जात होतो. पुढे लोक नव्हते. दशाश्वमेध घाटाजवळ लोक झोपले होते पण पुढे शुकशुकाट होता. एक फॉरेनर मुलगी आणि मीच फिरत होतो. ती मला घाबरली असावी, कारण प्रचंड जोरात चालत होती. मी मागे चाललो असतो तर तिचा पिच्छा करतोय असे तिला वाटले असते, म्हणून स्पीड वाढवून तिला ओव्हरटेक केले नि पुढे गेलो.
भोसले घाटावरचा हा दरवाजा मला विशेष आवडला, तिथे फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.
बऱ्याच ठिकाणी पोलीस होते. ते कुणालाही घाटाजवळ येऊ देत नव्हते. जिथे पोलीस नव्हते, तिथे लोक आंघोळी उरकत होते. दीड तास चालल्यावर दमलो. नमो घाट अजूनही अर्धा तास दाखवत होता, मग परत फिरलो.
मंदिर पहाटे २.३० ला उघडेल, असे कळले होते. तोपर्यंत ज्ञानव्यापी मशिद पाहू म्हणून G-मॅप लावून १ वाजता निघालो. अचानक “श्री काशी विश्वनाथ मंदिराचा बोर्ड” दिसला. तिथे फोटो घेतले. तिथल्या पोलिसाने माहिती दिली की मंदिर पहाटे ४ वाजता उघडेल. २५० रुपयेचे तिकीट काढून वेगळी रांग असते, त्याने लवकर दर्शन होते.
एक महाराष्ट्रातील स्त्रियांचं पथक २ वाजेपासून मंदिराबाहेर रांगेत बसले होते. परत रूमवर आलो — जवळच होता. अतिशय अरुंद बोळातून रस्ता होता. bhinti छान चित्रानी रंगवल्या होत्या. २ वाजता झोपलो. ४ वाजता उठून आंघोळ करून मोबाईल रूमवरचा ठेऊन मंदिरात आलो. रांग मोठी नव्हती, पण रांगेत उभे राहिल्यावर लक्षात आले की फार हळूहळू पुढे सरकतेय.
टीव्ही स्क्रीन्सवर लोक पिंडीला हात लावून दर्शन घेताना दिसत होते. हिंदूंचे मक्का म्हणावे असे सर्वात पवित्र मंदिर आणि थेट पिंडीला हात लावणे हे सौभाग्य — तर त्र्यंबक, भीमाशंकर, घृष्णेश्वर कुठेच मिळत नाही — म्हणून आनंदलो.
पण माझा नंबर आला तेव्हा ५ वाजून गेले होते आणि ५ वाजेपर्यंतच सर्वसामान्यांना पिंडीला हात लावता येतो. नंतर VIP ना प्रवेश (११०० रुपये देऊन).
मला मंदिर फार आवडले. अतिशय छान आणि छोटे. आपल्या अहिल्याबाईंनी बांधलेले म्हणजे आपण पिंडीपासून पाच फूटावरून गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतो. पण गाभारा तेवढेच मंदिर! उगाच जास्तीचे बांधकाम नाही. सोन्याच्या (?) पत्र्याने मढवलेले.
हा पत्रा राजा रणजितसिंहांनी दिला, असे वाचले होते. मंदिर परिसर पांढऱ्या फरशीने केलेला, अतिशय स्वच्छ होता.
थोडक्यात, मंदिर असावे तर असे! नाहीतर खूप मोठे बांधकाम अजिबात नको.
पिंड मला नीट दिसली नाही कारण स्त्रिया मध्ये होत्या पोलीस पुढे ढकलत होते. एक पोलिसाला माझी दया आली नि त्याने २ मिनिटे थांबून स्त्रिया उठून जाण्यापर्यंत रांग होल्ड केली नि मला दर्शन घेऊ दिले.
तोपर्यंत आतल्या पुजाऱ्याने पिंडीवरील हार उचलून माझ्या गळ्यात घातला. मंदिर परिसरात थोडा वेळ बसलो. माकडे भरपूर होती, माणसाना घाबरत नव्हती.
Exit वर पोलिसाला सांगितले की मला ज्ञानव्यापी मशीद पाहायची आहे. त्याने मला दुसऱ्या बाजूला जा सांगितले. तिकडे गेल्यावर नंदी दिसला — त्याचे दर्शन घ्यायलाही रांग होती. नंदीचे तोंड ज्ञानवापीच्या दिशेने आहे.
ज्ञानव्यापीच्या दिशेने गेलो. ज्ञानव्यापी मागून पाहता यावी अशीही व्यवस्था आहे. मागच्या बाजूने मंदिराचे अवशेष असलेले खांब स्पष्ट दिसतात. मंदिर आणि मशिदीच्या दरम्यान जाळीच्या लोखंडी भिंती आहेत. पलीकडे मशिदीत सैन्याचे शस्त्रधारी सैनिक.
मशिदीच्या खाली, नंदीच्या समोर एक भुयार खोदला आहे जिथे जुन्या मंदिराचे खांब स्पष्ट दिसतात. कोर्टाच्या आदेशाने वर्षभराआधीच ते सुरू झाले आहे. तिथे मंदिर स्थापन केले आहे. असे तिथल्या पुजाऱ्याने सांगितले.
सगळं दर्शन घेऊन बाहेर आलो. लोक अन्नपूर्णा मंदिर, कालभैरव वगैरे मंदिरात जात होते, पण मला तिकडे जायची इच्छा झाली नाही. मी सॅक घेऊन होटलवाल्याचा टॉवेल आत टाकून , थेट दशाश्वमेध घाटावर पोहोचलो. मला वाटलं होतं की पाणी अतिशय घाण असेल, पण अपेक्षेपेक्षा खूपच स्वच्छ होतं. घाटावरच्या चार-पाच ठिकाणी पाहिल्यानंतर अतिस्वच्छ जागा बघून कपडे काढले आणि डुबकी मारली — पापं धुतली गेली! पाणी थंड नव्हतं, सुसह्य होतं.
सकाळी घाट गजबजलेला होता
पुन्हा कपडे करून नावेत बसलो. इथे एक गंमत पाहिली नाव वाले मराठी कुटुंबे दिसली की मराठीत बोलायचे, या आई या, पटकन बस, शंभर रुपये वगैरे. नाव आधी गंगेच्या पैलतीरी गेली. तिथं उतरून लोकांनी आंघोळी केल्या. तिकडचं पाणी जास्त स्वच्छ होतं कारण गर्दी नव्हती. मग नावेनं सगळे घाट फिरवून आणले. मी नावेत पुढच्या टोकावर जाऊन जागा पटकावली, आणि एका मुलीला फोटो नीट काढ म्हणून दम देऊन मोबाईल तिच्या हातात दिला. तिनंही बिचारीनं चांगले फोटो काढले.
नाव मधोमध आली तेव्हा मी बिस्लेरीच्या तीन बाटल्यांमध्ये गंगाजल भरलं. मध्ये तहान लागली म्हणून चुकून थोडं गंगाजल प्यायलो. नाव पुन्हा किनाऱ्याला लागली.
एक गोंडस बाळ दिसले, त्याच्या वडिलाना विचारून त्याचा फोटो घेतला.
वेळ कमी होता, पुढची ट्रेन होती. थोडं बनारस फिरलो — बऱ्यापैकी स्वच्छ होतं. साधू, भिकारी वगैरेचा काही त्रास नव्हता. वातावरण अगदी प्रसन्न होतं. गंगा आरती मात्र पाहायला मिळाली नाही. diet वर असल्याने गिठले खाद्यपदार्थ चाखले नाही.
प्रतिक्रिया
22 Apr 2025 - 5:01 pm | कंजूस
खूप छान फिरवलेत. असे फोटो लेखन नवनवीन जागेंचं टाकत राहा.
रात्रीचे घाटांचे फोटो चांगले आले आहेत.
वेळ कमी असल्याने सारनाथ राहिलंच. पण ज्ञानवापीचा काशी मंदिरासह फोटो आवडला.
22 Apr 2025 - 5:31 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद!
22 Apr 2025 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली
हो, काशीत बरच काही पाहण्यासारखे आहे हे कर्नल साहेबानी कळवले, नंतर लक्षात आले की एक दिवस उशिराचे तिकीट बुक करायला हवे होते, कर्नल साहेबानी दिलेली यादी. इथे संग्रही राहील.
अकबराचा किल्ला बघा.
डोंबराजाचा आशिर्वाद घेऊन या.
दशाश्वमेध,मनकर्णीका,अहिल्याबाई होळकर असे एकुण अस्सी घाट आहेत.
वेणीदान, पिंडदान,स्वताचे श्राद्ध असे अनेक इहलोकी सुख व परलोक स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुकर करून घ्या.
विश्वनाथाचे दर्शन घ्या.
ग्यानवापी बघून घ्या.
नेहरूंचे जन्म स्थान आनंद भवन बघून घ्या.
तुलसीचौरा भेट द्या.
कबीरांना त्यांचे गुरू रामानंद भेटले तो घाट बघा.
तुलसीदास मंदिर व संपुर्ण रामायण संग्रहालय, कृष्ण संग्रहालय बघून घ्या.
बनारस विद्यापीठ
जवळच सारनाथ बोधवाक्य आणी स्तुप बघून घ्या.
बेडमी पुरी भाजी जरूर खा.
बनारसी पान,मलाई पान चव घ्या.लस्सी,चाट खाऊन वजा.
आमच्या सुनबाईंना बनारसी सिल्क साडी जरूर आणा.
किती लिहू.....
जाऊ देत जेव्हढे दिसेल तेव्हढे बघून,खाऊन घ्या.
बाकी काही केले नाही तरी गंगाजल जरूर भरून आणा. बरेच लोकांच्या कामाला येईल.
मी पाच लिटर दोन हजार चार मधे भरून आणले होते. आतापर्यंत आर्धे झाले आहे.
22 Apr 2025 - 5:51 pm | चित्रगुप्त
प्रवासवर्णन आणि फोटो खूपच छान. असेच फिरत रहा आणि लिहीत रहा. शुभेच्छा.
अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा त्यांच्या राज्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण भारतभर हजारो मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या.
-- अहिल्याबाईंनी बांधलेली महत्त्वाची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील बांधकामे:
१. काशी (वाराणसी):
काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली केला.त्यांनी मंदिराभोवती घाट, धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी विश्रामस्थळे बांधली.वाराणसीतील गंगेवर 'अहिल्याघाट' आजही त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे.
२. प्रयाग (अलाहाबाद):
संगमाजवळ घाट व यात्रेकरूंकरिता धर्मशाळा त्यांनी उभारली. कुंभमेळ्याच्या वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले.
३. रामेश्वर (तामिळनाडू):
रामेश्वरम मंदिरातील मुख्य मंडपाचे (गाभाऱ्याचे) पुनर्निर्माण त्यांनी केले.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व विहिरींची सोय केली.
४. द्वारका (गुजरात):
द्वारकाधीश मंदिराचे संरक्षण, मरम्मत आणि सौंदर्यीकरण.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व अन्नछत्र.
५. बद्रीनाथ व गंगोत्री (उत्तराखंड):
दुर्गम ठिकाणी असूनसुद्धा, त्यांनी धार्मिक यात्रांसाठी सुरक्षित घाट व विश्रांतीस्थळे उभारली.पाणी व अन्नाची सोय यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली.
६. अयोध्या:
श्रीराम मंदिर परिसरात घाट व पूजास्थळांचे जिर्णोद्धार. अयोध्येतील मंदिरांना आर्थिक व स्थापत्य सहाय्य.
महाराष्ट्रातील कार्य:
७. पंढरपूर (विठोबा मंदिर):
पंढरपूर येथे घाटांचे बांधकाम व यात्रेकरूंना धर्मशाळांची सुविधा. विठोबा मंदिर परिसरात विहिरी व पाण्याची सोय.
८. नाशिक (गोदावरी किनारा):
पंचवटी परिसर: रामघाट, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि श्रीराम मंदिर यांसारखी बांधकामे केली. त्र्यंबकेश्वर: कुशावर्त घाटावर पूल बांधला. गोदावरी नदीच्या काठी घाट व स्नानस्थळांचे बांधकाम. कुंभमेळ्यासाठी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा.
९. उज्जैन (महाकाल मंदिर):
महाकालेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार. अहिल्याबाई स्वतः उज्जैनमध्ये काही काळ राहिल्या होत्या आणि तेथे अनेक शैव मंदिरांचे पुनर्बांधणी केली.
१०. पुणे आणि इतर ठिकाणी:
पुण्यात काही धर्मशाळा व सार्वजनिक विहिरी.सामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वास्तविक सामाजिक गरजा पूर्ण करणारी बांधकामे.
इतर सामाजिक बांधकामे:
१०० पेक्षा जास्त विहिरी, तलाव आणि जलाशय त्यांनी बांधले जेव्हा दुष्काळ पडत असे. अनेक गावांमध्ये जलव्यवस्था आणि अन्नछत्र चालवली. स्त्रियांसाठी सुरक्षित स्नानस्थळे व विश्रांतीगृहे.
अहिल्याबाईंच्या बांधकामाचा एक खास नमुना म्हणजे त्यांनी कुठेही फक्त मूर्ती नव्हे तर संपूर्ण मंदिर संकुल, त्याच्या आजूबाजूच्या परिसरासहित उभारले. त्यांनी वास्तुशास्त्र व धार्मिक गरजा यांचा मिलाफ साधला.
अहिल्याबाई होळकर यांच्या या कार्यांमुळे त्यांना "पुण्यश्लोक" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बांधकामांचा वारसा आजही भारतभर पाहायला मिळतो.
22 Apr 2025 - 8:56 pm | अमरेंद्र बाहुबली
खरोखर अहिल्याबाई होळकर दैवी स्त्री होत्या, सोरटी सोमनाथ पासून ते रामेश्वरचे मंदिर, प्रत्येक धर्मिक स्थळी अहिल्याबाईंनी सढळ हाताने मदत करून मंदिरे, घाट बांधले आहेत.
अहिल्याबाईना मी मनापासून वंदन करतो! _/\_
22 Apr 2025 - 6:58 pm | कर्नलतपस्वी
फोटो आवडले.
पहिली वारी १९८४, दुसरी वारी १९८८.
तिसरी वारी होते का बघावे लागेल.
बाबरी मशिदीचा मुळ ढांचा, मग समतल जमिन असे बघावयास मिळाले. आता मंदिर बघावयास हवे.
बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही.
आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते.
हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे.
त्यामुळे आपली तक्रार निकाली काढण्यात आली आहे.
सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे.
काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही.
लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात.
उत्तर भारतातील नावाडी मराठीत बोलताना दिसले या मुळे हिन्दी आंदोलन सौम्य होणार काय? (ह.घ्या.)
लेख आवडला.
22 Apr 2025 - 9:06 pm | अमरेंद्र बाहुबली
तटस्थ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार कर्नलसाहेब!
बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही.
खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली.
आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते.
सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे.
हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे.
बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात.सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे.
मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल.
काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही.
ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :(
लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात.
नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.
22 Apr 2025 - 9:42 pm | कर्नलतपस्वी
शंभर टक्के सहमत.
१९८४ मधे दशाश्वमेध घाटावरून विश्वनाथ मंदिराकडे येताना वाटत होते की गटारातून चालतोय.
22 Apr 2025 - 9:58 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे रे , गंगेचे हे हाल कल्पना करुनच कसेतरी वाटते. तरीही कर्नल साहेब एक यात्रा काढाच! रेल्वेने २४ तासात पोहोचाल. घाट मंदिर फिरून या. सौंदर्य टिपून या.
23 Apr 2025 - 8:16 am | माहितगार
मागच्या एका उन्हाळ्यात माझ्या चुलत भावासोबत मप्र ग्वाल्हेर आग्रा उप्र मथुरा वृंदावन झाले. माझ्या भावाला भाजपा बद्दल बर्यापैकी आदर आहे. मथुरेपेक्षा वृंदावन मधील अस्वच्छता त्याच्याही डोक्यात गेली. हेमामालिनीने इतक्या वर्षात काय केले असा स्वाभाविक प्रश्न त्याने व्यक्त करुन दाखवला.
ग्वाल्हेर मधल्या ईमारती देखण्या आहेत पण जुन्या ग्वाल्हेर मध्ये अस्वच्छता बरीच आहे. तेथिल खूपच कचोरी आणि गुलाबजाम स्थानिकांमध्ये खूपच लोकप्रीय आहेत. आपल्याकडेही माश्यांकडे दुर्लक्ष केले जाते पण उत्तरेत बाहेर अस्वच्छेतेसोबत माश्यांचे मोठे प्रमाण भयंकर समीकरण वाटले. परकीय लोक भारतात ट्रीप मारली की पोट बिघडते अशी तक्रार करतात तसे बाहेरचे कमीत कमी खाऊन माझी ओव्हर ऑल इम्युनिटी बरी असूनही पोट बिघडले होते. बाहुबलींनी खाण्याबद्दल काही तक्रार केली नाही म्हणजे त्यांच्या जठराच्या बाहुबलीत्वाला आदर आणि माझी नजर ना लागो हि शुभेच्छा.
23 Apr 2025 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद माहितगार साहेब, खरे तर माझे जठर खरोखर ताकदवान आहे, काहीही पचवून घेते नी त्रासही होत नाही. बाकी मी सध्या डायटवर आहे. बाहेरचे पदार्थ पूर्णत वर्ज्य. जेवणात मो चांगले स्वच्छ टापटीप हॉटेल पाहून फक्त दोन मिस्सी रोट्या खाल्ल्या, तसेच दशाश्वमेध घाटाजवळच अतिशय स्वच्छ असे उडुपी होटल आहे तिथे नाश्ता केला. त्यामुळे बाहेर जेवणाचा संबंध फार कमी आला.
22 Apr 2025 - 7:06 pm | अनन्त्_यात्री
गोंडस बाळाचं प्रचि आवडलं
22 Apr 2025 - 9:08 pm | अमरेंद्र बाहुबली
खरोखर, अतिशय गोंडस बाळ होते ते! तरीही मला नाय फोटो घ्यायला जमले नाही.
22 Apr 2025 - 9:30 pm | रात्रीचे चांदणे
चांगलं लिहिलंय.
जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती
कारण माहिती नाही पण ही असली मंदिर आवडतच नाहीत. एकतर ती मंदिर वाटतच नाहीत. कदाचित पंढरपूर, तुळजापूर सारखी बघण्यात आली म्हणून आवडत नसतील.
22 Apr 2025 - 9:57 pm | अमरेंद्र बाहुबली
बरोबर! दगडी बांधकामाच्या मंदिरातील सौंदर्य नी थंडावा ह्या असल्या मंदिरात आजीबात जाणवत नाही. ना तिथे भाव जागृत होतो ना भक्ती. संगमरवरी दगडात जर देवाची मूर्ती असेल तर मग तर मंदिरातून पळू पळू वाटू लागते.
23 Apr 2025 - 5:46 am | कर्नलतपस्वी
तसे नव्हते म्हणायचे.
गंगा तेव्हां सुद्धा इतकीच स्वच्छ व सुंदर होती. एक रस्ता जो घाटावरून मंदिराकडे यायचा तो खुपच चिंचोळा,दोन्ही बाजुला गलिच्छ दुकाने व कचऱ्याचे ढीग होते. दुर्गंधी व घराघरातून येणाऱे घाण पाणी वाहत होते.
23 Apr 2025 - 10:12 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा! धन्यवाद.
23 Apr 2025 - 8:37 am | Bhakti
सुंदर लिहिलंय!
बाळ खुपच गोंडस आहे.मंदिर आणि मस्जिद किती परिणामकारक फोटो आहे,स्तब्ध!
ॐ श्री काशी विश्वेश्वराय नमः। काश्यां हि काशीति पुरं प्रसिद्धं, सर्वपापक्षयं नृणां स्यात् सदा। यत्र शिवः साक्षात् विराजते, तस्मै नमः काश्यां निवासिने।।
ते घाट,काशी विश्वेश्वर पाहायची खुप इच्छा आहे.
23 Apr 2025 - 10:13 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद ताई!
23 Apr 2025 - 2:05 pm | श्वेता२४
अतिशय जिवंत वर्णन शैली आहे तुमची!!! फोटो सुद्धा खूप सुंदर आले आहेत... डायट मुळे तुम्ही तिथे काही खाल्ले नाहीत असे लिहिले असले तरी वाराणसी हे तेथील विविध उत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे .मी भविष्यात काशीला जाणार आहे त्यावेळी तेथील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे यावरही माझा विशेष भर असणार आहे.... बघूया कधी योग येतोय....
23 Apr 2025 - 2:06 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद श्वेता! काशीला नक्की जा! फक्त भक्ती म्हणून नाही तर पर्यटनस्थळ म्हणूनही काशी सुंदर आहे!
23 Apr 2025 - 4:07 pm | विअर्ड विक्स
वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष)
असो. आपण वर्णन केलेली स्थळे मी लखनौ ला राहत असताना ३वेळेस पाहिलेली आहेत. त्यामुळे थोडे अधिकारवाणीने पुढील गोष्टी सांगतोय
१. भर उन्हाळयात उत्तर प्रदेशातील कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यास उन्हाचा भयंकर त्रास होतो, यांत पूर्वांचलचे उन थोडे जरा जास्तच भाजून काढते. केल्याने पर्यटन, रामजन्म प्रहरी आपला दर्शनयोग होता असे समजून गोड मानणे.
२. अयोध्येला जाऊन मंदिराच्या भव्यतेवर व सुरक्षा व्यवस्थेवर आपले वर्णन वाचले. हनुमान गांधी, सीता कि रसोई , इत्यादी पाहणे गरजेचे आहे. पण आजकाल ज्याप्रमाणे लालबागच्या राजामुळे त्या परिसरातील इतर गणपती दर्शनाची लोकानां तेवढी उत्सुकता राहत नाही, तसेच काहीसे या ठिकाणांचे झाले आहे.मंदिराच्या उंचीसाठी हनुमान गढीची उंची रेफेरेंस पॉईंट आहे, गढी चे दर्शन घेतले असते तर मुद्दा कळला असता, असो. मंदिराआधी तंबूतले राम पाहण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी व्हायची. त्यावेळेस मोबाइल व तत्सम वस्तू फार लांब ठेवाव्या लागत, तंबूत ३ स्तरीय सुरक्षा होती. ती अनुभवली असती तर त्यावर वैतागून आपण एक वेगळा लेख लिहिला असता. माझ्यावेळेस दर्शनासाठी इतका वेळ मोडला कि माझ्या ड्रायव्हरला मला काही बरे वाईट झाले असे वाटल्याने तो सगळीकडे मला शोधू लागला, नशीब गाडी घेऊन परत नाही गेला :). माझा ड्राइवर हा गोरखपूरचाच होता. शरयू नदीकाठी बांध बांधून उदंचन केंद्राद्वारे एक कृत्रिम घाट बनवलेला आहे. येथे जाऊन स्नान केले कि सर्व थकवा जातो.
३. मी गाडी गोरखपूरहून घेऊन गेलो होतो. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती.
४. वाराणसी - आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . मी स्वतः पर्यावरण अभियंता असल्याने अधिकरवाणीने सांगतोय. संकटमोचन मंदिर हे कालभैरव मंदिरापेक्षा भव्य आहे . कालभैरव मंदिर कॉरिडॉरचे काम मी गेलो असताना चालू होते , आता पूर्ण झाले असल्यास भव्यता जाणवेल. विशवनाथ मंदिर दर्शन आणि IIT BHU काशी विशवनाथ ह्याबद्दल माहिती घेऊन IIT BHU मंदिर जरूर पाहण्यासारखे आहे.
बाकी एकूण ८४ घाट आहेत, संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी.
५. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.
23 Apr 2025 - 4:37 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल आभार.
वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष)
खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की.
गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती.
मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे.
आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता.
ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता.
वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे .
धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले.संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी.
वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार.
गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.
पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.