पाच वर्षांपूर्वीचा (भाग १): लॉकडाऊन: तेविसावा दिवस
ती:
परवा आमच्या थोरलीचा १८ वा वाढदिवस झाला. आम्ही तिला कारची चावी वाढदिवसाची भेट म्हणून दिली. मिळालेल्या surprise ने तिच्या चेहऱ्यावर जे भाव उमलले ते पाहून तिचा पाच वर्षांपूर्वीचा वाढदिवस झर्र्कन डोळ्यासमोरून तरळून गेला. तेंव्हा लॉक डाउन सुरु होते आणि घरी बनविलेल्या केकवर वाढदिवस साजरा झाला होता.
पण आता काळ बदललाय. काळाबरोबर खूप काही बदललंय. एकेकाळी तिला दोन वेण्या पाडून द्यायला मी लागायची, आज ती मला हेअर स्टाइल सुचवते. धाकटीची बडबडही कमी झालीय. दोघीही उंच झाल्यात, पण केवळ शरीरानेच नाही; सगळ्याच बाबतीत. दोघींची स्वतंत्र विश्वे निर्माण झालीयत. आजकाल त्या आता फारसे प्रश्न काही विचारात नाहीत. थोडं कमीच बोलतात. बोलताना माझ्या चुका सुधारून देतात, सल्ले देतात. आम्हाला कळू नये म्हणून स्पॅनिशमध्ये बोलतात. दोघीही खूपच बदलल्यात.
पण मला वाटतं, मीही बदललीय.
एक आई म्हणून, त्यांचे संगोपन करण्यात, बुटांचे लेस बांधून देण्यात, बॅडमिंटनची रॅकेट काढून देण्यात, चार वाजता कांदे-टोमॅटोचे मुरमुरे करून देण्यात… असंख्य गोष्टी शिकवण्यात वर्षे निघून जातात. एक दिवशी लक्षात येतं, त्या आता खूप पुढे निघाल्यात. मागच्या सीटवर बसून मोठ्ठे डोळे करून खिडकीबाहेर पाहणाऱ्या त्या आता स्वतः ड्रायविंग सीटवर बसू लागल्यात. त्यांची कार हायवेवर गेल्यावर त्यात मी नसेन. माझ्या कारमध्ये तरी माझी आई फारशी कुठे असते?
आईपण हे काही केवळ मुलांना जन्म देणं एवढंच असतं का? त्यावेळची प्रसूतिवेदना आणि, मुले माझ्या विश्वातून बाहेर पडलीत, माझ्यात काहीसा रितेपणा आलाय, ही आजची भावना यात काही फरक आहे का?
त्या:
ओके, सरळच सांगते. २०२० मध्ये जर मला कुणी सांगितलं असतं की पाच वर्षानंतर मी कॉलेजात कोडिंग करत असेन, कार शिकत असेन, माझ्या लॅपटॉपवर तासन्तास टाइमपास करत असेन तर आइ वोन्ट हॅव बिलीव्हड इन दॅट रबिश! तेंव्हा बाबा आम्हाला जावा शिकवण्याचा ट्राय करायचा. आम्हाला काही कळायचं नाही, बिकॉज बाबाच्या जावापेक्षा आईचे मुरमुरे जास्त इंटरेस्टिंग असायचे.
वेल, बॅक टू प्रेझेन्ट, तेंव्हा पेक्षा सगळं किती बदललंय. किती फास्ट झालंय. आमचे एचओडी टू मच सिलॅबस देतात. सो मेनी असाइन्मेंट्स करायला सांगतात. वेळ पुरतंच नाही. परवा आमचा फेस्ट झाला. आमच्या ग्रुपने खूप धम्माल केली. जाम मजा आली. रात्री अकराला मी घरी आली. आई कितीदा तरी फोन करत होती. बाबा कितीदा तरी माझे लोकेशन चेक करत होता. एवढं काय असतं त्यांना माझं?
कॉलेजात आम्हाला पायथन कोडिंग शिकवतात, घरी बाबा कार शिकवतो. पण मला तर नं, पॅरलल पार्किंग पेक्षा पायथन स्क्रिप्ट सोपी वाटते! पण मी दोन्ही शिकणार आहे. मी सगळंच शिकणार आहे. स्पॅनिशही शिकली आहे. कुकिंग तर मी शिकलीच आहे. यूएसला गेल्यावर तिथं सगळं माझं मला ओनवरच करावं लागेल ना?
मी:
पाच वर्षांपूर्वी काळ जणू काही थांबला होता. वर्तमान पत्रांच्या बातम्यांतच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात. यथासांग देवपूजा करणं, किचनमध्ये वरण फोडणी टाकणं, हिच्याशी गप्पा मारणं, त्यांना काहीतरी शिकवणं, गरज नसली तरी घरात काहीतरी दुरस्ती करणं, गाणी गुणगुणणं… सर्व काही हळुवार संथ होत होतं. त्या क्षणांना ओळख नव्हती, पण आत्मीयता होती.
दिवसांमागुन दिवस जात होते. जीवन थांबलंय म्हणून ते पुन्हा सुरु होण्याची आम्ही वाट पाहत होतो. जीवन मात्र तिथेच, कदाचित आम्हीच नव्याने सुरुवात करण्याची वाट पाहत होतं.
आता मात्र आयुष्याचा वेग वाढलाय. माझी कन्सल्टिंग वाढलीय. नवनवीन टूल्स, टेकनॉलॉजिज शिकण्यात काहीशी दमछाक होतेय हे खरं पण भविष्याबद्दल आता अनिश्चितता वाटत नाही. ‘पुढचा हरी पुढे’ हेच खरं समाधानी राहण्याचं तत्वज्ञान आहे, नाही का?
लॉकडाउन बद्धल आजकाल कुणी बोलत नाही. सर्वजण विसरलेत म्हणून नाही; आयुष्यच अलगदपणे पुढे गेलंय.
लॉकडाउनचा तो तेवीसावा दिवस होता. आज १८५०वा दिवस आहे. पाच वर्षांत जग खूप बदललंय,
त्या दिवसांनी कदाचित फारसं काही दिलं नसेल, पण 'थांबणं' शिकवलं. गर्दीत असूनही स्वतःशी संवाद साधण्याचं, स्वतःलाच समजून घेण्याचं भान दिलं. नुसतंच मोकळं बसून राहून काहीही न करणं… यांमध्ये खरंच किती मोठा आनंद आहे याची कायम टिकणारी जाणीव करून दिली. आत कुठेतरी त्या थांबलेल्या काळाची आठवण अजूनही जिवंत आहे – एखाद्या शांत सुरावटीसारखी.
प्रतिक्रिया
16 Apr 2025 - 10:37 pm | मुक्त विहारि
हेच सत्य..