लॉकडाऊन: तेविसावा दिवस

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
16 Apr 2020 - 1:43 am
गाभा: 

मी
डिसेंबर पासून एका कंपनीचे काम External Consultant म्हणून करणं सुरू आहे. त्यांची २० मार्चपासून लॉकडाउनमुळं घरून काम करण्याची सूचना मिळाली. त्यांच्या ऑफिसात जायचो तेव्हा विशेष काही काम नसायचं.आता घरून काम करताना मात्र कितीतरी कसली-कसली कामं देताहेत. अर्थात, त्यातली कोणती करायची आणि कोणती टाळायची याचं गणित ज्याचं त्याला माहित असतंच!

पूर्णवेळ नोकरी सोडून पाचेक वर्षे झाली तेव्हापासून वर्षातून आठेक महिने काम करतोय. एप्रिल-मे महिन्यात शक्यतो काम करण्याचं टाळतो, ते उद्दिष्ट आता (घरून काम करत असल्याने) एका अर्थाने पूर्ण होत आहे. सध्याची वर्क-ऑर्डर सप्टेंबर पर्यंतची आहे. भविष्याबद्दल काहीशी अनिश्चितता वाटते आहे खरी पण, सध्या तरी ठीक चालू आहे ना मग जाऊ दे, पुढचा हरी पुढे असंही मन म्हणतंय.

घरून काम म्हणजे घोरून काम असा सुरुवातीला बेत होता, पण काही कारणांनी हळूहळू तो बदलला! दिवसभरात सध्या बराच मोकळा वेळ मिळतोय. तिच्याशी तासंतास गप्पा मारणं, नवनवीन पाककृती (आणि अनेकदा रोजचा स्वयंपाक) करणं, वाचन करणं, अधूनमधून सायकलिंग करणं, पहायचे राहून गेलेले सिनेमे पाहणं, मुलींना काहीतरी शिकवणं आणि त्यांच्याकडून ते implement करून घेणं, घरातील किरकोळ दुरुस्ती करणं, साग्रसंगीत देवपूजा करणं, नुसतंच मोकळं बसून राहून काहीही न करणं… यांमध्ये खरंच किती मोठा आनंद आहे याची जाणीव होतेय.
...

ती
सध्याच्या लॉकडाऊनमुळं दहा वर्षांपूर्वीच्या हैदराबादेतील संचारबंदीची आठवण झाली. तेंव्हा आम्ही जुन्या शहरात राहायचो. ३१ मार्च २०१० ला आमच्या मोठीचा तिसरा वाढदिवस होता. तिच्या मित्र मैत्रिणींना बोलावून, केक कापून, फुगे फोडून वाढदिवस साजरा करायचा असा तिचा हट्ट होता पण संचारबंदीमुळे केक वगैरे मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. त्यावेळी एका (स्थानिक नेता असलेल्या) शेजारी मित्राने, भर कर्फ्यूत शहरात जाऊन भारी केक आणून मुलीचा हट्ट पुरवला होता. अर्थात ते दहा वर्षांपूर्वीचं ओल्ड सिटी नावाचा खेडं होतं! यावेळी मात्र लॉकडाउनमुळं,(आणि कदाचित, आम्ही ओल्ड सिटी सोडल्यामुळं) ३१ मार्च २०२० ला बाहेरून केक वगैरे मागवणं काही जमलं नाही. ३१ मार्च २०३० ला असंच काही होईल का?

लॉकडाउनमुळं, उपलब्ध असलेल्या सामग्री नुसार काहीतरी नवे-जुने खाद्यपदार्थ आम्ही सामूहिक रीतीने करतोय. म्हणजे, कुणी कांदा चिरतंय, कुणी साहित्य काढून देतेय, कुणी गॅस पेटवतंय, कुणी फोटो काढतंय, कुणी सगळं झाल्यावर आवराआवर करतंय…

घरून काम करत असल्यामुळे सध्या त्याची किचनमध्ये घुसखोरी फारच वाढलीय. नाहीतरी, सुरुवातीपासूनच त्याचं, “Cooking and coding is same” हे मत आहेच म्हणा. रोज काही ना काहीतरी करतोय. आणि एकटा नाही, दोन्ही मुलींना घेऊन.

मी अगदी result-oriented आहे आणि तो मात्र फारच process-oriented. मला, किचनमध्ये असताना, मी एकटीच हवी असते. पूर्वी जॉब करत असताना, चारसहा जणांचा - भाजी, पोळी, वरण, भात, तोंडीलावणं असा स्वयंपाक करून मी अर्ध्या तासात किचनमधून बाहेर पडायचे. त्याला मात्र कुठला पदार्थ करायची तयारी करायलाच तासभर तरी लागतो. आधी तो दोन्ही मुलींना बोलावणार, (मलाही सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार), पूर्ण प्लान समजावून सांगणार, काम वाटप करून देणार, मुलींना जे करता येत नाही ते तिथल्या तिथेच शिकवणार, सगळी जमवाजमव झाल्यावर गॅस पेटवणार, मग केव्हातरी तासाभरानंतर तो पदार्थ टेबलावर येणार, त्यानंतर मग सगळे फोटो काढणार. त्या सगळ्यांमध्ये दोन-तीन तास तरी जाणार. मीन राशीच्या लोकांचा स्वभावच थोडासा मिनमिन करणारा असा असतो का?

खरंतर, आजवरच्या आयुष्यात आम्ही दोघांनीही, विशेषतः त्यानं, कुठलीच गोष्ट फार गांभीर्यानं म्हणून कधी केलीच नाही. जे केलं ते - सध्या मज्जा वाटतीय ना मग ठीकै, बाकी पुढचं पुढे, अश्याच विचारानं. म्हणूनच की काय, त्याला पहिल्यांदा भेटून पंधरा वर्षे झालीत असं वाटतंच नाही. पण, मुलींना घरकाम, किचनकाम, बाजारकाम, ड्रॉईंग, पेंटिंग इत्यादीतलं जे कळतं, ते काही अंशी त्याच्यामुळेच.
...

त्या
१३ मार्चला आमचा रिझल्ट आला. मी सिक्स्थ मध्ये गेले आणि दीदी नाईन्थमध्ये गेली. आमची शाळा १६ मार्चला स्टार्ट होणार होती पण लॉकडाउनमुळे नाही झाली. घरी राहिल्याने कधी-कधी बोअर वाटतंय पण आई-बाबा आणि दीदीच्यासोबत मज्जा येतीय.

परवा आई-बाबांनी आम्हाला अष्टा-चम्मा नावाचा गेम शिकवला. ते लहानपणी खूप खेळायचे म्हणे. खूपच इंटरेस्टिंग गेम आहे तो. मी तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच तो गेम शिकले. अष्टा-चम्मामध्ये तोडी करायला, आणि हसू नका, पण संडास बांधायला वगैरे खूप मजा येते. कधी कधी आम्ही नेम-प्लेस-ऍनिमल-थिंग खेळतो. तो गेम अधूनमधून आई आम्हाला मराठीमधून खेळायला सांगते. मी काही वेळ चीटिंग करते पण दिदीच्या लक्षात आलं तर ती मला मारते. आम्ही सगळे मिळून कधीकधी अंताक्षरी खेळतो.आईला तर खूप गाणे येतात आणि तिला काही गाणे तर पूर्ण म्हणता येतात. तिनं मला एक मराठी गाणं शिकवलं आहे. लास्ट वीकपासून बाबा आम्हाला जावा कोडिंग शिकवत आहेत. आतापर्यंत मी टोकन्स-इन-जावा शिकलेय. मला जावा खूप इंटरेस्टिंग वाटतंय पण अजून तेवढं काही समजत नाहीये.

सध्या बाहेर सगळंच बंद आहे म्हणे. मी तर खूप दिवसांपासून सेक्युरिटीगेटच्या बाहेरच नाही गेले. लास्ट समरमध्ये आम्ही पुण्याला गेलो होतो आणि या समरमध्ये आमचे कझिन्स हैदराबादला येणार होते, मग आम्हीपण नागपूरला जाणार होतो.

पण आम्ही कुठेच नाही गेलो, घरीच आहोत… मला वाटतं, करोना म्हणजे कर्फ्यू.
...

प्रतिक्रिया

भारी.. हा फॉरमॅट आवडला..!!

करोना म्हणजे कर्फ्यू. --- :-)

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:50 pm | वामन देशमुख

शाळेत मॅम घरात मॉम त्रास आहे.

लहान मुलं (आणि त्यांचे विचार) आपल्याला वाटतात तेवढे लहान नसतात हेच खरं !

कंजूस's picture

16 Apr 2020 - 4:44 am | कंजूस

आवडले विचार.

कुमार१'s picture

16 Apr 2020 - 9:37 am | कुमार१

प्रकटन आवडले.

प्रशांत's picture

16 Apr 2020 - 9:56 am | प्रशांत

लेख आवडला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2020 - 10:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन फॉर्मेट मस्तय आवडला. लॉक्डाऊनमुळे कोण काय काय करतंय, हे वाचतांना भारी वाटतं.
सर्वच सोबत असल्यामुळे एक चांगलं फिलींग आहे. धन्स.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2020 - 11:10 am | चौथा कोनाडा

वाह, मस्त ! आवडला, लॉकडाऊन: तेविसावा दिवस !
हा वेगळा फॉरमॅट अपिलिंग आहे !

मित्रहो's picture

16 Apr 2020 - 12:39 pm | मित्रहो

फॉर्मेट आवडला
मस्त आहे. लॉकडाउन सर्वांच्या नजरेतून
तो
काय आईबाबा सकाळी नऊ वाजता उठवतात. इतक्या सकाळी उठून काय करायचे. शाळा नाही तर घड आराम करु देत नाही. शाळेत मॅम घरात मॉम त्रास आहे.

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:51 pm | वामन देशमुख

करोना म्हणजे कर्फ्यू. --- :-)

२०१० च्या संचारबंदीची घरात अनेकदा चर्चा झाल्यानं दोघींना कर्फ्यूतलं जीवन माहित आहे.

अल्पिनिस्ते's picture

16 Apr 2020 - 1:03 pm | अल्पिनिस्ते

_/\_

चौकटराजा's picture

16 Apr 2020 - 2:07 pm | चौकटराजा

हा तुमचा फॉरमॅट आगळा वेगळा आहे. अगदी असाच अच्युत बर्वे यांची कादंबरी " कॅलिडिओस्कॉप " मध्ये त्यांनी वापरला होता. मला वाटते काही कादंबऱ्यात नारायण धारप यांनीही वापरलेला आहे.

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:52 pm | वामन देशमुख

कॅलिडोस्कोप माझ्या संग्रही आहे. त्या फॉरमॅटच्या प्रेमात पडून की काय, मी अनेकदा वाचली आहे.
अर्थात, बदलतं प्रथमपुरुषी निवेदन हा लेखनप्रकार मराठीत इतरही अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांत आहे.

सुमो's picture

16 Apr 2020 - 3:42 pm | सुमो

लेखनाचा फॉरमॅट वेगळेपणामुळे आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Apr 2020 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

मजा आली वाचताना

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

16 Apr 2020 - 3:47 pm | सौ मृदुला धनंजय...

मस्त.

तुषार काळभोर's picture

16 Apr 2020 - 6:06 pm | तुषार काळभोर

फॉर्मॅट आवडला. ३१-मार्च-२०१०-२०२०-२०३० योगायोग आहे खरा! २०३० चा वाढदिवस दण्क्यात साजरा होवो, या शुभेच्छा!

सहावीत जावा कोडिंग सुरुवात ?
परवा एक मित्र म्हणत होता, पायथन वगैरे शिकून घे. मी आयटीत असलो तरी मला कोडिंगची गरज पडत नाही. काम थोडफार इन्फ्रस्ट्रक्चर अन बरंचसं अ‍ॅप्लिकेशन आहे. मित्राला म्हणालो, छे, मला काही उपयोग नाही त्याचा. पण आता वाटतंय, शिकून घ्यावं. प्रेरणेसाठी धन्यवाद!

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:53 pm | वामन देशमुख

२०३० चा वाढदिवस दणक्यात साजरा होवो, या शुभेच्छा!

धन्यवाद!

सहावीत जावा कोडिंग सुरुवात?

हो. अर्थात हे सध्यातरी लॉक डाउन पुरतं मर्यादित आहे. पण सहावीतली आणि नववीतली या दोघींनाही एकत्र शिकवतोय. आज कोडींग वगळून आणि घरगुती उदाहरणं देऊन OOP ची प्राथमिक चर्चा केली आणि ती त्यांना आवडली. (त्यांना ती चर्चा कळली असं मला वाटलं!)

आता वाटतंय, शिकून घ्यावं.

शिकून घ्याच हो. पायथनदेखील सुंदर भाषा आहे.

मोदक, NiluMP, कंजूस, कुमार१, प्रशांत, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, चौथा कोनाडा, मित्रहो, अल्पिनिस्ते, चौकटराजा, सुमो, राजेंद्र मेहेंदळे, सौ मृदुला धनंजय…, पैलवान, … सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार!

काही प्रतिक्रिया वाचून मौज वाटली.

सौंदाळा's picture

16 Apr 2020 - 8:51 pm | सौंदाळा

लेख आवडला
थोडं आष्टा चम्मा बद्दल सांगा की, मी पण खेळेन म्हणतो पोरांबरोबर

वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 7:07 am | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

17 Apr 2020 - 9:34 am | वामन देशमुख

या अ‍ॅपच्या पानावर खेळाचे नियम आहेत. ते इथे कॉपी पेस्ट करतो आहे.

आम्ही हा बोर्ड वापरतो -
अष्टा-चम्मा खेळ

दोन चिंचोके split फोडून फासे (dices) आणि काचेच्या बांगड्यांचे प्रत्येकी चार तुकडे प्यादी असं वापरा. X रकान्यात प्यादं मारता येत नाही.

खेळाचे नियमः

Champul is a board game consisting of a 5x5 grid of squares.

Number of players required to play it?
It can be played with two to four players.
Each player has four coins distinguishable from coins of other players.

How do the coins move?
Movement of coins is anti-clockwise in outer squares and is clockwise in inner squares.
Each player starts from a square marked with home symbol and tries to reach the innermost square with all the coins.
Players use four cowrie shells as a dice.
The movement of coins depends on the number obtained by throwing four cowrie shells
All possible movement numbers are 1,2,3,4,8

How to win?
Player who reaches the innermost square first, with all four coins, wins.

Is there any action element?
yes. If a player's coin lands on a square having a single coin of another player then the coin of respective player is killed and is sent back to it's respective starting point.

Any scheme for extra turns?
A player gets an another turn to play if he gets either 4 or 8 from shells
A player gets an another turn to play if he cuts a coin of another player.
Also, if a coin of some player enters the innermost square then he gets an another chance to play.

तुषार काळभोर's picture

17 Apr 2020 - 9:51 am | तुषार काळभोर

आम्ही याला चल्लास आठ म्हणतो.
आमच्या घराच्या प्रत्येक पाटाच्या खालच्या बाजूला हा बोर्ड खडू ने आखलेला आहे. :)
शिंपले किंवा फोडलेले चिंचोके वापरतो. खेळाडूंच्या सोंगट्या म्हणून वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे तुकडे.

लई भारी's picture

17 Apr 2020 - 8:23 pm | लई भारी

एवढं फॉर्मल कॉम्प्लेक्स वर्णन वाचून दचकलो ना!
प्रचंड खेळायचो लहानपणी आणि तुम्ही वापरलेले शब्द होते आमच्याकडे पण :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Apr 2020 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णन वाचून डचकलों. पण ते घर चौकानातल्या रेशा पाहून हे तर आपलं 'चंफूल' आम्ही तर लै खेळलोय. चिंचुकेची एक पांढरी बाजू म्हणजे २ घरे काळी बाजू म्हणजे एक घर....

नवाही खेळ आवडला.

-दिलीप बिरुटे

ज्योति अळवणी's picture

17 Apr 2020 - 5:43 am | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे. आवडलं

अजित पाटील's picture

21 Apr 2020 - 6:53 am | अजित पाटील

ह्या गेम बदल अधिक महिति करुन घ्यायला आवाडेल
लेख छान लिहला आहे .

गणेशा's picture

26 Apr 2020 - 6:58 pm | गणेशा

भारी लिहिले आहे आवडले...फॉरमॅट तर भारीच.

2010-11 ला 50फक्त यांनी येथे एक कादंबरी टाईप लिहिले होते, नेमके कालच त्याची आठवण झाली होती..
कारण होते एकाच गोष्टीकडे वेगवेगळे पात्र कसे रिऍक्ट होतात, आणि त्या कथेत एकाच घटनेला तो, ती कसे विचार करत होती हे आठवले आणि असे पण लिहिले पाहिजे असे वाटले...

आणि लगेच आज तुमचे हे लेखन वाचले... त्यामुळे जास्त मज्जा आली..

तुमचा युनिक नेस दिसतोय मात्र..
लिहीत रहा.. वाचत आहे ..