कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांची दिल्लीवारी – एक संस्मरणीय भेट
दिल्लीला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. राजधानीत पाऊल टाकताच, मनात एक विचार आला—मिपाकर विवेककाका पटाईत ह्यांची भेट घ्यावी! पण ते व्यस्त असतील का? संदेश वाचतील का? याची खात्री नव्हती, इंडियागेट पाहून झाल्यावर मी त्यांना मिपावर मेसेज पाठवला आणि सोबतच एक ई-मेलही केला. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्याच क्षणी काकांचा फोन आला! त्यांनी अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि “घरी नक्की ये, सोबत जेवायलाही ये!” असे प्रेमळ आमंत्रण दिले.
इतका प्रेमळ आग्रह, त्यामुळे मीही उद्या नक्की येतो असे काकांना वचन दिले. पण काम काही लवकर आटोपले नाही, त्यामुळे चार दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. दरम्यान, काकांचा फोन आणि मेसेज होता—“कधी येणार?” काकाना कळवले की वेळ कळवतो, “तुम्हाला भेटल्याशिवाय दिल्ली सोडणार नाही!” आणि आज मी त्यांच्या घरी धडक दिली.
दिल्लीतील आठवणींचा ठेवा
काकांचा फ्लॅट अतिशय सुंदर अशा इमारतींच्या समूहात आहे—प्रशस्त आणि टुमदार! त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला आपुलकीने भेट दिली. अगदी लहानग्या नातवंडांनीही प्रेमाने नमस्कार केला. मग आम्ही, मी, काका आणि काकू, तासभर अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या.
काकांनी आपल्या घरच्या बाल्कनीत एक सुंदर बगीचा फुलवला आहे—कडिपत्ता, जास्वंद आणि इतर अनेक झाडे तिथे डोलताना दिसली. त्यानंतर काकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहनसिंह यांच्यासोबतचे फोटो पाहायला मिळाले. त्यासोबतच, पीएमओमध्ये काम करताना आलेले अनुभव, तिथली कामाची पद्धत आणि अनेक मनोरंजक किस्से काकांनी सांगितले. दिल्लीतील काकांचे वास्तव्य, उपक्रम वगैरे काकानी खूप छान माहिती दिली. मी काकाना पुणे याच म्हणून सांगितले व तुम्ही आल्यावर कट्टा करूच असे वचनही दिले.
या गप्पांच्या मधल्या वेळेत, काकूंनी गरमागरम पोहे, एक कडक कॉफी आणि अप्रतिम चविष्ट अनारसे वाढले.
अखेर, मी एका थोर आणि अनुभवी मिपाकराशी भेट घेतली, त्यांच्या कुटुंबातील प्रेम आणि आत्मीयता अनुभवली, आणि त्यांच्यासोबत अनमोल चर्चा घडली. आजचा दिवस खरंच संस्मरणीय ठरला!
मिपाकर विवेककाका पटाईत यांचा हा प्रेमळ पाहुणचार आणि त्यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. अशीच मिपाकरे भेटत राहोत आणि अशाच आठवणी गोळा होत राहोत!
⸻
अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर
मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय:
१) श्रीगुरुजी - पुणे
२) गणेश गोळे - भोसरी
३) पाषाणभेद - नाशिक
४) सचिन जाधव - नाशिक
५) कुळदादा - नागपूर
६) कर्नल तपस्वी - पुणे
७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान
८) डॉ. दाते - मंचर
९) सस्नेह - इचलकरंजी
१०) दुर्गविहारी - कराड
११) प्रकाश घाटपांडे - पुणे
१२) श्री. हार्डीकर - पुणे
१३) डॉ. दातरंगे - नाशिक
१४) भक्तिताई - अहमदनगर
१५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे
१६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर
१७) गणेश पांडे - हैदराबाद
१८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे
१९) विवेक पटाईत - दिल्ली
अजून अनेक मिपाकरांना भेटायचे आहे! भविष्यात अजून नवीन भेटी होऊन अशाच आठवणी तयार होतील! :)
प्रतिक्रिया
24 Mar 2025 - 7:51 pm | प्रचेतस
ग्रेट भेट.
बरेच दिवसांत काही कट्टा झाला नाहीये, भेटूयात एखाद्या विकांती.
24 Mar 2025 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
नक्की भेटुयात! आता २० व नंबर तुमचा! :)
24 Mar 2025 - 8:53 pm | चामुंडराय
अरे व्वा, भारी !
फक्त दोघांचा कट्टा किंवा गटग छान झाला.
प्रत्येक मोठ्या शहरात शोधला तर एक तरी मिपाकर किंवा माबोकर सापडतोच.
आणि दिल्लीकर मंडळींच्या आदरातिथ्य आणि अगत्याबद्दल तर प्रश्नच नाही. दिलखुलास असतात दिल्लीकर.
वृत्तांत वाचून मजा आली.
आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.
24 Mar 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद!
आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.
अरे वा! गिनिज बुक ऑफ मिपा रेकॉर्ड मध्ये मला स्थान मिळायलाच हवे! :)24 Mar 2025 - 9:02 pm | कंजूस
भेट आवडली.
एकेकटे भेटता त्यामुळे खूप गप्पा होत असतील. आठ दहा जणांचा कट्टा झाला की तेवढ्या व्यापक गप्पा होत नाहीत.
तुम्हा दोघांकडे विषयांचा स्टॉक भरपूर असतो.
यावरून आठवलं की फार मागे पुणेकर मिपाकर घारापुरी लेणी पाहायला येणार होते. मी लॉन्च तिकिट खिडकीपाशी थांबलो होतो आणि आलेल्यांना पाठवत होतो. दोघे जण गप्पा मारत बाजूच्या कट्ट्यावर बसले होते. अंदाजाने त्यांना विचारले की मिसळपाव कट्ट्यासाठी आला आहात का? तर हो म्हणाले. ( पेठकर काका आणि दीपक कुवेत यांच्या हॉटेल चालवणे या विषयावर गप्पा होत्या.) त्यांच्याशी ओळख करून घेऊन तिथे थोडा वेळ बसलो होतो. हल्ली दोघेही दिसत नाहीत.
24 Mar 2025 - 9:21 pm | प्रचेतस
त्या घारापुरी कट्ट्याचा हा वृत्तांत
घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत
24 Mar 2025 - 9:33 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद वाचतो!
24 Mar 2025 - 9:26 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद काका! आपलीही भेट घ्यायचे मनात चालले आहे. कुठे असता?
24 Mar 2025 - 9:05 pm | अमरेंद्र बाहुबली
ग्रेट भेट,
योगायोगाने मिपाकर गणेश पांडे ह्यांची भेट झाली. झालं असकी हैदराबादेत कुठे फिरायचे असा प्लान मी काल विचारला होता. मग कर्नल साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे मी कुठेही फिरायला न जाता १० वाजेपर्यंत ताणून द्यायची ठरवले. पण सकाळी ९ पर्यंतच झोपू शकलो. आवरून ९:४५ पर्यंत हाटेलात नाश्ता करायला गेलो गणेश सरांचा व्हॉट्सअप मॅसेज होता लोकेशनसह, जवळ असेल तर भेटू. गुगल मॅप उघडलं तर काय आश्चर्य? ह्या अफाट पसरलेल्या निजामाच्या जुन्या राजधानीत गणेश साहेब माझ्यापासून अवघे २५० मीटर वर होते, काल येताना मला गेटवर कारंजे असलेली नी विद्युतरोषणाईने झगमगणारी सुंदर इमारती असलेली सोसायटी दिसली होती त्यातच गणेश सर राहत होते, मग फोनफोनी करुन नाश्ता अर्धाच सोडून निघालो कारण मिपाकर नाश्ता चहा केल्याशिवाय सोडत नाही ह्याचा मला दांडगा अनुभव आहे. गणेश पांडें गेट वर न्यायला आले होते मग त्यांची नेत्रदीपक सोसायटी पाहत घरी पोहोचलो आणी मग दीड तास गप्पात कसे गेले कळालेच नाही, योगायोगाने त्यांचे वडिलही होते हैदराबादेत असा अस्सल रांगडा मराठी पेहराव पाहून मला खूप आनंद झाला, गावाकडची माणसेच संस्कृती जपतात हे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्याशीही भरपूर गप्पा मारल्या. ते घड्याळ रिपिअरिंग ची कामे करायचे जुन्या काळात ह्यावरून मला नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप आणी आम्ही” हे पुस्तक आठवले. गणेश पांडे सरानी देखील नरेंद्र जाधवांसारखी उत्तुंग झेप घेतलीय. त्यांचा दांडगा पुस्तक संग्रहदेखील पाहिला, आजचा दिवस सार्थकी लागला, मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांच्या मिपाकरांच्या भेटी घेण्यात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
24 Mar 2025 - 10:43 pm | कर्नलतपस्वी
अबा,कुप्रसिद्ध असलात तरी प्रसिद्धच आहात. आता कु का सु ते इतरांनाच ठरवू द्यात.
मस्त वृतांत.
कुठल्याही मिपाकराची भेट ही दोन अनोळखी फौजींच्या भेटी सारखीच असते. आम्हां फौजींना ओळख लागत नाही. तसेच मिपाकरांनाही असा माझाही अनुभव आहे. फक्त कळाले की मग तो वर्षानुवर्ष ओळखीचा असल्या सारखेच वाटते.
24 Mar 2025 - 11:04 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद कर्नलसाहेब! जय हिंद!
24 Mar 2025 - 11:14 pm | सौन्दर्य
सर्व प्रथम आपणा दोघांना प्रत्यक्ष्य (फोटोत का होईना ) भेटून आनंद झाला. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यत एकाही मिपाकराला भेटू शकलो नाही. नावाला जर चेहऱ्याची जोड असली की आपुलकी जरा जास्तच वाढते असा माझा अनुभव आहे. मी अमेरिकेत ह्युस्टनला असतो पण पुढच्या वर्षी भारत भेटीला यायची इच्छा आहे, त्यावेळी मिपावर पोस्ट टाकीनच व जमेल तितक्या मिपाकरांना भेटीन.
25 Mar 2025 - 12:10 am | रामचंद्र
अमेरिकेतल्या मिपाकरांच्या किंवा माबो-ऐसीकरांच्या भेटी झाल्या असतील तर त्याबद्दलही लिहा.
25 Mar 2025 - 12:40 am | अमरेंद्र बाहुबली
अरे आणखी एक मिपाकर राहिले,
त्याना भेटलोय पण यादीत टाकायचे विसरलो.
अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर
मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय:
१) श्रीगुरुजी - पुणे
२) गणेश गोळे - भोसरी
३) पाषाणभेद - नाशिक
४) सचिन जाधव - नाशिक
५) कुळदादा - नागपूर
६) कर्नल तपस्वी - पुणे
७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान
८) डॉ. दाते - मंचर
९) सस्नेह - इचलकरंजी
१०) दुर्गविहारी - कराड
११) प्रकाश घाटपांडे - पुणे
१२) श्री. हार्डीकर - पुणे
१३) डॉ. दातरंगे - नाशिक
१४) भक्तिताई - अहमदनगर
१५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे
१६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर
१७) गणेश पांडे - हैदराबाद
१८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे
१९) विवेक पटाईत - दिल्ली
२०) तुषार कामोद, नाशिक.
ऐकून २० झाले.
25 Mar 2025 - 7:51 am | विवेकपटाईत
शाळांची सुट्टी असल्याने नातवंडे घरी आली होती. त्यामुळे पाच सहा दिवसांपासून लेपटॉप वर बसलो नव्हतो. पण मोबाइल वर आलेल्या ईमेल वर बाहुबलींचा निरोप मिळाला. त्यांचाशी संपर्क साधला. ते मेरठ इथे होते. आमच्या 22 व्या माल्याचा फ्लॅट मधून नाकाच्या रेषेत मेरठ हाइवे जास्तीस्जास्त एक किलोमीटर दूर असला तरी समोर नोयेडा अथॉरिटीचा मोठा पार्क आणि नंतर एक गाव असल्याने सहज दिसतो. सोमवारी बाहुबली साडे दहा वाजता घरी आले. त्यांची शरीर यष्टी बाहुबली सारखीच आहे. स्वभाव ही अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या जवळ वेळ कमी होता. टॅक्सी खाली थांबलेली होती. घरगुती चर्चा झाल्या. आम्ही मीपाववर असलेल्या एकाही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे काम काय असते यावर दोन किंवा चार मिनिट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौ ने पोहे केले आणि सोबत अनारसे. (सौ. आणि ला ही आवडत असल्याने आमच्या घरी अनरस्याचे पीठ सौ. करून फ्रीज मध्ये ठेवते). त्यांना घर दाखविताना मेरठ हाइवे ही दाखविण्याचा प्रयत्न केला पण वारा चालत नसल्याने आ नि आकाशातील प्रदूषण मुळे स्पष्ट दिसला नाही. आज तर प्रदूषण आणिक जास्त आहे. पण बाहुबली समोर प्रदूषणाचा उल्लेख केला नाही. तसे ही एनसीआर मध्ये पावसाळा आणि संक्रांती ते होळी वारे चालतात फक्त तेंव्हाच प्रदूषण कमी असते. उन्हाळ्यात जेंव्हा लू चालते तेंव्हा वार्या सोबत धूळ ही भरपूर असते. त्या मुळे प्रदूषण ही भरपूर असते.
बाकी अर्धा-पाऊण तास घरी थांबले असले तरी त्यांची दिल्ली भेटीची आठवण नेहमीच राहील.
26 Mar 2025 - 9:11 pm | सस्नेह
वाह.. पटाईत काका जुने अन जाणते मिपाकर !
वृत्तांत छान रसभरीत वर्णन..
स्नेहा
26 Mar 2025 - 9:14 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद ताई!
27 Mar 2025 - 10:07 pm | जुइ
विवेकपटाईत काका आणि तुमच्या भेटीचे वर्णन छान! तुम्ही आवर्जून मिपाकराना भेटत राहतात याचे कौतुक वाटते!.
27 Mar 2025 - 10:10 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद जुई! :)
28 Mar 2025 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पटाईट साहेब दिसायला भारी आहेत. चेहरा पट्टीवरुन माणूस चांगला, गोड वगैरे आणि प्रेमळ वगैरे वाटतात, तसे असतीलही. आता विचार आणि दळणाच्या बाबतीत थोडं गाय,गोबर, कबर वगैरे आहेत पण एवढं तेवढं चालायचंच. आबा आणि पटाईट हे जालावर विचारांच्या बाबतीत एकदम शेवटची टोकं असे असूनही भेटी-गाठी झाल्या, चहा-पान झालं. हे पाहुन वाचून छान आणि आनंद वाटला. मिपा संस्थापक तात्या म्हणायचा आमचं भांडण आचा-याशी त्याच्या जिल्बीशी नाही.
-दिलीप बिरुटे
28 Mar 2025 - 8:36 am | अमरेंद्र बाहुबली
हाहा. बरोबर!
28 Mar 2025 - 2:02 pm | चौथा कोनाडा
"पटाईट " असं वाचून खुर्चीतच टाईट होऊन बसलो.
प-टाईट असं लिहून काय स्लेष साधला आहे कोण जाणे !
टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
:-)
28 Mar 2025 - 6:21 pm | कानडाऊ योगेशु
ट चा अनुप्रासिक वापर पाहुन मी चुकुन वरील वाक्य
टेक इट हलकटली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
असे वाचले.!
28 Mar 2025 - 9:36 pm | चौथा कोनाडा
हलकटली !!!
28 Mar 2025 - 4:44 pm | विवेकपटाईत
तुलसीदास म्हणतात "जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखि तीन तैसी"। ज्याच्या डोक्यात जे भरलेले असेल तेच दिसणार.