ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे.
मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात. त्यात मुख्यत्वे आहेत इंद्र आणि चंद्र!
सोमनाथ इथल्या कथेचा नायक आहे चंद्र. चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ह्या सगळ्या जणी म्हणजे नक्षत्रासारख्या होत्या, खरं म्हणजे नक्षत्रच. तर त्यांचे वडील म्हणजे दक्ष राजा ह्यांनी लग्न लावताना असं वचन घेतलं होतं की चंद्र ह्या सगळ्यांवर सारखंच प्रेम करेल, दुजाभाव (इथे हा शब्द वापरता येईल की नाही, शंकाच आहे). करणार नाही. पण असं काही झालं नाही. लग्नानंतर चंद्राच प्रेम फक्त रोहिणी वर दिसायला लागलं. बाकी 26 झाल्या नावडत्या! मग काय त्या गेल्या पित्याकडे आणि केली तक्रार नवऱ्याची. संख्याबळ जास्त असल्यामुळे दक्ष राजाला दखल घ्यावीच लागली. त्याने जावयाला समजावून सांगितलं, वचनाची आठवण करून दिली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. सासऱ्याने जावयाला शाप दिला की तुझी ओळख, तुझं वैशिष्ट्य असलेलं तुझं हे तेज नष्ट होऊन जाईल!
हा शाप भयंकरच होता. पण शब्द निघून गेले होते. चंद्राचे डोळे खाडकन उघडले. आता काय? चंद्र गेला ब्रम्ह देवाकडे. ब्रम्हदेव एकदम हुशार, ते काही ह्या सासरा जावयाच्या भानगडीत पडले नाही आणि त्यांनी ही तक्रार redirect केली महादेवाकडे. पण चंद्राला काहीतरी धीर द्यावा म्हणून सांगितलं की बाबा एक काम कर, पाटणला जा, तिथं सरस्वती नदी आहे त्यात स्नान कर आणि महादेवाला शरण जा. चंद्राने पडत्या फळाची आज्ञा प्रमाण ह्या न्यायाने लगेच सांगितलं तसं केलं. आता तसं बघायला गेलं तर हे दोघे साडू. त्यामुळे महादेवाला लक्ष घालावंच लागलं. त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!
ह्यानंतर मात्र चंद्राने खुश होऊन महादेवाचं सुंदर असं देऊळ सोन्यात बांधलं. महादेवाने सोमनाथ असं नाव धारण करून तिथेच राहण्याचा वर दिला. चंद्राला त्याच तेज इथे परत मिळालं म्हणून त्या क्षेत्राला प्रभास असं नाव पडलं.
इथून पुढे ह्या सगळ्या क्षेत्राचं महत्व वाढतच गेलं. श्रीकृष्णाच्या आयुष्यात असणारी स्यमंतक मण्याची गोष्ट सुद्धा इथेच घडली. जांबुवंतासोबत इथेच ती प्रसिद्ध fight होऊन सत्यभामेशी लग्न झालं. मुख्य म्हणजे चंद्राप्रमाणेच श्रीकृष्णाला सुद्धा दोष मुक्ती सोमनाथानेच दिली. श्रीकृष्णाची अवतार समाप्ती ह्याच ठिकाणी झाली आहे. मंदिरापासून जवळच असणाऱ्या भालका तीर्थ इथे पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाच्या नर देहाची इथे सांगता झाली.
चंद्रानंतर रावणाने हे मंदिर चांदीत बांधले होते आणि त्यानंतर श्रीकृष्णाने सुंदर असं लाकडी मंदिर बांधलं होतं.
वचनाला जागत सोमनाथ इथे राहून त्यांच्या भक्तांना दोषमुक्त करतात. ह्या स्थानाचं महत्व इतकं जास्त आहे की, सोमनाथच्या दर्शनमात्रे दोषमुक्ती मिळते, वेगळं काहीही करायची आवश्यकता नाही.
अशी ही सोमनाथ क्षेत्राची कहाणी सुफळ संपूर्ण!
प्रतिक्रिया
12 Feb 2025 - 3:28 pm | चित्रगुप्त
या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.
12 Feb 2025 - 4:22 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
12 Feb 2025 - 4:30 pm | मुक्त विहारि
चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे).
----
मग ह्याच न्यायाने, अकबर या मुस्लिम राजाला पण हिंदू धर्मियांनी देव मानायचे का?
--------
हिंदू सोशिक आहेत , म्हणून काहीही लिहायचे का?
12 Feb 2025 - 5:59 pm | kool.amol
तुमच्या ह्या कमेंटला काय उत्तर द्यावे हे खरेच समजत नाहीय, कारण तुम्ही जो संबंध लावला आहे तो जबरदस्त आहे. माझ्या मनात हे लॉजिक दूर दूर पर्यंत आले नव्हते. ती वाक्य काढून टाकतोय. धन्यवाद!
12 Feb 2025 - 6:18 pm | प्रचेतस
प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती.
अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले।
स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥
ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे.
ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे.
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत.
सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.
12 Feb 2025 - 8:32 pm | मुक्त विहारि
हो...
पण, आता तरी हिंदूंनी वैचारिक आणि शारीरिक गुलामगिरी सोडून दिली पाहिजे.
संभल मध्ये पण परिवर्तन घडत आहेच की आणि आजच्या घडीला अमानतुल्लाह खान पण परागंदा झाला आहे.
लाचारीचा इतिहास जितक्या लवकर हिंदू विसरतील तितके उत्तम.
14 Feb 2025 - 8:45 pm | चौथा कोनाडा
गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले !
हे जाता जाता आठवले.
धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत.
अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही..
किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !
16 Mar 2025 - 5:07 pm | कॉमी
देव आहे म्हणून इतक्या बायका करू शकला असा विनोद आहे. ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून सगळे जास्त बायका असणारे हिंदू देव आहेत हा काढत आहात. हि लॉजिकल उडी तुमची स्वतःची आहे, लेखकाची नाही.
12 Feb 2025 - 5:54 pm | kool.amol
सर्वप्रथम ह्यातल्या काही शब्दांमुळे पोस्ट आवडली नसेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी बोलतो. काही मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यामुळे भाषा छचोर कशी काय होऊ शकते? Reverse, sub clause ह्या शब्दात काय आक्षेपर्ह आहे मला तरी समजले नाही. तरी पण तुमची सूचना स्वीकारतो, पुढील लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाहीत ह्याची काळजी घेईन.
12 Feb 2025 - 6:19 pm | प्रचेतस
मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली नाही, उलट वेगळ्या शैलीत लिहिल्यामुळे छान वाटलं त्यामुळे लेख पुस्तकी आणि रुक्ष न राहता एक वेगळाच टच आलाय.
12 Feb 2025 - 7:59 pm | kool.amol
12 Feb 2025 - 7:59 pm | kool.amol
12 Feb 2025 - 8:44 pm | kool.amol
12 Feb 2025 - 8:44 pm | kool.amol
12 Feb 2025 - 8:46 pm | kool.amol
12 Feb 2025 - 8:46 pm | kool.amol
12 Feb 2025 - 8:46 pm | kool.amol
12 Feb 2025 - 9:59 pm | kool.amol
16 Mar 2025 - 5:05 pm | कॉमी
सहमत
12 Feb 2025 - 4:41 pm | विजुभाऊ
मुवी कायच्या काय लिवताय.
अकबर आणि त्याची पिलावळ; फक्त पिशाच्चे म्हणायच्या लायकीची आहेत.
12 Feb 2025 - 5:02 pm | मुक्त विहारि
एखाद्या व्यक्तीला जास्त बायका असतील तर त्याला देव मानायचे का?
12 Feb 2025 - 6:23 pm | प्रचेतस
सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल.
बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.
14 Feb 2025 - 10:46 pm | kool.amol
ही माहिती नवीन आहे. तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटण हे जुनं नाव आहे पण तुम्ही सांगितलेली व्युत्पत्ती जास्त योग्य वाटते आहे.
लेख मोठा होणार नाही ह्याची काळजी घेतली होती पण पुढचे लेख विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करेन
13 Feb 2025 - 7:53 am | सौंदाळा
लेख आवडला
भाषेचे काही अप्रस्तुत वाटले नाही.
गजनी, अहिल्याबाई होळकर, वल्लभभाई पटेल यांचे देखील उल्लेख पुढच्या भागात कदाचित येतील.
पुभाप्र
14 Feb 2025 - 10:51 pm | kool.amol
धन्यवाद! आता इतिहासातल्या घडामोडी लिहिणार आहे त्यात तुम्ही उल्लेख केलेल्या घटना असतील.
14 Feb 2025 - 5:35 pm | कंजूस
लेखाला सुरुवात करून चालना दिलीत. आपल्याकडे महाराष्ट्रातून बरेच भाविक गुजरातमध्ये ( सौराष्ट्रात) धार्मिक स्थळांची सहल करतात. द्वारका, सोमनाथ, जुनागढचे गिरनार ही मुख्य स्थाने. काही जण डाकोरलाही जातात. तोंडी वर्णन सांगतात पण कुठे लिहीत नाहीत. जैनांचे मुख्य ठिकाण पालिताणा.
सोमनाथजवळ दीव सुद्धा आहे. पर्यटनाचे ठिकाण. गुजरात थोडा पाहिला आहे. सौराष्ट्र पूर्ण बाकी आहे. बघू कसं जमतं ते.
14 Feb 2025 - 10:50 pm | kool.amol
धन्यवाद! हो हे खरं आहे, सगळ्यात जास्त पर्यटक ह्याठिकाणी मध्य प्रदेश मधून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्रातून. बरेचदा सोमनाथ द्वारका अशी यात्रा केली जाते. ही दोन्ही ठिकाणं तशी जवळ आहेत. त्यात गिर चे अभयारण्य सुद्धा येते.
2 Mar 2025 - 10:40 am | सौन्दर्य
"ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे."
मी राजकोटला नोकरीनिमित्त्ये पाच वर्षे राहिलो. ह्या पाच वर्षांत मी कमीतकमी २ ० ते २ ५ वेळा प्रभासपाटण, सोमनाथला गेलो आहे. मला तेथे तीन नद्या तर जाऊच द्या, सोमनाथ जवळच्या समुद्रात विलिन होणारी एकही नदी दिसली नाही. इतकेच नाही तर तेथील स्थानीय लोकांशी देखील फार जवळून संबंध आला , पण एकानेही अश्या संगमाबद्दल उल्लेख केला नाही .
तुमच्या ह्या प्रथम लेखात पौराणिक संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आले की कदाचित त्या संगमाविषयी अधिक माहिती मिळेल अशी आशा करतो .
मुंबईतील मूळ निवासी 'पाठारे प्रभू' हे प्रभास पाटणहुन मुंबईला आले अशी देखील एक आख्याईका आहे . मिपावरचे जाणकार ह्या वर अधिक प्रकाश टाकतील ह्या प्रतीक्षेत आहे .
तुम्हाला तुमच्या पुढील भागासाठी शुभेच्छा .
16 Mar 2025 - 2:57 pm | kool.amol
छान प्रतिक्रिया. नशीबवान आहात इतक्या जवळ राहायला मिळाले तुम्हाला. मुख्य मंदिरापासून जवळच एक राम मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो. त्या मंदिराच्या मागेच 2 नद्या आधी परस्परांना आणि थोड्याच अंतरावर समुद्राला मिळतात. तिथेच संगम आहे आपण तो बघू शकतो. हे मंदिर बरेच प्रसिद्ध सुद्धा आहे त्यामुळे मला थोडे आश्चर्य वाटते आहे.