सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
3 Feb 2025 - 1:14 pm

सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान
================

सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही. पण ते जाउ दे...धार्मिक पर्यटनाला चालना मिळून प्रयागराजच्या आर्थिक चक्राला चालना नक्की मिळाली, ही मात्र जमेची बाजू!

कुंभमेळ्यात सामील झालेल्या सन्यस्त नागासाधूंच्या योगसामर्थ्याच्या, त्यांच्या सिद्धींच्या प्रदर्शनाने असंख्य लोकांच्या मनात योगाबद्दल आदर नक्कीच वाढला असेल. पौरूषाचा त्याग करून अशा सिद्धी मिळवणे सोपे काम नाही. पण या सिद्धींमुळे देशासमोरचे कोणते प्रश्न सोडवायला मदत होते, असा एक नतद्रष्ट प्रश्न मनात निर्माण झाला आणि मी स्वत:लाच प्रत्येक गालावर थोबाडीत मारून गप्प बसवले...

"सिद्धी" हे योगशास्त्रामधले एक ठळक आकर्षण. अंतर्धान पावणे, परकाया प्रवेश, दुसर्‍याच्या मनातले विचार ताडणे, केवळ हवा, पाण्यावर जगणे वगैरे अतिरंजित कल्पना यात प्रमुख आहेत.

पण ’सिद्धी’ या कल्पनेवर विचार करायला सुरुवात केली तेव्हा असे लक्षात आले की ’सिद्धी’ म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून ’क्षमतांचा विकास’ होय!

’क्षमतांचा विकास’ अशी सुटसुटीत व्याख्या स्वीकारली की मग लक्षात येते की सिद्धी केवळ संसाराचा त्याग केलेल्या, अंगाला राख फासणार्‍या कुंभमेळ्यातल्या साधूंची मक्तेदारी नाही. संसारात राहून ’क्षमतांचा विकास’ करणारे असंख्य लोक जगभर आहेत.

आधुनिक विज्ञान, विवेकवाद इ० च्या चौकटीत राहून ’क्षमतांचा विकास’ म्हणजे सिद्धी ही व्याख्या स्वीकारायला काहीही अडचण राहात नाही. चेताविज्ञानाचे अगदी जुजबी जरी ज्ञान असले तरी हे कोडे अलगद उलगडते.

’शिकणे’ ही प्रक्रिया जीवशास्त्रीय पातळीवर कशी घडते हे दाखवणारे काही व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत(https://www.youtube.com/shorts/IYMYfrvnLYc). आपण एखादे कौशल्य शिकतो तेव्हा चेतापेशींच्या नव्या जोडण्या तयार होतात. शिकण्यासाठी अनुकूल वातावरण असेल तर, काही प्रेरणेने किंवा नैसर्गिक रित्याच ज्याना पटकन शिकण्याची देणगी मिळाली असेल तर, अशा लोकांमध्ये या जोडण्या वेगाने होतात. स्लो लर्नर किंवा हळुहळू शिकणार्‍यांमध्ये या जोडण्या हळुहळु निर्माण होतात. प्रतिकूल परिस्थिती, पोषणाचा अभाव किंवा जनुकीय दूर्दैव ही शिकण्याचा वेग कमी करणारी कारणे देता येतात(*). तरीही माल्कम ग्लॅडवेलने यशाचा किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी १०००० तासांच्या सरावाचा नियम सांगून यातले गूढत्व नाहीसे केले आहे.

ध्यान, प्राणायाम आणि सिद्धी

ध्यान, प्राणायाम इ० च्या अभ्यासाने माणसामध्ये मग कोणत्या क्षमतांचा विकास होत असावा? या प्रश्नाची उत्तरे पण मग विज्ञानाच्या आधारे देता येतात. ताणावर नियंत्रण मिळवून त्याचे व्यवस्थापन करण्याची क्षमता ही ध्यानाने मिळणारी प्राथमिक सिद्धी! हा टप्पा पार पडला की जे भावनिक स्थैर्य प्राप्त होते त्यामुळे आपल्या क्षमता आणि मर्यादा ओळखायची खरी ताकद मिळते, पर्यायाने वास्तवाचे भान राहते. पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. आपले आपल्या आयुष्यावर नियंत्रण आहे, ही भावना उभारी देते.

ध्यान, प्राणायामाने मेंदूमध्ये अनेक उपकारक बदल घडून येतात, हे आता जगजाहिर असून अनेक सन्मान्य विज्ञापीठातील संशोधनाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ध्यानाची वेगवेगळी तंत्रे मेंदूच्या वेगवेगळ्या भागावर काम करतात आणि त्यांच्याशी निगडीत क्षमतांचा विकास साधण्यास मदत होते.

माझ्या आतापर्यंतच्या ध्यानाच्या अभ्यासाचे प्रमुख चार टप्पे आहेत. या चार टप्प्यात माझे क्षमतांच्या विकासाचे अनुभव असे आहेत -

० ओशो प्रणित साक्षीभाव ध्यान - ओशोंनी सांगितलेल्या ध्यानतंत्राने मला येणारा राग नाहीसा झाला. हा परिणाम इतका अनेपेक्षित होता की हा बदल स्वीकारणे अवघड गेले आणि मी माझा राग ’परत’ मिळवला. पण या ध्यानाभ्यासात काही ’साक्षात्कार’ असे झाले की तेव्हाच्या समस्या चलाखीने आणि यशस्वीपणे हाताळू शकलो.

० अनुलोम-विलोम - या अतिशय सोप्या आणि तितक्याच कुचेष्टा होणार्‍या प्राणायाम आणि तदानुषंगिक ध्यानाचा अर्थ मला डॉ० दीक्षितांबरोबरच्या पुस्तकप्रकल्पाच्या निमित्ताने समजला. त्याचा मुख्य परिणाम झोप सुधारण्यात झाला. तसेच रक्तपात आणि हिंसाचाराच्या दृश्यांनी निर्माण होणारी भीति, घबराट आणि काळजी पूर्ण नाहीशी झाली. युट्यूबवरील शवविच्छेदनाचे व्हिडीओ कोणत्याही ’व्हिसेरल रिॲकशन’ शिवाय बघता येऊ लागले.

० आधुनिक तंत्राने म्हणजे इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान - यात मी १ चॅनेल आणि ८ चॅनेल इइजीमापन तंत्रज्ञान वापरून बघितले. हा मार्ग खर्चिक आहे, पण हा "सूर्य आणि हा जयद्रथ" अशातला प्रकार असल्याने जास्त प्रभावी असतो. त्यामुळे शिस्त निर्माण होण्यास मदत होते. मला १ चॅनेल इइजीमापन पुरेसे आहे असे वाटते, कारण ते आडवे पडून पण वापरता येते. या अभ्यासाने झोपेतील सुधारणा चालू राहिली. पण त्याच माझा तिरस्कार करणार्‍या माणसांबद्दल दया, करूणा हे भाव निर्माण झाले, म्हणजेच अशा लोकांना माफ करायची ताकद प्राप्त झाली. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटेनाशी झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझे गमावलेले हास्य परत मिळवले आणि खळखळून हसायला लागलो.

० स्वरैक्य ध्यान - हे मी स्वत: विकसित केलेले ध्यानतंत्र आहे. Physiological sigh आणि भारतीय संगीतातील स्वरसाधना तंत्राचा वापर करून हे तंत्र मी बनवले आहे. याचा प्रमुख फायदा असा की ५-१० मि० चा अभ्यास पण प्रभावी ठरतो. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे ध्यान करता येते. ध्यानावस्था आपोआप नकळत लांबत जाते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.

या ध्यानामुळे अगोदर मिळालेले सर्व फायदे टिकून राहण्यासाठी मदत तर झालीच पण माझा समाजमाध्यमावरचा वावर अचानक कमी झाला.

सर्वात महत्त्वाचे - ध्यानमार्गात तुमची जसजशी प्रगती होत जाते तसतशी तुमची वेगळा विचार करायची क्षमता वाढत जाते. तुम्ही समाजाच्या जोखडातून बाहेर पडता आणि ते समाज स्वीकारू शकत नाही. कुंभमेळ्यातील नागासाधू असेच समाजाच्या जोखडातून बाहेर पडलेल्या व्यक्ती आहेत, पण ते एक दूसरे टोक आहेत.

अलिकडेच म्ह० दोन महिन्यापूर्वी मी घरात पाय घसरून खुप जोरात आपटलो. स्नायू बरेच दुखावले पण अस्थिभंग मात्र झाला नाही. माझे वय ६१ असल्यामुळे डॉ० नी पण आश्चर्य व्यक्त केले.”ड’ जीवनसत्त्वाच्या नियमित सेवनाबरोबर प्राणायमाच्या अभ्यासाला मी याचे श्रेय देतो कारण हाडांमध्ये स्वायत्त नाडीसंस्थेच्या (Autonomus nervous system) शाखा पोचलेल्या असतात. या नाड्या हाडांच्या मजबुतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात! त्यामुळे मला अस्थिभंगापासून वाचविण्यात प्राणायामाची महत्त्वाची भूमिका आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही.

तात्पर्य - कुंभमेळ्यात न जाता नळाच्या पाण्यात अंघोळ करून मला मोक्ष प्राप्त झाला आहे. तुम्ही पण तो विज्ञानसिद्ध मार्गाने मिळवू शकता...

* स्लो लर्नर्स आर नॉट नो लर्नर्स, हे महत्त्वाचे!

आरोग्यविचार

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण, उत्कंठावर्धक लेख आवडला.

आधुनिक तंत्राने म्हणजे इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान - यात मी १ चॅनेल आणि ८ चॅनेल इइजीमापन तंत्रज्ञान वापरून बघितले. हा मार्ग खर्चिक आहे, पण हा "सूर्य आणि हा जयद्रथ" अशातला प्रकार असल्याने जास्त प्रभावी असतो. त्यामुळे शिस्त निर्माण होण्यास मदत होते.

-- याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.

(कदाचित माझ्या खालील लेखात उल्लेखिलेला " एक वेगळाच नवीन अनुभव" म्हणजे हा ईईजी ग्राफ असावा की काय, असे वाटते.
'संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १'

तुम्ही रुग्णालयात होता तेव्हा डोक्याला सेन्सर लावले होते का? तसे असल्यास तो आलेख इइजी असायची शक्यता आहे.

विज्ञानाने उपलब्ध केलेले परिधानक्षम सेन्सर तंत्रज्ञान अतिशय उपकारक तंत्रज्ञान आहे. दूर्दैवाने आपल्याकडे ते सर्वांच्या आवाक्यात नसल्याने लोक बाबा/बुवांच्या आहारी जातात. याशिवाय विज्ञान समजाऊन घेण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ आणि क्षमता असेलच असे नाही.

इइजीमापन तंत्रात मेंदूच्या लहरी मोजून ध्यानावस्थेचे निदान केले जाते आणि तुम्ही उत्कट अवस्थेला पोचलात की तुमच्या ॲपवर घंटा/बीप वाजवून तुम्हाला तसा संदेश मिळतो. अभ्यासाने तुम्ही अधिकाधिक काळ ध्यानावस्थेत जाण्याचे कौशल्य शिकू शकता. १ आठवडा ते १ महीना हा दृष्य परिणामासाठी लागणारा वेळ आहे.

प्रसाद गोडबोले's picture

4 Feb 2025 - 11:24 am | प्रसाद गोडबोले

वाह.
लेख उत्तम झालाय. काही पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा आहे अधे मधे पण तो मी दुर्लक्षित करू शकलो!

कुंभमेळ्यात न जाता नळाच्या पाण्यात अंघोळ करून मला मोक्ष प्राप्त झाला आहे. तुम्ही पण तो विज्ञानसिद्ध मार्गाने मिळवू शकता

हे अतिशय जबरदस्त लिहिले आहे !
तीर्थ व्रत नेम भावे वीण सिध्दी वाया ची उपाधी करिसी जना - असे ज्ञानेश्वर माउलींनी म्हणून ठेवले आहे !
तुकोबाही म्हणालेत -
न लगती सायास जावे वनांतरा |सुखें येतो घरा नारायण ।। धृ।।
ठायींच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ।। ३।।

ब्राह्मणांना तर "ज्या प्रवासाने संध्यावंदन आदी नित्य कर्मात खंड पडेल" असा सर्वच उपद्व्याप निषिध्द सांगितलेला आहे !

विज्ञान ह्या शब्दाची व्युत्पत्ती च विशेषत्वाने जाणणे अशी आहे.

तुम्हाला घरी बसून असे विशेषत्वाने जाणणे जमत असेल तर कुंभ , वारी, परिक्रमा, विपश्यना, art of living , चारधाम, योग शिबिर, आणि अन्य तत्सम काहीही सव्यापसव्य करावयाची आवश्यकता नाही.

ध्यान , समाधी, मोक्ष , सगळं आधीच आहे , इथेच , आतमध्ये ! फक्त जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !

असो.

लेख वाचून आनंद झाला!

लिहित रहा !

शुभेच्छा .

युयुत्सु's picture

5 Feb 2025 - 10:03 am | युयुत्सु

लेख वाचून आनंद झाला!

लिहित रहा !

धन्यवाद!

शानबा५१२'s picture

4 Feb 2025 - 9:24 pm | शानबा५१२

लागलो.

० स्वरैक्य ध्यान - हे मी स्वत: विकसित केलेले ध्यानतंत्र आहे. Physiological sigh आणि भारतीय संगीतातील स्वरसाधना तंत्राचा वापर करून हे तंत्र मी बनवले आहे

ह्या बद्दल अजून खोलात व सविस्तर, सोप्या शब्दांत माहिती करायला आवडेल, मी खूप उत्सुक आहे.

आपण खूप वर्षानी इथे लिहणे सुरू केलेत, खूप शुभेच्छा!