जॉन अब्राहम (भाग २)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
11 Jan 2025 - 3:40 pm

जॉन अब्राहम (भाग १)

(त्याने अचानक ०.४४ कॅलिबर डेरिंजर पिस्तुलाने लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोडून मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले . . . ) . . .

_______________________________________________________________________________________________

१४ एप्रिल १८६५, वेळ सायंकाळी अंदाजे १०:२० वाजता

प्रेक्षकातील काही डॉक्टरांनी लिंकनवर प्राथमिक उपचार करण्याचा तात्काळ प्रयत्न केला. परंतु लिंकनना उपचारासाठी औषधालयात नेणे आवश्यक आहे, परंतु त्यांची अवस्था पाहता त्यांना फार लांब नेता येणार नाही हे लक्षात येताच तेथून लिंकनना जवळच असलेल्या विल्यम पीटरसन यांच्या निवासस्थानी नेण्यात नेले. तेथील पलंग तुलनेने लहान असल्याने व लिंकन बरेच उंच असल्याने त्यांना त्या पलंगावर त्यांना तिरके झोपविण्यात आले. ते रात्रभर बेशुद्धीत होते व डॉक्टर रात्रभर त्यांच्यावर उपचार करीत ह्ते. परंतु उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता.. शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांची पत्नी मेरीने हे ऐकताच अपार शोक केला. युद्धमंत्री एडविन स्टँटन यांचे "ते आता देवदूतांचे झाले आहेत" हे वाक्य प्रसिद्ध झाले.

लिंकनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ या दिवशी झाला होता व मृत्यू १५ एप्रिल १८६५ या दिवशी झाला.

मृत्युशय्येवर लिंकन

मृत्युशय्येवर लिंकन

दुसर्‍या दिवशी ईस्टर रविवार होता. त्या दिवशी सकाळी अमेरिकेतील सर्व चर्चमध्ये लिंकन यांच्या हौतात्म्याची तुलना येशू ख्रिस्ताच्या हौतात्म्याशी करण्यात आली व त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली (१८६१ मध्ये अल्प काळात अमेरिकेत सर्वत्र हे वृत्त कसे पोहोचले असेल हे समजत नाही). लिंकन यांचे अनेक विरोधक सुद्धा हळहळले. काही काळ लिंकन यांचे पार्थिव व्हाईट हाऊस मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवल्यानंतर, पुढील १३ दिवस त्यांचे पार्थिव आगगाडीतून देशातील विविध भागात नेऊन शेवटी स्प्रिंगफील्ड (इल्युनॉय) येथे नेण्यात आले. फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क येथील ५ व्या रस्त्यावर सुद्धा पार्थिव नेण्यात आले होते. लक्षावधी नागरिकांनी आपापल्या राज्यात लिंकन यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

लिंकन यांचे शव घेऊन जाणारी आगगाडी. एकूण १३ शहरातून हे शव नेण्यात आले होते.

लिंकन यांचे शव घेऊन जाणारी आगगाडी. एकूण १३ शहरातून हे शव नेण्यात आले होते.

कोण होता हा मारेकरी?

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________

(ठरल्याप्रंमाणे केनेडी दांपत्य २१ नोव्हेंबर १९६३ या दिवशी एअर फोर्स १ या अध्यक्षांसाठी राखीव असलेल्या विमानातून टेक्ससच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर निघाले. ते टेक्सस राज्यातील ५ शहरांना भेट देणार होते. ) . . .

_________________________________________________________________________

२१ नोव्हेंबर १९६३

टेक्ससमध्ये केनेडी पहिल्यांदा सॅन अ‍ॅंतोनिओ येथे पोहोचले. उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन, मुख्यमंत्री जॉन कोनाली आणि खासदार राल्फ यारबरो त्यांच्या स्वागतासाठी होते. तेथून ते ह्यूस्टन येथे लॅटिन अमेरिकन नागरिकांच्या एका संमेलनात सामील झाले आणि दिवस संपताना ते डॅलसपासून जवळ असलेल्या फोर्ट वर्थ शहरात पोहोचले.

शुक्रवारी २२ नोव्हेंबरला फोर्ट वर्थ येथे हलकासा पाऊस पडत होता. तरीसुद्धा ते रात्री मुक्कामास असलेल्या टेक्सस हॉटेलच्या बाहेर हजारो समर्थक जमा झाले होते. ते पाहून छत्री, रेनकोट वगैरे न घेता केनेडी बाहेर आले आणि त्यांनी समर्थकांसमोर लहानसे भाषण केले. आपल्या लहानश्या भाषणात त्यांनी आर्थिक वृद्धी, संरक्षण क्षेत्र आणि अंतराळ संशोधन यावर भर दिला.या भाषणाला समर्थकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

हॉटेलमध्ये परत येऊन त्यांनी फोर्ट वर्थ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशी वार्तालाप केला.

तेथून ते कार्सवेल या लष्कराच्या विमानतळावर जाऊन विमानातून डॅलसला लव्ह फील्ड विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत थांबले होते. त्यातील अनेकांशी त्यांनी हस्तांदोलन केले. जॅकलीन केनेडींना समर्थकांनी लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. टेक्ससचे मुख्यमंत्री जॉन कोनाली व त्यांच्या पत्नी नेल्ली आधीच एका उघड्या छतहीन गाडीत बसले होते. केनेडी दांपत्य त्या गाडीत कोनाली दांपत्यांच्या मागील आसनावर आसनस्थ झाले. उपाध्यक्ष जॉन्सन व त्यांच्या पत्नी त्यांच्या पाठोपाठ असलेल्या एका दुसर्‍या गाडीत बसले.

जॉन केनेडी व जॅकलीन केनेडी डॅलस लव्ह फिल्ड विमानतळावर

जॉन केनेडी व जॅकलीन केनेडी डॅलस लव्ह फिल्ड विमानतळावर

गाड्यांचा ताफा विमानतळावरून निघाला. १० मैलांवर असलेल्या ट्रेड मार्ट येथे अध्याक्षांबरोबर समर्थकांचा भोजनसमारंभ आयोजित केला होता.

अध्यक्षांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो समर्थक उभे राहून अध्यक्षांची प्रतीक्षा करीत होते. गाडीतून जाताना हात हलवित ते केनेडींचे स्वागत करीत होते.

दुपारी १२:३० च्या सुमारास मुख्य रस्त्यावरून केनेडींच्या कारने डीले प्लाझापासून वळण घेतले. टेक्सस शालेय पुस्तके संग्रहालयापाशी केनेडींची गाडी पोहोचली असताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले.

कोणाला काही कळण्याच्या आतच अध्यक्ष केनेडींच्या मानेत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या. त्याच वेळी मुख्यमंत्री कोनालींच्या पाठीतही गोळी घुसली.

_________________________________________________________________________________________

(क्रमशः)

इतिहास

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Jan 2025 - 3:17 pm | चंद्रसूर्यकुमार

लिंकन आणि केनेडींची हत्या हा माझ्या खूप आवडीचा भाग आहे. याविषयी अजून लिहिता येईल पण त्यातून कदाचित पुढील भागात येणारी माहिती आधीच फोडली जाईल म्हणून आता जास्त लिहित नाही. तरीही काही गोष्टी लिहितो-

१. १९५० च्या दशकात अमेरिकेत टिव्हीवर I've Got A Secret म्हणून एक कार्यक्रम लागायचा. अर्थातच या कार्यक्रमाविषयी मला आंतरजालावरूनच समजले. त्या कार्यक्रमात ८ फेब्रुवारी १९५६ रोजी मेरिलँडमधील सॅम्युएल जे. सीमोर म्हणून ९६ वर्षाचे गृहस्थ आले होते. ते लिंकनची हत्या झाली तेव्हा फोर्ड थिएटरमध्ये होते- तेव्हा वय वर्ष ५. तेव्हा अध्यक्षांना गोळी मारली गेली आहे हे त्या बालसुलभ वयात त्यांना कळणे शक्य नव्हते. लिंकनच्या मारेकर्‍याने (त्याचे नाव अजून लेखात आलेले नाही म्हणून लिहित नाही) व्यासपीठावर उडी मारली तेव्हा उंचावरून उडी मारलेला तो मनुष्य सुरक्षित असेल ना हा प्रश्न त्यांना तेव्हा पडला होता. १९५६ मध्ये हा कार्यक्रम झाला तेव्हा अ‍ॅब्रॅहॅम लिंकनच्या हत्येची प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ते शेवटची हयात व्यक्ती होते. सॅम्युएल जे. सीमोरचे त्यानंतर काही आठवड्यांनी निधन झाले. हा कार्यक्रम युट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=1RPoymt3Jx4&t वर बघता येईल.

२. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचे उपाध्यक्ष अ‍ॅंड्र्यू जॉन्सन म्हणजे एखाद्या उत्युंग राज्यकर्त्यानंतर पुढचा राज्यकर्ता अगदी खुजा निघावा त्याचे उत्तम उदाहरण होते. लिंकनना गोळी लागली आणि त्यांना पीटरसन हाऊसमध्ये नेले गेले आहे हे समजताच उपाध्यक्ष आणि मंत्रीमंडळातील मंत्री तिथे पोचले. लिंकनची हत्या करायच्या कटात सहभागी असलेल्या लोकांनी लिंकनबरोबरच सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड आणि हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सनच्या हत्येचाही कट रचला होता. मुख्य हल्ला लिंकनवर फोर्ड थिएटरमध्ये झाला आणि इतर दोघांवर त्यांच्या घरी हल्ला करायचा असे ठरले होते. आयत्या वेळेस उपाध्यक्षांवर हल्ला करायचे धैर्य त्या व्यक्तीला झाले नाही म्हणून उपाध्यक्ष पीटरसन हाऊसमध्ये जाऊ शकले. सेक्रेटरी ऑफ स्टेट विलिअम सिवार्ड मात्र जखमी झाले होते. हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन कसे नादान होते याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी वाचले/बघितले आहे. लगेच संदर्भ देता येणार नाही पण हे मी वाचले/बघितले आहे हे नक्की. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकनना हे उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन बहुतेक आवडायचे नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांना पीटरसन हाऊसमधून जायला सांगितले. या हल्ल्यातून अध्यक्ष वाचायची शक्यता फार थोडी आणि कदाचित ते काही तासांचेच सोबती आहेत याची कल्पना तिथे असलेल्या सगळ्यांनाच आली होती. अशावेळी कदाचित आपल्याला अध्यक्षपदाची सुत्रे हाती घ्यावी लागतील ही कल्पना अँड्र्यू जॉन्सनना आली नसेल का? अशावेळी त्यांचे वर्तन कसे होते? परिस्थितीचे गांभीर्य, ती जाण त्यांच्याकडे अजिबात नव्हती. ते घरी जाऊन दारू ढोसून झोपून राहिले. दुसर्‍या दिवशी सकाळी ७.२२ वाजता लिंकन यांचे निधन झाले याचा त्यांना पत्ताही नव्हता. अँड्र्यू जॉन्सन यांचा अध्यक्ष म्हणून सकाळी ९ वाजता छोटेखानी शपथग्रहण समारंभ ठेवला होता आणि लिंकन गेले असून आपणच अध्यक्ष होणार आहोत याचा त्या महाशयांना पत्ताही नव्हता. त्यांच्या घरी त्यांना बोलावून आणायला माणसे पाठवावी लागली आणि त्यांनी त्यांच्या अंगावर पाणी मारून त्यांना उठवले. अँड्र्यू जॉन्सन थोडेसे उशीराच शपथ घ्यायला तिथे पोचले. त्यांच्यावर पुढे अमेरिकन संसदेत महाभियोग आणला गेला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले.

३. अ‍ॅब्रॅहॅम लिंकनची पत्नी मेरी लिंकन (मूळची मेरी टॉड) एका श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होती. तशाच श्रीमंत आणि वजनदार घराण्यातील होते इलिनॉयचे सीनेटर स्टिफन डग्लस. तर अ‍ॅब्रॅहॅम लिंकन एकदम साध्या कुटुंबातील होते. गंमत म्हणजे स्टिफन डग्लस यांनी पण मेरी टॉडला 'प्रपोज' केले होते. पण मेरीने अ‍ॅब्रॅहॅम लिंकन या त्यामानाने खूपच साध्या माणसाशी लग्न केले. त्याचे कारण म्हणजे feminine intuition होते- स्टिफन डग्लस नाही तर कधीतरी लिंकन अध्यक्ष बनतील असे मेरीला वाटले असे अविनाश धर्माधिकारींच्या एका भाषणात ऐकले आहे. व्यक्तिशः मला ते खरे वाटत नाही. कारण १८३९ मध्ये मेरी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनना भेटली तेव्हा लिंकन कधीकाळी अध्यक्ष बनू शकतील असे काही वाटण्यासारखे त्यांच्यात काही होते असे वाटत नाही. त्याउलट स्टिफन डग्लस मात्र खूपच वजनदार होते. असो. तर १८५८ मध्ये याच स्टिफन डग्लसनी अ‍ॅब्रॅहॅम लिंकनचा इलिनॉयच्या सीनेटरच्या निवडणुकीत पराभव केला आणि १८६० मध्ये अ‍ॅब्रॅहॅम लिंकननी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्टिफन डग्लसचा.

४. अ‍ॅब्रॅहॅम लिंकन म्हणजे एकदम सत्यवादी वगैरे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात ते १००% सत्य नक्कीच नव्हते. २०२० च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांपूर्वी नेटफ्लिक्सवर 'Race for the White House' नावाची जबराट सिरीज बघितली नाही. दुर्दैवाने ती आता नेटफ्लिक्स किंवा इतर कुठेच उपलब्ध नाही. त्या सिरीजमध्ये एक गोष्ट दाखवली होती ते बघून धक्का बसला. रिपब्लिकन पक्षाचे १८६० च्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार निवडायला अधिवेशन भरले होते शिकागोमध्ये. त्यावेळेस पक्षांतर्गत स्पर्धक अधिवेशनाला जायचे नाहीत. आघाडीवर नाव होते न्यू यॉर्कचे सीनेटर विलिअम एच. सिवार्ड यांचे (वर उल्लेख केलेले तेच). तेव्हा लिंकनच्या कॅम्पेन मॅनेजरने चापलुसी करून शिकागोमध्ये (म्हणजे आपल्या राज्यात) अधिवेशन होते याचा फायदा उठवत आपले लोक तिथे भरले. त्या सिरीजमध्ये दाखविले होते की त्या मॅनेजरने चक्क खोटी तिकिटे छापून आपल्या लोकांना अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तिथे भरले आणि सिवार्डचे समर्थक तिथे जाऊ शकले नाहीत. अशा आपल्या लोकांकरवी भरपूर घोषणाबाजी आणि आवाज करून कुंपणावरच्या डेलिगेट्सपुढे लिंकन प्रचंड लोकप्रिय आहेत असे चित्र उभे केले आणि त्यातून सिवार्डना अधिक पाठिंबा आहे असे चित्र असले तरी उमेदवार झाले लिंकन. एका अर्थी लिंकननी पक्षाची उमेदवारी 'ढापली' होती.

तीच गोष्ट केनेडींची. १९६० मध्ये जॉन केनेडींनी रिचर्ड निक्सनना थोडक्यात हरविले. केनेडींच्या या विजयात टेक्सस (२४ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) आणि इलिनॉय (२७ इलेक्टोरल कॉलेज डेलिगेट्स) या दोन राज्यांचा वाटा मोठा होता. दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये फरक थोडा होता पण इलेक्टोरल कॉलेजमध्ये केनेडींना ३०३ तर निक्सनना २१९ मते होती. टेक्सस आणि इलिनॉय ही दोन राज्ये निक्सननी जिंकली असती तर निक्सनना २७० मते मिळून ते अध्यक्ष झाले असते. केनेडींचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते लिंडन जॉन्सन. हे महाशय गुंड प्रवृत्तीचे होते. केनेडींची हत्या झाल्यावर ते अध्यक्ष झाले तेव्हा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे व्याजाचे दर कमी करत नाही म्हणून लिंडन जॉन्सननी फेडचे चेअरमन (रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला समकक्ष) बिल मार्टीन यांना धक्काबुक्की (की मारहाणही?) केली होती. https://mises.org/mises-wire/when-lbj-assaulted-fed-chairman .आपल्याकडे समजा पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना मारहाण केली तर? पण ते अमेरिकेत करून दाखविले लिंडन जॉन्सननी. तर हे लिंडन जॉन्सन असे होते. त्याप्रमाणे १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींचे खंदे समर्थक होते शिकागोचे महापौर रिचर्ड डॅली. ते पण काहीसे लिंडन जॉन्सनसारखेच. १९६० च्या निवडणुकांमध्ये केनेडींनी टेक्सस जिंकले ४६ हजार मतांनी तर इलिनॉय जिंकले ९ हजार मतांनी. या दोन राज्यात बर्‍याच काऊंटींमध्ये (आपल्याकडील जिल्ह्याला समकक्ष) तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले आणि विशेषत: इलिनॉयमध्ये तर अगदी प्रॉपर फ्रॉड झाला होता. इलिनॉयच्या इतर सगळ्या काऊंटींमध्ये निक्सनना आघाडी होती पण शिकागो शहरात मात्र केनेडींना भरघोस मते पडली होती. वर म्हटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी तिकडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मते मतपेटीत गेली होती. या फ्रॉडबद्दल काहींना १९६२ मध्ये न्यायालयाने शिक्षाही केली. निक्सन समर्थकांनी त्यांच्याकडे या निकालाला न्यायालयात आव्हान द्या असा आग्रह धरला. पण स्वतः निक्सन आपण 'क्राय बेबी' दिसायला नको म्हणून तसे आव्हान दिले नाही. मात्र निक्सन समर्थकांनी ठिकठिकाणी निकालांना न्यायालयात आव्हान दिले. हवाईमध्येही असा प्रकार झाला होता. निवडणुक संपल्यावर केनेडी अध्यक्ष झाल्यावर न्यायालयाने हवाईतून केनेडी नाही तर निक्सन जिंकले होते असा निकाल दिला आणि तिकडची इलेक्टोरल कॉलेजमधील तीन मते पूर्वलक्षी प्रभावाने केनेडींकडून काढून निक्सनना दिली. इलिनॉय आणि टेक्ससमध्ये मात्र न्यायलयाचे निकाल लागलेच नाहीत आणि मला वाटते केनेडींची हत्या झाल्यावर ते खटले बंद करण्यात आले. हा भाग तपासून बघायला हवा. अर्थात आजही केनेडी समर्थक असे काही झाले होते हे नाकारतात.

म्हणजेच काय अ‍ॅब्रॅहॅम आणि जॉन दोघांनीही एका अर्थी निवडणुक 'ढापली' होती असे म्हणता येईल. जॉन केनेडींना निवडणुक ढापली असेल तर आपल्यासाठी ते चांगलेच झाले. निक्सन पक्के भारतद्वेष्टे होते तर केनेडी आपल्यासाठी बरेच चांगले होते. शीतयुध्द काळात भारत-अमेरिका संबंध सगळ्यात चांगले होते केनेडींच्या काळात. १९६२ च्या चीन युध्दात केनेडींनी भारताला मदत केली होती. तसेच निक्सन अध्यक्ष झाले असते तर डिसेंबर १९६१ मध्ये नेहरूंनी गोव्यात कारवाई करून गोवा आपल्या नियंत्रणात आणले ते कदाचित केले नसते असेही म्हणायला जागा आहे असे वाचले आहे. कारण गोवा पोर्तुगाल या नाटो देशाच्या नियंत्रणात होता त्यामुळे गोव्यावर हल्ला म्हणजे नाटो मित्रदेशावर हल्ला असा त्याचा अर्थ लाऊन अमेरिका आपल्याविरोधात उठली असती तर आपल्याला काहीही करता आले नसते. निक्सन अध्यक्ष असते तर त्यांनी तसे केले असते ही शक्यता बरीच जास्त पण केनेडींनी तसे केले नाही.

५. १८६० मध्ये लिंकन जिंकल्यावर त्यांच्या नव्याने जिंकलेल्या प्रदेशांमध्ये गुलामगिरी पसरू द्यायची नाही या भूमिकेमुळे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी इलिनॉयची राजधानी स्प्रिंगफिल्ड ते वॉशिंग्टन हा प्रवास बराच लांबच्या मार्गाने रेल्वेने केला होता. शेवटी लिंकनचा मृतदेह त्याच मार्गाने वॉशिंग्टन ते स्प्रिंगफिल्ड असा नेण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्प्रिंगफिल्डमध्ये झाले. लिंकनचा मृत्यू आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार यात जवळपास एक महिन्याहून जास्त कालावधी होता. त्या काळात त्यांचा मृतदेह सडू नये म्हणून त्यावर रसायनांचा लेप लावण्यात आला होता. ठिकठिकाणी त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ती शवपेटी वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवली जात होती. आपल्या शहरात तशाप्रकारे शवपेटी ठेवण्यात येणार आहे याची पूर्वसूचना द्यायला लिंकनची शवपेटी नेणार्‍या ट्रेनपुढे दुसरी एक ट्रेन सोडली गेली होती. ती ट्रेन पुढे जाऊन पूर्वसूचना देऊन लोकांना सूचित करत असे. वॉशिंग्टनवरून बाल्टिमोर, न्यू यॉर्क, बफेलो, क्लिव्हलंड, इंडियानापोलिस, शिकागे अशा अनेक शहरांमध्ये असे लोकांनी अंत्यदर्शन घेतले होते. कित्येक लोक रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन करत होते. असे म्हणतात की त्यावेळी अमेरिकेची लोकसंख्या होती त्याच्या जवळपास अर्ध्या लोकांनी अशाप्रकारे एकतर रेल्वेमार्गाच्या बाजूला उभे राहून अभिवादन केले किंवा शवपेटीचे अंत्यदर्शन घेतले.

त्यानंतर अनेक वर्षे स्प्रिंगफिल्डमधील लिंकनच्या कबरीतून त्यांचा मृतदेह नाहिसा झाला अशा वावड्या उठत होत्या. शेवटी त्याला पूर्णविराम द्यायला १९०१ मध्ये ती कबर उघडून तसे काही झालेले नाही याची खात्री करण्यात आली.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2025 - 2:32 am | मुक्त विहारि

मस्त..

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2025 - 5:48 pm | श्रीगुरुजी

बापरे, लेखापेक्षाही सविस्तर माहिती! इतकी सविस्तर माहिती एकत्रित कोठेही नाही.

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार!

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2025 - 8:50 pm | चंद्रसूर्यकुमार

अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांच्या जीवाला पहिल्यापासूनच धोका होता. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे १८६० ची निवडणुक जिंकल्यावर ते स्प्रिंगफिल्डहून वॉशिंग्टनला काही दिवसांचा ट्रेनचा प्रवास करून आले होते. त्यांच्या प्रवासाविषयी आणि ते नक्की कुठे आहेत याविषयी कमालीची गुप्तता तेव्हा राखली गेली होती. इतके असूनही त्यांच्या संरक्षणाचा विचार सरकारी यंत्रणांनी सोडाच स्वतः लिंकननीही केलेला दिसत नाही.

१८६४ ची निवडणुक जिंकून ४ मार्च १८६५ रोजी लिंकन यांनी अध्यक्षपदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली. त्यावेळी अध्यक्ष निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुढील वर्षाच्या ४ मार्चला शपथ घेत असत. १९३३ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट यांच्यापासून ती तारीख ४ मार्चवरून बदलून २० जानेवारी करण्यात आली. शपथ घेतल्यानंतर वॉशिंग्टनमधील कॅपिटॉलमधून अध्यक्ष राष्ट्राला उद्देशून भाषण करतात तसे लिंकननी पण केले. त्या भाषणाला लिंकनची महिन्याभरानंतर ज्याने हत्या केली तो मारेकरी हजर होता आणि नुसता हजरच होता असे नाही तर त्याने ठरविले असते तर लिंकनवर तिथूनच गोळ्या झाडू शकला असत्या अशा ठिकाणी तो होता. याविषयीचे पुढील छायाचित्र प्रसिध्द आहे-

Lincoln

अध्यक्षांच्या बाजूला सिनेटर वगैरे लोक असतील तर समजू शकतो. पण सामान्य लोकांना अध्यक्ष जिथून भाषण करणार होते त्या ठिकाणच्या वरील गॅलरीत प्रवेश देणे अनाकलनीय वाटते. कदाचित त्यावेळी असा विचार केला गेला नसेल. १८६५ मध्ये लिंकनची हत्या झाल्यावर १८८१ मध्ये जेम्स गारफिल्ड आणि १९०१ मध्ये विलिअम मॅकिनली या अध्यक्षांची हत्या झाली होती. त्यानंतर हळूहळू अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिस वगैरे वापरणे सुरू झाले असे दिसते.

लिंकनची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्याच मारेकर्‍याने त्यांची हत्या करायचा प्रयत्न केला होता. लिंकन अध्यक्ष असल्याने व्हाईट हाऊसमध्ये राहायचे. पण त्यांचे वॉशिंग्टनमध्ये स्वतःचे दुसरे एक घरही होते. ते व्हाईट हाऊसमधून आपल्या दुसर्‍या घरी एकटेच घोड्यावरून जात. यादवी युध्द सुरू असतानाही आणि त्यांच्या जीवावर इतके लोक टपून बसलेले असताना लिंकन घोड्यावरून एकटेच जायचे हे अनाकलनीय वाटते. असे एकदा ते घोड्यावरून जात असताना त्या मारेकर्‍याने त्यांच्यावर गोळी झाडली होती. पण तो नेम थोडक्यात चुकला. लिंकन मुळात उंच होते आणि त्याकाळच्या पध्दतीनुसार ते बर्‍यापैकी उंच हॅटही घालायचे. ती गोळी लागून त्यांची हॅट खाली पडली पण त्यावेळेस ते सुरक्षित राहिले होते. निदान या अनुभवावरून तरी त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेतली जाणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही.

लिंकनना आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती असे म्हणतात. त्यांची हत्या होण्यापूर्वी चार-पाच दिवस ते व्हाईट हाऊसमध्ये रात्री झोपले होते तेव्हा त्यांना स्वप्न पडले. व्हाईट हाऊसमध्ये एक शवपेटी ठेवली होती आणि त्यावर अमेरिकेचा झेंडा लावला होता. स्वप्नात त्यांनी पहारेकर्‍याला विचारले- काय झाले? कोणाचा मृत्यू झाला आहे? तेव्हा तो पहारेकरी म्हणाला- तुम्हाला कळले नाही का? अध्यक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ते झोपेतून जागे झाले आणि त्या स्वप्नाविषयी त्यांनी त्यांच्या अंगरक्षकाला आणि त्यांचे चरीत्र लिहिणार्‍याला सांगितले होते.

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2025 - 9:18 pm | श्रीगुरुजी

खूपच भारी माहिती. ही माहिती इतकी सविस्तर आहे की वाचून वाटतंय पुढील भाग लिहायलाच नको.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jan 2025 - 9:17 am | चंद्रसूर्यकुमार

पुढचा भाग नक्कीच लिहा. मी माझ्या परीने त्यात भर टाकेन.

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Jan 2025 - 10:24 pm | चंद्रसूर्यकुमार

सुधारणा-

लिंकन घोड्यावरून जात असताना त्यांच्यावर गोळी कोणी झाडली हे नक्की कळलेले नाही. मला वाटत होते की ती गोळी नंतर त्यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यानेच मारली होती पण ती गोळी नक्की कोणी मारली हे इतिहासाला माहित नाही. ही घटना ऑगस्ट १८६४ मध्ये झाली होती.
https://www.americancivilwarstory.com/attempted-assassination-of-abraham...

महितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद
वाचतोय