बिनधास्त उभा तो वाडा हळहळणारा
वर पिंपळ थकला तेथे सळसळणारा
ते जळमट काही प्रवेशद्वारापाशी
तृण उंच वाढले बिलगे तरु पर्णांशी
पोपडे जरासे भिंतीवरती ओले
अन धाप टाकुनी उदास खिडकी बोले
निखळले कसे हे अलगद वासे काही
ते वैभव सारे जिथे द्यायचे ग्वाही
ती विहीर जेथे जमायचे बघ खेडे
वाजायाचे ते रहाट करकर वेडे
देव्हारा तिथला कसा पोरका झाला
चढविली कशी ना कुणी फुलांची माला
मी धावत सुटलो स्वप्नांच्या त्या पाठी
ना मिटली तरिही चिंतेची ती आठी
बैसतो स्मृतीच्या त्याच नदीच्या काठी
मी बालपणाला पुन्हा जगायासाठी
का आता कोणी तेथे फिरकत नाही
थांबला काळ जो पुढती सरकत नाही
ते काळ स्मृतींचे किती लोटले होते
मी शांत सुखाचे गाव सोडले होते
बंगले जरी मी उभारले त्या शहरी
गवसल्या कधी ना तिथे सुखाच्या लहरी
ही खदखद होती मनात थोडी थोडी
या जगण्याला ना गावाकडची गोडी
हे जरी फुकाचे ओघळ गाली येती
आभास मनाचे वाड्यावर त्या नेती
हे दुःख कदाचित कविता सांगत जाते
शब्दातुन माझे शैशव रांगत जाते
- किरणकुमार
वृत्त - भूपतीवैभव ( २-८-८-४ मात्रा)
प्रतिक्रिया
10 Jan 2025 - 7:41 pm | चित्रगुप्त
र्हदयस्पर्शी कविता.
15 Jan 2025 - 7:17 am | कर्नलतपस्वी
अगबी, अगदी.
ज्या वडा खाली चोरले आबे
त्या तरूतळी आता कुणी न थांबे
तो थंडगार उनाड वारा झोंबत होता
तो आता हाय वे वरूनी जातो