पावे मराठी

रोहन जगताप's picture
रोहन जगताप in जे न देखे रवी...
23 Oct 2024 - 10:47 am

मराठीत बोलून पावे मराठी

मनातून वाहून विश्वात ती

उभी राहता हीच जीवंत पाठी

नसे भ्रांत जन्मास या कोणती

महा होय राष्ट्र कसूनी मराठी

फुलावीत शब्दे जगी जागती

पुढे चालता हीच आधार काठी

भटक्या मनाला दिशा दावती

जगण्यास लाभेल मत्ता मराठी

कमाई घडे साथ येऊन ती

कुटूंबास पोसून राहून गाठी

समाजास संपन्न देऊन ती

असण्यास मिळून सत्ता मराठी

स्वराज्यात मानात थाटून ती

घुमूनी तिचा नाद दिशांत आठी

स्वतःशीच विश्वास बाणून ती

आशादायकवृत्तबद्धवीररसअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

23 Oct 2024 - 12:07 pm | प्रसाद गोडबोले

अरे काय हे ?

मला वाटतंय की आता chat gpt लाच विचारावे लागेल की ह्या कवितेचा अर्थ काय

Bhakti's picture

23 Oct 2024 - 12:19 pm | Bhakti

ही कविता जर अभ्यासक्रमात घेतली तर मी ऑप्शनला टाकेन.

कर्नलतपस्वी's picture

23 Oct 2024 - 2:50 pm | कर्नलतपस्वी

राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची.

प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल,

बाटली ओतून प्यावी जराशी
ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची....

मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल.

प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात.

पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

प्रचेतस's picture

23 Oct 2024 - 3:06 pm | प्रचेतस

नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे.
विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

रोहन जगताप's picture

24 Oct 2024 - 12:02 am | रोहन जगताप

मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप's picture

24 Oct 2024 - 12:06 am | रोहन जगताप

मराठीत बोलून पावे मराठी
मनातून वाहून विश्वात ती
उभी राहता हीच जीवंत पाठी
नसे भ्रांत जन्मास या कोणती

भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.

महा होय राष्ट्र कसूनी मराठी
फुलावीत शब्दे जगी जागती
पुढे चालता हीच आधार काठी
भटक्या मनाला दिशा दावती

भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.

जगण्यास लाभेल मत्ता मराठी
कमाई घडे साथ येऊन ती
कुटूंबास पोसून राहून गाठी
समाजास संपन्न देऊन ती

भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.

असण्यास मिळून सत्ता मराठी
स्वराज्यात मानात थाटून ती
घुमूनी तिचा नाद दिशांत आठी
स्वतःशीच विश्वास बाणून ती

भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे.

कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!!
आई माझी कृष्णकळीतील
विष विसरला कंस
देवकीच्याही पुढे निघाला
शुभ्र पांढरा हंस...

आई माझी रांगोळीतील
टिंब हरवली टिकली
कशास पाडू दार, कराया
भिंत घराची मधली...

माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल.....

माझी आई भिरभिर संध्या
सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा....

आई माझी अरण्यसरिता
चंद्र झुलविते पाणी
रामासाठी त्यावर लिहिते
शिळा अहिल्या गाणी...

आई माझी गाव निरंतर
पारावरती भरवी
संध्याकाळी भगवी होते
तिच्या तनूतील ओवी....

आई माझी काजळभरला रे!
मायेचा नखरा
वेणीमधली नागीण खुडते
जसा हिऱ्यांचा गजरा...

आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरजवेळी वाटत फिरतो
जोगी कुठला वेध ?

संध्येसाठी माझी आई
जपून उजळे वात
अश्वत्थाम्यापरी हिंडतो
जिथे भयंकर घात...

त्याहीनंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर.....

आई माझी झुळझुळतांना
किणकिणतीही तारा
तिच्याच पदराखाली होतो..
शालीन, शिंदाळ वारा...

माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा

~ग्रेस

कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही.

आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे.

कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा.

आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा

त्यामुळे जास्त गंभीर होत नाही.

भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

रोहन जगताप's picture

24 Oct 2024 - 1:44 pm | रोहन जगताप

सांभाळून घेतल्याबद्दल आभारी आहे.

कर्नलतपस्वी's picture

24 Oct 2024 - 2:50 pm | कर्नलतपस्वी

पु.ले.शु.