मला माहेरी येऊ दे
जीव झालाय व्याकूळ
भेट तुझी गं घेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
किती कुटुंबाचं ओझं
नाही क्षणाचा विसावा
तुझ्या कुशीत येऊन
माझा जीव शांत व्हावा
तुझ्या मांडीवर डोकं
मला हळूच ठेवू दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
भल्या पहाटे उठून
कामं आवरते सारी
सुखदुःखाचे प्रसंग
किती येती माझ्या दारी
तुझ्या मायेची गोधडी
अंगावरी गं घेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
रांधा वाढा उष्टी काढा
हेच आयुष्य चालले
तुझ्या हातच्या चवीला
किती दिस ना पाहिले
गोड घास तुझ्या हाती
मला हट्टाने जेवू दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
अंगणीचा पारिजात
मला बोलावतो आई
तुझी आठवण येता
डोळ्यामध्ये पाणी येई
माहेरचा हा सुगंध
मला सासरी नेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
श्याम माळी, बदलापूर
मो. क्र. 9730501029