मला माहेरी येऊ दे
जीव झालाय व्याकूळ
भेट तुझी गं घेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
किती कुटुंबाचं ओझं
नाही क्षणाचा विसावा
तुझ्या कुशीत येऊन
माझा जीव शांत व्हावा
तुझ्या मांडीवर डोकं
मला हळूच ठेवू दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
भल्या पहाटे उठून
कामं आवरते सारी
सुखदुःखाचे प्रसंग
किती येती माझ्या दारी
तुझ्या मायेची गोधडी
अंगावरी गं घेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
रांधा वाढा उष्टी काढा
हेच आयुष्य चालले
तुझ्या हातच्या चवीला
किती दिस ना पाहिले
गोड घास तुझ्या हाती
मला हट्टाने जेवू दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
अंगणीचा पारिजात
मला बोलावतो आई
तुझी आठवण येता
डोळ्यामध्ये पाणी येई
माहेरचा हा सुगंध
मला सासरी नेऊ दे
दोन दिस तरी आई
मला माहेरी येऊ दे
श्याम माळी, बदलापूर
मो. क्र. 9730501029
प्रतिक्रिया
2 Nov 2024 - 1:53 pm | अथांग आकाश
कविता आवडली!
15 Nov 2024 - 7:44 am | गुल्लू दादा
आवडली.
15 Nov 2024 - 11:09 am | सस्नेह
सुरेख हळवी ...!
15 Nov 2024 - 4:37 pm | कर्नलतपस्वी
घाल घाल पिंगा वार्या
माझ्या परसात
माहेरीच्या सुवासाची
कर बरसात...
आवडली.
25 Dec 2024 - 10:14 pm | चौथा कोनाडा
सुंदर कविता ... आवडली !
क्या बात .. किती चित्रदर्शी !
26 Dec 2024 - 7:30 am | कर्नलतपस्वी
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावत.