देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला. त्याला स्टेडियममधील प्रेक्षकांनी अगदी भरभरून आणि मनापासून दाद दिली. खेळात आपण माणसांनी तयार केलेल्या भिंती, देश, धर्म, जात, पात, भाषा, विरघळून टाकण्याची आणि सर्वांना माणूस म्हणून एकत्र आणण्याची, अफाट शक्ती असते, याची काल प्रचिती आली.
नीरज चोप्राचं ऑलिम्पिकमधील रौप्यपदक, अर्शद नदीमच्या ऐतिहासिक कामगिरीसमोर थोडंसं झाकोळलं गेलं हे खरं, पण आपल्या भारतीयांची देहयष्टी पाहता, कौशल्याच्या बळावर ८९ मीटरपेक्षा जास्त लांबी गाठणं, सोपं नव्हतं. अंतिम फेरीतील सर्व बारा खेळाडूंनी ८० मीटरचा, आणि त्यापैकी पहिल्या सहा खेळाडूंनी ८७ मीटरचा टप्पा पार केला, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूचं पदक अवघ्या चार सेंटिमीटरने हुकलं, यावरून अंदाज येतो, की यावेळी स्पर्धा, किती चुरशीची झाली ते.
दुसरी फेरी संपताना, सर्व प्रतिस्पर्ध्यांसमोर आता ९२.९७ मीटरचा टप्पा मागे टाकायचं, अशक्यप्राय असं आव्हान होतं, जे की सर्व जागतिक स्पर्धां मिळून, आतापर्यंत फक्त ५ वेळा शक्य झालं होतं. नीरज चोप्रा जेव्हा दुसऱ्या प्रयत्नासाठी सज्ज झाला, त्यावेळी त्याच्यावर प्रचंड दबाव होता. रात्री उशीरा जागं राहून, थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या करोडो भारतीयांच्या अपेक्षा आता टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या "गोल्डन बॉय" वर एकवटल्या होत्या. स्टेडियममधे तर अगदी Gladiator चित्रपटासारखं वातावरण तयार झालं होतं. सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. नीरज चोप्राची कौशल्यपूर्ण धाव पाहून, काही मिनिटापूर्वीचं ऑलिम्पिक रेकॉर्ड, आता सहज मागे पडेल, असं क्षणभर वाटलंही, पण भालाफेक या मैदानी खेळात कौशल्यासोबतच, अतीव शक्तीचीही कसोटी लागते; कामगिरीत सातत्य, कौशल्य, आणि समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं कडवं आव्हान, असं प्रेरणादायक वातावरण असूनही, नीरज चोप्राला ९० मीटरचा टप्पा पार करता आला नाही, पण त्याने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली, ८९.४५ मीटर. अजूनही चार प्रयत्न शिल्लक होते. अपेक्षा अजून जिवंत होत्या, खेळ पुढे सरकत होता, प्रत्येक फेरीत सर्वांच्या नजरा आता चॅलेंजर म्हणून नीरज चोप्रावर खिळल्या होत्या, आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने नीरज चोप्राने आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं खरं, पण भालाफेकीचा वेग वाढविताना संवेग/momentum वर नियंत्रण न ठेवता आल्याने, त्याचे उरलेले चारही प्रयत्न चुकले.
टोकियो ऑलिम्पिक (२०२०) स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिलेल्या अर्शद नदीमने, यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत, पहिल्या स्थानावर झेप घेतली, तर गतविजेता असलेल्या नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. आणि ग्रेनाडा या अवघ्या सव्वालाख लोकसंख्या असलेल्या कॅरिबियन देशातील अँडरसन पीटर्स, या दोन वेळा जागतिक भालाफेक स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूने, आपलं पहिलं ऑलिम्पिक (ब्राँझ) पदक मिळवलं.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात, भालाफेक खेळात वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या युरोपियन खेळाडूंना, बहुधा पहिल्यांदाच, podium finish पर्यंत पोहोचताच आलं नाही. आशियाई देशांनी आता जागतिक स्तरावर, भालाफेकीसारख्या मैदानी खेळातून, येणाऱ्या काळाची, global south ची, एक चुणूक दाखवून दिली आहे!
प्रतिक्रिया
11 Aug 2024 - 6:24 am | भागो
भालाफेक
चपखल रिपोर्टिग.आवडल. फारच छान!
11 Aug 2024 - 7:21 am | Bhakti
छान!
नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.