केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा - मुनरो आयलँड

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
2 Aug 2024 - 9:30 pm

या आधीचे भाग

1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा

4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा

      आज आम्हाला थेकडीवरून मुनरो आयर्लंड येथे जायचे होते आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वरकला इथे पोहोचायचे होते. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे लवकर उठून साडेसहा वाजताच थेकडी सोडले. माझ्या अंदाजाप्रमाणे आम्हाला मुनरो आयर्लंड ला पोहोचायला दुपारचे साडेबारा तरी वाजतील असे वाटले. वाटेत सृष्टी सौंदर्य छान होते. .

फोटो

पण आता झाडांचा प्रकार बदलला होता. मुन्नार सोडले त्या वेळेला आम्हाला चहाचे मळे पाहायला मिळत होते. आता मात्र सर्व जंगली भाग आणि जंगलामध्ये दिसणाऱ्या झाडांनी मन मोहून जात होते

फोटो

     तेवढ्यात आम्हाला एक सुंदर असा धबधबा दिसला.

धबधबा

साधारण सकाळचे आठ वाजले असतील. आम्ही इथे एक छोटा ब्रेक घ्यायचे ठरवले. हा धबधबा मात्र खाली जवळ जाऊन एन्जॉय करता येण्यासारखा होता. विशेष म्हणजे या धबधब्यामध्ये आम्हाला एक इंद्रधनुष्यही दिसले. या खालच्या चित्रामध्ये तुम्हालाही दिसेल !!

धबधबा

तरी तिथे एक पोलीस होताच . शमीभाई त्यांच्याशी मल्याळी मध्ये बोलला आणि त्याने आम्हाला खाली जवळ जाऊन फोटो घेता येईल असे सांगितले.

धबधबा

मग काय, आम्ही खुश झालो आणि शेवटी धबधब्यामध्ये भिजायचा आनंद आम्हाला मिळालाच! टायटॅनिक पोज मध्ये जॅक आणि रोज बनून आम्ही रोमँटिक फोटोशूट केले!!

फोटो

     तिथेच जवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर आम्हाला केळाचे भजे दिसले. इथेही ट्राय करूया कदाचित वेगळी चव मिळेल आणि हा प्रकार आवडेलही असे म्हणून आम्ही ट्राय करायला घेतले, तर त्याची चव अजूनच बेकार होती!! पण चहा मात्र अप्रतिम होता! साधारण वीस-पंचवीस मिनिटात आम्ही तिथून निघालो. वाटेत रबराची झाडे देखील दिसली.
फोटो

फोटो
साधारण 10 च्या सुमारास आम्ही नाष्ट्यासाठी हॉटेल शोधू लागलो. परंतु चांगले असे हॉटेल मिळेना. या मार्गावरती बरीचशी नॉनव्हेज हॉटेल्स दिसली. शेवटी एका कुठल्यातरी देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो,तिथे आम्हाला प्युअर व्हेज उडुपी हॉटेल दिसले. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथे सब्रीमलाचे बरेचसे भक्त आम्हाला दिसत होते. ते हॉटेलमध्ये जेवताना दिसत होते.
फोटो

     हे अत्यंत साधे हॉटेल होते जे माफक दरामध्ये भक्तांना जेवण देत होते. बरेचसे लोकं सांबार भात खाताना दिसले आणि पुरी भाजी खाताना दिसले. आम्ही नाष्ट्या करता विचारले, तर त्यांच्याकडे फक्त डोसा होता. डोसा सुद्धा फार काही चांगला नव्हता. परंतु त्या हॉटेलच्या मॅनेजरने आमच्यासाठी ताबडतोब गरम गरम मेदू वडे तळून काढले व फ्रेश चटणी बनवून दिली. त्या सगळ्या गडबडीत मी काही फोटो काढले नाहीत.

     नाश्ता करून आम्ही निघालो. मुनरो आयलँड मध्ये ड्रायव्हरने ओळख काढून एका नावाड्याशी बोलणी करून ठेवली होती. शमीभाईने मुनरो आयर्लंड ला कधीही भेट दिली नव्हती. त्याला हे ठिकाणच माहीत नव्हते. त्यामुळे तो देखील हे ठिकाण पाहण्यासाठी आतुर होता आणि जेव्हा आमची गाडी खरोखरीच मुनरो आयलँड मध्ये शिरली त्यावेळी खरे केरळ आम्हाला दिसले!!!

फोटो

अप्रतिम सुंदर सुंदर अशी नारळाचे झाडे आणि अप्रतिम असा अष्टमुडी बॅकवॉटरचा नजारा ……..

फोटो

फोटो

फोटो

      वा !!!! असे उद्गार आमच्या तोंडातून आपोआप बाहेर पडले. शमी भाई म्हणाला की तुम्ही उत्तम ठिकाण निवडले आहे. इतके स्वच्छ पाणी मी कधीही पाहिले नाही. अलेप्पीचे बॅक वॉटर खूप गढूळ आहे. हे ठिकाण खूपच सुंदर आहे. मी माझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन इथे नक्की येणार. हे ऐकून मी माझीच पाठ थोपटून घेतली.

फोटो

फोटो

     आता थोडं मुनरो आयर्लंड बद्दल माहिती देते. पूर्वीच्या काळी मुंड्रथुरुथ्थु नावाने ओळखले जाणारे हे बेट अष्टमुडी तलाव व कल्लडा नदी यांच्या संगमावरती वसलेले आहे. याचा इतिहास बघायचा झाला तर सन 1800 पर्यंत मागे जावे लागते. कर्नल जॉन मुनरो हे त्रावणकोरचे दिवाण होते. मलंगकारा मिशनरी चर्च सोसायटी यांना धार्मिक अभ्यास केंद्र उभारता यावे यासाठी त्यांनी आपल्या अखत्यारीतील हे बेट त्यांना देऊन टाकले. कृतज्ञता दर्शवण्यासाठी या सोसायटीने सदर बेटाला कर्नल मुनरो यांचे नाव दिले. तेव्हापासून हे बेट मुनरो आयलँड म्हणून ओळखले जाते.

फोटो

फोटो

     कल्लडा नदीतील गाळाची माती संचयित होऊन या बेटाची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला सुपीक असणाऱ्या या भागामध्ये नंतर मात्र अष्टमुडी तलावातील खारट पाण्यामुळे हा भाग शेतीसाठी नापीक होत गेला. पूर्वी या बेटावरती शेती व काथ्या(coir) बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत होते. तथापि आता हे दोन्हीही उद्योगाचे प्रमाण येथे खूप कमी झाले आहे. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे बरीचशी घरे पाण्यामध्ये बुडून जात असल्यामुळे एका अहवालानुसार सदर बेट सन 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल. याबाबतचे अनेक व्हिडिओ मी youtube वर पाहिले होते. मुनरो आयर्लंड येथे छोट्या छोट्या निमुळत्या जलमार्गातून छोट्या पारंपारिक होडीतून प्रवास करायला मिळतो.

फोटो

फोटो

अगदी पारंपारिक केरळचे दर्शन करायचे असेल तर ही जागा म्हणजे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. इथे अष्टमुडी तलावामध्ये कांदळवनांनी नैसर्गिक रित्या कमान बनवलेली आहे.

फोटो

फोटो

हा एक निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारे खारफुटी वनस्पतींनी अशा प्रकारची कलाकृती बनवणे माझ्यातरी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे स्थान म्हणजे एकमेव द्वितीय असे आहे. तिथे जाऊन येणे आणि त्या प्रकारच्या खारफुटी वनस्पती पाहणे हे माझ्यासाठी अतिशय उत्तम अनुभव होता.
     केरळमध्ये आपण अशा प्रकारचं बॅकवॉटर होडीतून अनुभवण्यासाठी आलेप्पी व पूवर हे दोन अतिशय प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यामानाने मुनरो आयर्लंड हे ठिकाण मात्र तितकेसे प्रसिद्ध नाही. परंतु त्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहून मला मात्र तिथे जाण्याची इच्छा झाली. कारण सन 2050 पर्यंत जर ते बुडून गेले तर या सुंदर ठिकाणावर आपल्याला कधी जाता येणार नाही. आलेप्पी नंतरही बघता येईल असा विचार केला. आम्हाला हाऊसबोटीमध्ये राहण्यात इंटरेस्ट नव्हता कारण मुलगा सोबत होता व त्यामुळे हालचालीवर मर्यादा येतात. तसेच आम्हाला पूवरही मिस करायचे नव्हते. आलेप्पी व मुनरो आयर्लंड या दोन्ही ठिकाणचा अनुभव एकच असणार होता. कारण मी आलेप्पिला जरी गेले तरी तिथे छोट्या छोट्या जलमार्गातूनच फिरणार होते. तथापि मी मुनरो आयलँड ची निवड केली आणि हा माझा या सहलीसाठी नियोजनाचा सर्वोत्तम निर्णय ठरला! खरंतर हे शांतता अनुभवणाऱ्या लोकांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुनरो येथे पारंपारिक पद्धतीने नाव हाकली जाते. त्यामुळे नावेला अजिबात स्पीड नसतो. नाव अत्यंत निमुळत्या रस्त्यातून जात असल्यामुळे आजूबाजूची झाडे, पक्षी अगदी पाण्यातून वाहत जाणारे साप, हे खूप जवळून दिसतात. येथील सृष्टी सौंदर्य हे तुम्हाला निःशब्द करून टाकते. नैसर्गिक कमानी पर्यंत जर जायचे असेल,तर जाता- येता जवळपास दोन तास लागतात. यासाठी एका बोटीला चालवणारा दोन ते अडीच हजार रुपये घेतो. त्यांची मेहनत बघता हा दर काही जास्त नाही. एका तासाचे 1000 याप्रमाणे साधारण हिशेब असतो. तुम्हाला नुसते छोट्या छोट्या जलमार्गातून फिरायचे असेल तर एका तासात ते एक हजार रुपये घेऊन फिरवून आणतात. परंतु जर तुम्हाला नैसर्गिक कमानी पर्यंत जायचे असेल तर मात्र जास्त पैसे द्यावे लागतात. आम्हाला नैसर्गिक कमान बघायची होती. त्यामुळे आम्ही तीन तासासाठी दोन हजार रुपये या दराने बोट ठरवली.
      मुनरो आयलँड येथे बरेच होमस्टे आहेत. इथे तुम्हाला पारंपारिक केरळी पदार्थ ऑर्डरनुसार बनवून मिळतात. येथे एक जुनी चर्च आहे, तेही पाहता येते. खरंतर या गावात नुसताच फेरफटका मारणे हा सुद्धा एक सुखाचा अनुभव असू शकतो. थोडक्यात ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गीय आहे, परंतु ज्यांना स्पीड बोट मध्ये बोटिंग करण्याची इच्छा असते लहान मुले सोबत आहेत, त्यांना कदाचित हा अनुभव आवडणार देखील नाही. परंतु खरंच सांगते आमच्या जवळपास अडीच तासाच्या बोटीच्या सहलीमध्ये मुलाने खूप एन्जॉय केले. कारण आजूबाजूला खूप सारे पक्षी, पाण्यामध्ये साप, खेकड्यांची घरे, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी सतत दिसत होत्या. नैसर्गिक कमान बघून त्याला कांदळवनांनी तयार केलेला निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला. त्याला मुळीच कंटाळा आला नाही आणि आम्हाला देखील आला नाही जेव्हा मी सर्व सहल संपल्यानंतर सगळ्यांना या सहलीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडले असे विचारले त्यावर आम्हा सर्वांचेच एकमत झाले ते म्हणजे मुनरो आयलँड !!
     सहलीचे नियोजन करताना या सर्व गोष्टींची माहिती असावी म्हणून हे सर्व मी विस्ताराने लिहिलेले आहे . आलेप्पी किंवा मूनरो आयलंड यापैकी एक निवडावे का? या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकणार नाही. कारण मी आलेप्पी पाहिलेले नाही. ते सुद्धा सुंदरच आहे आणि भविष्यात मी आलेप्पिला नक्की भेट देणार आहे. तथापि मूनरो आयलँड हे स्वर्गीय ठिकाण आहे आणि जर त्रिवेंद्रम जवळ जाणार असाल, जटायू अर्थ सेंटरला भेट देणे हा तुमच्या सहलीमधील भाग असेल, तर मुनरो आयर्लंड हे तुमच्या सहलीमध्ये समाविष्ट असायलाच हवे. मुनरो च्या कॅनो राईडमध्ये सुद्धा आम्हाला पक्षी बघायला मिळाले, बॅकवॉटरचा मी अनुभव घेतला, मग पूवर आणि मुनरो सारखे आहेत का? तर नक्कीच नाही!! पूवरचा अनुभव वेगळा आहे आणि मुनरो आयलंड चा अनुभव पूर्णतः वेगळा आहे. दोन्ही अनुभव नक्की घ्यावेत आणि अजिबात चुकवू नयेत असेच आहेत.
     आम्ही गेलो तेव्हा तो नावाडी आमची वाटच पाहत होता. आम्ही समजून गेलो की दोन तासासाठी तो किती ठिकाणाहून कुठून कुठून फिरवून आणणार आहे. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रेट सांगितले. एक तासाचे एक हजार दोन तासाच्या फेरीमध्ये रु. 2000. त्यावर आम्ही त्याला सांगितले की आम्हाला मॅगरुव्हची कमान (mangrove arc ) जी आहे तेथून जाऊन यायचे आहे. त्यावर त्यांनी अडीच हजार आम्हाला सांगितले. आम्ही घासागीस करून दोन हजार भरपूर आहेत असे सांगितले. त्यावर तो तयार झाला आणि आमची सफर सुरू झाली. फोटो

फोटो

इथे बोट हाताने वल्लवली जाते. स्पीड बोट नाही आणि त्याला खूप मेहनत लागते. तो बिचारा नावाडी बराच वयस्कर होता. त्याने एक वल्लव मला हातात दिले होते. मी मला जेवढे वल्हवायला जमेल तेवढे वल्हवत होते. p>

फोटो

मजा येत होती. अत्यंत छोट्या छोट्या कॅनॉल मधून आपल्याला नेत असताना आजूबाजूचा निसर्ग हा वर्णन करता येणार नाही इतका सुंदर असतो!!

फोटो

फोटो

खालील चित्र बरेच दिवस माझ्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून होते

फोटो

फोटो

फोटो

     कॅनॉल वरूनच रहदारीकरीता पूल बांधलेले असल्यामुळे कॅनॉल क्रॉस करत असताना जेव्हा कधी पूल येतो तेव्हा डोके खाली करून क्रॉस व्हावे लागते.
फोटो

हा अनुभव साधारण इटली मधल्या कॅनॉल रायडिंग सारखाच आहे असा रिव्ह्यू मी वाचला होता. त्याची मला प्रचिती आली.

फोटो

खूप सारे प्राणी, पक्षी, पाण्यात पळणारा साप तर खूप ठिकाणी दिसला.

फोटो
कॅनॉल च्या मार्गात काठाने असलेली घरे

फोटो

सुंदरसे पक्षी दिसले. खेकड्यांचे घर दिसले. नितळ निळे सुंदर पाणी आणि त्यातून आमची शांतपणे जाणारी नाव ……

फोटो

फोटो

फोटो

पण आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला शांततेत अनुभवायचा असेल तर यासारखा सुंदर अनुभव जगात शोधून सापडणार नाही!!! आता आम्ही अष्टमुडी तलावाच्या पाण्यात प्रवेश केला होता

फोटो

ज्यांना दोन तास शांतपणे नावेत बसण्याचे पेशंस आहेत त्यांनी ही राईड अवश्य करावी आणि मॅन्ग्रुव कमानी पर्यंत जावे.

फोटो

फोटो

आता आम्ही या कमानीच्या आत प्रवेश करते झालो ही जागा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध अशी आहे.
फोटो

याचसाठी केला होता अट्टाहास!!
फोटो

फोटो

फोटो

आता आम्ही मॅन्ग्रुव कमान क्रॉस करून पलीकडे गेलो आणि आतील कांदळवणात आम्ही बरेच फोटो काढले. त्याचबरोबर शूटिंग ही केले.

फोटो

फोटो

आता आम्ही त्याच कमानीतून परत जात असतानाचा हा फोटो आहे
फोटो

     त्यानंतर परत येत असताना आम्हाला ते एका फ्लोटिंग रेस्टॉरंट वर घेऊन गेले.
फोटो

फोटो
तिथे नारळाचे पाणी, लिंबू सरबत आम्ही घेतले आणि पुन्हा नाव वल्लवत आम्ही जागेवर आलो. परत येताना देखील अष्ट मुडी तलाव आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पुन्हा एकदा दिसले..
फोटो

खारफुटी वनस्पती.... या वनस्पतींच्या खालच्या जाड मुळांमुळेच सुनामी च्या लाटांपासून संरक्षण होत असते
फोटो

सुंदरशा नारळाच्या झाडांची रांग पहा...
फोटो

फोटो

फोटो

फोटो

छोट्या छोट्या कॅनॉल मधून नाव जात असताना दिसणारे हे सुंदर नजारे......

फोटो

      खरंच हे दोन तास आम्ही सर्वजण हिप्नोटाईझ झाल्यासारखे निसर्ग रूपाचे दर्शन करत होतो. अक्षरशः स्वर्गातून फिरून आल्यासारखे वाटले. आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयलंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते. आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा स्वप्नवत अनुभव याठिकाणाने आम्हाला दिला.

      आम्ही पुन्हा मूळ जागेवर आलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. परत फिरून आलेल्या जागा वरती आम्ही थोडे ग्रुप फोटो काढले त्यातील हा सासूबाईंचा फोटो.

फोटो

होडीवाल्या काकांची मेहनत लक्षात घेऊन आम्ही त्यांना 500 रुपये जास्तच दिले. कारण ते बोलले होते की, आताशा वयोमानामुळे त्यांना दिवसातून एकदाच नाव वल्हवणे जमते. जाताना आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये जेवणाबद्दल बोलून गेलो होतो. यांची राहण्याची सोय पण आहे असे त्यांनी सांगीतले.
फोटो

फोटो

तिथेच आम्ही गेलो. आम्ही चार थाळी ऑर्डर केल्या. थाळीमध्ये त्यांनी टॉपीओका, मिक्स व्हेज, सांबार,कढी, रस्सम अशा बऱ्याच गोष्टी दिल्या.

फोटो

      तुम्हाला सांगते, थाळीत हे सर्वात डावीकडे जे पिवळे दिसत आहे ते फोडणी दिलेले टॉपीओका आहे. इथे केरळमध्य टॉपीओका चे उत्पादन खूप होते. हे साधारण रताळ्यासारखे दिसते. पण गोड नसते. याच्यापासूनच साबुदाणा करतात म्हणे. हा प्रकार उकडून, मॅश करून खरड्यासारख्या चटणीबरोबर सकाळी नाश्त्याला खायचा इथे प्रघात आहे. त्यामुळे मला हा प्रकार खायचाच होता आणि अनायासे तो इथे खायला मिळाला. जेवण घरगुती आणि अत्यंत चांगले होते. आम्हाला खूप आवडले.

     त्यांच्याशी काही गप्पागोष्टी करून आम्ही तेथून निघालो. आम्हाला खर तर आज इथूनच वरकलाला जायचे होते . वर्कलाला सनसेट बघायचा होता. त्यामुळे तिथे सहाच्या आधी आम्हाला पोहोचायचे होते. गुगल मॅप दोन तासाचा रस्ता दाखवत होता पण एकंदरीतच दोन दिवसाचा अनुभव पाहता मी सनसेट पाहायला मिळेल की नाही याबाबत साशंक होते. शमीभाई ला आम्ही गाडी फास्ट पळवण्यासाठी सांगत होतो. त्याने शक्य तेवढी गाडी फास्ट पळवली तरी देखील आम्हाला वर्कलाला पोहोचायला सायंकाळचे पावणे सात वाजले. त्यामुळे आमचा सूर्यास्त मीस झाला.

     यात एक वाईट गोष्ट घडली म्हणजे आम्ही जे हॉटेल बुक केले होते तो ओनर फोनच घेत नव्हता. मी कॉल बॅक करतो, मी कॉल बॅक करतो असे करून तो फोन कट करायचा. त्यामुळे टेन्शनच यायला लागले, की अरे आपण आता काय करणार आहोत? झालं असं होतं की, माझे बुकिंग घेऊन, पैसे घेऊन तो मला रूम द्यायची तो विसरून गेला होता आणि आमचं बुकिंग त्याने दुसऱ्याच कुणालातरी दिले होते. शेवटी आम्ही वर्कलाला ज्यावेळी पोचलो तेव्हा त्याचा कॉल आला की मी तुम्हाला भेटायला येत आहे आणि तुमचं बुकिंग आम्ही दुसऱ्याला दिलेला आहे. तरी तुमची राहायची सोय मी दुसरीकडे करतोय. मला सुरुवातीला फारच राग आला. तरी पण मी शांततेत त्याला विचारलं की तुम्ही असं कसं करू शकता?त्यावर तो म्हणाला की तुम्हाला त्याच प्रॉपर्टी मध्ये दुसरी रूम देतोय,ती आवडली तर पहा. नाहीतर मी दुसर्या हॉटेलमध्ये तुमची सोय करून देतो .
     त्यावरती मी आम्ही जाऊन पाहिले तर आमची रूम त्याने काही परदेशी पर्यटकांना दिली होती. ते परदेशी पर्यटक तिथे काही ट्रीटमेंटसाठी आले होते आणि मी खरंच पाहिलं की ते व्हिलचेयर वरती असलेले आणि वृद्ध असे लोक होते. त्यांनी महिनाभरासाठी ते कॉटेज बुक केलं होतं. त्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झाला. आम्हाला आता जी रूम ऑफर करत होता ती नॉन एसी होती आणि बरीच वरती होती. कम्फर्टेबल पण नव्हते. त्यामुळे मी त्याला सांगितले की आम्हाला दुसरी रूम दाखवा. त्यावर त्यांनी सांगितले की इथून दुसरीकडे आमचेच एक हॉटेल आहे. तिथे मी तुम्हाला एसी रूम देतो. त्यावर आम्ही ती रूम दाखवायला सांगितले. हा एक बंगला होता आणि केवळ सतराशे रुपयात एका एसी रूममध्ये आम्ही चार जण आरामात मावू एवढे मोठ्या रूममध्ये त्याने आम्हाला ॲडजस्ट करून दिले. शिवाय ड्रायव्हरला सुद्धा वरती एक रूम रिकामी होती तिथे झोपले तर चालेल अशी सोय करून दिली. त्यामुळे आमचे पैसेही वाचले आणि नुकसान तर काहीच झाले नाही.

     आम्ही रुममध्ये सामान टाकले आणि आम्ही वर्कला बीच बघायला गेलो. खरंतर पूर्ण रात्र झाली होती आणि आम्ही वर्कलाला समुद्र पाहिला तर समुद्र अतिशय खवळलेला होता.

फोटो

      उंच कड्याजवळ (cliff) हा किनारा असून तीथपर्यंत पोहोचायला पायऱ्या उतरुन जावे लागते. आम्ही पायऱ्या उतरून खाली समुद्रापाशी गेलो. आम्ही समुद्रापासून बरेच लांब होतो,पण लाटा इतक्या जोरदार आपटत होत्या की असं वाटतच नव्हतं की याच्यामध्ये पोहायला वगैरे जाता येईल किंवा भिजता येईल. तीथली रेती पाहिली तर सपाट आणि थोड्या अंतरावर तीव्र उतार- परत सपाट रेती -परत तीव्र उतार असे दिसत होते. म्हणजे भरती आल्यावर अंदाज न आल्याने बुडण्याचा अगदीच धोका दिसत होता. तिथे कोणीही समुद्राच्या आसपास जात नव्हते किंवा गेले नव्हते. आणि अचानकच इतकी जोरदार लाट आली आणि आमच्या पायापर्यंत पाणी आले . आमच्या सारखे तीथे इतर निवांत बसलेली माणसे पण चटकन उठून मागे निघून गेली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा समुद्र घातक आहे. पाण्यामध्ये खेळण्याचा हा समुद्र नाही . केवळ लांबून बघणेच योग्य आहे. इथे उद्या यायचं नाही हे मनातल्या मनात ठरवून टाकलं.
      पुन्हा पायऱ्या चढून वरती आलो आणि फिरायला लागलो. कुठे शुद्ध शाकाहारी हॉटेल जेवायला मिळते का ते पाहत आम्ही फिरत होतो. परंतु एकही हॉटेल आम्हाला तिथे सापडले नाही. शेवटी आम्ही मुलासाठी एक आईस्क्रीम घेतलं.

फोटो

रात्रीचे 9.00 वाजून गेले होते. भूक तर खूप लागली होती. इथे नाईट लाईफ जोरावर आले होते. बरेच परदेशी पर्यटक तिथे वेगवेगळ्या कॅफेमध्ये फिरत होते. बाहेर ताजे मासे आणि तत्सम आहार घेऊन विक्रेते तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही ताजे ताजे बनवून देतो असे सांगत होते . एकंदरीतच इथले हिप्पी टाईप वातावरण पाहून लक्षात आले की आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. खरंतर युट्युब वरचे व्हिडिओ बघून मी या ठिकाणाचा समावेश माझ्या आयटनरीत केला होता. मुनोरो आयर्लंड इथे संध्याकाळी करण्यासारखे विशेष काही नव्हते त्यामुळे सगळ्यांना कंटाळवाणे होईल त्यापेक्षा वर्कला हे अजून एक ठीकाण पाहता येईल आणि इथल्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करता येतील असा विचार करून मी नाईट स्टे इथे करायचा असा विचार केला होता. तथापि हा माझ्या सहल नियोजनातील अत्यंत चुकीचा आणि वाईट निर्णय होता. तिथे गेल्या गेल्याच कळालं की येथील हवेच्या स्थितीमुळे पॅरासेलिंग सध्या बंद आहे. एकंदरीत समुद्राच्या रुद्रावतारामुळे कळालेच होतं की इथे काही वॉटर स्पोर्ट्स करण्याच्या परिस्थितीतला हा समुद्र नाही. त्यामुळे सर्फिंग तरी करता येईल का हा विषय होता. एका कॅफेच्या बाहेर फिरता फिरता आम्हाला सर्फिंगचा बोर्ड दिसला आणि एका चांगल्या डीलमध्ये आम्हाला स्वस्तामध्ये सर्फिंग एक तास करण्यासाठी आम्ही बुकिंग करून टाकले.

     शेवटी जेवण्यासाठी गुगल वरती शोधून एक अतिशय उत्तम असे हॉटेल वरकलामध्ये आम्हाला मिळाले. हॉटेल विनायक असे त्याचे नाव . इथे आम्हाला उत्तम असा मलाबार पराठा खायला मिळाला. माझ्या मुलाला तिथला मलाबार पराठा आणि पनीर मशरूमची भाजी इतकी आवडली की, यापुढे रोज आपण हेच खायचं हे त्याने जाहीर करून टाकले. त्यांना मी विचारले की तुमच्याकडे पुट्टू मिळतो का ?त्यावर ते म्हणाले की सकाळी दहा वाजेपर्यंत आमच्याकडे पुट्ट आणि कडला करी मिळते. मी एकदम खुश झाले. कारण हा पदार्थ मला मुन्नार मध्ये खायला मिळाला नव्हता.त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला इथेच यायचे हे आमचे फिक्स झाले. मस्त पोटभर जेवण करून आम्ही रूमवर गेलो. उद्या आम्हाला लवकर सात वाजताच सरफिंग साठी जवळच्या बीचवर जायचे होते. सर्फिंगचा मी चार वेळा समुद्रामध्ये बुडून घेतलेला अत्यंत थरारक आणि धोकादायक अनुभव….. जटायू अर्थ सेंटर व पूवरची अविस्मरणीय बोट राईड, तेथील सुंदर असा सूर्यास्त व गोल्डन सँड बीच चा अप्रतिम नजारा या सर्व अनुभवांचा तपशील पुढील भागात……..

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

3 Aug 2024 - 1:05 am | राघवेंद्र

मस्त चालू आहे सहल.
साधा पुट्टु कि आयस क्रीम पुट्टु पाहण्यात उत्सुक :)

श्वेता२४'s picture

3 Aug 2024 - 7:31 am | श्वेता२४

प्रतिसादासाठी धन्यवाद!!आम्ही पारंपारिक पुट्टू खाल्ला. आईस्क्रीम पुट्टू असतो का हे मला माहित नाही. तुमच्याकडूनच पहिल्यांदा ऐकत आहे.

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2024 - 2:48 pm | कर्नलतपस्वी

कोकणात तार्कर्ली बघीतलेच असेल. गरिबांचे केरळ म्हणता येईल.

भटकंती आवडली.

श्वेता२४'s picture

3 Aug 2024 - 3:53 pm | श्वेता२४

मी तारकर्ली व देवबाग अजून पाहिले नाही. बकेट लिस्ट मध्ये आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सुंदर वर्णन! खारफुटीची जंगल पाहायला पाहिजे.
निसर्ग झाडांनाही शिकवतो, आणि ते स्वतः बदल घडवतात,या जगावर राज्य करतात.खारफुटीची एक मोठी किनारपट्टी भारतात आहे.
Pnematophores/breathing roots हवेत वाढलेल्या मुळांमार्फत पाण्यात बुडालेल्या मुळांना प्राणवायू मिळतो.
viviparyम्हणजे झाडावर असतानाच बीजाचे अंकूरण होणे.
Proproots मुळं दलदलीत पसरून झाडांना उभे राहायला आधार देतात.

श्वेता२४'s picture

4 Aug 2024 - 3:38 pm | श्वेता२४

खारफुटी वनस्पतींबद्दल व त्यांच्या मुळांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.

ह्या भागाचे टायमिंग माझ्या पथ्यावर पडणार आहे 👍
येत्या १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पाच दिवसीय केरळ दौऱ्यात कोल्लम आणि वर्कला ह्या दोन शहरांत माझा मुक्काम असणार आहे. गुगल मॅप्सवर बघितले तर कोल्लम पासून मुनरो आयलंड केवळ २३ किमी अंतरावर म्हणजे तसे बऱ्यापैकी जवळ असल्याचे दिसत आहे. अर्थात पर्यटन हा सदर दौऱ्याचा मूळ उद्देश नसला तरी कमी-अधिक प्रमाणात भटकंती होणे अटळ आहे, त्यामुळे हे मुनरो आयलंड बघणे सहज शक्य होईल असं वाटतंय.

आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयर्लंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते.

पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे अलाप्पुझा (अलेप्पी) देखील छानच आहे, तुमच्या पुढच्या केरळ भेटीत ते देखिल अवश्य बघा. तिथले पुर्ण दिवसाचे जलपर्यटन आणि निसर्गसौन्दर्य आवडले आहेच पण तिथे केवळ फोटो काढण्यापुरती नाही तर चांगली मोठी दुमजली बोट थोडा वेळ चालवायलाही मिळाल्याने मला जरा जास्तच मजा आली होती 😀

1

२

३

४

५

६

७

आता लवकरच मुनरो आयलंड पण पाहिले कि मग ह्या दोन्ही ठिकाणांची तुलना करून माझे काय मत बनते ते कळवतो 😀

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

श्वेता२४'s picture

5 Aug 2024 - 9:18 am | श्वेता२४

शक्य झाले तर मुनरो आयर्लंड ला अवश्य भेट द्या. ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा. बाकी कोल्लमहून मुनरोला जाणार असाल तर अष्टमुडी तलावातून मुनरो आयर्लंड पर्यंत जलमार्ग आहे. जेट्टीने जाऊ शकता. गाडी जरी असली तरी गाडीही चढवता येते आणि आर्थिक दृष्ट्या देखील फायरशीर आहे. वेळही वाचतो .भविष्यात थेकडी व आलेपिला मी नक्कीच भेट देणार आहे. मुनोरो आयर्लंड व आलेपी याबद्दलची तुमची निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. आवर्जून लिहा.

टर्मीनेटर's picture

26 Aug 2024 - 3:13 pm | टर्मीनेटर

ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा.

जुलै अखेरीस वायनाडमध्ये झालेल्या भुस्खलनात सुमारे चारशे जण म्रूत्युमुखी पडले आणि दिडशेच्यावर लोक बेपत्ता झाले! ह्या नैसर्गीक आपत्तीत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली म्हणून ह्यावर्षी ऑगस्ट्मध्ये होणाऱ्या नावांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच मी कोल्लमला पोचलो तेव्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवत हवामान खात्याने पाच दिवसांसाठी त्या परीसरात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केल्याने अष्टमुडी तलावातले आणि त्या सर्वच परीसरातले (ज्यात मुनरो आयलंडही आले) नौकानयन हवामानखात्याकडुन पुढील सुचाना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

पण गंमत म्हणजे असे असुनही मला काही गमावल्यासारखे वाटले नाही कारण ज्या मित्राकडे माझा मुक्काम होता त्याचे घर कोल्लम पासुन दहा किलोमीटर अंतरावर अष्टमुडी तलावातील अतिशय निसर्गरम्य अशा 'थेक्कुंभगम' (Thekkumbhagam) ह्या बेटावरच्या गावात आहे. चांगल्या मोठ्या घराच्या पुढे-मागे आणि आजुबाजुला मस्तपैकी बागबगीच्या आणि पससबाग संपते तिथे अष्टमुडी तलावाचा काठ! हे घरच माझ्यासाठी एक पर्यटनस्थळ होते 😀
जमल्यास त्याबद्दल एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो.

घरामागचा अष्टमुडी तलावाचा काठ...

AM1

AM2

AM3

श्वेता२४'s picture

26 Aug 2024 - 3:25 pm | श्वेता२४

मुनरो आयलँड बद्दलची तुमची निरीक्षणे वाचण्यासाठी मी उत्सुक होते . त्यामुळे तुम्हाला तिथे जाता आले नाही हे वाचून वाईट वाटले. परंतु तुम्ही जिथे राहिला आहात तेथील फोटो बघून तुमचा तो अनुभव अगदीच काही मिस झाला नाही असेच वाटते.
जमल्यास त्याबद्दल एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो.
अगदी नक्की लिहा. ठरवून केलेल्या पर्यटनापेक्षा असे हे नैसर्गिक पर्यटन व तेथील स्थानिकात राहून मिळालेला अनुभव हा निश्चितपणे वेगळा असतो.

टर्मीनेटर's picture

26 Aug 2024 - 3:50 pm | टर्मीनेटर

ठरवून केलेल्या पर्यटनापेक्षा असे हे नैसर्गिक पर्यटन व तेथील स्थानिकात राहून मिळालेला अनुभव हा निश्चितपणे वेगळा असतो.

+१०००
ह्या दौऱ्याचा उद्देश पर्यटनाचा नव्हता, त्यामुळे पाळिव कुत्रा, ससे आणि असंख्य वेगवेगल्या पक्षांच्या सानिध्यात केलेले ह्या बेटावरचे तिन रात्रींचे वास्तव्य, त्रिवेंद्रम ते वर्कला आणि वर्कला ते कोल्लम हे कोस्टल रोडने समुद्राच्या साक्षीने केलेले प्रवास, दोन दिवस वर्कला आणि एक दिवस 'रान्नी' येथे झालेला एक लग्न समारंभ, पावसात भिजत बाइकवरुन केलेली निरुद्देश भटकंती, मागच्या एका प्रतिसादात उल्लेख केलेल्या ताडीत आणि शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेल्या तांदुळांचे अप्पम, इडी अप्पम, मलबार परोटे आणि काही पारंपारीक खाद्यपदार्थांचा घेतलेला आस्वाद ह्या सर्व गोष्टी नेहमीच्या ठरवुन केलेल्या पर्यटनापेक्षा वेगळाच आनंद देउन गेल्या...

अगदी नक्की लिहा.

एक चित्रलेख पाडण्याचा प्रयत्न करतो 😀

प्रचेतस's picture

6 Aug 2024 - 9:22 am | प्रचेतस

हा भाग सर्वात जास्त आवडला.
केरळचं खरं निसर्गसौंदर्य ह्याच भागात दिसलं.

श्वेता२४'s picture

6 Aug 2024 - 1:11 pm | श्वेता२४

केरळचं खरं निसर्गसौंदर्य ह्याच भागात दिसलं.
हे मात्र अगदी खरं. आम्हालाही तसंच वाटलं. प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

गोरगावलेकर's picture

6 Aug 2024 - 1:18 pm | गोरगावलेकर

मुनरो आयलंड आवडले . माझ्या दोन्ही मुलींनी दोन वेगवेगळया वेळी येथे भेट दिली आहे त्यांच्याकडून या ठिकाणाची थोडीफार माहिती मिळाली होती पण आपल्या लेखामुळे तपशीलवार माहिती मिळाली . फोटो मस्तच .
अलेप्पीला भेट दिली आहे. त्यावेळी तेही ठिकाण खूप आवडले होते . टर्मिनेटर भाऊंनी म्हटल्याप्रमाणे आमच्याही ग्रुपने एका भल्या मोठ्या दुमजली बोटीवर ( (सहा बेडरूम असलेल्या) फेरफटका मारत २४ तास व्यतीत केले होते व काहींनी बोट चालवायचा आनंदही लुटला होता .

श्वेता२४'s picture

6 Aug 2024 - 2:56 pm | श्वेता२४

प्रतिसादासाठी धन्यवाद. खरंतर मुनरो आयलंड हे आलेपीच्या मानाने खूप कमी गर्दीचे व जास्त व्यावसायिकीकरण न झालेले ठिकाण आहे. त्यामानाने आलेपी हे पूर्णतः विकसित असे व्यावसायिकीकरण झालेले ठिकाण आहे. तुलनेने आलेपीला करण्यासारखे बरेच काही आहे. उदाहरणार्थ जरी हाऊसबोटीमध्ये राहायचे नसले तरी तेथील समुद्रकिनारा देखील प्रसिद्ध आहे. तिथे कॉइर म्युझियम म्हणजेच काथ्याच्या पासून केलेल्या वस्तू चे संग्रहालय आहे. हाऊस बोट मध्ये राहणे हा स्वतःच एक वेगळा अनुभव आहे. परंतु मुनारो आयलँड येथे मात्र कॅनॉल रायडिंग शिवाय अन्य काही ऍक्टिव्हिटी नाहीत. म्हणायला जवळ कोल्लम येथे अष्टमुडी तलाव येथे सरकारमान्य दरात अनेक वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत. जसे की बनाना रायडिंग, फास्ट स्कूटर रायटिंग, वॉटर जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तथापि फक्त मुनोरो आयलंड हे शांततेत फेरफटका मारण्यासाठी व ग्रामीण केरळ अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणांचा अनुभव हा वेगळा असेल असे मला वाटते.

श्वेता२४'s picture

7 Aug 2024 - 10:48 am | श्वेता२४

कृपया धागा 'भटकंती' या सदरात हलवावा.

श्वेता व्यास's picture

14 Aug 2024 - 11:21 am | श्वेता व्यास

छान चालू आहे सहल, मुनरोची भटकंती आवडली.

श्वेता२४'s picture

14 Aug 2024 - 7:43 pm | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2024 - 11:55 am | चौथा कोनाडा

वा ... सुंदर !
Heartwram124
धन्यवाद .. प्रचि आणि वृतांत .. अप्रतिम मेजवानी दिल्याबद्द्द्ल !

श्वेता२४'s picture

30 Aug 2024 - 2:54 pm | श्वेता२४

धन्यवाद चौ.को.