परबची अजब कहाणी---६
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
(भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
(भाग—५ https://www.misalpav.com/node/52373)
(माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे. ह्या नंतर कथा काय वळण घेते, परब सारीकेचा खून का करतो? हे मलाही माहित नाही. कारण परबने मला पाठवलेला दस्तावेज एव्हढाच आहे. तेव्हा मी तरी काय लिहिणार? पण ह्या कथेचा शेवट काय होणार आहे त्याचा अंदाज मी करू शकतो. तो लिहून मी ही मालिका समाप्त करत आहे.
---------आपला नम्र भागो पाटील.)
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
फ्रेनी श्वास रोखून सगळं ऐकत होती. परबची एकूण स्क्रीझोची पराकोटीची केस होती. त्याला भ्रम होत होते, दृश्ये दिसत होती. आवाज ऐकू येत होते. दोनी मिळून तो एका निराळ्या दुनियेत वावरत होता. त्याचं खास स्वतःच जग होतं. ह्या जगातून त्या जगात त्याची ये जा चालू होती.
पण सारिकाचा खून केल्यावर त्याची थिअरी तोंडावर आपटली होती. तिची डेडबॉडी पोस्ट मॉर्टेम होऊन नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आली होती. अंत्यसंस्कार निर्विघ्न पार पडले होते. ह्या बद्दल परबचे काय म्हणणे होते.
“परब, सारीकेच्या खुनात नेमके काय घडले?”
परब सांगू लागला.
फ्रेनी, सारीकेला मोक्ष देऊन मी हॉटेलवर परत आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले असतील. शांतपणे जेवण उरकले. एक कडक कॉफी पिऊन गाढ झोपी गेलो.
रात्री केव्हातरी दरवाज्याची बेल वाजवली. माझी झोप डिस्टर्ब झाली. घड्याळात साडे तीन वाजले होते.
अश्या ह्या मनहूस अभद्र वेळी कुणाला बरे माझी आठवण झाली असावी?
दरवाजा उघडला तेव्हा दरवाज्यात पोलीस!
“मिस्टर परब, तुम्हाला सारीकेच्या खुनाबद्दल अटक करण्यात येत आहे.”
होय, माझ्या थिअरीला मोठा धक्का बसला होता.
Sarika was real!
म्हणजे ह्याचा अर्थ असा होता कि ह्या जगात काही लोक रिअल होते आणि पण बरेचसे लोक डमी होते.
फ्रेनी. माझा खटला कोर्टात उभा राहील, सरपोतदार साहेब, तुम्ही. तुमच्या प्रयत्नाना यश येऊन, मी वेडा आहे असा निष्कर्ष काढला जाईल आणि माझी रवानगी रामन राघव प्रमाणे वेड्यांच्या इस्पितळात होईल. पण कदाचित दैवाचे फासे उलटेही पडतील आणि मला फाशीची शिक्षा ठोठावली जाईल. पण फाशी अमलात येई पर्यंत चार पाच वर्षे सहज निघून जातील.
मला हा अवधी पुरेसा आहे.
मला संशय आहे कि “श्री होम्स” ही त्या लोकांची फ्रंट आहे. कोण आहेत हे लोक? माझी थिअरी अशी आहे कि
---सध्या खर तर भविष्य काळतील समजा ३००० साल चालू आहे. नेमके कुठले साल चालू आहे? ही गोष्ट महत्वाची नाही.
---ह्या काळातील मानव अत्यंत प्रगतीशील आहेत. त्यांनी शक्तिशाली संगणक निर्माण केले आहेत. त्या संगणकांच्या सहाय्याने त्यांनी आपली ही दुनिया निर्माण केली आहे. आपली अशी समजूत करून दिली आहे कि सध्या २०२४ साल चालू आहे. हे सर्व कशासाठी केले जात आहे? आणि काही रिअल लोक इथे देखरेख करण्यासाठी नेमले आहेत.
ह्याबाबत माझे काही तर्क आहेत. पण कदाचित सत्य वेगळेच असेल. त्यामुळे आत्ता काही बोलण्यात अर्थ नाही.
असे असेल कि त्या अतिप्रगत मानवांनी अनिर्बंध, धुंद, बेधुंद वागणुकीचे परिणाम काय होउ शकतात हे जाणण्यासाठी हा एक्सपेरीमेंट सेट केला असेल. आपण ह्या खेळातले खेळाडू. त्यांनी जसे आपले प्रोग्रामिंग केले आहे तसे वागणारे.
हजारो शक्यतांमधली ही एक शक्यता!,
प्रॉब्लेम काय आहे ना फ्रेनी, कि कधीतरी लाखात एक “खेळाडू” “जागृत” होतो आणि “खेळियाचा” शोध घेण्याचा प्रयत्न करतो. अशा “खेळाडू”वर लक्ष ठेवण्यासाठी काही रिअल माणसे!
आता मात्र फ्रेनीचे विचारसत्र वेगाने सुरु झाले. “आपण समजत होतो तसा हा वेडा नाही. ह्याच्या प्रवासाचा हा जवळ जवळ अखेरचा टप्पा आहे. ह्याला इथेच थांबवायला पाहिजे.”
“परब.एक मिनिट, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. ही मी गेले आणि आले.”
“नो प्रॉब्लेम. टेक युअर टाईम”
फ्रेनी बाहेर आली आणि तिने नंबर फिरवला.
“हलो, रावजी काका. पराग साहेबराव परब. जन्म तारीख अमुक सप्टेंबर वीसशे दोन. रंग गव्हाळ. चेहरा ऑर्डीनरी. डोळ्यांचा रंग काळा. फाईलमध्ये फोटो असेल. मला मेल कर.”
फोटो आला. परफेक्ट मॅच.
“ओके रावजी काका. ह्याला रीअॅलीटीमधून डिलीट करा.”
परबची ती शेवटची भेट होती. एकाएकी परबच्या छातीतून मरणाची वेदना उमटली.
परबला मृत्यूची जाणीव झाली. काय झाले आहे ह्याची त्याला जाणीव झाली. फ्रेनीवर आपण विश्वास ठेवला ही आपली केव्हढी मोठी चूक!
“फ्रेनी, मॅडम.तुम्ही माझा घात केलात. माझ्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता. ह्या अखेरच्या क्षणी मला इकारसची कथा आठवते आहे. त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्याला सूर्याचे रहस्य जाणून घ्यायचे होते, त्याच्या बाबांनी त्याला पंख बनवून दिले. आणि एक शहाणपणाचा सल्ला दिला. सूर्याच्या जवळ उड्डाण करू नकोस. माझ्या बाबांनीही मला “पंख” दिले पण शहाणपणाचा सल्ला नाही दिला. आणि दिला असता तरी काय झाले असते? इकारसचे जे भविष्य ते माझेही. मीही सत्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला. मग माझाही शेवट असाच होणार होता. मॅडम, मी चाललो आहे. पण... माझा हा संदेश त्यांना सुपूर्द करा. त्यांना एव्हढेच सांग कि “डू नॉट बी सो प्राउड.” आज तुम्ही जिंकला आहात. उद्या मी जिंकणार आहे”
परबच्या तोंडातून शब्द मोठ्या कष्टाने बाहेर पडत होते. त्याचा आवाज आता दूर दूरहून येत होता.
“फ्रेनी, माझे पाय कुठे आहेत? माझे पंख? ते कुठेत? फ्रेनी काय केलेस तू हे? मी तुझ्यावर विश्वासून माझी कथा तुला सांगितली. कुणी कुणावर विश्वास ठेवणे चूक आहेका? तू त्याच्या पैकी एक आहेस हे आता समजतंय.”
“बेटा, थोडा त्रास होईल पण मी तुझी मुक्तता केली आहे. जा बेटा. बाय...हॅव अ नाईस अँड कम्फर्टेबल डेथ!”
फ्रेनी थोडा वेळ थांबली. शरीर विरून जायला थोडा वेळ लागतो. अर्धा तास.
पूर्ण खात्री करण्यासाठी तिने बाबासाहेबाना फोन केला. काही काही केसेसमध्ये काय होत कि काही धागे लटकत रहातात. रेफरन्स शिवाय.
“मिस्टर बाबासाहेब सरपोतदार, मी फ्रेनी बोलतेय. त्या परबच्या केस बाद्दल बोलायचं होतं.”
फ्रेनीची अशी अपेक्षा होती कि सरपोतदार सर म्हणणार,
“कोण परब? नाही माझ्या ऑफिसमध्ये कोणी परब नव्हता. आपला गैरसमज झाला असणार. इट्स ऑलराईट. तसदी कसली हो. होतं असं कधीतरी. मोस्ट वेलकम. नाईस टॉकिंग टू यू.”
त्या ऐवजी पलीकडून थंड प्रतिसाद आला,
“वेल डन फ्रेनी.”
Zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
तर मंडळी, पराबचा अवतार इथे संपला. परब वेडा होता का? त्याला भ्रम होत होते का? त्याला आवाज ऐकू येत होते का? आपल्याला मॉनिटर केले जात आहे अशी त्याची भावना झाली होती.. ही तर स्क्रीझोची खास लक्षणे आहेत.
का त्याला सत्य समजले होते?
त्या साठी कथेचा उत्तरार्ध वाचावा लागेल.
आता ही कथा ह्या जगात सरपोतदार, फ्रेनी आणि ओ येस मी. आम्हा तिघांनाच माहित आहे. मला कशी माहित?
हे पण सांगायला पाहिजे का?
(समाप्त? ओ नो, नेवर से “द एंड.”)
प्रतिक्रिया
28 Jul 2024 - 12:49 pm | गवि
वाह वा ... लै भारी..
28 Jul 2024 - 1:10 pm | कर्नलतपस्वी
खुपच भारी.
कथा वाचताना मला सुद्धा कधी परब,कधी फ्रेनी तर सरपोतदार आहे असे वाटत होते. म्हणजे कधी स्क्रिझो तर कधी सामान्य. प्रवाही कथा.