परबची अजब कहाणी---४

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
23 Jul 2024 - 12:45 pm

( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)

फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता.
“साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले.
माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता.
“लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून? माझ्या कडून म्हणाल तर मी कुणाशीही उधार उसनवारी करत नाही. कुणाकडून घेत नाही कुणाला देत नाही. बँकेकडून पाहिजे असेल तर चार नंबरच्या मोने बाई आहेत, त्यांना भेटा. मला माझे काम करू द्या.”
“सर मोने बाईंनीच मला आपल्याकडे पाठवलं आहे.”
त्याने टेबलावरच्या इंटरनकॉमची बटणे दाबली.
“मोने बाई, तुम्ही ह्या इसमाला...”
“सर इसम नाही. माझं नाव परब आहे. परब.” मी मधेच बोललो.
“तेच ते. बाई, तुम्ही ऐकताय ना. तुम्ही या परब नावाच्या इसमाला माझ्याकडे का पाठवलय? तुमच्या लेवलला तुम्हाला असली कामे निपटता येत नाहीत? प्रत्येक वेळेला माझी गरज का पडतेय? बँकेन तुम्हाला कशासाठी ठेवलय? ऑं? नुसता पगार खाऊन खुर्ची गरम करायला? ...... बघतो मी.” आता माझ्याकडे बघून, “बाई म्हणतात कि तुमच्याकडे आधार कार्ड नाहीये म्हणून. जा आधार कार्ड घेऊन या आणि मग चार नंबरला भेटा. जा आता.”
“त्याचं काय आहे सर, आधार कार्डला माझा तात्विक विरोध आहे. माझ्याकडे व्होटर आयडी आहेना आणि आरबीआयच्या सर्क्युलरप्रमाणे...”
“वा वा. आमचा पण तुम्हाला कर्ज देण्यास तात्विक विरोध आहे. तुम्ही असं करा. आरबीआयकडूनच कर्ज घ्या ना. बघा देतात का. आता जा माझा वेळ खाऊ नका. मला माझे काम करू द्या.”
क्षणभर वाटले कि ह्या खत्रूड झुरळाला इथेच मनोबलाने चिरडून टाकावे का? ह्याला जगायचा काय हक्क आहे? हा असला काय आणि नसला काय, कुणाला काय फरक पडणार आहे?
पण त्याचे काय आहे ना कि माणूस म्हणजे किल्ल्यांचा जुडगा नाही कि फौंटनपेन नाही. तो सजीव आहे, tयाला भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे. त्याला बायकापोरे असतात, नाते वाईक असतात, जिथे काम करतो तिथे संबंध असतात. समाजात बांधिलकी असते. मला काय म्हणायचे आहे कि समजा तो एखाद्या कट्ट्याचा मेंबर आहे, एखाद्या दिवशी कट्ट्यावर हजेरी लावली नाही तर लगेच फोना फोनी सुरु होते.
“अरे कुठे हुंदाडतोयस?” इत्यादी. ह्या सर्व “बंधना”तून त्याला “मुक्ति” द्यायची झाली तर मनोबला बरोबरच शाररीक बलाचाही वापर करावा लागणार.
आज ते “शाररीक बळ” माझ्या पाशी नव्हते. म्हणून मी हतबल होतो.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याला भेटायला गेलो. सरळ त्याच्या केबिनमध्येच घुसलो.
“अरे तू पुन्हा आलास?” आता तो अरे-तुरे वर आला होता.
“सर, आपल्यासाठी भेट वस्तू आणली आहे.”
त्याची अधाशी नजर माझ्या बॅगकडे गेली.
“तू काय मला लाच द्यायचा प्रयत्न करतोयस काय? बरं, बघू काय आणलं आहेस?”
“बघा ना सर. खास तुमच्यासाठीच आणली आहे.” मी बॅगमधून पिस्तुल काढून त्याच्यावर रोखले, “आवडली का गिफ्ट, सर?”
गजाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. मला वाटत त्याने ओरडायचा प्रयत्न केला असावा पण आवाज बाहेर पडला नाही. फक्त जबड्याची उघड झाप झाली.
“ही गिफ्ट तुमच्या हृदयाला भिडेल.” एव्हढे बोलून मी त्याच्या हृदयावर नेम धरून पिस्तुल झाडले.
अशा प्रकारे श्री गजानन सदावर्ते, मॅनेजर, खारमहाल ब्रँच, फनजॉब बँक याचे अस्तित्व संपुष्टात आले होते. मी संपुष्टात आणले होते.
मी थोडा वेळ तिथेच थांबलो. माझे सामान आवरून मी शांतपाने केबिनच्या बाहेर पडलो. जणू काही झालेच नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा ब्रँचमध्ये जाऊन मोने बाईच्या समोर उभा राहिलो.
“मला सदावर्ते साहेबांना भेटायचे आहे.”
“सदावर्ते? कोण सदावर्ते?”
“अहो बाई, तुमचे ब्रँच मॅनेजर! मी परब. कालच मी त्यांना लोनसंबंधात भेटलो होतो. त्यांनी मागितलेले कागद घेऊन आलो आहे.”
“मिस्टर परब, तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. इथे कोणी सदावर्ते फिदावर्ते नाहीयेत. गेली दोन वर्षे झाली. लोटलीकर ब्रँच मॅनेजर आहेत.”
“ओह माय. माझी ब्रँच चुकली असणार. एनिवे थँक यू हं मॅडम.”
मी समाधानाने बाहेर पडलो. सदावर्ते त्याच्या सर्व कनेक्शन्ससह विस्मृतीत गेला होता. म्हणजे असं कि ह्याने कधीतरी बोर्डाची परिक्षा पास केली असणार, पदवी परिक्षा पास केली असणार पण आज जर तुम्ही ह्याचे रेकॉर्ड शोधायचा प्रयत्न कराल तर तुमच्या हाती शष्प देखील लागणार नाहीये.
सो आय वाज राईट!
पण माझ्या प्रयोगांमुळे विश्वाचा समतोल ढासळला असावा. कुणीतरी माझ्या प्रयोगांची दखल घेतली असावी. जर लोकांना सत्य समजले तर विश्वाचा डोलारा कोसळला असता. सदवर्तेच्या (आणि इतरही) प्रयोगाचे पडसाद उमटायला सुरवात झाली.
माझ्यावर नजर ठेवली जात असावी अशी तीव्र जाणीव मला झाली. माझा पाठलाग केला जात होता. माझा पाठलाग करणारे दिसत नव्हते पण त्यांची कुजबुज ऐकू येत होती. माझा “सिक्स्थ सेन्स” जागृत झाला होता. विचार करत होतो, कोण असावेत हे लोक?
त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न मी सुरु केला.
मला माहित होते कि आता फक्त काही दिवसांचा प्रश्न होता. “ते लोक” लवकरच स्वतःहून पुढे येतील. स्वतःला रीवील करतील. अशी माझी खात्री होती. कदाचित माझ्याशी समझोता करायची त्यांची इच्छा असावी. आणि अगदी तसेच झाले. पहिली हालचाल त्यांनीच केली.

Zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

कथा

प्रतिक्रिया

आयडिया भन्नाट. पण विज्ञान किंवा गूढ कथेच्या मानानेही जsर्रा फार फेच्ड वाटली. मनुष्य म्हणजे फक्त शैक्षणिक सर्टिफिकेट आणि सरकारी रेकॉर्डस इतकेच नसते. तो इतर अनेक लोकांच्या आयुष्याशी जोडला गेलेला असतो. त्याला इतर नातेवाईक असतात. तो मुलेबाळे पैदा करतो. आपल्याला अमुक नावाचा बाप होता ही मेमरी देखील कोणा पोराच्या मनातून पुसली जाईल आणि बाप कधी नव्हताच असे काही तिथे ओव्हर राईट होईल, आणि जग बिनबोभाट जगत राहील हे जरा....

भागो's picture

23 Jul 2024 - 4:43 pm | भागो

गवि सर
आभार.
माणसाच्या सामाजिक बांधीलकीचा मुद्दा मी कथेत घेतला आहेच.
ही कथा म्हणजे फँटसी आहे का? विज्ञानाचा आणि कथेचा कितपत संबंध आहे?
सर तुम्ही सॉलीप्सिझमबद्दल वाचले असणारच. तरी पण ज्यांनी वाचले नसेल त्यांच्यासाठी,
Solipsism is the philosophical idea that only one's mind is sure to exist. As an epistemological position, solipsism holds that knowledge of anything outside one's own mind is unsure; the external world and other minds cannot be known and might not exist outside the mind. Wikipedia
ह्या विषयी आंतरजालावर खच्चून मतिरिअल अवेलेबल आहे.
हे झाले पाश्चात्य तत्वज्ञान. पण पौर्वात्य आणि झेन तत्त्वज्ञानातही हा विचार आहे.
"ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या" म्हणजे काय?
अजूनही एक विचार आहे. Do we really exist ?
का आपण कोणाच्यातरी खेळातील पात्रे आहोत?
हा झाला सिम्युलेशन हायपॉथेसिस.
हा खूप मोठा विषय आहे. मी तो गोष्टी रुपात आणायचा प्रयत्न केला आहे.

अत्यंत भारी विषय. आता या दृष्टीने पुढे वाचतो. तुम्ही नवीन प्रयोग करत रहा.

भागो's picture

23 Jul 2024 - 6:09 pm | भागो

https://www.misalpav.com/node/49975
"जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी"
वाचली नसेल तर अवश्य वाचा.

सौंदाळा's picture

23 Jul 2024 - 3:15 pm | सौंदाळा

जबरदस्त कल्पना.

भागो's picture

23 Jul 2024 - 4:45 pm | भागो

आभार.
अनेकांचे आभार मानणे आहेच. ते कथेच्या शेवटी करणार आहे.

श्वेता२४'s picture

26 Jul 2024 - 2:37 pm | श्वेता२४

आता या कथानकात अजून काही पात्रांची एन्ट्री होणार की अजून काही? याची उत्सुकता लागली आहे..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत

उत्सुकता वाढली असल्याने दोन भागांत ग्याप वाढवू नये अशी विनंती.

धन्यवाद.