भेटीलागी जिवा

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
30 Jun 2024 - 8:29 pm

भेटीलागी जिवा

दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं.
त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस .
दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात .
वेगळ्या मार्गाने ! ...
शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ...
वारकरी , त्यांच्या दिंड्या , त्यांचे ट्रक, तुळशी - वृंदावनं , विणेकरी , भजनं ,टाळ -मृदंग , भजनी ठेका .
त्याच्या काळजाचा ठेका मात्र चुकलेला असतो .
त्याच्याही डोक्यात तिच्या आठवणींची वारी सुरु असते . आणि मनाला आस ...
---------------
त्यांचा जुना वाडा होता . पुढे तीन मजली माडी . मागे आतमध्ये अंगण . अंगणाच्या एका बाजूला घरांची रांग . सगळी रिकामी . एकदा त्याच्या वडलांनी भाडेकरू ठेवायचा निर्णय घेतला आणि अनुचं कुटुंब रहायला आलं .
एकदम कूल पोरगी !
त्याला वडलांचा निर्णय खूप आवडला .
दोघांची नजरानजर होऊ लागली . मग बोलणं होऊ लागलं .
त्यादिवशी पालख्यांचं आगमन होतं . दोघांच्या घरातली सगळी मंडळी दर्शनाला गेलेली . वाड्यात दोघेच .
त्याला आज संधी मिळाली . त्याने त्याचं मन व्यक्त केलं . ती काहीच बोलली नाही . त्याला काहीच कळेना .
तो सरळ पुढे झाला व त्याने तिला मिठीत घेतलं .
तिने विरोध केला नाही .
-----
दोघे एकमेकांच्या सहवासात आनंदी असायचे .
पण पुढे तिने वाडा सोडला आणि संपर्कही .
तिच्यानंतर वाड्यात आणखी भाडेकरू आले होते . त्यांच्या मुला-मुलींच्या संपर्कात ती असायची . पण याच्या नाही .
कारण ? - माहिती नाही .
-----
त्यादिवशी पालख्या येणार होत्या . तो सकाळपासून बाहेरच होता . संध्याकाळी तो वाकडेवाडीला पोचला . वारी येत होती . त्याला वाटलं - आपणही वारीमध्ये सामील व्हावं म्हणजे तरी आपल्या मनाला बरं वाटेल . तोही चालू लागला .
त्याच्या शेजारी एक आजोबा होते . वयस्कर , गावाकडचे , हे मोठा टिळा लावलेले . पण थकलेले , तरी ते चालत होते .
तो त्यांच्याकडे पाहून हसला. तेही हसले . म्हणाले ,' दरवर्षी येतो . आता एकच इच्छा - वारीमध्येच भगवंताने बोलवून घ्यावं '
तो म्हणाला , ' असं म्हणू नका आजोबा, त्यापेक्षा ग्यानबा -तुकाराम म्हणा .'
ते डेक्कनला पोचले आणि आजोबा पडले की खाली . त्याने आरडाओरडा केला . त्यांना बाजूला घेतलं गेलं तिथे आरोग्य पथक होतं .
नशीब ! त्यांना फार काही झालं नव्हतं , थकवा आला होता एवढंच . नर्सेस त्यांना पहात होत्या . मागून एक डॉक्टर चालत आला . बरोबर एक तरुणी . ती त्याची बायको असावी , हे कळत होतं .
ती अनू होती ...
वारकऱ्यांचा प्रवाह थोडाच थांबला होता . ते चालतच होते, एकामागे एक .
तो मनाने -ते आजोबा झाला होता .
पालख्या खूप पुढे निघून गेल्या होत्या .
--------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

1 Jul 2024 - 6:59 pm | कर्नलतपस्वी

मन मनास उमगत नाही
अदमास कशाचा घ्यावा

अंदाज चुकला वाटतं.

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 Jul 2024 - 10:12 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळी खूप आभार .

कर्नलजी
तुमच्या प्रतिक्रिया खूप मस्त असतात .
भारी अन काव्यात्म .