लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.
![]() |
छायाचित्र जालावरुन साभार
|
लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या दिवशी सुरवातीच्या निकालपूर्व अंदाजात 'वाराणसी मे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पिछे चल रहे' या बातमीचा तर, कमाल धक्का बसला होता.पंतप्रधान कसे बसे दीड लाखाच्या मतांनी ते विजयी झाले. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं जनतेचं अभिनंदन करावी अशी गोष्ट वाटली, ज्यात फैजाबाद अयोध्येतील जनतेने आणि राम भक्तांनी 'देव भक्ती वेगळी आणि राजकारण वेगळं' हे दाखवून दिलं आणि अयोध्येत भाजपचा पराभव केला. प्रत्यक्ष रामालाही रामावरून केले जाणारे राजकारण आवडलं नसावं. चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारला अच्छे दिन आलेत त्यांचंही अभिनंदन. लोकसभेत लोकांनी एक वेगळाच निकाल दिला. सर्वाधिक जागा मिळून भाजपा सत्तेत नाही. इतर पक्षाच्या आधाराने सत्ता येत आहे तर, इंडियाने जी देशभर आघाडी घेतली त्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा कमी असूनही त्यांचा उत्साह नक्कीच वाढला आहे, लोकशाहीत जनतेला ग्रहित धरायचं नसतं, हे अत्यंत सुखद आहे.
विविध राज्यातील बहुमतांतील सत्ता उलथवणे, इडी,सीबीआय, आयकर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकून विरोधकांचा आवाज दाबणे, नेत्यांना तुरुंगात टाकणे. पक्ष फोडणे, पक्ष चोरणा-यांना मदत करणे, भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणे त्याला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देणे, अशा असंख्य गोष्टी सरकार करीत होते आणि जनता सगळं गप्प राहुन बघत होती. लोकांनी मतदानाच्या माध्यमातून बदल करुन एक प्रतिक्रिया दिली आहे. एक पक्ष आणि एक मालक असावे अशा प्रकारचे सद्य सरकारचे वागणे होते. सर्व 'फोकस' ध्यानधारणेच्या वेळेस जसा होता तसा पक्षीय 'फोकस' 'सरकारी फोकस' सर्व आपल्यावर असावा दुसरा त्यात नसावा अगदी क्यामे-यातही दुसरा कोणी नसावा इतकी मतलबी वृत्ती लोक पाहत होते, आता आघाडी सरकार असल्याने 'हम करे सो कायदा' याला मर्यादा येणार आहेत, मनमानी पद्धतीने वागता येणार नाही.
भारत देशाचे पंतप्रधान म्हणून जे बोलण्याचे, जवाबदारीचे, प्रतिष्ठेचे पदाचे कायम ठेवले पाहिजे. असे ते भान मा. पंतप्रधान यांनी गमावलेले निवडणूकीत दिसले, जे की दुर्दैवी वाटत होते. भारतीय प्रसारमाध्यामधून स्क्रीप्टेड मुलाखती आणि प्रचारादरम्यान केलेली विधाने ही तर, देशाच्या पंतप्रधानांकडून निव्वळ थट्टा होती. गाय, गोबर, हिंदू-मुस्लिम, मंगळसूत्र, अल्पसंख्याक, मासे, मटण, मुजरा आणि सर्वात म्हणजे म.गांधी यांच्यावरील तर विधान अतिशय दु:खदायक असे होते. महाराष्ट्रात सतरा ठिकाणी पंतप्रधानांच्या सभा झाल्या त्यात केवळ तीन ठिकाणी विजय मिळवता आला, यावरून प.मोदींची लोकप्रियता कमी होत चालली आहे असे म्हणायचे की निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसते तर ती लोकांच्या प्रश्नांची निवडणूक असते असे म्हणता येते. गत, सरकारच्या 'अब की बार चारसो पार' च्या गल्लीबोळातला घोषणांनी जी काय रया जायची ती गेलीच आहे. आता तोही एक एक स्टॅटर्जीचा भाग म्हणायचा तरी, बंगालमधेही अशीच रणनीती अवलंबवली होती, तेव्हा अधिक विजयासाठी अशा प्रसिद्धीची घोषणा आवश्यक असली तरी 'अब की बार चारसो पारचा' आवाज आता म्यूट झाला आहे.
सामान्य जनतेला वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. कोणताही पक्ष असो वा सरकारे, जगण्या-मरण्याचे प्रश्न कायम सुटत राहिले पाहिजे असे जनतेला वाटत असते. आपण जेव्हा अशा प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे लोकांना घेऊन जाऊ पाहतो, तेव्हा काही काळ लोक भावनिक होतातही, पण हीच जनता आपली जेव्हा फसवणूक होते आहे, असे वाटते तेव्हा मतदानाच्या माध्यमातून बदल करते हा धडा या निवडणूकीने दिला.
शेतक-यांचे आंदोलन, चौकाचौकात खिळे ठोकून शेतक-यांची केलेली मोर्चाबंदी, केलेला गोळीबार, मणीपुरामध्ये चाललेली जाळपोळ, महिलेची काढलेली नग्न धिंड, करोना काळात अचानक निर्णय घेऊन हजारो-लाखो जनतेच्या मृत्युपंथास घेऊन जाणारे अचंबीत करणारे निर्णय. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणाचे आरोप, त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना फरफटत घेऊन जाणे, राजकारणाचा स्वार्थ हेतू ठेवून डोळ्यावर झापडे बांधून घेणे, हे मुख्य माध्यमांतून येत नसले तरी जनतेने पर्यायी माध्यमांचा वापर करून सरकार विरोधी रोष कायम ठेवला, टीका करीत राहिले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकार मात्र दुर्लक्ष करीत राहिले.
दहा वर्षात ज्या काही योजना सरकारने आणल्या त्या निश्चितच स्पृहणीय असतील त्या जनतेसमोर अधिक सक्षमपणे ताब्यात असलेल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत घेऊन जाता आले असते. तीनशे सत्तर कलम, देशभरातील रस्ते, शेतक-यांसाठीच्या विविध योजना, महिलांसाठीच्या योजना आणि अनेक गोष्टी आहेत पण त्याचा वापर निवडणूकीत करून घेता आला पाहिजे. अग्निवीर सारख्या फसव्या योजना, नवे शैक्षणिक धोरण, जनतेचे आरोग्य, तरुणांच्या नोकर भरतीची बंद झालेली दारे उघडणे अजूनही सरकारला शक्य आहे.
गत निवडणुकीत एकमेकांना शिव्या घालणारे, अजिबातच भरवसा नसणारे पक्षांना घेऊन आता नवे सरकार स्थापन होणार आहे, असे दिसते. मुल्यहीन राजकारण, अजिबातच विश्वास नसणारे राजकर्ते, राजकारणातील नैतिकता, क्षणाचा भरवसा नसणारी मतलबी स्वार्थी माणसं सर्वच पक्षात आहेत तेव्हा अशावेळी हे सरकार नवे आव्हानांना सामोरे जात चालवावे लागणार आहे. बहुमताच्या सत्तेसाठी अजून काही पक्ष फोडाफोडी होते का ते येत्या काळात जनतेसमोर येईलच.
धार्मिक झुली घेऊन मतदारांना भुलवता येईल पण जगण्या-मरण्याच्या प्रश्नांकडे डोळे झाक केली तर, जनता मतदानाच्या माध्यमातून सर्व निकाल लावते हा विविध राज्यांमधील संमिश्र निकाल पाहता म्हणावे वाटते. अठराव्या लोकसभेने भारतीय जनतेने विविध पक्षांना हा दिलेला धडा आहे, येत्या काळात येणारे सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक डोळसपणाने बघेल त्यासाठी नव्या आघाडी सरकारला शुभेच्छा आणि विरोधी पक्ष जो अधिक दमदार पद्धतीने 'इंडियाच्या' निमित्ताने अधिक मजबूत होत आहे, जनतेच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव ठेवतील, उत्तम निर्णय घ्यायला भाग पाडतील. निवडणूकीत जनतेने दिलेल्या धड्यांचा आदर करतील, निर्णय कायम स्मरणात ठेवतील. अठरावी निवडणूक यशस्वी पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन. निवडणुकांमधील होणारे घटते मतदान हा चिंतेचा विषय असला तरी, जागरुकपणे मतदानात सहभागी होणा-या जनतेचंही अभिनंदन. लोकशाही जिंदाबाद.
प्रतिक्रिया
10 Jun 2024 - 2:45 pm | पॅट्रीक जेड
महाराष्ट्राच्या वाट्याला एकच मंत्रिपद? गडकरींच्या रुपाने. पियुष गोयल तसही महाराष्ट्रात सक्रिय नाही. बाकी मित्रपक्षातील शिंदे गटाला एक राज्यमंत्रिपद फक्त. मोठा अन्याय झालाय महाराष्ट्रावर.
10 Jun 2024 - 3:12 pm | पॅट्रीक जेड
सुबोध खरे, शाम भागवत, वामन देशमुख, विवेक पटाईत, चौकस, निनाद, सामान्य वाचक नी अनेक भाजप समर्थक आयडी निकालानंतर गायब का झालेत. तरी भाजप सरकार आलंय. काँग्रेस सरकार आलं असतं तर?… ;)
10 Jun 2024 - 8:24 pm | पॅट्रीक जेड
निकाला आधी तर सर्व ऍक्टिव होते. अचानक हा साक्षात्कार कसा झाला?
10 Jun 2024 - 8:40 pm | सुबोध खरे
किती लोकांनी तुम्हाला " विनंती" केली होती कि असले बिनबुडाचे आणि भंपक प्रतिसाद देऊ नका
पण तुम्ही कुठे ऐकताय?
उदा स्वाती मालीवाल या भाजपच्या एजंट आहेत.
तुम्हाला याचा एक तरी पुरावा सापडला का?
10 Jun 2024 - 9:05 pm | पॅट्रीक जेड
गोदी मीडिया किती सत्य दाखवते हे माहितच आहे आपल्याला. एकदा ध्रुव राठींचा हा व्हिडीओ पहा.
https://youtu.be/7zH5cy7mUBA?si=4uJi6UxpfNkPDwpM
11 Jun 2024 - 9:49 am | सुबोध खरे
ध्रुव राठींवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर धन्य आहे.
ज्या रुस्तुम ए जमान ला शिवाजी महाराजांनी लढाईत हरवलं तो शिवाजी महाराजांचा निष्ठावंत सेवक होता म्हणणाऱ्या या हुशार माणसाचे इतिहासाचे च नव्हे तर एकंदर ज्ञानच धन्य आहे .
त्याचा बोलविता धनी कोण आहे ते पण जाणून घ्या.
अर्थात आपण असे काही कराल याची शक्यता सुतराम ही नाही हे मी जाणून आहे
पण तरीही
18 Jun 2024 - 5:08 pm | चौकस२१२
पॅट्रिक मान यु बॉर्न ऑन मिपा टु मंथ अगो ओन्ली नो ? पुनर्जन्म ? कोणाचा
11 Jun 2024 - 12:04 am | शाम भागवत
मी तरी यावेळेस भाग घेतला नव्हता.
11 Jun 2024 - 12:48 am | पॅट्रीक जेड
का हो?
18 Jun 2024 - 5:10 pm | चौकस२१२
तुमचा उदय झालेला दिसतोय....
आणि माझे म्हणाल तर गेलं काही दिवस मिपावरून मला बहुतेक ततपूरते निलंबित केलं होत, तसे तर अमरेंद्र बाहुबली हि दिसत नाहीत
10 Jun 2024 - 9:10 pm | पॅट्रीक जेड
बाकी मोदींची अनेक कामे मला वयक्तिकरीत्या आवडली होती.
अतिक्रमण तोडून काशी नी अयोध्या कॅरीडॉर बनवणे. उज्जैनही अतिशय सुंदर बनवलेय. पण स्वतःचा उदो उदो नडला.
11 Jun 2024 - 12:29 pm | कानडाऊ योगेशु
होय.चमकोगिरी अतिच होती. मुद्दामुन महात्मा गांधीच्या निर्व्याज हसुसारखे(?) स्वतःचे पोस्टर जिथे तिथे डकवुन स्वतःचे हसे करुन घेतले.
अटल सेतु पादचार्यांसाठी प्रतिबंधित असताना त्याच्या उद्घाटनापूर्वी स्वतःचे अनेकविध कोनातुन फोटो काढले.
माझ्यामते हा झटका अत्यावश्यकच होता. विरोधक काय करु शकतात ह्याची प्रचिती येणे आवश्यक होते.आता ह्यातुन योग्य तो धडा घेतला जावा तर हा निकाल एक इष्टापत्तीच ठरेल.
11 Jun 2024 - 2:37 pm | पॅट्रीक जेड
+१
11 Jun 2024 - 6:17 pm | नठ्यारा
कानडाऊ योगेशु,
योग्य धडा काय हा प्रश्नंच आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाहीये. म्हणजेच विरोधकांना हे यश मुस्लिम मतांच्या एकजुटीमुळे मिळालंय. हे एक प्रकारचं ध्रुवीकरण आहे. ही इष्टापत्ती नाही. ही हिंदूंसाठी भयसूचक घंटा आहे. हिंदू व्होट रेट वाढवायला हवा.
-नाठाळ नठ्या
11 Jun 2024 - 6:24 pm | पॅट्रीक जेड
हिंदूंसाठी भयसूचक घंटा आहे. नाय ब्वा. भाजप हरली म्हणून घाबरावे अश्यातले आम्ही हिंदू नाहीत, भाजप पक्ष नव्हता तेव्हाही हिंदू सुरक्षित होते. काही वर्षांनी भाजप पक्ष नसेल तेव्हाही आम्ही हिंदूच असू. आम्हाला आमच हिंदुत्व टिकवण्यासाठी भाजप शेख्या पक्षांची गरज नाही.
11 Jun 2024 - 9:45 pm | कानडाऊ योगेशु
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान एकजात सगळे भाजपेतर पक्ष नेते एका व्यासपीठावर आले होते व हात उंचावुन अभिवादन वगैरे केले होते. त्याचे फोटो ही प्रसिध्द झाले होते तेव्हा भाजपेयींकडुन वल्गना केली गेली होती कि मोदीजींनी कचरा एका ठिकाणी गोळा केला आहे आता त्याला साफ करणे बाकी आहे वगैरे. अर्थात तेव्हा विरोधी पक्षनेत्यांची एकी काही टिकली नाही व बीजेपीला नुकसान झाले नाही. पण ह्यावेळेला मात्र त्यांनी ही चूक केली नाही. बीजेपी चा मतटक्का घसरला नाही पण अनेक विरोधी पक्षांमध्ये जे मतांचे विभाजन होत होते ते ह्यावेळेला झाले नाही. महाराष्ट्रा भाजप विरूध्द इतर पक्ष असा सामना होता आणि इतर पक्षांमध्ये फार जास्त फाटाफूट ठेवली गेली नाही. (काकांचे राजकारण.) बीजेपी इथे गाफिल राहिली. अशी चूक पुन्हा महागात पडु शकते. सौ कुत्ते एक शेर का शिकार कर सकते है ह्या उक्तीची प्रचिती आली.
11 Jun 2024 - 10:09 pm | पॅट्रीक जेड
सौ कुत्ते एक शेर का शिकार कर सकते है ह्या उक्तीची प्रचिती आली. जसे मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन हिटलरला हरवलं नी गर्विष्ठ, अहंकारी, आत्मप्रौढी करणाऱ्या हिटलरने शेवटी गोळी झाडून आत्महत्या केली.
11 Jun 2024 - 9:47 pm | कानडाऊ योगेशु
हिंदू कायमच असेच वागत आले आहेत. बीजेपी चे चाणक्य जर खरोखरच त्या दर्जाचे राजकारणी असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवुनच पुढील रणनीती आखायला हवी. फक्त हिंदूना दोष देऊन काही उपयोग नाही.
11 Jun 2024 - 10:07 pm | पॅट्रीक जेड
१० वर्षे एकहाती सत्ता असूनही हिंदू सुरक्षित नसेल
तर काय उपयोग?
18 Jun 2024 - 5:18 pm | चौकस२१२
स्वतःचा उदो उदो
हे पटले , जरा चमको गिरी जास्तच झाली , "भाजपची गॅरंटी" अशी घोषणा जास्त योग्य "मोदिकी गॅरंटी" हे नाही आवडले
संघ चालकांचं नुकत्याच झालेलया भाषांतून त्यांची बहुतेक " संस्था / पक्ष व्यक्तीपेक्षा जास्त मोठा असला पाहिजे " हे सुचवले असे वाटते
18 Jun 2024 - 8:29 pm | पॅट्रीक जेड
संघ चालकांचं नुकत्याच झालेलया भाषांतून त्यांची बहुतेक संघाचे असेच असते, वरातीमागून घोडे. जिंकले तर आमच्यामुळे जिंकले, हरले तर तुमच्यामुळे हरले. मोदी बहुमताने जिंकले असते तर संघाने स्वतःच्या गळ्यात हारतुरे घालून घेतले असते. आता मोदी बहुमतापासून बरेच दूर आहेत तर कानपिचक्या वगैरे देत आहेत. मागच्या दहा वर्षात हिंमत झाली का संघाची हिंमत मोदींविरुद्ध बोलायची?? मातृसंस्था म्हणे.
18 Jun 2024 - 9:21 pm | रात्रीचे चांदणे
२०१४ आणि १९ साली संघाने हारतुरे घालून घेतले होते का?
18 Jun 2024 - 9:47 pm | पॅट्रीक जेड
हो. संघाची यंत्रणा कामाला लागली वगैरे म्हणून विजय झाला अस्व लेख येऊन पडत होते.
18 Jun 2024 - 9:47 pm | पॅट्रीक जेड
हो. संघाची यंत्रणा कामाला लागली वगैरे म्हणून विजय झाला अस्व लेख येऊन पडत होते.
13 Jun 2024 - 10:06 pm | पॅट्रीक जेड
लोकसभा निवडणुकीनंतर 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण, 10 कोटींच्या निधीची तरतूद - Waqf Board Fund
https://www.etvbharat.com/amp/mr/!state/provision-of-10-crores-fund-by-m...
14 Jun 2024 - 8:37 am | चामुंडराय
अ बा तुमच्या पिंका कोणीतरी कॉपी करतोय.

आय डी हॅक झालाय बहुतेक, सावध व्हा.
16 Jun 2024 - 11:04 pm | मुक्त विहारि
https://www.misalpav.com/node/36614
18 Jun 2024 - 5:01 pm | चौकस२१२
हा घ्या उपरोधाने ओतप्रोत भरलेला अभिप्राय
चला २०२४ साली काही गोष्ट चांगलया झाल्या
१) ई वि एम यंत्राचा जीव भांड्यात पडला. एवढी वर्षे फार टपल्या मारलाय लोकांनी त्याला राव
२) भारतातून लोकशाही नाहीशी झाली आहे असा आरडा ओरडा करनार्यांना बूच बसले ( २०१९ साली कुमार केतकरांचे भाष्य काय होते आठवावे )
३) भाजपला "मोदींनंतर कोण" हा शोध घायला मोकळीक मिळाली
४) पी एम इन वेटिंग अजून पिं इन एम वेटिंग करीत बारामतीस बसले
आता गंभीर अभिप्राय:
लोकशाही जरा सुधृढ झाली
मोदी व्यक्तिपूजा कमी होऊन भाजप हा पक्ष म्हणून मानणारे चाळणीतून चाळले जातील
भारतीय लोकशाही सुधृढ असली तरी जनता ती भावनात्मक रीतीने मतदान करते हे दिसले
पुढील भाकीत : मोदींचा एक दिवस वाजपेयी होईल अशी भेटी वाटते
18 Jun 2024 - 5:06 pm | चौकस२१२
गत निवडणुकीत एकमेकांना शिव्या घालणारे, अजिबातच भरवसा नसणारे पक्षांना घेऊन आता नवे सरकार स्थापन होणार आहे,
मग सेना ( उद्धव ) आणि काँग्रेस हा असंगांचा संग नाही दिसत तुम्हाला ?
आता विचार "सह्या युत्या ऑस्ट्रेलियात नाहीत का हो"?
तर घ्या उत्तर : उजवे राजकरणी येथे लिबरल आणि नॅशनल असे दोन आहेत , स्व बळावर ते कधी निवडून येणार नाहीत ( डाव्या लेबर पक्षा समोर ) म्हणून त्यांची अनके दशकांची युती आहे आणि असा खिचडी खेळ कधी खेळेला जात नाही
18 Jun 2024 - 5:14 pm | चौकस२१२
जनतेच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव ठेवतील, उत्तम निर्णय घ्यायला भाग पाडतील.
असे झाले तर उत्तमच.. पण आत्तापर्यंत चे राजकारण बघता ते केवळ "विरोधाला विरोध करणार असे दिसतंय" राहुल गांधींची पहिली प्रेस कॉन्फरन्स ऐकली तेवहा " आम्ही जातीवार जनगणना आणू " हे ऐकले आणि एकूण दिशा कळली , शहाबानो केस ची आठवण झाली
21 Jun 2024 - 10:08 am | पॅट्रीक जेड
केजरीवालांची सुटका झाली. भाजपला जनतेने दणका दिल्याचे चांगले परिणाम आता दिसू लागलेत.
21 Jun 2024 - 11:49 am | सुबोध खरे
नक्की का?
भुजबळ बुवा
कळफलक आला हातात कि बडवा अशा वृत्तीमुळे आपलं हसं होतंय हे आपल्याला समजत नाही कि समजून घ्यायचंच नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणासाठी केजरीवालांच्या सुटकेस स्थगिती दिली आहे.
आणि आपण सुटका झाली म्हणून जाहीर करून मोकळे?
भाजपाला जनतेने दणका दिल्याचा या बातमीशी काय संबंध आहे?
हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि याचा भाजपशी काहीही संबंध नाही.
21 Jun 2024 - 2:39 pm | पॅट्रीक जेड
सर तुम्ही खूप भोळे आहात ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भाजपात नेता ईडी चौकश्या बंद होतात. भाजपात नसेल तर ईडी चौकश्या लागतात हे तुम्ही विसरलाच असाल. त्याच प्रमाणे भाजप विरोधक म्हणून ईडी ने केजरीवालना त्रास दिलाच नसेल नाही? भाजप प्रवेशानंतर ईडी ने अनेकांचे आरोपपत्र मागे घेतले. अशी “प्रामाणिक“ ईडी केजरीवालना घोटाळ्यासाठी अटक करतेय की भाजपसाठी हे तुम्हाला माहित नसेलच.
21 Jun 2024 - 7:54 pm | सुबोध खरे
केजरीवालांची सुटका झाली.
भुजबळ बुवा
केवळ हातात कळफलक आहे म्हणून तो बडवलाच पाहीजे असे नव्हे हे आता तरी शिका.
बाकी मी भोळा आहे कि मूर्ख आहे कि अतिशहाणा आहे हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू
21 Jun 2024 - 8:16 pm | पॅट्रीक जेड
सर भाजपच्या इशाऱ्यावर खोट्या केसेस टाकण्यात नी त्या सेटल करण्यात ईडी पटाईत आहे. त्यामुळे केजरीवालांची “सुटका” झाली असेच म्हणावे लागेल. बाकी आताच बातमी वाचली वारल्या न्यायालयाने स्थगिती दिलीय. नितीशबाबू नी चंद्राबाबूंच्या राज्यात लोकशाही पुन्हा बहरेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी भाजपला वेसण घालावे.
22 Jun 2024 - 12:40 pm | सुबोध खरे
आपल्या बेसिक्स मध्येच राडा आहे म्हणून असे विचित्र निष्कर्ष निघतात.
इ डी किंवा सी बी आय अगदी भाजपाची बटीक आहे असे एक वेळ मान्य केले तरी
न्यायालये सुद्धा भाजपच्या बाजूनेच निकाल देत असती तर आज सोनिया राहुल गांधींपासून लालू ममता केजरीवाल पर्यंत सर्व जण तुरुंगात सडत पडले असते.
हे सर्व लोक आज जामिनावर बाहेर आहेत हे आपल्यास माहिती आहे का?
कालच खालच्या नायायालयाने ( जर भाजपला विकले गेले असले तर) केजरीवाल याना जमीन द्यायचा निकाल कसा काय दिला हा प्रश्न आपल्याला पडत नाही?
जाऊ द्या
तुम्ही बडवा कळफलक.
त्यासाठी मेंदू वापरलाच पाहिजे असे नाही.
21 Jun 2024 - 12:55 pm | सिद्धार्थ ४
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मिळाला आहे. काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लाँडरिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. ईडीने ४८ तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध केला. आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे अवघ्या २४ तासांच्या आत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दिल्ली सरकारच्या रद्द झालेल्या अबकारी धोरणातून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल आरोपी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीस सुधीर कुमार जैन आणि रवींद्र दुडेजा यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. “उच्च न्यायालय या प्रकरणाची दखल घेईपर्यंत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी होईपर्यंत सत्र न्यायालयासमोर (राऊस एव्हेन्यू) आता या प्रकरणाची सुनावणी होणार नाही”, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
25 Jun 2024 - 8:07 pm | पॅट्रीक जेड
सूर्यकांता पाटील ह्यानी घरवापसीचे नारळ फोडलेय. आता भाजपातून घरवापसी जोरात सुरू होईल.
25 Jun 2024 - 8:33 pm | पॅट्रीक जेड
भाऊ तोसरेकरणा भाजपने लीगल नोटीस पाठवली म्हणे. :)
करा अजून भक्ती म्हणावं. जे भाजपसाठी चाळीस चाळीस वर्षे राबणाऱ्यांना झाले नाहीत ते भाजपेयी कालच भाजपचा प्रचार हाती घेतलेल्या भाऊना होणार आहेत का?? मज्जा. कधी अटक होते पाहूयात. :)
28 Jun 2024 - 7:48 pm | पॅट्रीक जेड
बहिणीच्या विरुद्ध भावाला उभे करणाऱ्यांनी आज लाडकी बहीण योजना जाहीर केली.
आयरनीच्या देवा…
28 Jun 2024 - 8:44 pm | पॅट्रीक जेड
देशभक्त ध्रुव राठी ह्यांच्या सौजन्याने.
*Modi 3.0 Report*
Delhi T1 Airport Roof Collapse
Jabalpur Airport Roof Collapse
Four Bridges Collapse in Bihar
Atal Setu Bridge Cracks
NEET Paper Leaks
Ram Mandir Roof Leaks
Reasi terrorist attack
Kathua terrorist attack
Doda terrorist attack
Ayodhya flooding
Pragati Maidan tunnel flooding
Kartavya Path flooding
Train derailment
It hasn’t even been one month since the new government was formed. This is all a result of last 10 years of disastrous policies and corruption :(
Wake up India!
7 Jul 2024 - 1:18 pm | पॅट्रीक जेड
जोगेश्वरी भूखंड प्रकरणी रवींद्र वायकरना क्लीनचिट?? भाजपचे वॉशिंग मशिन जोरात सुरू आहे. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.
16 Aug 2024 - 3:04 pm | जावा फुल स्टॅक
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी हा खुप चान्गला लेख लिहिलेला आहे
16 Aug 2024 - 8:02 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
17 Aug 2024 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कौतुकाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
17 Aug 2024 - 7:37 pm | मुक्त विहारि
बांगलदेशमधील हिंदू लोकांवर होत असलेल्या अत्याचारांवर, पण लेख लिहा की...
17 Aug 2024 - 12:22 pm | कंजूस
राज्याच्या निवडणुका - वातावरण तापत आहे.
आता निकालानंतर मागच्या वेळेसारखं व्हायला नको.