हिंदोळे

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
5 Jun 2024 - 10:30 pm

हिंदोळे

आज तिचं लग्न होतं .
तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं .
होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ.
तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं .
तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील .
एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती. तो तिथे बसला . शांत . शांत होण्यासाठी .
त्याने ऑर्डर दिली . पहिला घोट त्याने घेतला अन त्याचं लक्ष बाहेर गेलं . समोर एक बिल्डिंग होती . तिच्यावर मोठ्या लोंबत्या लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. त्या वाऱ्यावर हलत होत्या . पुढे- मागे . त्याच्या मनातही तिच्या आठवणी हिंदोळे घेऊ लागल्या .
त्या लाईटच्या माळा म्हणजे - कोणाचं लग्न ? ... हा योगायोग असला तरी वाईटच होता .
त्याने त्याचं दुःख दारूत बुडवायची सुरुवात केली .
--------
त्याचा फोन वाजला . तिचा होता. अनेक वर्षांनी आजच .
‘ कसा आहेस ? ’ तिचा आवाज . त्याचा हात थरथरला .
“ मी… मी… छान आहे. तू कशी आहेस ?’ त्याने विचारलं .
मग ती बोलत राहिली .नोकरी, संसार ,सारी धावपळ .तो ऐकत होता .
ती म्हणाली ,’आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे.’
‘ओह ! … हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी ! मग आज काय विशेष ?’
‘काही नाही रे. किती वर्षं झाली आता लग्नाला .पण आज तुझी आठवण आली .माझ्या लग्नाच्या दिवशी मी तुला फोन करीन म्हणलं होतं .आणि तो राहिला ; पण माझ्या लक्षात होतं .’ पुढे ती बोलत राहिली .
मग त्यांचं संभाषण थांबलं. तो निघाला .त्याच जुनाट बारकडे. तो बार अजुनी तसाच होता . तो त्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने ते पुसलं .
मग तो स्वतःशीच हसला .
तो आत गेला नाही . तो उलट फिरला आणि घराच्या दिशेने निघाला.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2024 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! आवडले. लिहिते राहा.

मुझे किसी के बदल जाने का गम नही है,
बस कोई था, जिससे ये उम्मीद नही थी.

-दिलीप बिरुटे
(नीट घराच्या दिशेने निघालेला)

लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.
एक छानसा लघुपट बनवला जाऊ शकतो या कथेवर.
प्रा.डाँ.नी दिलेला शेर पण चपखल.

टर्मीनेटर's picture

7 Jun 2024 - 7:48 pm | टर्मीनेटर

लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.

+१
लहानशीच पण परिणामकारक कथा आवडलीच, फक्त मला मला मुकेश ऐवजी 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटातील काही गाणी आठवली!

अहिरावण's picture

7 Jun 2024 - 1:12 pm | अहिरावण

आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Jun 2024 - 2:13 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाचक मंडळी
मी आपला खूप खूप आभारी आहे .

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Jun 2024 - 2:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

बिरुटे सर
चित्रगुप्त
टर्मिनेटर
अहिरावण

विशेष आभार .