मं...(मग)!

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
22 May 2024 - 12:29 pm

मं ..(मग?)

मsssग कधीतरी 'रे' ची वाट बघून बघून थकलेल्या 'गं' चा स्वर चढतो.
"मीच नेहमी हाक मारायची,
मीच भेटायची बोलायची धडपड करायची,
तुला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल"
या "मीचमी"च्या मुद्दूसूद भांडणात मग हळूच डोकावतो तो मं..
"राग येणार नाहीतर काय, मं(मग)?
मुद्दामहून करतो का रे? मं(मग)?"
हा मं एकटा नसतो, मागून त्याच्या ग असला तरी अध्याहृत, कळत नकळतसा.
....
मं ची मिजास त्याच्या तीव्रतेत.
मुक्कामाची त्याची जागा देखील ठरलेली, मोक्याची.
झुटामुठा राग आल्यावर नाकाच्या शेंड्यावर, मोग-याच्या कळीसारखा गोलमटोल फुगरा!
मानेच्या मुरक्यात, मासोळीसारखा लयदार!
मृगनयनांतल्या मेघांआड दडलेला, मुसमुसणारा..
मोहक बिहक मुळीच नसतो तो अशा वेळी..
माहीत असतंच ते "गं"लाही चांगलंच्.
मुकामुका तरी कितीवेळ रहाणार बिचारा गं?
शेवटी मनातलं बोलून मोकळा होतो..
आणि मोठ्या तो-यात उभा रहातो कमरेवर दोन हात ठेऊन दिवाकरांच्या नाट्यछटेतल्या रुसलेल्या मुलासारखा, "बोलावणं आल्याशिवाय नाही" म्हणत..
...
आता बारी मितभाषी कोमल रे ची असते,
मृदू मुलायम शब्दांनी गं ला मनवायची,
तीव्र मं सोबत धीरानं संवादी होण्याची,
गं ला असंss जवळ घेऊन, आंजारून गोंजारून, "सा"वरून स्थिरावण्याची..
मावळतीला मधुरगंभीर मारवा छेडण्याची...

( रे आणि गं नंतर म अपरिहार्य होता. आणि मारवा असल्यानं कवितेत प वर्ज्य:))

मुक्तक

प्रतिक्रिया

Bhakti's picture

22 May 2024 - 1:01 pm | Bhakti

मृगनयनांतल्या मेघांआड दडलेला, मुसमुसणारा..

असाच आमचा मं :)
मं...
धुसरलेल्या वातावरणात मधाळ गोडवा....
गुंतलेल्या छटांना मं सोडवत मोकळीक देतो
अल्हाळपल्हाळ लावत गं पहाटेपर्यंत मरवा फुलवायची
ता"रे" झेलतं मनोहरी मग अंगण दिसायचे..

प्राची अश्विनी's picture

24 May 2024 - 9:18 am | प्राची अश्विनी

भक्ती, खूप खूप thanks!:)

चित्रगुप्त's picture

24 May 2024 - 1:45 pm | चित्रगुप्त

"कवित्व शब्द सुमनमाळा.. अर्थपरिमळ आगळा" याची प्रचिती या मालिकेत येते आहे. खूप खूप सुंदर आणि कल्पक.

सगळ्याच घरात अशी रागदारी नसते,
ज्यांच्या घरी तीव्र 'ग' वसतो
त्यांच्या दारी 'राग', असतो
'मग, संवादी 'रे',ची 'ध',(वादी) धडपड सुरू होते
'ग', मधील गारवा शोधण्यासाठी
पण एक जन्म सुद्धा कमी पडतो
मं ..(मग?),'समे', वर येण्यासाठी

कवीता आवडली.