रजिस्ट्रेशन

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
18 May 2024 - 4:49 pm

काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो.
मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं.
मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?”
मला उत्तर द्यायच्या ऐवजी त्याने अतिफचे गाण लावलं, “हम किस गलीमे...”
मग म्हणाला, “मलाही माहित नाही. गुगल बाबा लावला आहे, तो जिकडं नेईल तिकडं जायचं.”
छान.
मी खिडकीच्या बाहेरचे कॉंक्रिट जग बघत होतो.
“नंबर फिफ्टी फोर.
द हाउस विथ कॉंक्रिट डोअर,
कॉंक्रिटचे घर कॉंक्रिटचे दार कॉंक्रिटची जमीन...
कॉंक्रिटची माणसे कॉंक्रिटचे भाव
कुणी घ्या कॉंक्रिट कुणी द्या कॉंक्रिट...
...
...
असे करत करत अखेर एकदाचं ऑफिस आले.
“गावातली सगळी ऑफिसं सोडून आपण इथच का आलो?”
“कारण हे ऑफिस तळ मजल्यावर आहे. जिने चढावे लागत नाहीत. उतरावे लागत नाहीत. म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठी अपंग लोकांसाठी सोईस्कर.”
आम्ही पोचलो तेव्हा अकरा वाजले होते.
नेहमी प्रमाणे विजेचा लपंडाव चालला होता. लोकांना बसण्यासाठी एक मोठी खोली होती. तिथे अंधार. पंखे बंद. मरणाचा उकाडा. अगदी स्थितप्रज्ञ निरिच्छ लोकं तिथे बसली होती. बाकी आम्ही बाहेर एक जंगली बदामाचे झाड होते. त्याच्या सावलीच्या आधाराने उभे राहिलो.
पण कचेरीचे काम चालले होते. त्यांच्या कामासाठी वेगळं यूपीएस होतं म्हणे.
काळ्या पँट आणि शुभ्र पांढरे शर्ट परिधान केलेले इकडून तिकडे लगबगीने ये जा करत होते. कोण आहेत हे लोक?
“हे वकील. हे म्हणजे सरकार आणि सामान्यजन ह्यांच्यातले मध्यस्थ. दिसतात आपल्यासारखेच पण निराळी जमात.”
बबन आमचा वकील शोधात होता. मिळाला एकदाचा.
“सगळे आले का?”
“अजून दोन म्हाताऱ्या येणे आहे. निघाल्या आहेत. येतील इतक्यात.”
“सगळी मंडळी आली की मला मिसकाल द्या.” तो पुन्हा गर्दीत नाहीसा झाला.
कुठूनतरी लहान मुलींची एक टोळी अवतीर्ण झाली. त्या मुली प्रत्येकाच्या शर्टाला हात लावून भीक मागत होत्या. काहींनी दिले काहींनी हट म्हणून झिडकारून लावले. त्यांचे जीवनाच्या पाठशाळेत शिक्षण चालले होते.
म्हाताऱ्या काठी टेकत टेकत आल्या एकदाच्या. मी जरा पुढे झालो.
“नमस्कार आजी.”
“तू कोण? चेहरा ओळखीचा वाटतोय खरा.”
“अगो हा आपला शकूचा नातू केशव.”
“नाही आज्ये. मी नानांचा केशव कुलकर्णी.”
“हा हा आठवलं. नाना कसा आहे?”
नानासाहेब तिगस्तासाली गेले. “ठीकाय.” म्हणून चूप बसलो.
सगळे आले आहेत ही वार्ता बाबनने वकीलापर्यंत पोहोचवली.
तो म्हणाला थोड थांबायला लागेल कातर अजून “चलन” नावाची गूढ गोष्ट अजून मिळाले नव्हते. का तर एसबीआयचा सर्वर डाउन होता. हो हो तीच ती एसबीआय.
आम्ही सारे आत जाऊन बसलो. आता दिवे आणि पंखे सुरु झाले होते. त्या हॉलच्या चारी भिंतींवर अनेक सुचना लिहिल्या होत्या. त्यातले एकही अक्षर समजण्यासारखे नव्हते. पुढच्या वेळेस गेलो कि लागल्याचे फोटो घेऊन येईन.
एक म्हातारा भिकारी काठी टेकत टेकत आला नि भीक मगु लागला. लोकांनी हात आणि पाय दोनी आखडून घेतले.
थोड्या वेळाने तीस पस्तीतीतली एक स्त्री आली. तिने आवाज वाढवून सगळ्यांना शांत केले.
“शांतता. शांतता. ऐका ऐका. साहेबांनी मला सांगितलं कि हॉलमध्ये जाऊन सांग म्हणून. मी अपंग आहे. मला एक हजार रुपये औषधासाठी पाहिजेत. तुम्हाला जमेल तशी मदत करा. दहा रुपये वीस रुपये...” तिने एक मळका अनंत घड्या केलेला कागद फिरवला. माझ्या शेजारी बसलेला म्हणाला, “एक पै देऊ नका. रोजची नवटंकी आहे.”
भीक मागणे ही पण इतर कलांप्रमाणे -म्हणजे गायन, नृत्य, चित्रकला इत्यादी- एक कला आहे.
दोनी आज्या गाढ झोपल्या होत्या.
मी कंटाळून हॉलचा बाहेर पडलो.
“लांब जाऊ नकोस. आपला नंबर येईलच.”
मी हो करून बाहेर आलो. मधेच एक झ्याक प्याक गाडी आली. त्यावर “Army अपंग” असे लिहिले होते. नंबर प्लेट वर आर्मीचे चिन्ह होते. गाडीतून पासेंजर सीट च्या बाजूने एक निर्विकार तरुणी उतरली आणि तिने ड्रायवर बाजूचा दरवाजा उघडला. आतून चालक उतरला. त्याच्या उजव्या हातात एक खास काठी होती. डाव्या हाताने त्याने तरुणीच्या खांद्याचा आधार घेतला आणि चालायला सुरवात केली. प्रत्येक पाउल मोठ्या कष्टाने टाकत होता. त्याला पाउल उचलताच येत नव्हते. बाहेरून हॉलच्या आत आल्यावर कुणीतरी चपळाई करून व्हील चेअर आणून दिली. त्याच्या जिद्दीला मनोमन नमस्कार करून मी बाहेर आलो.
त्या रजिस्ट्रारच्या ऑफिसच्या आजूबाजूला वकिलांची दुकानं लागली होती. ते काय काय कामं करतात त्याची यादी बाहेर लावली होती. बक्षिसपत्र, मुखत्यारपत्र, भागीदारी, वाटणी, एन ए, वहिवाट, सात बारा असे कोड वर्डस होते. कधी आयुष्यात गरज पडलीतर माहित असावे म्हणून डोक्यात नोंद करून ठेवली.
समोर एक शटरडाऊन केलेले ऑफिस होते. बऱ्याच वर्षात तेथे कुणी धंदा केला नसावा. तिथे सावली होती. विचार केला तिथे उभं राहून इकडची गंमत बघावी. बंब शटरवर अनेक धमक्या लिहिलेल्या होत्या
“येथे गाडी लावल्यास दोनी/तिनी/चारी चाकातील हवा काढून टाकली जाईल.”
“भडव्या, इथे गाडी पार्क करून तर बघ!”
...
...
“ड्रेनेज फुटले आहे. तुझा बाप पैसे देणार आहे का?”
बापरे. मला भीति वाटली, वाटलं शटर उचलून कोणतरी येईल आणि म्हणेल, “बरा सापडलास. काढ पैसे.”
तिथून आवाज न करता बाजूला झालो.
त्याच्या बाजूला तयार कपड्याचे दुकान होते. तिकडून एक तरुण काळा चष्मा घालून, कमरेवर हात ठेवून माझ्याकडे बघत होता. का रे बाबा? मी पण त्याच्या कडे बघू लागलो. अपुन भी डरता थोडाच?
“क्या, क्या चाहिये?” मी ठणकाऊन विचारलं.
तो काय उत्तर देणार? घाबरला असणार.
नंतर डोक्यात लाईट लागला. ही तर तयार कपड्याच्या दुकानातली डमी आहे. सुममध्ये काढता पाय घेतला.
बबन मला शोधात आला, “चल भाऊ, आपला नंबर लागला.” पुन्हा एकदा डमीला गुड बाय करून आत गेलो.
माझी ठरवलेली शब्द संख्या संपत आली आहे. तेव्हा आज इतकेच!

कथा

प्रतिक्रिया

आमचीही वाचण्याची मर्यादा संपली आहे. आता इतकेच.

भागो's picture

19 May 2024 - 8:07 am | भागो

समजलं.
कॅशलेस इकॉनमी. शब्दाविना वाङ्मय.
अरेरे मिपावर चित्रलिपीची सुविधा नाही. असतीतर पूर्ण लेख आणि हा प्रतिसादही चित्रलिपीत लिहिला असता. असो कंजूस भौ.
आ...
शब्दमर्यादा.
पुढच्या वेळेस "भार" हलका करेन.
"शब्दांच्या पलीकडचे" जे आहे ते समजून घ्या.

तो शेवटच्या वाक्याला प्रतिसाद होता. बाकी तुमचे लेखन ही करमणूक असते.

कानडाऊ योगेशु's picture

19 May 2024 - 11:24 am | कानडाऊ योगेशु

भावाच्या मुलाने मला गादीत घातले

दोन मिनिटे अडखळलो.वाटले काही नवीन वाक्प्रचार तर नाही आहे. नंतर कळले टायपो आहे. नशीब. नाहीतर चुकुन शब्द नीट लिहुन अनुस्वार इकडे तिकडे झाला असता तर बराच घोळ झाला असता.इति शब्द मर्यादा!

भागो's picture

19 May 2024 - 2:03 pm | भागो

क्षमा करा.
गलतीसे मिस्टेक हो गयी.
Pun not intended.

कर्नलतपस्वी's picture

19 May 2024 - 12:46 pm | कर्नलतपस्वी

मला पण प्रथम दर्शनी कथा वेगळेच वळण घेत आहे असे वाटले.

गादीत गुंडाळले म्हणजे प्राॅपर्टीचा लोचा दिसतोयं. पण मग समजले व यु टर्न घेत मूळपदावर आलो.

पु भाग प्रं