अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते
शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो
वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे
अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ
नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!
प्रतिक्रिया
14 May 2024 - 1:17 pm | अहिरावण
वा ! मस्त !!!
मोहाचा फुलोरा
दिशांतरी जातो
रिचवून शांतपणे
सारी दु:खे सोसतो!
16 May 2024 - 10:35 pm | बाजीगर
मस्त.
14 May 2024 - 1:19 pm | प्रचेतस
खूप आवडली ही कविता.
14 May 2024 - 1:47 pm | कर्नलतपस्वी
शिपाई बुलबुल चे जोडपे विमनस्क अवस्थेत घरट्याकडे एक टक बघत बसले होते तेंव्हा हेच विचार मनात आले...
मोहाचा फुलोरा
दिशांतरी जातो
रिचवून शांतपणे
सारी दु:खे सोसतो!
अनंत यात्री च्या कवीता लाजवाब असतात. आवडली हे वेगळे सांगत नाही.
16 May 2024 - 10:31 pm | बाजीगर
क्या बात है कर्नलजी....बेहद खूष, मदहोष.
14 May 2024 - 2:16 pm | Bhakti
सुंदर!
16 May 2024 - 2:08 pm | चांदणे संदीप
वेगवेगळे वृक्ष आणि त्या खालच्या/त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या भावना.
सिंपली ग्रेट! ___/\___
सं - दी - प
16 May 2024 - 2:59 pm | चित्रगुप्त
कविता खूप भावली.
या पाची वृक्षांचे फोटो वा चित्रे हुडकायला हवीत.
16 May 2024 - 3:02 pm | चित्रगुप्त
16 May 2024 - 3:10 pm | चित्रगुप्त
नाथमंदिरातील अजानवृक्ष.
16 May 2024 - 6:14 pm | चित्रगुप्त
सोळाव्या शतकातले एक चित्र.
16 May 2024 - 10:28 pm | बाजीगर
अनंन्तयात्रीजी आपल्या कवितेचा बाज वेगळाच आहे, वाचून अतिप्रसन्न जाहलो. बहोत खूब.
मला ही काही ह्याच लाईनवर म्हणावेसे वाटले,
म्हणून मोरोपंतांच्या ओळी घेऊन म्हणतो,
पुष्पवर्ण नटला पळसाचा ।
पार्थ सावध नसे पळ साचा !!
पंतांचा खेळ आर्या वृत्ताचा ।
महापंडीत तो मोरया वृत्ताचा ।।
17 May 2024 - 12:24 pm | प्राची अश्विनी
मुद्दाम log in करून प्रतिक्रिया देण्याइतकी कविता आवडली.
अप्रतिम!
19 May 2024 - 5:26 pm | अनन्त्_यात्री
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.