स्वप्नं

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in जे न देखे रवी...
22 Dec 2008 - 6:16 pm

चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे
अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे.

दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा,
वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा.

अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे.

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे.

तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे,
वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे.

मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी...

फक्त तुझीच साथ असावी...

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मीनल's picture

22 Dec 2008 - 6:40 pm | मीनल

छान आहे.

मात्रांची काही गाडबड वाटते आहे का?
जाणकार सांगतीलच ईंप्रूव्हमेंटसाठी.

मी जाणकार नाही.
मीनल.

दत्ता काळे's picture

22 Dec 2008 - 7:40 pm | दत्ता काळे

छान आहे..

फक्त
अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे.

च्या ऐवजी

अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे,
तुझ्या स्मॄतीने नकळत माझ्या, डोळ्यांमध्ये अश्रु जमावे.

आणि,

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे.

च्या ऐवजी

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
स्वप्न असे की सत्य असे हे, मीच माझिया मना पुसावे.

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 2:07 am | विसोबा खेचर

मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी,
इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी...
फक्त तुझीच साथ असावी...

वा! छान लिहिलं आहे..!

तात्या.

अरुण मनोहर's picture

27 Dec 2008 - 7:21 am | अरुण मनोहर

एकूण कविता मस्त जमली आहे.

पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे,
हे कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय.

अनिल हटेला's picture

27 Dec 2008 - 7:26 am | अनिल हटेला

इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी...

सुंदर कविता....
सहज आणी सुंदर...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..