Being Sentimental.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
15 Apr 2024 - 4:00 pm

Being Sentimental.
मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो.
कसं ते पहा.
मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है
हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला. त्याला पाहिजे ते पान समोर आल्यावर.
“एकस्क्युज मी सर, पण हा पत्ता जरा सांगणार का. कवाधरून शोधतो आहे.”
“काय पत्ता आहे?”
“भागो पाटील. गल्ली नंबर तीन. पुणेकर कॉलनी.”
हायला हा तर मलाच शोधतो आहे. भागो सावधान.
“पुणेकर कॉलनी तर हीच आहे. तीन नंबर इथून डाव्या हाताला वळून...”
“अहो तिकडे चार चकरा मारून झाल्या पण भागो पाटील हे नाव कुणीही ऐकलेले नाही”. कसं ऐकणार? गल्लीच चुकीची आहे ना.
“सॉरी, मला पण माहित नाही. चहा घेणार? फोन नंबर आहेना, फोन करायचा...?
“काही उपयोग नाही. स्वीचड ऑफ, एंगेज्ड, आउट ऑफ रेंज अस चाललाय.”
“पैसे भरले नसतील. काय प्रॉब्लेम काय आहे? इतके डेस्परेट झालाय जणू.”
“अहो त्याचा मित्र मरणासन्न पडलाय. सारखी त्याची आठवण काढतोय.”
माझा कोणीही मित्र साध्या पडश्यानपण आजारी नव्हता. सगळे साले ठणठणीत उंडारत होते. वर मी कुणाचेही उसने पैसे घेतले नव्हते. कि त्याने मरतानाही त्याची वसूली करावी.
“काय लोकं असतात एकेक.” मी आपलं काहीतरी बोलायचे म्हणून बोललो.
मी हळूच काढता पाय घेतला. सुटलो म्हणून सुटकेचा श्वास घेतला आणि लांबून घरी जावे असा विचार केला.
समोरून हातात मोबाईल घेऊन इकडेतिकडे पहात एकजण चालला होता. मी चपळाईने त्वरित साईड बदलून दुसऱ्या बाजुला गेलो.
फोन चालू केला. ताबडतोब इनकमिग..
अननोन नंबर होता. फोन बंद करून टाकला. हे लोक आज दिवसभर मला फोन वापरू देणार नाहीत.

आजचा दिवस काही खरा नव्हता. तो जो कोण मरणासन्न होता तो गचकल्या शिवाय माझी सुटका नव्हती.
थोडी झोप लागत होती तर दारावर कुणीतरी धक्के मारत होतं. हे लोक थोडावेळ झोपू पण देत नाहीत. जरा कुठे डोळा लागतोय.
“कोण आहे?” मी धडपडत उठलो. दरवाजा वाचवण्यासाठी तरी उठणे भाग होते. मी दरवाजा उघडला. असाच कोणीतरी रँडम होता.
“कशाला बोंब मारताय? बेल आहे ना.”
“बेल वाजवून वाजवून थकलो. चल तुला न्यायला आलो आहे. सोनटक्के शेवटच्या घटका मोजतोय आणि तू इकडे तंगड्या प्रसरून झोपला आहेस. चल लवकर. जे आहेत त्या कपड्या निशी चल. कशाचाही भरंवसा नाही. आई पण तुझी आठवण काढती आहे.”
“अहो पण सोनटक्के नावाचा माझा कोणीही मित्र नाही.”
“हे पहा भागो, तुला घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे. बऱ्या बोलाने येणार आहेस कि नाही?”
त्याची भव्य दिव्य कमावलेली शरीरयष्टी बघून मी नांगी टाकली. म्हटलं एक डाव सोनटक्कयाला बघून तर येऊ.
मला रिक्षात घालून तो आडदांड सोनटक्क्याच्या घरी घेऊन गेला. बासष्ट रुपये भाडं झालं होतं. मी हात वर केले. मी का म्हणून भाडं द्यायचं? त्यानं चुपचाप भाडं दिलं. नंतर तो वसूल करणारच होता म्हणा.
सोसायटीच्या बाहेर थोडी गर्दी होती. हलक्या आवाजात कुजबुज चालली होती.
आम्ही फ्लॅटमध्ये शिरलो. कॉटवर सोनटक्क्या झोपला होता. आमच्या बरोबरचा जो होता तो सोनटक्क्याच्या कानापाशी वाकला आणि म्हणाला, “बबनराव, भागो आला आहे.”
सोनटक्क्याने डोळे उघडून माझ्याकडे क्षीण कटाक्ष टाकला. त्याला जे काय समजायचे ते तो समजला. कुणीतरी विचारले, “बबन, ओळखलस का भागोला?”
त्याच्या डोक्याची हालचाल झाली. त्याचा अर्थ तुम्ही काहीही लावू शकाल.
“हो, म्हणताहेत. म्हणजे अजून शुद्ध आहे. नाहीतर वेध लागले कि भ्रम लागतो.”
“तुमची फार आठवण काढत होते. बरं झालं तुम्ही आलात. आता सुखानं...”
पेशंटने एका बाजूला मान टाकली. डॉक्टरने घाई करून इंजेक्शन मारले. नाडी बघितली. काही उपयोग नव्हता. प्राणपाखरू उडून गेले होते. का कुणास ठाऊक मी एकदम रिलॅक्स झालो. लवकर सुटका झाली.
मग रडारड सुरु झाली.
“भागो, आईला भेटून घ्या. सांत्वन करा.
बाहेरच्या खोलीत आई रडत होती. मी खाली जवळ बसलो. म्हणालो, “आई...”
अश्या वेळी काय बोलायचे ते मला समजेना. “आई माझ्याकडे बघ आणि शोक आवर...” मधेच कोणीतरी टपकला आणि आईच्या कानाशी लागला. आईने थोडा वेळ रडू थांबवले. तो गेल्यावर पुन्हा रडण्याचा उमाळा आला.
अर्धा दिवस नाहीतरी वाया गेला होताच. दुपारी मॅटीनीचा शो मिळाला असता. घाई करायला पाहिजे.
हे सगळे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं. बाहेर मोकळ्या हवेत आल्यावर बरं वाटलं.
“काय गेला का.”
“तुम्ही कुठे असता?”
“म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. सध्या स्लंप चालला आहे म्हणे?”
“शेअर काढून टाकावे का?”
“हे गव्हरमेंट बदल्या शिवाय...”
जरा बाजूला रस्त्यावर जाऊन सिगारेटचे दोन झुरके घेतले. बरं वाटलं. एक मोकळी रिक्षा चालली होती. थांबवली. कॉलनीत परत आलो. सकाळ पासून काही खाल्ले नव्हते. वडापावच्या स्टालवर जाऊन दोन वडापाव घेतले.
खायला सुरवात करणार तोच मोबाईल नाचवत एकजण जवळ आला.
“एकस्क्युज मी सर, पण हा पत्ता जरा सांगणार का. कवाधरून शोधतो आहे.”
“काय पत्ता आहे?”
“भागो पाटील. गल्ली नंबर तीन. पुणेकर कॉलनी.”
(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

मिपाचे वाचक समजूतदार आहेत, ह्या विश्वासाने लिहिली आहे.

चौथा कोनाडा's picture

15 Apr 2024 - 5:24 pm | चौथा कोनाडा

बाप रे ... पार शेण्टीमेण्टल करून टाकलं की राव !
आता कुणाचा नंबर ?

कोणतरी दुरचा काका होता. मी त्यांचा फेवरीट पुतण्या होतो. काय करणार गेलो. अगदी घाटावर गेलो.

अहिरावण's picture

15 Apr 2024 - 7:12 pm | अहिरावण

मा़झी तब्येत ठणठणीत आहे. खुलासा संपला.

अरे अहिरावण सर, १०१ वर्षे आयुष्य आहे तुम्हाला. आताच तुमची आठवण काढली होती. खर सांगा, तुम्हाला उचकी लागली होती ना. खरं ना. आ आ नेहमी खरं बोलायचं. हे घ्या चोकोलेट.

अहिरावण's picture

16 Apr 2024 - 1:56 pm | अहिरावण

वा वा धन्यवाद

निम्म त्यातलं मी श्री अमरेंद्र यांना देतो

नाही नाही. त्यांना आपल्या आशीर्वादाची गरज नाही. कारण ते
"अमर" इंद्र आहेत. ते आपल्याला "पुरून" उरतील.

नाही नाही. त्यांना आपल्या आशीर्वादाची गरज नाही. कारण ते
"अमर" इंद्र आहेत. ते आपल्याला "पुरून" उरतील.

कर्नलतपस्वी's picture

15 Apr 2024 - 8:18 pm | कर्नलतपस्वी

भागो पाटलांना रिपोर्ट करतात का काय?

नाही हो. उगाच आपली डार्क कॉमेडी.

चित्रगुप्त's picture

16 Apr 2024 - 1:49 pm | चित्रगुप्त

कथा आवडली.
मला बरेचदा अशी स्वप्ने पडतात, ज्यात अगदी अनोळखी माणसे असतात, पण स्वप्नात मात्र ती ओळखीची असलेली दिसतात. बहुतेक सगळ्याच स्वप्नात मी काहीतरी समस्येत अडकलेलो आहे, काही केल्या त्यातून सुटका होत नाहीये आणि ते 'ओळखीचे' लोक नुसते बघून पुढे जात आहेत वगैरे असते. याचे 'तार्किक' स्पष्टीकरण काही सुचत नाही. या 'समस्या' कधी प्रत्यक्ष-शारीरिक असतात - उदाहरणार्थ मी एका खूप उंच असलेल्या किल्ल्याच्या भिंतीवर किंवा गवाक्षात अडकलेलो आहे, मला तिथून खाली येणे शक्य होत नाहीये, आणि खालून बरेच 'ओळखीचे' लोक नुसते माझ्याकडे बघून निघून जात आहेत.... कधी एकादी मोठ्ठी-अवजड मोटारसायकल मी हातात घेऊन, जेरीस येऊन पेट्रोल पंप शोधत फिरतोय ... वगैरे.
या कथेतले मृत्युशय्येवरचे लोक असे 'स्वप्नातल्या ओळखीचे असतील का ?

वा वा. तुम्ही तर माझ्या कथेला नवा "आयाम" दिला आहे. (चला "आयाम" शब्द वापरून टाकला.)
ह्या स्वप्नाचा फार त्रास होत असेल तर झोपताना उशीखाली चाकू ठेऊन झोप. का? कसं वगैरे आपल्याला (म्हणजे मला. आदरार्थी बहुवचन) माहित नाही.
आता स्वतःची टिमकी वाजवतो. मी स्वप्ना विषयी एक कथा लिहिली होती. ती वाचकांनी कचऱ्यात टाकली. पण आता वाचायला हरकत नाही.
https://www.misalpav.com/node/49525
"आयुष्य म्हणजे स्वप्नांची अखंड मालिका"