कॉफी __२

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
12 Apr 2024 - 12:56 pm

कॉफी___2

अनोळखी भाषेच्या शहरातल्या म्युझियमच्या लांबलचक संगमरवरी पाय-या चढता चढताच आपण थक्क होऊन जातो.
आतल्या दालनांतली रेंम्ब्रां आणि कार्व्हाजिओ आणि विंची आणि कोणन् कोणाची चित्रं शिल्पं पहाताना कळतं यांना फोटोत बंद करणं केवळ अशक्य .. आणि आपोआप मोबाईल पर्समध्ये जातो.
..….
फिरून फिरून पाय दुखायला लागले असतात, दुपार उलटून चालली असते,
आता एक शेवटचं दालन मग बाहेर पडायचं असं आपण ठरवतो. आणि...
आणि तिथंच तो दिसतो.
संगमरवरी शिल्पासमोर ऐसपैस फतकल मारून बसलेला...
मांडीवरच्या वहीत पेन्सीलनं, समोरची पहुडलेली हर्माफ्रोडाइट चितारणारा..
त्याचं लक्षंच नसतं आजूबाजूच्या वाहत्या माणसांकडं..
हनुवटी झुकवून तो ते वरवर सोप्पे वाटणारे कर्व्स शांतपणे कागदावर उतरवत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कोप-यातल्या क्रोलाईन्स मधेच थोड्याशा थरथरतात इतकंच..
इतक्यात त्याच्या मनाप्रमाणं स्ट्रोक जमतो आणि त्याच्या मुडपलेल्या ओठांच्या कोप-यात हलकं हसू उमटतं.
कामात रंगून गेलेल्या माणसाइतकं देखणं दुसरं काहीही नसतं अगदी ते बर्निनीचं आखीव रेखीव शिल्प सुद्धा..
.....
डोळ्यात हे चित्र भरून घेऊन आपण जड पावलांनी तिथून निघतो.,
तिथल्याच रेस्तराँमध्ये आपण शांतपणे काफे ओ ले भुरकत असताना कुणीतरी ऑपं..विचारतं
ते न समजून आपण बावळटासारखं वर मान करून अं? करतो तर समोर मगासच्याच त्या हस-या क्रोलाईन्स !!!
आता मात्र अनोळख्या जागेतली , भाषेतली ती कॉफी एकदम ओळखीची गोड गोड होऊन जाते..

मुक्तक

प्रतिक्रिया

Galleria Borghese (रोम), Louvre (पॅरिस), Uffizi (फ्लॉरेन्स) आणि Palazzo Massimo (रोम) आणि व्हॅटिकन मधील 'हर्माफ्रोडाइट' बघितल्या आहेत आणि त्यांचे फोटो पण काढलेले आहेत, परंतु आजवर 'हर्माफ्रोडाइट' या नावाकडे कधी लक्ष गेले नव्हते. हर्मिताज मधे पण आहे म्हणे, पण अजून योग आलेला नाही.

ही कविता दोन-तीनदा वाचली आणि ही 'हर्माफ्रोडाइट' कोण बुवा ? असा प्रश्न पडला, आणि जालावर शोध घेता बरीच माहिती मिळाली. यावर खरेतर एक लेख लिहीता येईल. प्रयत्न करेन.

कविता एकदम वेगळीच आहे, आणि कहीशी गहनही. यामुळे ती मिपाकरांच्या नजरेतून सुटलेली दिसते. अनेक आभार.
('क्रोलाईन्स' म्हणजे काय ते समजले नाही, कृपया खुलासा करावा)

Galleria Borghese (रोम) मधील हर्माफ्रोडाइट:
.

लूव्र - पॅरिसमधील हर्माफ्रोडाइट:
.

Palazzo Massimo मधील हर्माफ्रोडाइट:
.

उग्रसेन's picture

18 Apr 2024 - 8:59 am | उग्रसेन

'हर्माफ्रोडाइट' म्हणजे महिलांनी ढुंगन वर करुन झोपणे.
चित्रातून हजार शब्दाच्या भावना समजतात ते हे असं.

धन्यू

चित्रगुप्त's picture

18 Apr 2024 - 11:39 am | चित्रगुप्त

'हर्माफ्रोडाइट' म्हणजे महिलांनी ढुंगन वर करुन झोपणे.

तसं नव्हं पंत. लईच मोठी भालगड हाय हर्माफ्रोडाइटांची. आनि त्या 'महिला' न्हाईत (सर्वात खालचा फोटू नीट बगा)
लिहीन सावकाशीनं नंतर.

उग्रसेन's picture

19 Apr 2024 - 8:53 am | उग्रसेन

खालच्या फोटोत 'दिसलं'

लईच मोठी भालगड हाय हर्माफ्रोडाइटांची.

तपशीलवार चित्र टाकून लेख लिव्हावं बघा.

प्राची अश्विनी's picture

19 Apr 2024 - 2:04 pm | प्राची अश्विनी

आधी कबरीत गेलेल्या कवितेला वर काढल्याबद्दल धन्यवाद!
क्रोलाईन्स म्हणजे डोळ्यांच्या कोप-यातल्या सुरकुत्या.
बर्निनीनं गादी तयार केली हे नव्हतं माहीत , मी समजत होते ते अख्खं शिल्प त्यानंतर बनवलाय.

कंजूस's picture

17 Apr 2024 - 9:37 pm | कंजूस

कॉफी आवडली.
___________
चित्रगुप्त, पुतळ्यांच्या गाद्या झकास आहेत. एसी नसल्याने तिसरा लादीवरच तळमळत आहे.
( क्रो लाईन्स तुम्हास माहिती नाही? Crow's feet हो)

प्राची अश्विनी's picture

19 Apr 2024 - 2:12 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद. :)

सध्या लूव्र-पॅरिसमधे असलेली ही मूर्ती फार प्राचीन असून ती १६०८ च्या सुमारास रोममधे जमिनीत सापडली होती. यथावकाश ती Villa Borghese Pinciana मधे संग्रहित करण्यात येऊन तिच्यासाठी संगमरवरी गादी बनवण्याची कामगिरी तात्कालीन प्रसिद्ध मूर्तीकार Gian Lorenzo Bernini (१५९८-१६८०) याच्यावर सोपवण्यात आली.
पुढे नेपोलियन बोनापार्टच्या काळात ती पॅरिसमधे येऊन तेंव्हापासून लूव्र संग्रहालयात आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकाद्या 'स्त्री' ची नसून 'अर्धनारी' ची आहे. खालील फोटो बघा:
.

काॅफी_2 चा घोट घेतला आणी ग्लैबेलर लाईन्स गडद झाल्या.
अपसुकच अभिधाना कडे हात गेला आणी शब्द कोशाच्या ढिगार्यात अर्थ शोधू लागला.

हळू हळू मनाच्या कॅनव्हास वर रंग दिसू लागले आणी डोळ्यांच्या कोप-यातल्या क्रोलाईन्स मधेच थोड्याशा थरथरू लागल्या..आणी

अशाच एका शब्द चित्र पटलावर उभरू लागले.

कामात रंगून गेलेल्या माणसाइतकं देखणं दुसरं काहीही नसतं अगदी ते बर्निनीचं आखीव रेखीव शिल्प सुद्धा..
.....

खरचं, बरीच पारायणं केली तेव्हां कुठे थोडा अर्थ उलगडला. नेहमीप्रमाणेच कच्चा माल शोधत असताना असेच एक चित्र दुपारच्या रणरणत्या उन्हात एका कवीने काढले आहे त्यांचे नाव कवी अनिल. "वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे उन'.

या गीताचा अर्थ आणी कार्यकारण भाव समजून घेण्यास त्या पाठीमागील वस्तूस्थिती शोधून काढली. आणी नंतर फक्त शब्द निघाले "अप्रतिम".

कवीता आवडली.

प्राची अश्विनी's picture

19 Apr 2024 - 2:11 pm | प्राची अश्विनी

खूप खूप धन्यवाद कर्नलसाहेब. ( बाकी कर्नल म्हटलं की जे चित्र डोळ्यासमोर उभं रहातं त्यात ग्लॅबलर लाईन्स असतातच. कदाचित छोटी सी बात मधल्या अशोककुमारमुळे असावं)
वर ळ झाली.. मला अतिशय आवडतं. पण इतके दिवस मी ते प्रेमगीत समजत होते. तुमचा प्रतिसाद वाचून थैडा गुगल सर्च केला आणि मग आर्तता समजली.
त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

19 Apr 2024 - 2:39 pm | कर्नलतपस्वी

भर दुपारी बारा वाजता डांबरीकरण चालू असलेल्या रस्त्यावर एका मजुरीवर काम करणाऱ्या आईची तगमग रेखाटली आहे. दुर पर्यंत कुठल्याच प्रकारचे झाड,आडोसा किवां सावली नाही. तान्ह्यास कापडात गुंडाळून रस्त्याच्या कडेला उन्हातच झोळीत टाकलयं. बारा वाजता सावली पायाखाली आली आहे आणी आई स्वताची सावली सुद्धा आपल्या बाळावर पांघरूण म्हणून टाकू शकत नाही.

इथे कवीने आई आपल्या बाळासाठी कुठपर्यंत विचार करू शकते याची परिसीमा दाखवली आहे.

कवितेतली हिच उत्कटता आणी कवीचे शब्द गीताला अजरामर करतात. म्हणून मला कविता फार आवडतात.

थोडक्यात स्पष्टीकरण इतर वाचकांसाठी.