बेटाचा शोध.
(विचित्रविश्वात भागो.)
आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012
आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता. ही नवीन युगाची देणगी होती. त्यात सगळे फरफटत जात होते. त्यात त्या आयाही होत्या. ह्यालाच नॅनीट्रॅप म्हणतात म्हणे. सगळे जग गतिमान आहे. आपण जर एकाच जागी थांबलो तर...? तर पळा पळा बघुया कोण पुढे पळतो ते!
मी पण हळूहळू त्या शर्यतीत खेचला जात होतो. पण सुदैवाने आमची त्यातून सुटका झाली.
एके दिवशी सकाळीच आमच्या एजंटचा फोन आला. मी फोन घेतला तर मला हेलो म्हणायची देखील संधी न देता तो अथक खोकत राहिला. त्याला तब्बल पाच मिनिटे झाल्यावर तो म्हणाला, “कोण? भागो पाटील का?”
“होय.”
“छान. भागो, तुमच्या साठी रावसाहेबांनी एक पाकीट पाठवले आहे. कृपा करून या आणि त्याचा ताबा घ्या. मला जबाबदारीतून मोकळे करा.”
“हो हो. तुम्ही उगा काळजी करू नका. काळजी केल्यानं तुम्हाला खोकल्याचा त्रास होतोय. हे लक्षात घ्या.”
“तुमच्या ह्या आपुलकीचा मी शतशः ऋणी आहे.”
रविवारी त्याच्या ऑफिसात जाऊन मी तो बंद लिफाफा ताब्यात घेतला. लिफाफा चांगला वजनदार नि जाडजूड होता. तो त्याच्या समोर उघडून वाचण्यात काही हशील नव्हते.
“मी हा घरी नेऊन वाचीन म्हणतो.”
“जशी आपली मर्जी. आधी इथे लिफाफा मिळाल्याची सही करा.”
मी तिथे लिफाफा मिळाल्याची सही ठोकली आणि घरी परतलो. घरी बायको वाट पहात होती. तिला तो लिफाफा दाखवला.
“अरे बापरे. हे काय नवीन लचांड तरी.”
मी तो लिफाफा फोडला आणि वाचला. त्या लिफाफ्यात जे काय रावसाहेबांनी लिहिले होते ते वाचून मी आश्चर्याने अवाक झालो. मती कुंठीत झाली. असं काय लिहिले होते त्या लिफाफ्यात? मी असं करतो त्या लिफाफ्यातला मजकूर जशाच्या तसा इथे उधृत करतो. रावसाहेब लिहितात,
“मत्प्रिय सौ. व श्री. भागो.
नमस्कार आणि अनेक आशीर्वचन.
मला वाटतंय कि मी आधी माझा परिचय करून द्यायला पाहिजे नाही का? आम्ही विभूते मूळचे विभूतेवाडी(धाकटी पाती) जिल्हा अहमदनगरचे जहागीरदार. आमच्या पूर्वजांनी थोरले बाजीरावांच्या चाकरीत राहून पराक्रम गाजवले, एकदा तर गनिमांच्या वेढ्यातून पेशव्याना सुखरूप बाहेर काढले. त्या उपकाराची परतफेड म्हणून पेशव्यानी त्याना हे गाव बहाल केले. जहागीर कसली? म्हणतात ना काप गेले नी भोके राहिली. आजोबांच्या काळापर्यंत वैभव गेले फक्त खुणा राहिल्या. पडक्या गढीची डागडुजी करायचीही ऐपत राहिली नाही. अशी अवस्था झाली असताना आजोबांनी विचार केला कि असं हातावर हात ठेवून, बसून परिस्थिती काही सुधारणार नाहीये. काहीएक निश्चय करून आजोबांनी गावाशी असलेले सारे बंध तोडून आफ्रिकेकडे प्रयाण केले.
भागो, आफ्रिकेत त्यांनी काय उद्योग केले ते इथे लिहिण्यात काही अर्थ नाही. कारण आज जी कोट्याधीशांची पिढी दिसते त्या घराण्याच्या मूळ पुरुषाच्या सुरवातीच्या कारकिर्दीचा बराचसा कालखंड अंधारलेला असतो. तसा आजोबांचाही होता. पण तो वेगळा विषय आहे. तर आजोबा ह्या सगळ्यातून जेव्हा सही सलामत तावून सुलाखून बाहेर आले ते हिऱ्यांच्या खाणीचे सधन मालक म्हणून.
आता त्या संपत्तीचा मी एकमेव वारस आहे.
आता थोडं माझ्या विषयी.
मला लहानपणा पासून प्राणीशास्त्रात रुची होती. लहानपणी माझ्या खिशात सरडे, पाली सारखे जीव ठेवून फिरत असे. माझे आणि प्राण्यांचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. प्राण्यांना “सिक्स्थ सेन्स” असतो. त्याना आपला कोण आणि पराया कोण हे बरोबर समजते. तसा मी रूढ अर्थाने झूआलॉजिस्ट नव्हतो म्हणजे माझ्याकडे कुठल्याही विश्वविद्यालयाची पदवी नव्हती. ( ती पदवी घेऊन नाहीतरी मी काय करणार होतो. नोकरी?) पैसा अमाप होता, वेळ अफाट होता. काय करायचे ते मात्र नजरेसमोर दिसत नव्हते. ह्याच सुमारास “क्रिप्टोझूआलॉजिस्ट सोसायटी ऑफ अमेरिका” ची स्थापना व्हायचे घाटत होते.
भागो, क्रिप्टोझूआलॉजि आणि क्रिप्टीड असे शब्द कदाचित तुमच्या कानावरून गेले नसतील.
A cryptid is an animal or creature that people believe is real but there is no solid proof or scientific evidence available to prove that it does actually exist.
बऱ्याच प्राणिशास्त्रज्ञांच्या मते “क्रिप्टीड” हे मानवी कल्पना विलासाचा आविष्कार आहेत. जरी जगातील अनेक महाकाव्यात वा पुराणात आणि लोककथातून त्यांचे उल्लेख सापडतात. तरी त्यांचे अस्तित्व मान्य करायला ते तयार नाहीत. आपल्याकडचे जटायू, गरुड, ग्रीक देवता पॅन, इजिप्तचे स्फिंक्स हे व अनेक. मानवी इतिहासाच्या सुरवातीपासून आजतागायक ह्यांच्या कथा जगाच्या सगळ्या भागातून निरनिराळ्या जनसमुदायाकडून एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हा अमोल ठेवा हस्तांतरित झाला आहे. विकिपीडिआ मध्ये, भागो, तुम्हाला अशा प्राण्यांची यादीच मिळेल.
अगदी सध्याच्या युगात अमेरिकेतील “बिगफूट”, स्कॉटलंडच्या सरोवरात राहणारा “नेसी”, हिमालयात एकाकी भटकणारा “येती”, टास्मानियन टायगर... यादी बरीच मोठी आहे.
आम्ही उत्साही लोकांनी मिळून सोसायटी स्थापन केली. माझा उत्साह आणि व्यासंग बघून सभासदांनी माझी “चीफ इंवेस्टिगेटर” म्हणून नेमणूक केली. त्यानिमित्ताने मी जगभर प्रवास करायला लागलो. त्याचा परिणाम असा झाला कि मला आपल्या अज्ञानाची तीव्र जाणीव झाली. आम्ही जितक्या वेळा म्हणून अमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये मोहिमा काढल्या तितक्या वेळा आम्हाला प्राण्यांच्या नवीन प्रजाती मिळाल्या. जगाच्या समुद्रातल्या केवळ ५% प्राण्यांची आपल्याला माहिती आहे. पृथ्वीचा ७०% भाग समुद्रांनी व्यापला आहे. कल्पना करा, भागो, ह्या समुद्रांच्या तळाशी कश्या प्रकारचे जीव नांदत असतील. आपल्याला काही कल्पना नाही. बरेच काही लिहिण्यासारखे आहे. इथेच थांबून मी मुख्य विषयाकडे वळतो.
साधारणतः पाच सहा वर्षांपूर्वी मी विमानाने मुंबईतून दुबईला जात होतो. हे साधे पंख्याचे विमान होते. मी मुद्दाम माझ्या प्रवासासाठी चार्टर केले होते. ते कमी उंचीवरून उड्डाण करत होते. हवा स्वच्छ होती. त्यामुळे खालचा प्रदेश मला क्लिअर्ली दिसत होता. एकदम माझा सिक्स्थ सेन्स जागृत झाला. मी खाली नजर टाकली तर फाईंडर खाडीवरच्या बेटावरून आम्ही जात होतो. मला जाणीव झाली कि अरे इथे काहीतरी गूढ रम्य चालले आहे. हे सोडून मी दुबईला का बरे जातो आहे? मी कॉकपिटात जाऊन पायलटला विमान माघारी वळवण्यास सांगितले. दुबईला “डेझर्ट क्रिप्टीड” विषयावर सेमिनार होता. त्यांना कळवले कि काही अपरिहार्य कारणाने मी येऊ शकत नाहीये. त्यांची निराशा झाली असणार पण माझा नाईलाज होता.
मुंबईला परत आल्यावर टॅक्सीकरून फाईंडरला पोचलो. खाडीच्या किनाऱ्यावर स्थानिक कोळी लोकांचे गाव आहे. त्या गावाच्या सरपंचाला गाठले. त्याचा आधी गैरसमज झाला असावा. त्याला वाटले कि “तसले” काहीतरी काम असावे. तसले म्हणजे “माल” उतरावयाचे. तो म्हणाला आम्ही असल्या कामात पडणार नाही. तुमचे तुम्ही बघून घ्या. त्याची खात्री पटवायला बराच वेळ लागला. पण एकदा खात्री पटल्यावर तो दिलखुलास बोलायला लागला. मला त्या बेटा विषयी रुची आहे हे कळल्यावर...
“हो त्या बेटाची मालकी आमच्या पंचायतीकडे आहे.”
“पण तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही ह्या भानगडीत न पडाल तर बरे.”
“का? का तर ते बेट झपाटलेलं आहे. आम्ही कोणी तिथे कधीही जात नाही. फक्त वर्साच्या पैल्या अमासला एक कोंबडं वाहून दुरून नमस्कार करून परततो. त्यांचा काही त्रास होऊ नये म्हणून.”
“त्याचे काय आहे सायबा, अमाप वरसामागं तिथे बाहेरून काही जीव आले होते. ते पिढ्यान पिढ्या तिथेच वस्ती करून आहेत.”
(हा हेच ते.)
“नाही आमी कोणीही बघितले नाहीत. पण ते आहेत.”
“काय बोलाताव काय? तुम्हाला ते बेट पाहीज्याल? पंचायतीला विचारायला पाहिजे.”
(क्रमशः)
प्रतिक्रिया
12 Apr 2024 - 9:56 am | विवेकपटाईत
कथा आवडली
12 Apr 2024 - 12:10 pm | भागो
काका
आभार मानतो आहे.
बरच मोठं कथानक डोक्यात होतं. आता हवा हवा झालय. दुसरी लाईन पकडायला पाहीज्याल.
12 Apr 2024 - 12:50 pm | कर्नलतपस्वी
आपोआप पुढल्या लाईनी दिसतील.