एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा..
बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा.
मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो,
दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं!
म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ...
कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार?
स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार?
मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ?
त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ...
मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं.
नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग? आवडेल की नाही?
फारच रात्र किंवा अगदीच पहाट आहे का आता"
असं शेक्सपियरचं भूत मानेवर चढ़ून बसतं.
आणि लिहिता हात धरून बसतं.
अगदी याचसाठी, उत्तरात एक प्रश्न लपवून पाठवावा.
त्यामुळं "नुसतंच हाय कसं म्हणावं?
घनघोर आठवण आली हे कसं लपवावं?
हिरव्या ठिपक्याची वेड्यासारखी वाट पाहिली ही कबुली कशी द्यावी?"
अशी सगळी गुपितं जपली जातात आपोआप...
"उत्तर प्रश्न प्रश्न उत्तर" अशी लोकरीची लडी उलगडत जाते..
शब्दांशी शब्द जुळत जातात..
मनांना मनं कळत जातात..
कधी कधी मग मौनाचे सुद्धा संवाद होतात.
पण ते सगळं पुढचं पुढे..
आत्ता मात्र, जाता जाता उत्तरात अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा ..
प्रतिक्रिया
24 Mar 2024 - 11:10 am | प्राची अश्विनी
सासं
तेवढं शीर्षक बदलून प्रश्नाच्या करता येईल का?
24 Mar 2024 - 3:25 pm | अहिरावण
यंदा मोहर जोरदार आलाय का?
25 Mar 2024 - 8:38 am | प्राची अश्विनी
:)