पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस.
तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो,
माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते.
ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं.
शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं.
पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते.
कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं.
तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस.
मग "मग" घेतोस.
मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते.
तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.
पाठमो-या तुला असं कॉफीत मग्न झालेलं पहाणं पण रोमांचक असतं.
मग अमूलची मिल्क पावडर..
मी उगाचच तुझ्या जवळ जात तुझ्या कंबरेभोवती हात टाकत "नक्की without sugar आहे ना?" करत तुला उचकवते.
पण तू माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत, नाकावरचा चष्मा अर्धा खाली घेऊन सॅचेवरची माहिती वाचून माझ्या ज्ञानात अमूल्य भर टाकतोस.
मला इथं हसू फुटत असतं,
आणि तिथं पाण्याला उकळी.....
तू किटलीचं बटण बंद करून, एका हाताने मला गरम किटली पासून लांब ठेवत मग मध्ये पाणी ओततोस.
स्टीकने कॉफी ढवळतानाची तुझी एकाग्रता तर अगदी एखाद्या athlete सारखी..
..
वाफाळत्या कॉफीवरचा पहिला हक्क माझाच !
मी फूफू करत एक घोट घेते आणि "mmmm" म्हणत मग तुझ्याकडे परत देते.
कॉफी एकदम बकवास झालेली असते..
आणि आता ते तुलाही कळणार असतंच की..
पण तुझ्या गळ्यात पडून तुझ्या हातातल्या त्या गरम्म मगाला गाल लावत असं एकत्र कॉफी पिणं मात्र खरंच ummm असतं..
अशावेळी कळतं इतक्या साध्या सुध्या कॉफीला उत्तेजक पेय का म्हणतात ते..
( कविता की गद्य यांचा निर्णय करता आला नाही. )
प्रतिक्रिया
21 Mar 2024 - 10:22 am | अहिरावण
अजुन मेहनत घेतली असती तर तरल काव्य झालं असतं... जाऊ द्या !
21 Mar 2024 - 10:42 am | प्राची अश्विनी
ब्लॅक कॉफी समजून सोडून ध्यान.
21 Mar 2024 - 12:21 pm | अहिरावण
ते तर आहेच...
21 Mar 2024 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्तछंदातल्या कविता अशा असतात.
वाह ! कॉफी आवडली. आशय पोहोचला.
लिहिते राहा.
''मुझे आजकल इतनी फुरसत नही है,
सलामत रहे, तेरी आखो की मस्ती''
-दिलीप बिरुटे
21 Mar 2024 - 10:41 am | प्राची अश्विनी
आणि वाह!
खुदा करे आप को फुर्सत भी मिले
और मस्ती भरी कॉफी भी|
21 Mar 2024 - 2:49 pm | कंजूस
कॉफीची पूड कोणती यावर ठरतं कॉफी चांगली होणार का नाही. कॉफी बोर्डाची दुकानं असतात तिथून फिल्टर कॉफी (+दहा टक्के चिकोडी मिक्स मिळते) ती आणावी थोडी. पन्नास ग्राम आणून संपल्यावर आणखी आणावी. कारण ते दुकानदार रोज थोड्या कॉफी बिया नवीन दळतात . ( रोबस्टा नावाच्या बिया थोड्या कडवट असतात पण स्वस्त असतात. अरेबिका कडवट नसतात पण महाग असतात. चिकोडी किंवा चिकोरी ही कॉफी नसते पण कॉफीचा कडवटपणा कमी करण्यासाठी मिसळतात. इन्स्टंट कॉफी आणू नये.
( हे गद्य आहे).
मागच्या महिन्यात चिक्कमगळुरू इथे रस्त्यावर टपरींवर बरीच कॉफी प्यायलो. दहा रुपये कप. मशीनमध्ये दूध पावडरने केलेली कॉफी पिऊ नये.
बाकी काव्य,भावना पोहोचल्या थोड्या.
22 Mar 2024 - 10:31 am | अहिरावण
बाकी कॉफी करायची तर ब्रास फिल्टरमधेच... https://www.pandurangacoffee.com/products/south-indian-brass-filter
24 Mar 2024 - 10:32 am | प्राची अश्विनी
घेतला पाहिजे हा.
21 Mar 2024 - 3:16 pm | कर्नलतपस्वी
कधी कधी आयुष्यात काही गोष्टी उशीरा कळतात
अन हृदयाला चटका लावून जातात.
काॅफी हे पेय इतकं उत्तेजक असतं हे आताच कळालं
शाळा आणी ऑफिसच्या गडबडीत कधीच नाही मिळालं
ते गळ्यात पडणं,वाफाळलेली काॅफी एकत्र पिणं ...
उरलय फक्त दिवा स्वप्न.
कारण माझा सुर्य उगवतो तेंव्हा असते तीची मध्यानरात्र .
कवीता आवडली.
24 Mar 2024 - 10:31 am | प्राची अश्विनी
धन्यवाद.
21 Mar 2024 - 5:15 pm | किसन शिंदे
ही कॉफी घरातली कि हॉटेलमधली..? त्या प्रसंगातले अगदी बारकावे सुद्धा टिपलेत लिखाणात.
24 Mar 2024 - 10:32 am | प्राची अश्विनी
मनातली!;)