सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :
“ ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.
या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.
प्रश्न
१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.
२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही
३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.
५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?
६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.
निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.
वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.
अग्रिम धन्यवाद !
****************************************************************************************
धन्यवाद !
प्रतिक्रिया
27 Feb 2024 - 7:38 am | कंजूस
स्वागत
27 Feb 2024 - 3:56 pm | श्वेता व्यास
छान उपक्रम आहे, लेखकांचे अनुभव वाचायला आवडेल.
27 Feb 2024 - 5:06 pm | कुमार१
तुम्ही सुरुवात करून टाका ! वाचायला नक्कीच आवडेल :)
27 Feb 2024 - 6:21 pm | श्वेता व्यास
स्वत:ला लेखक म्हणवून घेण्याइतकं लेखन आणि लेखनसातत्य दोन्ही माझ्याकडे नाही. तरीसुद्धा आजपर्यंतचा अनुभव पुढीलप्रमाणे आहे.
१. पूर्वी फक्त स्वत:साठी लेखन चालू होतंच. २०१० साली ब्लॉगलेखन सुरु केलं. छापील लेखन २०१७-१८ मध्ये गोवन वार्ता साठी केलं होतं. ५-६ लेख साप्ताहिक पुरवणीत छापून आले, नंतर त्या सातत्याने लेखन जमलं नाही. २००८-२०१० या काळात बरेच लोक ब्लॉग लिहायचे, काहींचे ब्लॉग्स वाचून वाटायचं की यापेक्षा आपण बरं लिहू शकतो, आणि मनात बरंच काय काय येत असतं तर लिहून पाहुयात.
२. दोन्ही माध्यमातून पूर्वी केलं आहे, सध्या दोन्ही बंद आहेत.
३. स्वतःचा ब्लॉग / संस्थळे (मिपावर २-३ लेख आहेत बहुतेक) / वृत्तपत्रे (पूर्वी छापून आलंय, नंतर प्रयत्न केला नाही)
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? शक्यतो ललितलेखन, मनोगत वाटेल असं.
५. मनातलं लिहून काढावं असं बऱ्याचदा वाटतं, तितका वेळही मिळाला तर लिहिते. मनापासून इच्छा नाही झाली तर लिहीत नाही.
६. ब्लॉगवर सुरुवातीला ओळखीचे लोक वाचून छान म्हणायचे, तेव्हा हे फक्त प्रोत्साहन आहे की खरंच चांगलं आहे हे कळायचं नाही. अनोळखी लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तेव्हा जरा बरं वाटलं. वृत्तपत्रामध्ये फोन नंबर दिलेला होता तेव्हा काही वाचकांनी आवर्जून SMS वर लिहिलेलं आवडल्याचं सांगितलं तेव्हा समाधान मिळालं होतं. आणि सध्या लेखन बंद असूनही लोक विचारतात की सध्या लिहीत का नाही, तेव्हाही वाटतं की वाचणारं कोणीतरी आहे, लिहायला हवं परत!
27 Feb 2024 - 7:14 pm | कुमार१
हे अगदी पाळावेच. 'आतून' येणे जरुरीचे.
नक्की लिहीत रहा !
27 Feb 2024 - 11:27 pm | मुक्त विहारि
१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.
----- १२-१३ वर्षे झाली. विशेष आठवण म्हणजे, तेंव्हा पासून अतृप्त आत्मा, वल्ली आणि गणपा, यांच्या बरोबर सुर जुळले आणि ते अद्यापही टिकून आहेत.
२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही
--- इलेक्ट्रोनिक
३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी
----- संस्थळे
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.
--- जे जे हिंदुत्ववादी असेल ते ते लिहितो.
५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?
--- ह्याच देशांत, हिंदुंना कुणीही फाट्यावर मारायला नको, म्हणून हिंदु हितवादी ह्याच भूमिकेतून लिहितो.
६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.
----- जे जे हिंदू हितवादी आहेत, ते एकत्र यायचा प्रयत्न करतातच.
28 Feb 2024 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व मिपाकर, मालक, तंत्रज्ञ, संपादक, हितचिंतक, लेखक-वाचक सर्वांना भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
28 Feb 2024 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.
महाविद्यालयात शिकत असतांना कविता करणे नाद होता. कारण म्हटलं तर, प्रेमाच्या झुळकेचा परिणाम असला तरी, कवितेचं स्वरुप सामाजिकच होतं. विद्रोही, भिडणं, व्यवस्थेविरुद्ध, प्रशासनाविषयी खदखद हीच कारणं असावीत.
२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही.
आम्ही काही मित्र एक साहित्य विषयक त्रैमासिक चालवतो त्यात अधुन-मधुन लिहित असतो. छापील आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही ठिकाणी लिहितो.
३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी
ब्लॉग, वृत्तपत्रे, नियतकालिके.
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.
नवे पुस्तक समिक्षात्मक, चित्रपट, आवडलेली कथा. एखादा साहित्यप्रकार, साहित्यात येणारे सामाजिक विषय, तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य, भाषा. इ.
५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?
व्यक्त होण्याची खाज हे मुख्य कारण लेखनामागे आहे, असे वाटते.
६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.
वाचकांच्या प्रतिक्रिया या वरवर समाधान करणा-या असल्या तरी आपण आपलं व्यक्त होणे महत्वाचे वाटते. लिहिण्याचा आतुन आवाज आला की लिहायचं. वाचकांच्या अपेक्षेसाठी लिहु नये असे मत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(हौशी लेखक-वाचक )
28 Feb 2024 - 1:36 pm | अहिरावण
५. खाज
28 Feb 2024 - 1:52 pm | कुमार१
दोन्ही मनोगते नेटकी व प्रामाणिक आहेत.
आवडली !
28 Feb 2024 - 1:52 pm | कुमार१
दोन्ही मनोगते नेटकी व प्रामाणिक आहेत.
आवडली !
28 Feb 2024 - 2:53 pm | नपा
लेखकाच्या दिलेल्या व्याखेनुसार.. मीपण लेखक या गटात येतो.
१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.
घरापासून दूर राहणे हे सर्वात महत्वाचे कारण होते लेखनाला - तेव्हा पत्र लेखन एवढ्यापुरतं मर्यादित होतं. वाचनाची आवड होतीच. जेव्हा काही किस्से, प्रवासवर्णन/अनुभव लिहिण्यायोग्य वाटले ते लिहून काढले. साधारण २५ वर्ष झाली असावीत.
अर्थात सातत्य नाही. एवढ्यातच एक नाटक सुद्धा लिहिला आहे.
२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही
दोन्ही
३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी
वृत्तपत्रं व मिपा
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.
अनुभव, काही किस्से
५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?
मनापासून जर एखादा विषय आवडला आणि लिहावंसं वाटलं तरच लिहिता येत उगाच ओढून ताणून लिहिणे होत नाही.
29 Feb 2024 - 7:39 pm | कुमार१
अगदी. आतून येणे महत्वाचे.
29 Feb 2024 - 7:59 pm | गवि
+१
नुसतं लिहावंसं वाटणं इतकंच पुरेसं नसून, आता हे लिहिल्याशिवाय चैन पडणार नाही, झोप लागणार नाही, स्वस्थ वाटणार नाही अशी मजबुरी झाली तरच होणारे लेखन विलक्षण असते. एरवी (उदा. कोणत्या तरी दिवाळी अंकाला दिलेली कमिटमेंट म्हणून) पार पाडणे, त्यात जीव नाही
;-)
29 Feb 2024 - 9:31 pm | सर टोबी
काही तरी, आपला अपार श्रद्धा असणारा विचार सांगावा, चुकून माकून विखारी टिका झाली तरी अहमिहिकेने आपली श्रद्धा सोडू नये असं वातावरण आता राहिले नाही. येशू ख्रिस्ताची एक गोष्ट आठवते. एका बदफैली स्त्रीला त्यावेळेसच्या कायद्याप्रमाणे दगडांनी ठेचून मारण्याचा आदेश दिला जातो. ती स्त्री जीवाच्या आकांताने पळत येशू ख्रिस्तापाशी येऊन कोसळते. तिच्या मारेकऱ्यांचा त्वेषपूर्ण विचार ऐकून येशू फक्त एकच सांगतो - ज्याने कधीही पाप केलं नाही तो या स्त्रीला पहिला दगड मारेल. सगळा जमाव खजिल होऊन निघून जातो.
आजच्या काळात त्या स्त्रीचे मरणे अटळ असेल!
माझी माझ्या विचारांप्रती श्रद्धा कायम आहे पण ते विचार सांगण्याची उर्मी आता नाही.
1 Mar 2024 - 8:56 am | सुधीर कांदळकर
खालीलप्रमाणे :
१. २००७ सालापासून. १९९८ साली माझ्या आईच्या पंचाहत्तरी सोहळ्यात जमलेल्या नातेवाईकांशी गप्पा मारतांना अनेक आठवणी निघाल्या. तेव्हां बहुतेकांनी सांगितले की माझ्या आठवणी एकदम ताज्या आहेत आणि निवेदनशैली मस्त आहे. तू लिही. पण कागदावर लिहिणे मुळातच मला आवडत नाही. मनोगत, मिपा वगैरे संस्थळे सुरू झाली आणि बरहा फॉन्टने कळफलकावर मराठी बडवणे सोपे झाले. मग एक प्रवासवर्णन लिहिले. स्वत: स्वतःचा समीक्षक बनलो. पंधरा दिवसांनी वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. पुन्हा वाचले. दुरुस्त्या, नूतनीकरण. शेवटी समाधान झाल्यावर प्रसिद्ध केले.
२. इलेक्ट्रॉनिक माध्यम. एकदा एका छापील मासिकात एका विषयावर लेख मागवले होते. मी पाठवला. पसंत आला, प्रसिद्ध झाला. मोबदला म्हणून २५० रु. मिळाले. तेवढेच छापील माध्यमातले लेखन.
३. मनोगत, मिपा आणि ब्लॉगवर.
४. प्रवासवर्णने, आठवणी, शास्त्रीय विषयांवर, संगीतावर लेख लिहिलेत.
५. कांही वाचक मनापासून प्रामाणिक प्रतिसाद देतात. कांही लेखकाची जात किंवा विचारधारा पाहून हातचे राखून लिहितात. तर कांहीजण प्रतिसाद हे मनातले ठराविक विचारधारेचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणून प्रतिसाद देतात. पण अशाच्या मनातील द्वेषभावना पाहून मी व्यथित होतो. त्यामूले फारसे प्रसिद्ध करीत नाही. लिहिलेले ९० टक्के माझ्याजवळच ठेवतो. पण स्वतःचेच प्रसिद्ध अप्रसिद्ध लेख पुन्हां वाचतांना छान वाटतें हे खरेंच.
या लेखावरील इतरांचे प्रतिसाद वाचतांना छान वाटले. लेखकांस धन्यवाद.
1 Mar 2024 - 9:33 am | कुमार१
प्रांजळ मनोगत आणि पाचव्या मुद्द्यात आलेले परखड भाष्य हे दोन्ही आवडले.
>>अगदी सहमत.
या निमित्ताने अमेरिकेचे आद्यकवी वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितेतील दोन ओळी उद्धृत करतो :
मुळात आपण स्वतःसाठीच लिहीत असतो; जे लिहितो त्याचे परिणाम आपल्यावर होतातच !
1 Mar 2024 - 2:20 pm | श्वेता व्यास
@कुमार१ सर, आपण सातत्याने सर्वांना उपयुक्त असे लेखन करत आहात.
आपला व्यासंग मोठा आहे. एक डॉक्टर असूनही लिखाणासाठी तुम्ही खास वेळ काढता याबद्दल फार कौतुक वाटतं.
आपण खऱ्या अर्थाने लेखक आहात. त्यामुळे तुमच्या लेखन प्रवासाबद्दल तुमचे मनोगत वाचायला नक्कीच आवडेल.
1 Mar 2024 - 2:54 pm | कुमार१
श्वेता, धन्यवाद
मुळात आपले संस्थळ हे हौशी लोकांचे व्यासपीठ आहे. इथे लिहिणारा प्रत्येक जणच लेखक आहे असे मी मानतो. तो नवोदित असो किंवा मुरलेला, अशा प्रत्येकाचे मनोगत सर्वांसमोर यावे असे मनापासून वाटते.
या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्यातील जास्तीत जास्त लेखकांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी इच्छा आहे.
म्हणून मी माझ्या मनोगताचा क्रमांक शक्य तितका उशिरा ठेवलेला आहे.
नक्की लिहीणार आहे; थोडी इतरांची वाट बघतो आहे इतकेच :)
2 Mar 2024 - 2:23 pm | कुमार१
माझ्या मातुल आणि पितुल घराण्यात मिळून गेल्या दोन पिढ्यांमध्ये चार लेखक होते. ते पुस्तके लिहून स्वतःच प्रकाशित करीत. त्या पुस्तकांच्या छपाईदरम्यान घरी एकत्र बसून मुद्रितशोधन केले जाई. ही कौटुंबिक पार्श्वभूमी लेखनाला फारच पोषक होती. माझ्या लेखनछंदाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी, पदवी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षात.
आपल्या आजूबाजूस घडणाऱ्या व मनाला भिडणाऱ्या असंख्य घटनांवर आपण समाजात कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि दैनिकातील वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली. त्या काळी पत्रलेखकाला आपले नाव पेपरात छापून आलेले पाहण्याचा आनंद काही औरच असे. जशी माझी पत्रे क्रमाने प्रकाशित होऊ लागली तसा तो आनंद वाढत गेला. मग या प्रकाराची गोडी लागली
दरम्यान पदवी शिक्षण संपताना लिहीलेला ‘’ मुक्काम पी. एच. सी.” हा कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झालेला माझा आयुष्यातील पहिलावहिला लेख अर्थात अनुभवकथन.
नंतर सुमारे १५ वर्षे अगदी व्यसनासारखे विविध विषयांवर प्रमुख दैनिकांतून फक्त पत्रलेखन केले. एकदा एका कुटुंबीयाच्याच पुस्तकाला 25-30 ओळींचे प्रास्ताविक लिहीले आणि त्याला “पान उलटण्यापूर्वी..” हे शीर्षक दिले होते.
पुढे कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून, “आता फक्त पत्रे बास झाली, स्वतंत्र लेख लिही पाहू” असा सल्ला दरडावून मिळाला ! मग हळूहळू वृत्तपत्रांमधून (मुख्यत्वे ‘सकाळ’ दैनिक) काही लेख व दोन लेखमालाही लिहिल्या. त्या काळी दैनिकांत अनाहूत लेखनाच्या प्रसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असायचे. परंतु जे काही प्रसिद्ध झाले त्याने लेखनाला प्रोत्साहन मिळत गेले.
साधारण १९९५च्या सुमारास मासिकांमध्ये लेखन चालू केले. त्यापैकी प्रमुख मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ त्यात वीस वर्षे मनमुराद लेखन करून अक्षरशः अंतर्नादमय झालो होतो. तसेच ‘पुरुष उवाच, ‘अपेक्षा’ आणि अन्य काही दिवाळी अंकांमध्येही लिहिले. पुढे 2015 च्या सुमारास हळूहळू छापील साहित्यिक मासिके बंद पडू लागली. मग मलाही बदलणे भाग होते आणि त्यानुसार लेखन इ-माध्यमात- म्हणजेच मायबोली संस्थळावर करू लागलो. २०१७मध्ये मिपावर पण आलो. सुरवातीस फक्त ललितगद्य या प्रकारात रमलेलो होतो. पण पुढे आरोग्य आणि मराठी व इंग्लिश भाषाविषयक लेखनातही पदार्पण केले. सन 2018 नंतर छापील माध्यमातले लेखन केलेले नाही; आता फक्त माबो व मिपा ही संस्थळे.
पूर्वी मोजून ६ कविता केल्या होत्या आणि त्यातल्या दोनांना वाचक आणि श्रोत्यांची पसंती मिळाली होती. परंतु आपल्यात काव्यगुण नाहीत हे वेळीच जाणवल्याने ते खाते बंद करून टाकले.
सातत्याने लेखन करण्यामागे, मनातील विचारांचा निचरा होणे, लेखनउर्मी आणि वाचकांशी संवाद साधणे हे हेतू आहेत. लेखनाच्या गेल्या ४२ वर्षांत वाचकसंवाद एकंदरीत समाधानकारक आणि आनंददायी आहे. “कला ही टीका व स्तुतीची सारखीच धनी असते” या उक्तीनुसार या दोन्हीही गोष्टी अनुभवल्यात.
आता उर्वरित आयुष्यात लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे असा मानस आहे. स्वतःच्या मन:चक्षूपुढे एक तराजू ठेवलेला आहे. त्याच्या एका पारड्यात निरीक्षण, वाचन, चिंतन आणि मनन ही ४ गाठोडी तर दुसऱ्या पारड्यात फक्त लेखन आहे. या दोन पारड्यांपैकी पहिले पारडे जितके जड राहील तितके ते लेखकाच्या हिताचे असेल.
भविष्यकाळात दृकश्राव्य माध्यमांमधील धोधो सादरीकरणामुळे निव्वळ लेखनाला किती महत्त्व राहील, हा गांभीर्याने विचार करायचा प्रश्न आहे. यावर प्राथमिक विचार केला असता, “टीव्ही आणि इंटरनेटच्या झंझावातानंतर रेडीओ किंवा सर्व जुनी लेखनमाध्यमे संपुष्टात आली का?“ हा प्रश्न मनात येतो आणि त्याचे उत्तर आपल्या सगळ्यांसमोर आहे. ते पाहता, बऱ्याच सादरीकरणांसाठी सुद्धा मूलभूत लेखन ही गोष्ट लागतेच. त्यामुळे ती पायाभूत कला म्हणून अस्तित्वात राहील असे वाटते; निव्वळ त्याचा वाचकवर्ग बऱ्यापैकी कमी होईल. वाचकांपेक्षा प्रेक्षकवर्ग भरपूर वाढल्याचे चित्र आता आपल्यासमोर आहेच.
.. असा हा ४ दशकांचा लेखनप्रवास !
5 Mar 2024 - 2:27 pm | श्वेता व्यास
वाह! प्रेरणादायी असा थक्क करणारा लेखनप्रवास आहे.
मनातील विचारांचा निचरा होणे
हे मात्र खरंय.लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे
कृपया असे करू नका :)
9 Mar 2024 - 4:12 pm | कर्नलतपस्वी
वडिलांनी लवकरच गाशा गुंडाळला,दाणादाण उडाली.वारसाहक्काने मिळालेल्या विस्कळित राज्याची घडी बसवण्यासाठी पौगंडावस्थेतचं शस्त्र उचलावे लागले. मुंडके उडालेल्या शिपाया सारखा सैरावैरा दाणपट्टा फिरवू लागलो. "वन मॅन आर्मी", प्रयत्नांती परमेश्वर, लवकरच यश आले. राज्य स्थिरस्थावर झाले. भूतलावरील सामन्य मानवा प्रमाणे संसार सागरात गटांगळ्या खात कसाबसा किनार्यावर पोहोचलो.(म्हणजे सेवानिवृत्त झालो).
लहानपणीच्या जिवाभावाच्या सवंगड्यानी कायप्पावर साद दिली. सर्वांनी आपापल्या भूतकाळाचा हिशोब दिलासा मी सुद्धा दिला. चिमणीच्या दाताने रावळगाव चॉकलेट वाटून खाल्लेल्या सवंगड्यांनी चाॅकलेटशी इमान राखून हरबार्याच्या झाडावर चढवले.
आणी मी लिहायला लागलो.
स्वानंदा करता लिहीतो.
नाही प्रतिसादाची मोजणी
नाही उपहासाची बोचणी
अशी अवस्था.
बाकी,आपले लेख खुप माहितीपूर्ण ,किचकट विषय सोपे करून सांगण्याची हातोटी काही वेगळीच आहे.
9 Mar 2024 - 4:46 pm | कुमार१
हे विशेष आवडले !
लिहित रहा कविराज....
16 Apr 2024 - 8:16 pm | कुमार१
चांगल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकेल असं जे काही वाचण्यात, ऐकण्यात किंवा बघण्यात येईल त्याच्याही नोंदी इथे करून ठेवतो.
…
युट्युबवर वसंत वसंत लिमये या लेखकांची मुलाखत पाहिली. त्यांच्या एका कादंबरी लेखनाच्या काळातील त्यांनी सांगितलेला हा किस्सा.
कादंबरीचा घटनाकाळ 1990 च्या दशकातील होता. त्यांच्या कादंबरीतील एक व्यक्ती 1991 साली संध्याकाळच्या वेळेस डोंबिवली लोकलने प्रवास करणारी होती. हा तपशील लिहिताना त्यांना हेही महत्त्वाचे वाटले की, त्या काळी संध्याकाळच्या विशिष्ट वेळेतील डोंबिवली लोकल अमुक ठिकाणाहून किती वाजता निघते, याचा शोध घ्यावा.
आता इतके जुने वेळापत्रक तर गुगलवर नाही. मग त्यांनी रेल्वेतील लोकांच्या ओळखी काढत त्या काळचे छापील वेळापत्रक मिळवले आणि त्या लोकलची बरोबर वेळ त्यातून शोधून मग ती कादंबरीत लिहीली. या सगळ्या प्रकारात घरच्यांनी त्यांना वेड्यात काढले. परंतु त्यांनी त्यांच्या या खटाटोपाचे समर्थन असे दिले :
वास्तवातले तपशील काल्पनिक लेखनात सुद्धा शक्य तितके अचूक असावेत हा त्यांचा आग्रह आवडला.
16 Apr 2024 - 9:30 pm | विवेकपटाईत
आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी लेखन सुरू केले.मराठी येत नव्हती तरी मराठीत लिहिण्याचा निर्धार केला. मिसळपाव वाचकांनी माझी भाषा सहन केली. त्यांनाच सर्व श्रेय.