मनी वसे ते
--------------------------------------------------------------------------------------------------------
२७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होता. त्यादिवशी रात्री शाळेत थांबायचं ठरलं. सर असं म्हणल्यावर त्या कल्पनेने वरुणला धमाल वाटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन होता.त्याच्या तयारीसाठी मुलं काम करणार होती.
मराठी भाषा गौरव दिन म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने तो दिवस साजरा करण्यात येतो. तर, विज्ञानदिन हा सर सि.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो. रामन इफेक्ट या शोधाची घोषणा त्यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी केली.तो हा दिवस.या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
शाळेमध्ये दोन्ही दिवस कार्यक्रम होते. त्यातही विज्ञानदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार होता. त्याची बरीच कामं होती.शास्त्रीय प्रयोगांची नावं, ते सादर करणाऱ्या मुलांची नावं, यांचे फलक तयार करायचे होते. त्यामुळे आधल्या दिवशी शाळेत थांबून काम करायचं ठरलं होतं. जेवणाची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यांची शाळा म्हणजे नवीन प्रशाला. ती गावाबाहेर होती. आजूबाजूला सगळं मोकळं. माळरानावर ती एकटीच उभी. शाळेचं मैदान प्रचंड आणि एका बाजूला शाळेची भव्य इमारत.
शाळा सुटल्यावर मुलं काम करू लागली. आठवी अन नववीची फक्त.रात्रीचे नऊ वाजले. मुलं दमली होती. त्यांना भुका लागल्या होत्या. ती जेवायला बसली. मुलांना सोबत विज्ञानाचे ढमाले सर होते.
एका वर्गात झोपण्याची व्यवस्था केली होती.पोरांची बडबड चालू होती.
दुसऱ्या दिवशी चश्मिष्ट परेशला स्टॉलवर अंधश्रद्धेबद्दल बोलायचं होतं. समाजात बाबा अन बुवा लोकांना फसवतात. त्यासाठी ते विज्ञानाचे प्रयोग करतात. आणि लोकांना ते चमत्कार वाटतात, याविषयी तो लोकांना माहिती देणार होता.
परेश होता स्कॉलर; पण भावखाऊ प्रकार ! सकाळी वर्गात मराठी दिनाचे कार्यक्रम होते.परेशने म्हणींच्या गोष्टी सांगितल्या होत्या.त्यामध्ये एक म्हण होती- मनी वसे ते स्वप्नी दिसे ! त्याची आठवण निघाली आणि तिथून विषय घसरला तो भुतांकडे !
ढमाले सरांचं म्हणणं होतं की भुतं नसतात.परेश आणि त्याचा खास मित्र नरेश. त्यांचं मत होतं की असतात.
त्यावर वरुण ओरडला,’ अरे खोटारड्या ! भुतं असतात म्हणतोस; तर मग उद्या अंधश्रद्धेविरुद्ध कसं काय बोलणार तू ?’
त्यावर मुलं फिदीफिदी हसली.
वरूणचं म्हणणं होतं, काहीवेळा परिस्थिती अशी असते की ज्याच्यामुळे तुम्ही घाबरता.
मग सर मुलांना ओरडले,’ ए चला, झोपा आता.’
खरं तर बहुतेक मुलं आधीच झोपली होती. रात्रीचं गार लागत होतं. वर्गाची दारं-खिडक्या बंद करूनसुद्धा.
परेश, नरेश यांची मात्र बडबड चालू होती.त्यावर वरुण त्यांना म्हणाला,’ए, तुम्हाला झोप येत नसेल तर बाहेर जा. मैदानावर चक्कर मारा. मांडवात सगळं काही नीट आहे का ते तरी बघा. आणि आम्हाला झोपू द्या ! ’
त्यावर त्यांनी तोंड वाकडं केलं;पण ते दोघे एक टॉर्च आणि काठी घेऊन बाहेर पडले.ते दोघे मैदानाच्या दिशेने जाऊ लागले. मोठमोठ्याने गप्पा मारत.मैदानाकडे जाणारा रस्ता मातीचा होता. दोन्ही बाजूला अशोकाची मोठमोठी झाडं. रात्रीची वेळ, ते दोघेच,तेही शाळेत, त्यात गप्पा. त्यांना जाम मजा येत होती.
अंधार,शांतता अन गार हवा होती. झाडांची सळसळणारी पानं भुतांच्या शेपट्यांसारखी वाटत होती. भितीदायक ! त्या वातावरणामुळे क्षणभर त्यांना असं वाटलं की उगा आलो इकडे. त्यात दोघेच.
ते दोघे मैदानावर पोचले.तिथे उद्याच्या कार्यक्रमाचा मंडप होता. त्यामध्ये विज्ञान प्रयोगांचे छोटे छोटे स्टॉल्स लागणार होते.ते मांडवात शिरले.मांडवात एकच बल्ब होता.परेश शिट्टी वाजवत होता आणि तो बल्ब विझला. त्याची शिट्टी तोंडातच राहिली.आधीच अंधार आणि आता बल्बही अंधारात बुडालेला. त्यांच्या टॉर्चचा प्रकाश खूप अपुरा होता.
त्याचवेळी कोपऱ्यात काहीतरी खसफसलं. त्यांची बोबडीच वळली. ते अंदाजाने बाहेर मैदानावर पळाले.
तर ती खसफसही दूर पळाली. तो एक कुत्रा होता. मांडवात झोपायला आलेला. बिचारा ! राखण करायला आला, तर या पोरांनी त्यालाच पळवून लावलं होतं.
तो कुत्रा आहे हे या दोघांना कळालं,पण तरी त्यांची घाबरगुंडी उडाली होतीच. आता ते नेहमीच्या सवयीप्रमाणे मैदानाच्या रस्त्यावरून शाळेकडे चालू लागले. आणि - शाळाही अंधारात बुडालेली. मागे अंधार पुढे अंधार. काळाकुट्ट ! छातीत धडकी भरवणारा ! अरे बापरे! आता खरी परीक्षा होती. खरं तर त्या भागातले दिवे गेले होते. आता अंधारात इमारतीपर्यंत पोचावं लागणार होतं. सोबतीला अशोकाची झाडं होती,की आणखी कुठली सोबत ? …
अन- एका झाडामागून काही डोकावलं. काहीतरी वेगळं ! विचित्र ! एक आकृती.
दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला व ते घाबरून तिकडे पाहू लागले.पऱ्या घाबरला होता, त्याचा हात खाली झाला होता. त्यामुळे टॉर्चचा प्रकाशही जमिनीवर पडत होता. आणि त्याचा हात थरथरत असल्याने तो प्रकाशही विचित्र हलत होता. भीतीने त्याच्या हातातून टॉर्च खाली पडला, घरंगळत गेला व बंद पडला.
ती आकृती -आकृती कसली ? तो तर हवेत तरंगणारा एक चेहरा होता.नुसताच चेहरा. खाली शरीरच नव्हतं. आणि त्याला चेहरा तरी कसं म्हणायचं? कारण तो विचित्र दिसत होता. त्या चेहऱ्याची ठेवण माणसासारखी नव्हतीच मुळी. काहीतरी वेगळी. विद्रूप ! लालसर चमकणारी.
आणि परेशने कर्णकर्कश्श किंचाळी फोडली आणि त्याबरोबर ती आकृती गायब झाली.पण त्यांनी दोन पावलं पुढे टाकली, तोच ती पुन्हा हजर ! ते थांबले आकृती गायब.पुन्हा ते पुढे,पुन्हा ती हजर. त्यांचा रस्ताच अडवला होता तिने.
परेश भीतीमुळे मोठ्याने ओरडला, ‘ए आईS !’ तर मोहन नुसताच ‘एS’ करून ओरडला.आकृती पुन्हा दिसेनाशी झाली.
तिकडे पोरांचा आवाज ऐकून सर बाहेर आले. त्यांच्याकडे मोबाईल होता अन त्याचा टॉर्च. पण मैदानापर्यँतचं अंतर जास्त होतं.इकडे ती आकृती आता पोरांच्या दिशेने सरकली मात्र, पोरांची गाळण उडाली.
सर पळतच त्यांच्याजवळ पोचले.सरांनी आवाज दिला ,’परेश !’
तशी आकृती गायब झाली व पोरांनी ओ दिली.
‘काय झालं रे?’ सरांनी विचारलं.
‘स-सर- एक आकृती…’
‘कसली आकृती? आकृती नाही न बिकृती नाही ! चला गप.’ असं म्हणत त्यांनी एकदा सारीकडे नजर टाकली. बिनधास्तपणे ! कुठेच काहीच नव्हतं.
आणि सर पोरांना घेऊन शाळेच्या दिशेने निघाले. झपाझप चालत. त्या दोघांना जरा धीर आला.
मध्येच पऱ्याने मागे पाहिलं तर ती आकृती मागून डोकावून त्याच्याकडेच पहात होती. तो पुन्हा ओरडला व पळायला लागला.तसा नऱ्यासुद्धा.
आता सरांनी मागे पाहिलं अन … त्यांनाही ती आकृती दिसली. त्यांच्याकडेच बघणारी. डेंजर चेहऱ्याची !
तसे सर किंचाळले आणि -तेसुद्धा पळत सुटले. जोरात ! त्यांनी मुलांशी पळण्याची स्पर्धाच लावली जणू आणि घाबरण्याचीसुद्धा !
शाळेच्या क्रीडास्पर्धा झाल्या होत्या; नाहीतर ते तिघेही पळण्याच्या स्पर्धेत पहिले आले असते !
ते वर्गात पोचले. सर म्हणाले.’ काही नाही रे! झोपा गप.’
पण ते वरवरचं. त्यांचाही ऊर धपापत होता. पळण्याने आणि भीतीने. मुलांना भीती वाटू नये म्हणून ते स्वतःची भीती लपवत होते.
इकडे झाडामागे ती आकृती हसत सुटली. पण हळूच. तो वरुण होता. त्याने आज ठरवलंच होतं,पोरांना काही करून घाबरंवायचं !... अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या परेशला तर नक्कीच. पण त्या गंमतीत सरांचा सहभाग असेल हे मात्र त्याच्या मनी आलं नव्हतं ना.
त्याने काय केलं होतं? त्याने आधीच काळी पॅन्ट घातली होती.वर काळी घोंगडी पांघरली होती. त्याने घरून आणलेली. ती डोक्याभोवती पक्की गुंडाळली होती आणि टॉर्च छातीजवळ शर्टात अडकवला होता. चालू करून. उभा,प्रकाश वर जाईल असा.
अंधाराच्या पार्श्वभूमीवर काळ्या घोंगडीत सगळं झाकलं गेलेलं. आणि फक्त तोंडावर उभट पडलेला टॉर्चचा प्रकाश. त्यामुळे अंधारात तरंगता लालसर चेहराच काय तो दिसत होता. काळ्या अंधारात काळा पोशाख अदृश्य झाला होता. चेहऱ्याचे उठाव काय ते दिसत होते. वेगळेच.भेसूर. आणि त्याच्यावरच तो प्रकाश. बाकी पूर्ण पूर्ण अंधार; तर ओळखणार तरी कसं गड्याला ?
त्याने घोंगडी दुमडली. टॉर्च खिशात ठेवला. मग तोही निघाला वर्गाकडे. त्याचवेळी दिवे आले.
तो वर्गात पोचला. पऱ्या आणि नऱ्या गोधडीत उडत होते. सर जागे होते. नुकतंच आपण काय पाहिलं यावर त्यांचाही विश्वास बसत नव्हता.वर्गात आलेल्या वरुणकडे त्यांनी अविश्वासाने पाहिलं.
‘काय रे, तू कुठे होतास?’ त्यांनी विचारलं.
त्याने करंगळी वर करून दाखवली.
' त्याच्यासाठी घोंगडी घेऊन ?... एवढी थंडी वाजते होय ? बरं चल, झोप आता.' ते डाफरले.
आता त्याला सरांना घाबरणं भाग होतं, जरी ते मगाशी त्याला घाबरले होते.
त्याने डोक्यावरून घोंगडी घेतली. तो आडवा झाला. त्याला झोपही लागली. आणि मनी वसे ते…त्याला स्वप्न पडलं-त्याचं भूतरहस्य सरांना कळलंय म्हणून. आणि ते कळल्यावर सरांनी त्याला जो काय हाणलाय म्हणता !
मग तो ,’नको ना,नको ना सर’, असं झोपेत म्हणाला आणि कूस बदलून झोपी गेला.
सरांना कळलं, वरुण झोपेत बोलतोय म्हणून ! का ? ते मात्र कळेना. की त्यालाही ती आकृती दिसली? तरीही सरांनी दुर्लक्ष केलं आणि ते डोक्यावरून गोधडी घेऊन गुडूप झाले.
वरुणची आकृतीही घोंगडीत गाढ झोपी गेली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
26 Feb 2024 - 8:15 am | बिपीन सुरेश सांगळे
नमस्कार
उद्या मराठी भाषा गौरव दिन
परवा विज्ञान दिन
यानिमित्त खास
26 Feb 2024 - 4:24 pm | कर्नलतपस्वी
कथा आवडली.
26 Feb 2024 - 9:19 pm | मुक्त विहारि
पण, चुकूनही हा प्रयोग करु नका..
माझ्या 'अ" नावाच्या एका मित्राने, "ब" नावाच्या दुसऱ्या मित्रावर हा प्रयोग केला होता.
"ब" नावाच्या मित्राला फेफरे आले. सुदैवाने "ब" वाचला आणि "अ" खुप दिवस अबोल झाला होता.
27 Feb 2024 - 4:02 pm | श्वेता व्यास
आवडली कथा.