द होल ट्रूथ!

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
21 Feb 2024 - 12:54 pm

जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही.
“चल, काहीतरी पिऊया.”
“नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.”
“मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.”
दिवस मावळतीला आला होता. आता सुटका नव्हती. पक्या जे काय बोलेल ते ऐकायचे.
“पक्या, राजकारण सोडून दुसरं काही बोलणार असशील तर येतो.”
“माहिती आहे.”
अखेर पक्या मला हॉटेलात घेऊन गेलाच. मला न विचारताच त्याने कोकची ऑर्डर पण दिली.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शेवटी तो वळणावर आला.
“काल मी है ना ट्विटर—ओके—X वाचत होतो. बघतो काय तर एक ओपिनिअन पोल बघितला...”
“आलास ना राजकारणावर शेवटी.” मी वैतागून बोललो.
“राजकारण नाही रे बाबा. पोल अशाबद्दल होता कि ह्या स्ट्राला किती भोकं आहेत...”
हातातल्या स्ट्राला बारकाईने न्याहळत पक्या बोलला. अच्छा ह्यासाठी कोक हं.
“काय एकेक लोकं असतात. ह्यात पोल कसला घ्यायचा. ड्रिंकिंग स्ट्राला दोन भोकं. एक खाली आणि एक वर. खालून कोकाकोला आत येणार आणि वरून आपण पिणार. झालं?”
“केलीस ना घाई आणि फसलास. ह्या प्रश्नाला चॉईस काय होते?”
(१)एक
(२)दोन
(३)शून्य
(४)अगणित – इंफायनीट
(३)शून्य आणि (४)अगणित असे मत देणारे लोक मोजकेच होते. पण “एक” आणि “दोन” म्हणणाऱ्या पार्ट्या तोडीस तोड होत्या.”
हे स्ट्रा प्रकरण इंटरेस्टिंग होत चाललं होतं.
स्ट्राला भोक नाही म्हणणाऱ्यांच्या मताने...
जर स्ट्राला तिच्या लांबीवरून कापले तर काय होते? स्ट्राचे रुपांतर प्लास्टिकच्या “शीट” मध्ये होते. म्हणजे कागदाच्या एका तुकड्यापासून आपण एक भोक बनवू शकतो. कुठे गेली स्ट्राची भोके? कमाल आहे कात्रीची. कात्रीने भोकालाच कापून टाकले! हा, स्ट्राला तुम्ही एका टाचणीने, सुईने भोक पाडू शकता. पण स्ट्राला स्वतःला असे भोक नाहीये.
मग “अगणिक”वाल्यांचे काय म्हणणे आहे? ते पण कात्री घेतात आणि स्ट्राचे दोन तुकडे करतात. आता किती भोक झाली? चार! पहा कात्रीची कमाल. दोन भोकांची चार भोकं केली. असे करत करत गेलात तर तुम्ही “लिमिट” मध्ये इंफिनिटीला पोहोचाल. स्ट्रा म्हणजे काही नाही हो एका वर्तुळावर दुसरे वर्तुळ. त्यावर अजून वर्तुळे. एका वॉशरवर अनेक वॉशर ठेवले कि झाली स्ट्रा तयार.
एका वॉशरला एक भोक. अशी भोकावर भोके ठेवली कि जे तयार होते त्याला म्हणायचं “स्ट्रा.”
पण ह्या वादाच्या आधी आपण एक गोष्ट विसरलो. ती म्हणजे “रंध्र” ह्या संकल्पनेची व्याख्या.
हाही एक वादाचा विषय. काहीतरी आहे ते “रंध्र” का काहीतरी नाही त्याला “रंध्र” म्हणायचे? ज्यात आपण “काहीतरी” भरू शकतो किंवा ज्यातून “काहीतरी” आरपार जाऊ शकते. मग जमिनीत खणलेला खड्डा, किंवा पाण्याचा ग्लास वा बाटली? त्याला शास्त्रज्ञ कॅवीटी म्हणतात.
पोकळी. गणिती व्याख्ख्या गणिताच्या पुस्तकात राहू द्यात. कारण?
( व्यवहारातील व्याख्ख्या.
जेव्हा उत्तुंग व्यक्तिमत्व जगाचा निरोप घेते तेव्हा मागे उरते ती पोकळी. ही कधीही भरून येण्यासारखी नसते. आणि जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्याबोळ वाजतो तेव्हा ज्ञानी लोक म्हणतात, “अर्थव्यवस्थेला भोक पडले आहे आणि त्यातून गळती सुरु झाली आहे.”
देशाचे सरकार बदलले कि भोक बुजवता येईल.)
तर ग्लासला “भोक”म्हणणे सयुक्तिक आहेका? समजा आपण ग्लास वरून दाबत गेलो तर एक वेळ अशी येईल कि ग्लासचे “भोकपण” नाहीसे होईल काय उरेल तर काचेची एक चकती. त्याचप्रमाणे आपण स्ट्रा वरून दाबत गेलो तर खाली उरेल अंगठी. म्हणजे स्ट्राचे रंध्र नाहीसे झाले नाही. किंबहुधा स्ट्राचे रुपांतर भोकात झाले आहे. ह्याचा आधार घेऊन आपण रंध्राची व्याख्ख्या करू शकतो.
रंध्र एखाद्या वस्तूला, संकल्पनेला बिंदूत परिवर्तल होऊ देत नाही.
आपण स्ट्राला थोडा वेळ बाजूला ठेवूया. कारण पक्याने आता दोन प्लेट “भोकं” ऑर्डर केली आहेत. म्हणजे मेदू वडा. मेदू वड्याला एकच भोक आहे ह्यावर कुणाचे दुमत नसावे. मेदू वड्याचा दूSSSSरचा इंग्लिश नातेवाईक डोनट. त्यालाही एकच भोक. आपल्या कानाडी कडबोळ्यालाही.
एक मिनिट. काही सुगरणी दोन भोकं असलेलं कडबोळं बनवू शकतात. एक आपल्याला दिसते ते आणि दुसरे कडबोळ्याची पोकळ नळी. जिलबी सुद्धा आतून पोकळ असते. ह्या “पोकळीला देखील गणिती शास्त्रज्ञ भोक म्हणतात. कारण? कारण तेच. जे वर सांगितले आहे तेच. हे गणिती शास्त्रज्ञ चवीने खाण्या ऐवजी भोकं शोधात बसतात. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण ह्यांच्या दृष्टीने कॉफीचा मग आणि डोनट ह्यांमध्ये काही फरक नाही. का? पण तो दुसऱ्या लेखाचा विषय आहे.
अवांतर सोडून देऊ या आणि मूळ मुद्द्याकडे वळूया.
स्ट्राला भोके किती?
“दोन”वाल्या पार्टीचे म्हणणे आपण ऐकले. वर्तुळाला एक भोक असते.( वर्तुळ हेच एक भोक आहे!) ह्या न्यायाने स्ट्राला एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक अशी दोन वर्तुळे आहेत म्हणजे दोन भोके आहेत. म्हणजे ह्यांच्या दृष्टीने ग्लासला एक भोक आहे!
गणिती संकल्पनेनुसार स्ट्रा म्हणजे एक वर्तुळ आणि एक लांबी (length) ह्यांचा समन्वय –गुणाकार- आहे. लांबीला (length) रंध्र नसते. आणि एक वर्तुळ म्हणजे एक रंध्र!
गणितज्ञांचा हा निर्णय आहे. पहा तुम्हाला पटतोय का.
ह्या शास्त्राचे नाव आहे टोपॉलॉजी. टोपॉलॉजी हा आता निव्वळ गणिताचा विषय राहिलेला नाहीये. तर त्याला आता विज्ञानात मानाचे स्थान मिळाले आहे. तीन टोपॉलॉजीस्टना विज्ञानाचे नोबल मिळाले होते. कारण त्यांनी केलेल्या संशोधनाने विज्ञानाची काही कोडी सोडवण्यास मदत झाली होती. विषय धोडा गहन आहे पण करमणूक म्हणून वाचायला काय हरकत आहे?
(समाप्त)

विज्ञान

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

21 Feb 2024 - 2:24 pm | श्वेता व्यास

विषय धोडा गहन आहे पण करमणूक म्हणून वाचायला काय हरकत आहे?
गहन करमणूक आवडली.

भागो's picture

21 Feb 2024 - 10:27 pm | भागो

अनेक आभार श्वेताजी.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2024 - 3:03 pm | अमरेंद्र बाहुबली

डोक्याचा भूगा झाला.

भागो's picture

21 Feb 2024 - 10:30 pm | भागो

अमरेंद्र बाहुबली
असे नका लिहू. तुमचा मेंडू सॉलिड आहे, सॉलिड राहील!

मला लिंबूपाणी घ्यायची वेळ आली!!
:)

भागो's picture

21 Feb 2024 - 10:32 pm | भागो

Bhakti
लिंबूपाणी straw वापरून प्या. खूप छान लागेल.

नठ्यारा's picture

21 Feb 2024 - 6:28 pm | नठ्यारा

वर अमरेंद्र बहुबलींनी म्हटलंय तशा धर्तीवर डोक्याचं भोक झालंय पार. म्हंटलं आता होऊन जाऊदेच.

हां, तर काय म्हणंत होतो की, जर कात्रीने नळी कापून दोनाची चार भोकं होतात, तर ती खरी भोकं नाहीतंच. ती मायावी ( pseudo holes ) आहेत. खरं भोक एकंच असतं आणि ते मोबियस पट्टीस असतं. तिला घेरावरून कात्रीने कापलं तरी एकंच भोक राहतं.

ही पहा अशी दिसते मोबियस पट्टी : https://en.wikipedia.org/wiki/M%C3%B6bius_strip

केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ).

-नाठाळ नठ्या

भागो's picture

21 Feb 2024 - 10:24 pm | भागो

डोक्याला भोक!
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पूर्वीच्या काळी - फार

फार वर्षांपूर्वी - कवटीला भोक पाडणे हा डोकेदुखीवर

रामबाण इलाज असावा किंवा भूतबाधा झाली

असल्यास भुताला बाहेर जाण्यासाठी मार्ग काढावा

अशी कल्पना असावी. अश्या भोक असलेल्या कवट्या

उत्खननात सापडल्या आहे! ह्याला ट्रेपानेशन असे नाव

आहे.
मोबिअस स्ट्रीप हा अजून एक आश्चर्यजनक आणि

गूढ प्रकार आहे. कागदाची एक पट्टी घेऊन ट्विस्ट

करून त्याची टोके एकमेकाना जोडली कि झाली

मोबिअस स्ट्रीप. हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ह्या
स्ट्रीपचे वैशिष्ट्य कि हिच्या मनात एक आणि बाहेर

एक असे नसते. तुम्ही जर बाहेर सुरवात करून

प्रदक्षिणा करायला सुरवात केली तर शेवटी तुम्ही आत

पोचता. आणि आतून सुरवात केली तर बाहेर येता.

तसेच तुम्ही उजवा हात वापरणारे असाल तर

प्रदक्षिणेच्या शेवटी तुम्ही डावखोरे व्हाल! गुरुवर्य

नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या

संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी

पुस्तक नाहीये. कुणाला आठवत असेल तर इथे लिहा.

केवळ एकंच मर्यादारेखा ( boundary curve ) असल्याने हीच खरं भोक आहे (, असा माझा दावा आहे ).

-नाठाळ नठ्या>>>
विचार करण्यासारखा मुद्दा. A twisted hole!?

अहिरावण's picture

21 Feb 2024 - 7:38 pm | अहिरावण

शेवटी भोक महत्वाचे असते हे नक्की

समजलं. ह्या भोकपुराणात थोडे अवांतर भोकमहात्म्य.
खिडकी हे भिंतीचे भोक आहे. पहा- अमरकोष
विंडो वातायनं खिडकी भिंतीचे भोक ते बरे||

nanaba's picture

22 Feb 2024 - 4:03 am | nanaba

आवडली

भागो's picture

22 Feb 2024 - 9:41 pm | भागो

ओके!

चित्रगुप्त's picture

22 Feb 2024 - 5:10 am | चित्रगुप्त

ही गहन करमणूक खूपच रोचक आहे. असे क्वचितच वाचायला मिळते. असे आणखी अवश्य लिहीत रहावे.
'कॅव्हिटी' चा मराठी समानार्थी शब्द 'पोकळी' च्या ऐवजी 'खड्डा' जास्त चपखल वाटतो.
'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ? तसेच त्याला ब्लेडने लांबीच्या दिशेने कापत गेले तर कोणता आकार निर्माण होइल ?
किंवा त्या नळीची दोन्ही टोके हुबेहुब जुळवून चिकटवण्याऐवजी जरा अंतर/फट ठेऊन चिकटवली तर किती भोके/फटी निर्माण होतील ? खड्डा, छिद्र, भोक, फट, चीर, यात काय फरक आहे ? 'फट म्हणता ब्रम्हहत्या' म्हणजे काय ? अश्या अनेक प्रश्नांचा गुंता झालेला आहे.
-- एकाद्या दोरीचा गुंता झाला तर किती भोके/फटी असतील ? तोच गुंता नळीच्या झाला तर ? शेकडो बारीक दोरे एकत्र पिळून केलेल्या दोरखंडाला किती फटी असतात ? स्ट्रॉ' ला मधोमध एकादे मोठे भोक करून मग त्यातून 'कोक' ओढला तर तो तोंडात जाईल की त्या भोकातून बाहेस सांडेल ? एकाऐवजी एकमेकांपासून काही अंतरावर दोन लहान मोठी भोके केली तर कोक कुठून निघेल ? भोक, कोक, आणि कोकशास्त्र यांचा काय संबंध आहे ?
-- कागदाचे दोन तुकडे एकावर एक बरोबर जुळवून त्यांना आठ भोके केली तर त्या वस्तूला एकूण किती भोके आहेत ? मग ते दोन तुकडे जरा सरकावून- भोकावर भोक येणार नाही असे जुळवून एकमेकांना घट्ट चिटवून टाकले तर ती भोके कुठे गेली ? सोळा भोकांऐवजी सोळा 'खड्डे' निर्माण झाले असे म्हणता येईल का ?

खूप अवघड पेपर काढला आहे. निषेध!
एक उत्तर माहित आहे.
'स्ट्रॉ' च्या ऐवजी रबरी नळीचा तुकडा घेऊन त्याची दोन्ही टोके जुळवून चिकटवून टाकली तर किती भोके होतील ?>>>
ह्यालाच टोरस म्हणतात. ह्याला एकच भोक आहे.
सोरी
नाही म्हणजे दोन भोके आहेत. एक भोक बाहेरचे. जसे मेदू वड्याला मधे असते ते. आणि दुसरे पोकळ नळीचे.

नठ्यारा's picture

22 Feb 2024 - 9:36 pm | नठ्यारा

भागो,

A twisted hole!?

स्वबद्धपीळछिद्र .... ? A twisted hole bound by itself .... ?

-नाठाळ नठ्या

भागो's picture

22 Feb 2024 - 9:40 pm | भागो

yes. Why not?

राघव's picture

22 Feb 2024 - 9:54 pm | राघव

इंटरेस्टींग! वाचतोय.

शेवटी कुणाला भोकात जा म्हणायची देखील सोय राहिलेली नाही हेच खरे. :-)

नठ्यारा's picture

22 Feb 2024 - 10:01 pm | नठ्यारा

भागो,

नारळीकरांनी -मला आठवतंय त्यानुसार ह्या संकल्पनेवर एक सुंदर कथा लिहिली आहे. हाताशी

तुम्ही म्हणता ती कथा 'उजव्या सोंडेचा गणपती' आहे. ती नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' या विज्ञानकथासंग्रहातली आहे. लहानपणी मी तिचं अनेक वेळा पारायण केल्याचं आठवतं. तरीपण मोबियस पट्टीवर उजव्याचा डावा कसा होतो ते माझ्या चिमुकल्या मेंदूत शिरायचं नाही. शेवटी तरुणपणी ओरियेंटेबल सरफेसची गणिती व्याख्या बघितल्यावर उलगडा झाला. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल तुमचे खास आभार! :-)

-नाठाळ नठ्या

अवांतर : परसदारी हे सापडलं : https://www.misalpav.com/node/38786

श्वेता व्यास's picture

23 Feb 2024 - 9:56 am | श्वेता व्यास

परसदारी हे सापडलं
+१ मलाही मोबियस नाव ऐकलं की या अनुवादित कादंबरीची आठवण होते.