व्ही फॉर - भाग तीन

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Feb 2024 - 9:09 pm

व्ही फॉर - भाग तीन
----------------------------
रियाला किडनॅप केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं होतं . बापरे! साधी मध्यमवर्गीय माणसं ती . घाबरलीच . पोरीला किडनॅप केलं, त्यात तो नामचीन गुंडा ! पण पुढे त्यांच्या कानावर असं आलं की त्याच्यावर हल्ला झालाय . तो वाचेल याची शक्यता फारच कमी आहे. पण त्यांनी एक केलं . त्या क्षणापासून त्यांनी रियासाठी स्थळ बघायची सुरुवात केली.

पण दिप्या त्याच्यातून वाचला. तो वाचणारच होता . त्याची इच्छाशक्ती जबर होती आणि अंगातली रगही !

पण गडी पार काडी झाला होता . त्यातून बाहेर पडायला त्याला खूप दिवस लागले . पण त्यावेळी मोठा भाईने त्याला मदत केली. सगळीच मदत . त्याला खूप सांभाळून घेतलं .

पण त्यामुळे दिप्याला लाईन सोडायची कधी तेच कळेना. तो चक्कर झाला .

पण तो धीर करून एकदा भाईशी बोलला ,' भाई, मला ही लाईन सोडायची आहे . '

मोठा भाई सहृदय होता . तो म्हणाला, ' पण ही लाईन सोडून तू काय करू शकतोस ? याचा विचार तू केला आहेस कधी ? आणि लाईन सोडल्यावर त्या चवलीपावली पोरीशी लग्न करायला आपले दुश्मन जिवंत ठेवणार आहेत का तुला ? तू लग्न करशील त्या गरीब पोरीशी आणि ती बिचारी विधवा होईल ! ... '

त्यावर दिप्या निरुत्तर झाला . तरीही त्याने लाईन सोडायचं ठरवलं होतं ; पण त्याच वेळी त्याची आई खूप आजारी पडली. तेव्हा पुन्हा मोठा भाईने त्याला सगळी मदत केली . दवाखान्याचा मोठा खर्च होता. तो केला नसता तर दिप्याची आई काही वाचली नसती .

तेव्हा दिप्या भाईच्या आणखी जवळ आला . आता मात्र तो भाईसाठी जीव द्यायलाही तयार होता. आणि हळूहळू तो भाईचा खास माणूस झाला .

गॅंगला जरा बरे दिवस आले होते . दोन-चार मोठी डील्स झाली होती . पोरांच्या खिशात पैसा खुळखुळत होता. पोरं खूष होती . ती ऐश करत होती .

त्याचवेळी मोठा भाईचा गेम झाला होता.
दिप्याचा दिप्याभाई झाला होता आणि ...
रियाचं लग्न ठरलं होतं.

आता दिप्याला बदला घ्यायचा होता ... दोघांना खलास करायचं होतं. दोघं म्हणजे, त्यातला एक प्रतिस्पर्धी गँगचा राईट हॅन्ड आणि दुसरा म्हणजे ... रियाचा होणारा नवरा ...

दोघांना उडवायचं नक्की होतं. फक्त कोणाला आधी ? तो प्रश्न होता.

पण त्याचं मन विचार करू लागलं . रियाच्या नवऱ्याला मारायचं ? … त्याला वाटलं कोणीही हेच काम करेल , असलंच काम करेल; पण आपण असं करायचं का ? जरी आपण गुन्हेगार असलो तरी आपण पशूच्या पातळीवर का उतरायचं? तसं केलं तर बाकीच्या भाईंमध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय ?

या विचाराने त्याला खूप त्रास झाला . रियाला तो कायमचं गमावणार होता. काय करावं त्याला कळेना ; पण त्याने कामात लक्ष घातलं .कारण आता तोच मोठा भाई होता . गॅंगची पोरं आता त्याच्यावर अवलंबून होती . पोटासाठी ! नाहीतर त्यांचे हाल तर कुत्र्यानेही खाल्ले नसते . कुत्र्याच्या मौतीने मेले असते भाडखाव ! साले छटाक ! मोठा भाई होता म्हणून छाती फुगवून चालायचे . आता गेली होती शेपटी खाली साल्यांची ! आता त्यांची भिस्त दिप्याभाईंवरच तर होती .

त्याने मनाच्या मखमली कोपऱ्यात रियाची आठवण नाजूकपणे बाजूला ठेवून दिली .

तो पूर्णपणे कामाकडे वळला . मोठा भाई गेल्यामुळे बाकीच्या गॅंग डोकं वर काढायला लागल्या होत्या. त्यांनाही धक्का द्यायची गरज होती.

सगळ्यात आधी त्याने आर टोळीचा उजवा हात उडवला . त्यानंतर त्याने एका ठरलेल्या ठिकाणी फोन केला आणि प्रॉब्लेम झाला. त्याने बापूंना फोन केला होता. बापू मंत्री होते.
त्यांचं खरं आश्रयस्थान ! त्याने खून केल्याचं सांगितलं.

तेव्हा ते म्हणाले ,'दिप्या ,सध्या पक्षात माझीच अवस्था बिकट आहे . आत्ता मी तुला मदत करू शकत नाही . तुझं तू बघ ! नाहीतर गायब हो काही दिवस तरी. ‘

दिप्याला पहिल्यांदाच एकटं पडल्यासारखं वाटलं.

बापू खरं बोलत होते का खोटं ते माहीत नाही. पण थोडक्यात बापूंचा आधार नाही , मोठा भाई नाही आणि रिया- ती तर कायमचीच दुरावणार होती .

त्याच्या मनाचा पक्षी एकटाच नैराश्याच्या आभाळात उडत राहिला .

त्याने पोरांशी सल्ला मसलत केली आणि तो फरार झाला .

पुढे मात्र सगळा अंधारच होता.
XXX
क्रमश:

हे ठिकाण

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2024 - 10:55 pm | चौथा कोनाडा

रोचक भाग होता हा !

लेखनशैली छानच !

कर्नलतपस्वी's picture

25 Feb 2024 - 4:49 pm | कर्नलतपस्वी

पुभाप्र.