पैज.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
12 Feb 2024 - 8:37 am

मी आपला माझ्याच धून मध्ये गाडी चालवत होतो. शिल्पा रावची गाणी ऐकत.
कलंक नाही...
हवाके साथ साथ. घटाके संग संग. रस्ता असा कि जणू तेरी चाल है नागीन जैसी.
माझी गाडी म्हणजे जुना खटारा. मेकानिक म्हणतो, “आता बस झालं. मी पण कंटाळलो. मोडीत काढा. कंडम गाडी. भंगार मध्ये टाका. दुसरी घ्यायला झालीय.”
अरे वा रे वा. ह्या गाडीचा आणि माझा जनम जनम का रिश्ता आहे. तिला अशी कशी टाकून देऊ? माझी जीवन साथी. कधी कधी रुसते पण थोडी मरम्मत केली तेल पाणी टाकले कि लगेच हसते.
तेव्हड्यात एका भारी गाडीने मला ओव्हरटेक केलं.
माझ्या समोरच ती जात होती. लेटेस्ट टॉप मॉडेल.
एक तरुणी ती गाडी चालवत होती. ओव्हरटेक करताना तिने काच खाली केली. हसून मला हाय हॅलो केलं. ओझरतं दर्शन दिलं.
दोन गोष्टी डोळ्यात भरल्या. एक म्हणजे तिची मिररशेड्स आणि दुसरी म्हणजे वाऱ्यावर भुरू भुरू उडणाऱ्या केसांच्या बटा.
तिच्या हास्याने गरीब बिचारा मी सस्त्यात विकला गेलो.
पुढची गाडी इतकी क्लास मग चालवणारी तशीच असणार.
समोरचीने ब्रेक लावला. मी पण ब्रेक लावला.
समोरचीने वेग पकडला. मी पण वेग पकडला.
समोरचीने डावा सिग्नल दिला. मी पण डावा सिग्नल दिला.
समोरचीने हॉर्न दिला. मी पण हॉर्न दिला.
असा मी तिला फालो करत चाललो होतो. गुलामासारखा. भारून गेलेला मी.
आमच्या समोर एक बारा चाकी ट्रेलर हळू हळू चालला होता. आमच्या मार्गात अडसर झाला होता.
बहुतेक तिच्या बाबांचा असावा.
तिने लेन बदलली. मी पण बदलली.
एके ठिकाणी मात्र धमाल झाली.
तिने उजव्या बाजूला जायचा सिग्नल दिला. मी नाही दिला कारण मला डाव्या बाजूला वळायचे होते. इतकीच साथ संगत होती.
जा, बाई जा.
लिव्ह लॉंग. प्रॉस्पर. बी हॅपी.
अहो महादाश्चर्यम्! तीही डाव्या बाजूला वळली.
जणू काय ती माझ्या पुढं पुढं करत होती. मला लीड करत होती. खुणावत होती.
आता मात्र तिने खरच वेग पकडला. मी पण वेग वाढवला. पण तो तद्दन मूर्खपणा होता. तिच्या लेक्सस समोर माझी जुनी फियाट! मी काय शर्यत जिंकाणार?
अगदी माझ्या नजरे समोर लेक्सस हळू हळू अदृश्य झाली.
चला. सुंठीवाचून खोकला गेला. खोकला? नाही हा शब्द बरोबर नाही.
ह्या सगळ्या प्रकरणात मी भुकेला आहे हे पार विसरून गेलो होतो. किमान चहा तरी मिळावा म्हणून जीव तरस रहा था.
अखेर एक हॉटेल दिसलं. मी फियाट आत घेतली बघतो तो काय लेक्सस तिथेच पार्क केलेली होती. आख्ख्या हॉटेलमध्ये ती एकटीच होती. मी सरळ तिच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसलो.
तिने डोळ्यावर मिररशेड घातला होता. त्यातून ती माझ्या आरपार बघत होती. समोर अर्धवट खाल्लेला पिझ्झा पडला होता. कोकचे मंद मंद घुटके घेत होती.
माझ्या येण्याची वाट पहात बसली होती.
वेटर आला.
तिने कोक आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. मी पण कोक आणि पिझ्झा ऑर्डर केला. मला खरतर चहा पाहिजे होता. पण आता तिनं माझा ताबा घेतला होता. मी माझं मी पण हरवून बसलो होतो. मी माझा राहिलो नव्हतो.
माझं खाणं होईपर्यंत ती पण बसून राहिली. माझी वाट बघत.
आम्ही दोघही बरोबर उठलो. मी चपळाईने तिच्या आधी गल्ल्यावर पोहोचलो.
“दोघांचे बिल सांगा.” मालकाने वेटरला हाक मारली.
वेटरने सांकेतिक भाषेत रक्कम सांगितली.
मी बिल चुकते करण्यासाठी खिशात हात घातला. पाकीट गायब. पुढचे, मागचे, वरचे, खालचे सगळे खिसे चाचपडले. पण पाकीट गायब! चुकून गाडीतच राहिले असणार.
मी वळलो, ती माझ्या मागेच उभी होती. तिच्या हातात माझं पाकीट होतं.
कदाचित माझं खाली पाडलेलं पाकीट हिनं उचललेलं असणार. नाही ते तसं नव्हत. कारण तिनं मला माझं रिस्टवॉच, माझी अंगठी, माझ्या बुटाच्या लेसेसही परत केल्या.
“बाबू चश्मेवाल्याकडे एक वर्ष उमेदवारी केली आहे.”
आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
घाट सुरु झाला होता.
घाट माथ्यावर पोचल्यावर तिने गाडी कडेला घेतली. मला पण घ्यावी लागली कारण पेट्रोल संपले होते.
ती कठड्यावर रेलून खालच्या दरीकडे एकटक बघत होती. शिअर फिफ्टीन हंड्रेड फीट द्रॉप. जीवाचा थरकाप उडवणारा.
“केव्हढी खोल आहे ही दरी.”
“तुमची इच्छा असेल तर आपण ही दरी पार करू शकतो.” मी बोललो पण मनातल्या मनात.
तिनं मिररशेड केसावर चढवली. मावळत्या दिनकराच्या जीवघेण्या संधिप्रकाशात तिचे डोळे चमकले.
“खरच?”
“अगदी.”
“इथून कोणी उडी मारली तर खाली पोचायला किती वेळ लागेल? एनी आयडिया?”
मी माझा मोबाईल काढला. “g” ची किंमत बघितली. सूर्याचे वेध घेतले. थोडी आकडेमोड केली. काहीतरी एक फिगर सांगितली.
“तेव्हढ्या वेळात तर मी पण गाडीने खाली पोहोचू शकेन.”
“काहीतरीच. ते कसं शक्य आहे?” मी हसून तिला डिवचलं.
“लगी शर्त?”
“हा लगी.” मी पण इरेस पेटलो.
“मग बघ. नीट बघ. त्या जागेला पळसधारा म्हणतात. हेअरपिन बेंड आहे. तो बघ तो फार्मा कंपनीचा पन्नास फूट बाय शंभर फूट चा बिलबोर्ड. तू इथून उडी मार नि माझी गाडी घेऊन निघते. माझी लाडकी लेक्सस!” आता ती एकेरी बोलायला लागली, “अरे तुझ्या आधी तेथे जाऊन तुझी वाट बघत राहीन. वेळेवर ये नाहीतर उशीर करशील.”
“अग, तुझ्या लेक्ससच्या आधी माझी धरणीमाता मला तिथे घेऊन जाईल. पण पैज जिंकणाऱ्याला बक्षिस?”
“बक्षिस? जर मी जिंकले तर मी तुझ्याशी लग्न करेन. जर तू जिंकलास तर तू माझ्याशी लग्न करशील. मंजूर?”
ती मला कुठे घेऊन चालली होती काय माहित.
“अरे, मी आयुष्यात कधी हरली नाय. तेव्हा जिंकायचं असेल तर जीव पणाला लाव. पण जरा जपून.” असा बेदरकारपणा आणि असा लाघवीपणा.
ती गाडीत बसली. मी रस्त्याच्या कठड्यावर उभा राहून उडी मारायच्या तयारीत.
तिनं गाडी चालू केली.
“एक दो तीन!”
खाली पडताना एक गोष्ट मला आठवली. जिच्या साठी ही उडी मी मारली तिचे नाव विचारायचे राहून गेले.
अशी युगानुयुगे गेली.
मी जेव्हा पळसधारा पॉइंटला अलगद खाली उतरलो तेव्हा तिथले दृश्य हृदयद्रावक होते. काहीतरी आक्रीत घडले होते. लेक्ससचा बारा चाकी ट्रेलरचा आठव्या चाकाखाली चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर ती पडली होती.
अजूनही मंद मंद वाऱ्यावर तिचे केस भुरू भुरू उडत होते. मिररशेड्स बेवारशी पडली होती. बाजूलाच पोलिसांची गाडी नि अन्ब्युलंस उभी होती. पोलीस खडूने रेघा मारत होते. टेपने अंतर मोजत होते. कुणीतरी तिच्या अंगावर चादर टाकली. मला भडभडून आले. डोळ्यात अश्रूंची दाटी झाली.
“जिंकलीस ग जिंकलीस. शेवटची पैजही तूच जिंकलीस.”
कुणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला.
“अरे वेड्या, रडतोस काय. ही मी इथे आहे.”
मी वळून मागे बघितले. मागे ती हसत उभी होती.
“माझ्या एका शब्दाखातर उडी मारलीस! मी हरले. तूच जिंकलास.”
तर कोण जिंकले?
बाजूच्या झाडावर चिऊताई बसली होती. ती चिवचिवली.
“भांडू नका. भांडू नका. तुम्ही दोघेही जिंकलात. आता ह्या मोहाच्या झाडावर न भांडता सुखेनैव नांदा सौख्यभरे.”

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

12 Feb 2024 - 12:03 pm | कर्नलतपस्वी

तुमची कथा वाचताना एका हिन्दी गाण्याची आठवण झाली. पण ते गाणं वरून खाली न वाचता खालून वर वाचलं तर तुमची कथा ठरेल.

तेरे प्यार का आसरा चाहता हु
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हु

भागो's picture

12 Feb 2024 - 7:34 pm | भागो

कर्नलसाहेब,
व्हफा ?
हे लोक तर शेवटची परिक्षा पास झाले.

श्वेता व्यास's picture

12 Feb 2024 - 12:32 pm | श्वेता व्यास

छान! आवडली कथा.

कर्नलसाहेब, श्वेताजी,
आभार!